Wednesday, February 16, 2011

साजन गये परदेस....

पापण्यांत जपले मी
मेघ तुझ्या डोळ्यातले
वाहू कधी दिले नाही
भाव तुझ्या मनातले

दारातून पाहते मी
पाऊस गं दूरातला
डोळ्यातून वाहू लागे
अबोल पाउस आतला

होऊ लागले पिवळे
पान गुलाबी कोवळे
पुसाया अश्रू माझे
मेघ गालावरती ढळे

सांग कितीदा आखू मी
तू लांधलेली वेस
वेशीच्या अल्याड माझा
आपलासा परदेस

कुठली ती वाट सांग
मज तुजपाशी नेई?
वाटाड्या वाटूलीशी
असं वैर का गं घेई?

आळले नाहीत मेघ
जरी भेगाळली धरा
माझा पाचोळा वाहण्या
तुझाच असावा वारा

-सत्यजित.