Monday, February 1, 2010

अनाथांची माय

एक झोळी पाठीवरती
एक शिळीपाकी पोळी
भीक मागत्या हातावरती
मातृत्वाच्या ओळी

कुरवाळल्या रातीचा
अंधार मनाला जाळी
अंगावरचा पान्हा सुकला
सुकल्या पान्ह्याची होळी

माय असते बिना नखांची
ती वांझोटे कुरवाळी
दोन अश्रू स्तनातले
बाळाच्या ओठी ढाळी

केली उकीरडयात रिकामी
भरलेली झोळी
मातृत्व कुणाचे पोटी
दातृत्व कुणाच्या भाळी

माय! तिला फुटतो पान्हा
ऐकुन ती कींकाळी
कोण कुणाची खळगी भरतो?
परी तो मेघ तू हो आभाळी

कितीक तोंडे पाठीवरली
ह्रुदयाशी कवटाळी
घास नको घासातला
ती मागते शीळी पोळी.

-सत्यजित.