Monday, April 23, 2007

निमित्तमात्र

पावणे सहाचा गजर लाव म्हणालास
पण गजर सहा पन्नासला झाला
तुला तेवढच निमित्त मिळालं
माझ्यवर रागवायला

घाईघाईतच तुझा डबा भरला
भाजीत मीठ जरा कमी पडलं
आणि तू तेवढच निमित्त केलंस
हॉटेलचं खायला

पाच पन्नासची लोकल चुकली
आणि विरारच्या घर्दीतुन घर गाठलं
तरीही उशीर झालाच
आणि तुला तेवढच निमित्त मिळालं
घड्याळाकडे बोट दाखवायला

तू टी. व्ही. समोर पाय सोडून बसला होतास
चपात्या करताना सिलेंडर संपला
दुसरा सिलेंडर देखील रिकामा होता
तुला तेवढच निमित्त मिळालं
माझी अक्कल काढायला

मी वैभव लक्ष्मीचा उपवास केला
आणि तुझच यश मागितलं
तू सिगरेट्चा धूर हवेत सोडत
सुट्ट्या पैशांचं निमित्त केलंस
फ़ुलांची वेणी विसरायला

मी भराभर सगळं आवरलं
पाच चाळीसचा गजर लावला
फ़ॅनखाली केस मोकळे सोडले
तुला तेवढच निमित्त मिळालं
तुझा पुरुषार्थ दाखवायला

पावणे सहाचा गजर चुकेल ह्या विचारात
निवांत झोप लागलीच नाही
तू जागरणाचं निमित्त केलंस
उशीरा उठायला

मी अहोरात्र झटत होते
तुला यशशिखरावर पहायला
आणि संसारचं निमित्त झालं
माझ्यातली मी निमित्तमात्र व्हायला . . .

सत्यजित.

No comments:

Post a Comment