उन्ह कोवळं कोवळं
तुझ्या कांतीहुन सावळं
तुझ्या ओल्या केसां मध्ये
दडे दवाचं सोवळं
तुझ्या पापणीशी झुले
एक दवबिंदू प्यारा
तुझ्या पापण्यांनी उडे
फुलपाखरी मोहोळ
चुके क्षणांचा मेळ
कधी येते सांजवेळ
दूर तारकांस मिळे
तुझा प्रकाश नितळ
जेंव्हा फुलारून येते
नभी नक्षत्रांची वेल
अन रात काळी होते
डोह डोळ्यांचे काजळ
माझ्या मनात उठले
भाव-विभोर तुफान
घाल थोडीशी फुंकर
बघ क्षमेल वादळ
-सत्यजित.
--------------------------------------------------------------------------------------
माझी कविता मलाच उलघडते तेंव्हा...
उन्ह कोवळं कोवळं
तुझ्या कांतीहुन सावळं
तुझ्या ओल्या केसां मध्ये
दडे दवाचं सोवळं
एका सुंदरश्या सकाळी नववधू प्रमाणे दवाचा घुंगटा ओढुन बसलेली धरा, तिचा घुंगटा उलघडण्यासाठी आतुर झालेली सुर्याची कोवळी किरण पुढे सरसावतात आणि तू दिसतेस. आत्ता न्हाउन निघालेली, ओले केस हळुवार बांधलेली. त्या सोनेरी किरणां पेक्षा तुझं रुप अधिक मोहक दिसतंय आणि वाटतंय...
तुझ्या पापणीशी झुले
एक दवबिंदू प्यारा
तुझ्या पापण्यांनी उडे
फुलपाखरी मोहोळ
तुझ्या केसातील पाण्याचा एक थेंब कुठे तरी लगबगीने निघालाय, आणि तुझे सुंदर डोळे पाहताच तुझ्या पापणीवर स्थिरावलाय, तुझ्या पापणीवर स्थिरावलेला हा थेंब गुलाबाच्या पाकळ्यांवरील दबबिंदू सारखा दिसतो आहे. त्याच्या ह्या धिटाईला दटावण्या साठी तू पापण्यांची उघडझाप करतेस आणि माझ्या अंतरंगात अनेक फुलपाखरं उडु लागतात....
चुके क्षणांचा मेळ
कधी येते सांजवेळ
दूर तारकांस मिळे
तुझा प्रकाश नितळ
वेळेचं भान राहीलं नाही, कितीसे क्षण एका क्षणात सामावुन गेले आहे "एक पल में जींली जिंदगी सारी", मी पार हरवुन गेलो आहे. हळुवार सांज कधी आली कळलं सुद्धा नाही. चांदण प्रकाशात तुझं रुप येवढं खुललं आहे की वाटतंय ह्या तारका तुझाच प्रकाश घेउन लखलखताहेत.
जेंव्हा फुलारून येते
नभी नक्षत्रांची वेल
अन रात काळी होते
डोह डोळ्यांचे काजळ
सांज मावळली, एक दोन तारकांचं आभाळ आता नक्षत्रांनी भरुन गेलं आहे. ही काळी रात्र तुझ्या डोळ्यांचं काजळ झाल्या सारखी भासते आहे. तुझ्या खोल अथांग डोळ्यात हरवुन जावसं वाटत आहे.
माझ्या मनात उठले
भाव-विभोर तुफान
घाल थोडीशी फुंकर
बघ क्षमेल वादळ
माझी मनस्थिती मला काही कळण्याच्या पलिकडे निघुन गेली आहे. मनात भावनांचं काहूर उठलं आहे. तू माझ्याशी बोलावंस असा माझा हट्ट नाही पण, एखादा कटाक्ष देखिल ह्या वेड्या मनाला स्वस्थ करील.
-सत्यजित. (Satyajit Malavde)
khupch sundar....
ReplyDeleteकविता खरंच खूप छान आहे. तुमच्या नावासहीत कुणाला forward करु शकतो का?
ReplyDelete--- प्रिया.
नक्की, नावासहीता forward माझा आक्षेपं नाही. विचारल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप आभार
ReplyDeleteजेंव्हा फुलारून येते
ReplyDeleteनभी नक्षत्रांची वेल
अन रात काळी होते
डोह डोळ्यांचे काजळ
खूप आवडल्या ह्या ओळी !