Showing posts with label थोडं हळव. Show all posts
Showing posts with label थोडं हळव. Show all posts

Sunday, January 26, 2014

नयनामृत

आता फारसं जाणं होत नाही
की जाववत नाही कुणास ठाऊक?
पण गेलो की जाऊन बसतो
विहीरीवर तासंतास
ही विहीर बघितली की
आठवतात तुझे कथिल पाणेरी डोळे..

कधी दुथडी भरुन वाहणारे
तर कधी गहन खोल
आता विहीरीच्या काठावरती
तुझ्या डोळ्यांची आर्त ओल

दिसते मा़झी छबी खोल
पण आता थोडीशी अंधूक
विहीर होते डोळ्या देखत
ओल्या आठवणींची संदूक

इतक्यात कुणी माहेरवाशीण
विहीरीचे ओढते पाणी
मी ओंझळ पसरुन मागुन घेतो
तिच्या कळशीतले थोडे पाणी
.....
...
-सत्यजित.

Saturday, December 11, 2010

जेंव्हा बाप जन्माला येतो..

बाप झाल्यावर कळलं बाप होणं म्हणजे काय
जन्म दिल्यावर कळल जन्म घेणं म्हणजे काय

बाप म्हणजे पाऊस असतो बाप असतो हिरवळ
स्वतः जळत असताना, लेकराच्या चटक्यांची कळवळ

किती उशिरा कळू लागला खाल्ल्या फटक्यांचा अर्थ
काळजीला जनरेशन गॅप म्हणणं किती होतं व्यर्थ

समजवून सांगायला जाता, तो जातो चिडून निघून
रागातंही मला हसू येतं, समोर माझं बालपण बघून

समजवुन समजला नाहीच तर देतो चार फटके
आई-बाप ते आई-बापच ! कुणीच नसतं हटके

दु:ख खाल्ल्या फटक्यांचं नाही, दु:ख दिल्या फटक्यांचं नाही
मी जसा बाप बनलो तस त्याचंही त्याला कळेलच की नाही ?

दु:ख येवढच आहे अजुन कितीश्या चुका म्हातारपणी कळतील ?
तेंव्हा वळुन वळायचं म्हंटलं तरी, म्हातारी पावलं कीतीशी वळतील ?

आज किती सहज काढत जातो आपण त्यांच्या चुका
त्यांनाही आपले पाढे वाचता येतात, पण बाप राहतो मुका

उन्हात होरपळल्या शिवाय पाण्याची वाफ होत नाही
पाण्याची वाफ झाल्या शिवाय पाऊस होता येत नाही !

जळण्यामध्येही जगणं असतं येवढं आज ग्राह्य आहे
बाबा, तुमच बोट धरुन चालतोय म्हणुन सारं सुसह्य आहे !!

-सत्यजित.

Monday, July 19, 2010

जिवन

माणसाच्या खरतर दोनच गरजा, आधी शारिरीक आणि मग मानसिक. तशा माणसाला व्याधीही दोनच शारिरीक आणि मानसिक. जिवनातला फोलपणा कळल्यावर देखिल जिवनाबद्दल तत्वज्ञान सांगणार्‍या संतांना तरी काय म्हणवं? त्यांना जिवन खरच कळलं असतं की नाही कुणास ठाउक? ना आगा, ना पिछा. जावं गप-गुमान जंगलात, हिमालयात रहावं. स्वतःचा काय नी दुसर्‍याचा काय, संसार तो संसारच, आणि संसार म्हंटला की गुरफटण आलच. पण काही संत मात्र समाधी घेतात तर काही संत लोक कल्याणाचा वसा उचलतात. हे तर तसच आहे ना, तुला माझं पटणार नाही "मी घर सोडुन गेलेला बरा" तर दुसरा म्हणतो "तुला माझं पटो न पटो, तुझ्या समजण्याच्या पलिकडे आहे सगळं". थोडक्यात काय तर, जिवनाच्या फोलपणातही फोलपणा आहेच. पण एक मात्र खरं प्रत्येकाला आपला व्हूव पॉइंट आहे, इथे निरर्थक असं काहीच नाही, एक जिवन सोडलतर... प्रजनन ह्या निव्वळ धेय्याला कीती फाटे फोडलेत आपण.

-सत्यजित.

भयभीत सावल्या

तू शांत समई सारखी तेवत असलिस
तरी भींतीवरच्या सावल्यां सतावतात
तुझ्या तेजा पेक्षा तुझ जळणं जाणवत राहतं
शेवटच्या धुराचा दर्प दरवळे पर्यंत
कोणाला कळणारही की तू जळत होतीस
"तेजासाठी कुणाच तरी जळणं अपरीहार्यच"
हे तुझ तत्वज्ञान मला कधीच पटलं नाही
प्रत्येकवेळी माझ्या विचाराना मुर्खात काढत तू म्हणतेस...
सावल्यांच अस्तित्वचमुळी ज्योतीने असतं
सावल्यांच तरी काय? आपलाच आभासतात त्या
जे दुसर्‍याला जाळतं ते जळणं आणि
जे दुसर्‍याला प्रकाशमान करत ते उजळणं
ज्योत कधीच जळत नही ती फक्त उजळतं असते
आता डोळे मिट आणि म्हण "तमसो मा ज्योतिर्गमय"

-सत्यजित.

Monday, February 1, 2010

अनाथांची माय

एक झोळी पाठीवरती
एक शिळीपाकी पोळी
भीक मागत्या हातावरती
मातृत्वाच्या ओळी

कुरवाळल्या रातीचा
अंधार मनाला जाळी
अंगावरचा पान्हा सुकला
सुकल्या पान्ह्याची होळी

माय असते बिना नखांची
ती वांझोटे कुरवाळी
दोन अश्रू स्तनातले
बाळाच्या ओठी ढाळी

केली उकीरडयात रिकामी
भरलेली झोळी
मातृत्व कुणाचे पोटी
दातृत्व कुणाच्या भाळी

माय! तिला फुटतो पान्हा
ऐकुन ती कींकाळी
कोण कुणाची खळगी भरतो?
परी तो मेघ तू हो आभाळी

कितीक तोंडे पाठीवरली
ह्रुदयाशी कवटाळी
घास नको घासातला
ती मागते शीळी पोळी.

-सत्यजित.

Friday, January 29, 2010

एक घास चंद्र ..

आई... तो का गं म्हणतो खेळायला एक चंद्र आण?
आई... मला नको चंद्र फक्त त्याचा एक तुकडा वाढ
आई... ह्या फुटक्या पत्र्याच्या डब्ब्यामध्ये
लाउया का गं एक स्वप्नाचं झाड?
स्वप्नाच्या झाडामागे तरी चंद्र लपेल का?...!!!
रात्र असली तरी अंधार कुठेच नसेल का?
त्या झाडाला लगतील ती स्वप्न मी पाहुन घेईन
माझ्यासाठी थोडी ठेवेन आणि...
थोडी आई तुला देईन..

-सत्यजित.

Friday, October 30, 2009

पाउसमयी...

धुक्यांच्या दुपारी
डोंगराच्या माथी
पाउस जाहली ती
देत हात हाती

मी चिंब चिंब ओला
पाउसही भिजलेला
चेतऊनी शहारा
मीठीत निजलेला

श्वासात मंद होता
मृद्गंध वेडावणारा
आवेग तुफान होता
नसांत रोरावणारा

विरघळून गेले माझे
तन मातीचे होते
खळखळत्या गिरीघारा
ओघळ प्रीतिचे होते

हळुवार उतरली सांज
इंद्रधनू नभात
पाउस मृण्मयी झाला
करीत प्रीतिची बरसात.

-सत्यजित.

Saturday, August 15, 2009

चिमुटभर

अंगोपांगी उठलेल्या व्रणांना
तू मिलन खुणा म्हणालास
मी प्रेम तर तू अधिकार म्हणालास
यातच सगळ आलं
चिमुटभर वाळु झालं..


-सत्यजित

Tuesday, July 7, 2009

मैत्री

मैत्री म्हणजे काय?
सांगता येत नाही
मैत्री कधी मैत्रीचा
पुरावा देत नाही

मैत्री मुळीच नातं नसतं
मैत्री नसते बंधन
मैत्री म्हणजे श्वास असतो
मैत्री असते स्पंदन

मैत्री राधीकेच गाणं
मैत्री सावळ्याचा पावा
मैत्री सारं सारं देउन
मिळाल्याचा दावा

मैत्री छोटं बाळ असतं
मैत्री असते पोक्त
मैत्री सुदाम्याचे पोहे
मैत्री मथुरेच तख्त

मैत्री असते सागर
मैत्री असते झरा
मैत्री असते अथांग खोल
मैत्री खळखळणारी धारा

मैत्री कधीच मरत नसते
मैत्री कधीच सरत नसते
मैत्री अमृताचे थेंब होऊन
रितेपण भरत असते

मैत्री सांगता येत नाही
मैत्री असते जाणीव
मैत्रीत मागता येत नाही
मैत्रीत नसते उणीव

मैत्री नसते स्वार्थ
मैत्री ना परमार्थ
मैत्री असते साधासरळ
जिवनाचा अर्थ

मैत्री गालावरचे
अश्रू पुसणारा हात
मैत्री आत आत खोल खोल
रुजलेली साथ

मैत्री असते घट्ट मिठी
मैत्री असते झप्पी
मैत्री थुईथूई आनंदात
गालावरची पप्पी

मैत्री असते कुणासाठी
अविरत कळकळ
मैत्री असते शब्दांवाचुन
व्यक्त होणारी तळमळ

मैत्री असते दोन श्वास
मैत्री दोन श्वासातलं अंतर
मैत्री श्वासांचाही श्वास
मैत्री श्वासांच्याही नंतर

मैत्रीवर लिहीता लिहीता
आकाश भरुन जाईल
समुद्राच्याही शाईचा
दौत रीता होईल

मित्र दुर होतात तरी
मैत्री कधीच विरत नाही
मैत्री आठवणींचा गंध
मैत्री कधीच झुरत नाही

-सत्यजित

Wednesday, August 27, 2008

सतावुन जाणार्‍या आठवणी

सतावुन जाणार्‍या आठवणींना
मातू देऊ नको म्हणालास खरा
पण जाता जाता त्याच आठवणी देउन गेलास
तू काय दिलस, तू काय नेलस
ह्याचा हिशोब करताना
हसर्‍या आठवणींचेही डोळे पाणावतात
त्यांचे डोळे पुसण्याचे सामर्थ्य नाही रे माझ्यात
माझ्यातला तू मात्र माझे डोळे पुसत रहातोस
आणि मग पुन्हा डोळे पाणावतात
कदाचित तू पुसत रहावस म्हणुन
तू काय, तुझ्या आठवणी काय
तितकच प्रेम करतात माझ्यावर
आणि तरीही तुझे शब्द आठवत रहातात
'सतावुन जाणार्‍या आठवणीना मातु देऊ नकोस'

-सत्यजित.

Monday, June 16, 2008

रिटायरमेंट

रिटायरमेंटची सकाळ
जिवनाची संध्याकाळ
मिणमीणते डोळे
टाळू पर्यंत कपाळ

कपाळवर आट्या
भेडसावणारे विचार
ईच्छाशक्ती असते
सांधेदुखीने लाचार

जाड भिंगाच्या चष्म्यातून
जेव्हा भुतकाळात पाहीलं
बरच काही केल तरी
बरच काही राहीलं

अरे बाप आहे मी तुझा
असं सांगाव का लागतं?
हक्काने पॉकेटमनी घेणार्‍याकडे
आज मागाव का लागतं?

आता कमी जरी दिसलं
तरी मनं वाचता येतात
सबबीचे खडे नुसत्या
बोटांनीच वेचता येतात

प्रत्येक घासागणिक हात
आता जास्तच थरथरतात
नुसता मायेच्या स्पर्श मागता
उच्श्वास नुसतेच घुरघूरतात

हाताचा पाळणा माझा
आता पुरता गंजला आहे
राजाच्या गोष्टीतला महल
पडका पत्त्यांचा बंगला आहे

आपल्याच पोटचाच गोळा
झाल्या चुकांवर बोट ठेवतो
कालचा देव्हार्‍यातला दिवा
आज अडगळीत एकटाच तेवतो

हातात कोंबल्या जपमाळेतील
राम देखिल मरा होतो
’अयुष्य एक जुगार’
येवढाच शाप खरा होतो?

-सत्यजित.

Wednesday, December 19, 2007

साकी

नको पिऊ म्हणतेस
काळीज जळेल म्हणतेस
साकी,
दगडाच काळीज कधी जळत का?
जळाल तरी कुणाला कळतं का?

दारुण अवस्थेतल्या मनाला
दारुनेच बर वाटत
शुद्धीत असलना की उगाच
आठवुन आठवुन मन आटत

भर दोन पेग,
प्याला आपटत 'चिअर्स' म्हणू
दोन घोट जाताच वाटेल
काही झालच नाही जणू

धुंध होत हसेन मी
माझ्यावर ह्सणार्‍या नशीबावर
ह्रुदयातल्या आठवणी गुंफुन
विणल्या रेशमी कशिद्यावर

साकी भरत रहा पेग पेग..
ही आठवण जाइस तोवर
नाहीच गेली जरही आठवण
तर मी आठवण होइस तोवर

सांडू नकोस दारू, साकी
पुन्हा निसटण्याची भावना दाटते
रित्या पेल्यात,सांडल्या थेंबात
तीच तीच आठवण दाटते

साकी..
साकीकुणी मजे साठी पितं
कुणी भोगत्या सजे साठी पितं
कुणी पेटुन उठण्या साठी पितं
कुणी पेटुन विझण्या साठी पितं

सगळंच दु:खाने भरलेल
मज दु:खही पिता येईना
जहरच सु:ख देईल पण
मज जहरही पिता येईना

पिऊ देत गं... सखे साकी
ही दारू काय माझा जिव घेईल?
एकदा गतप्राण झालेल्याचा
सांग पुन्हा कसा जिव जाईल?

सांग पुन्हा कसा जिव जाईल.. चिअर्स!!!

-सत्यजित

Thursday, April 26, 2007

आई सांग ना . . .

आई मी गर्भात असताना तुला विचारलं होतं
मी येणार ते जग कसं आहे ?
तू म्हणाली होतीस
शब्दात नाही सांगता यायचं
इतकं ते लोभस आहे
आई आई तू मला फ़सवलंस
ह्या जगाचं सारं लोभस रूपच दाखवलंस
दुथडी भरून वहाणार्‍‍या नद्या
झुळझुळणारं पाणी
चिमण्यांचा किलबिलाट
आणि कोकिळेची गाणी
पौर्णीमेचा चंद्र आणि
सुखद निद्रेची रात्र
राम कॄष्णाच्या गोष्टी नी
देवादिकांची स्तोत्र
सारं सारं लोभस
आई सारं सारं बोगस
इथे दुष्काळात करपलेली जमिन
अन पूरात वाहणारी घरे
कुठे कोरडा आक्रोश तर
कुठे अश्रुंचे झरे
इथे दारिद्र्याच्या विळखा आहे
अन कुपोषणाचे बळी
दैत्यांच्या पापांचा फ़ास
निष्पापांच्या गळी
धर्मा अधर्माच्या झगड्यात
शेवटी धर्माचेच मरण
चांगल्या तत्वांनी घ्यावी
परिस्थीती पुढे लोळण
आई सांग तू मला का फ़सवलंस ?
आई सांग तू मला का फ़सवलंस ?
ह्या निर्दयी जगाचं लोभस रूपच का दाखवलंस ?

आई म्हणते . . .

बाळा मी जगायला तुला शिकवतेय
तर तू मरणाचं दु:ख घेउन बसलास
मी लढायला तुला शिकवताना
तू पराजयाच्या कल्पनेनेच खचलास ?
रोज सुर्याचा प्रकाश असताना तुला
अमावस्येच्या रात्रीचं भय कशाला ?
जीवनातील सुखाचे क्षण वेचताना
दु:खाची पर्वा कशाला ?
जीवनात दु:ख नसले की
सुखाचे मोल रहात नाही
दु:खाना कवटाळून सुखाने
सुखातही जगता येत नाही
उचलताना पहिले पाउल
पडण्याची भीती बाळगू नकोस
कीतीदा जरी पडलास तरी
पडण्याचे दु:ख आळवू नकोस
नेहमी वर पहावं
खाली कधी पाहू नये
जीवनातील चांगलं ते घ्यावं
वाईट कधी घेउ नये
तू संकटात असताना
राम धाउन येण्याची
इच्छा बाळगू नकोस
तू संभ्रमात असताना
कृष्णाने गीता सांगण्याची
इच्छा ठेऊ नकोस
तुझ्या संकटातून तुलाच तरून जायचंय
दुसरे संकटात असताना
त्यांचा राम तू व्हायचंय
कृष्णाची गीता वाचून
कृष्ण तुला व्हायचंय
दु:खाशी एकट्याने लढताना हसत हसत तुला जगायचंय
बाळा हसत हसत तुला जगायचंय. . .
बाळा हसत हसत तुला जगायचंय. . .

सत्यजित.

Monday, April 23, 2007

निमित्तमात्र

पावणे सहाचा गजर लाव म्हणालास
पण गजर सहा पन्नासला झाला
तुला तेवढच निमित्त मिळालं
माझ्यवर रागवायला

घाईघाईतच तुझा डबा भरला
भाजीत मीठ जरा कमी पडलं
आणि तू तेवढच निमित्त केलंस
हॉटेलचं खायला

पाच पन्नासची लोकल चुकली
आणि विरारच्या घर्दीतुन घर गाठलं
तरीही उशीर झालाच
आणि तुला तेवढच निमित्त मिळालं
घड्याळाकडे बोट दाखवायला

तू टी. व्ही. समोर पाय सोडून बसला होतास
चपात्या करताना सिलेंडर संपला
दुसरा सिलेंडर देखील रिकामा होता
तुला तेवढच निमित्त मिळालं
माझी अक्कल काढायला

मी वैभव लक्ष्मीचा उपवास केला
आणि तुझच यश मागितलं
तू सिगरेट्चा धूर हवेत सोडत
सुट्ट्या पैशांचं निमित्त केलंस
फ़ुलांची वेणी विसरायला

मी भराभर सगळं आवरलं
पाच चाळीसचा गजर लावला
फ़ॅनखाली केस मोकळे सोडले
तुला तेवढच निमित्त मिळालं
तुझा पुरुषार्थ दाखवायला

पावणे सहाचा गजर चुकेल ह्या विचारात
निवांत झोप लागलीच नाही
तू जागरणाचं निमित्त केलंस
उशीरा उठायला

मी अहोरात्र झटत होते
तुला यशशिखरावर पहायला
आणि संसारचं निमित्त झालं
माझ्यातली मी निमित्तमात्र व्हायला . . .

सत्यजित.

आठवणी

आठवणी तर नेहमीच असतात पाठीशी
काही क्षण आपसुक बांधले गेलेले असतात गाठीशी
त्या आठवणीत ठेवताना विसरलेल्या
त्या विसरायच्या म्हणून जपलेल्या

त्यांचं गाठोडं सोडताच त्या चित्रा सारख्या भासतात
एकांतात असताना मित्रा सारख्या असतात
त्या आठवणी दुसर्‍या साठी जगलेल्या
त्या आठवणी दुसर्‍यांनी जागवलेल्या
त्या आठवणी . . .

कधीतरी दाटून येतो कंठ आणि ढळतो एक अश्रु
त्या कनवाळू क्षणांना सांगा कसा विसरू ?
त्या आठवणी मायेने भिजलेल्या
दुसर्‍याला प्रकाशीत करुन स्वत: विझलेल्या

ह्या आठवणीच स्वप्नांना वेग देतात
मार्गस्थ असताना अनुभावाचं रूप घेतात
त्या आठवणी पराभवातून शिकवणार्‍या
त्या आठवणी विजयानी सुखावणार्‍या
त्या आठवणी . . .

काही विसरायच्या म्हणून आपण उगाळत असतो
पुन्हा पुन्हा स्मरून आतल्याआत जळत असतो
त्या आठवणी जळून देखील उरलेल्या
त्या आठवणी काळा संगे विरलेल्या
त्या आठवणी . . .

कधी वाटतं आपणही कुणाच्या तरी आठवणीत रहावं
आठवणीत राहून अनंत रुपात जगावं
आठवणीत जगताना
फ़क्त एक आठवण होऊन रहावं . . .

सत्यजित.

Sunday, April 22, 2007

बालपण . . .

बालपण खरच छान असतं
सारं जग कसं मोकळं रान असतं
त्या चिमुकल्या पंखांना
आभाळ देखील लहान असतं

बालपण खरच छान असतं ..

आईचं धरलेलं बोट
जगाचं एक एक टोक असतं
माउलीच्या कुशी मध्ये
आपलं सारं ब्रम्हांड वसतं

बालपण खरच छान असतं ..

आईचा पदर हेच आपलं
आभाळ असतं
आभाळ गवसण्या आभाळ
देखील लहान असतं

बालपण खरच छान असतं ..

चॉकलेटचा बंगला
स्वप्नांचे विषय असतात
रडून गोष्टी मिळतात
असे जीवनाचे आषय असतात

बालपण खरच छान असतं ..

रूसून बसल्यावर पुर्ण होणारे
छोटे छोटे हट्ट असतात
विद्वानाला संभ्रमीत करणारे
छोटे छोटे प्रष्ण असतात

आज सार्‍या बालगोपालांचा वाटे मज हेवा ..
बालपण देगा देवा ... बालपण देगा देवा . . .

सत्यजित.

Friday, April 20, 2007

वेडा. . .

वेडा वेडा म्हणून हिणवताय
पण तुम्हा सगळ्यांना हुशारीचे धडे शिकवीन
भर चौकात सार्‍या शहाण्यांना नागवीन
असुनदेत फ़ाटके कपडे माझे
पण तुमच्या कपड्यांनी तरी कितीसं झाकलंय ?
माझ्य नजरेतून बघा, मला तर सारं उघडंच दिसतंय
सगळी बोगस तत्वे तुमची सगळी पोकळ भाषा
पेकाट्यात कुणी लाथ हाणता गुंडाळाल लगेच गाषा
कुणीही यावं फ़ाडून न्यावं,
लोकलज्जेच्या नावाखाली त्याला थिगळं जोडत बसावं
सगळा तुमचा भेकडपणा सहिष्णुतेच्या नावाखाली गोंजारताय
नेसणं ओलं झालं तुमचं, कशाला शूरपणा दाखवताय ?
कधीच मेला कृष्ण आणि आता एकही पांडव नाही जीता
रोज नागवल्या जातात द्रौपद्या आणि तुम्ही डोळे मिटून वाचताय गीता
प्रेत्यक घरात एक द्रौपदी आहे, तिचं रक्षण कोण करेल ?
माना खाली घालून जर पांडव झालात, तर कृष्ण कोण बनेल ?
घेतला कृष्णानेही जन्म आणि जर सांगायला घेतली गीता,
तर त्यालाही वेडयात काढाल तुम्ही, त्याचं काही ऐकून न घेता
तोही कशाला येतो म्हणा, आता त्याला पांडव कुठे मिळणार ?
चार पाच वेड्या टाळक्यांसह, तो सहस्त्र कौरवांशी कसं लढणार ?
त्यालाच सोडवूदेत त्याचे प्रष्ण, आपण विचार कशाला करा ?
किड्या मुंग्यांसारखं जगा आणि कुत्र्यासारखं मरा
वेडा आहे हो मी, असं उगाच काहीही बरळत रहातो
आणि त्या अज्ञातवासातल्या पांडवांना तुमच्यात शोधत रहातो. . .

सत्यजित.

Thursday, April 19, 2007

वेडसर. . .

का मागे लागली आहेस
त्या निष्पाप फुलपाखराच्या
ते बागडत नाही आहे
ते पळतंय जीवाच्या आकांताने
त्याच्या रंगाचं कौतुक करीत
अलगद चिमटीत पकडलेस त्याचे पंख
आणि झटकून पुसून टाकलीस बोटं
त्याचे रंग बोटांना चिकटताच
मन भरताच मुठीत हलकेच घेऊन
भिरकावलंस त्याला आकाशात
आणि पंखांची असहाय्य फ़ड्फ़ड करत
कोसळलं ते धरतीवर
एक कळकळीचा सुस्कार टाकून निघून गेलीस
माझ्या हृदयाचं घायळ फ़ुलपाखरु करुन. . .

Wednesday, April 18, 2007

प्रष्ण. . .

त्याच जुन्या क्षणांनी
पुन्हा एकदा गर्दी केलिय
त्या भेडसावणार्‍या प्रष्णांनी
पुन्हा एकदा वर्दी दिलीय
दिल्या घेतल्या सुखदु:खांची
कधी आकडेमोड केली नाही
पण तुझ्या वचनांची नोंद
कोरलेली हृदयाची ही वही
त्या वहीची पानं फाडताना
काळीज तीळ तीळ तुटतंय
सांग सखे एकदा तरी
माझं कुठे काय चुकतंय ?

प्राक्तन. . .

मला सारथी पद स्वीकरायचं होतं
पण लगाम हाती आला नाही
तू रथारुढ हो म्हणाला
आणि स्वत: बेलगाम झाला

यशापयशाचे अश्व जोडले
आणि स्वप्नांचा लगाम दिला
वर्तमानाची धूळ उडवत
भविष्याचा प्रवास सुरु झाला

सगळ्याच वाटा खळग्यांच्या
वेगाने तुडवायच्या
भावनांच्या वेदना
हास्यात उडवायच्या

काळ एकावर एक आसूड ओढतोय
पण हूं नाही की चूं नाही
सुख दु:खाचा संघर्ष म्हणतोय
मी नाही किंवा तू नाही

रथ माझ्या जीवनाचा पण
मी कधीच नाही हाकला
प्राक्तनाचा सारथी माझ्यापुढे
कधीच नाही झुकला. . .