कण कण भिजू लागतो
घन बरसून मोकळा होतो
क्षण क्षण फ़ुलू लागतो
नी मी माझ्या पासून वेगळा होतो
थेंबा थेंबानं आभाळ
माझं सर्वांग चुंबतं
मी कवटाळतो त्याला
वारं रोमारोमांत झोंबतं
धावतात अल्लड थेंब
मना पर्यंत खोल
त्या अगणीत थेंबांचं
कसं चुकवावं मोल ?
मी दास बनून रहातो
खिडकीच्या गजांआडून पहातो
त्याच ऋण काही फ़िटत नाही
तरीही तो बरसत रहातो
एक दिवस असाच येतो
तो अबोल निघून जातो
दूरवर त्याचा ठाव घेत
मी अंगण ओलांडून जातो
मग सर्वांग निथळू लागतं
त्याचे थेंब तो परत घेतो
आणि अबोल गेलेला तो
गरजत बरसत परत येतो
माझं मन आवरत नाही
मी पुन्हा थेंबांचं ऋण घेतो
दर वेळी मुद्दल हडपून
फ़क्त काही थेंबांचं व्याज देतो
असा कर्जबाजरी मी
त्याचा सदैव ऋणी रहातो
आणि व्याज फ़ेडायची पाळी येताच
मी त्याचीच आवर्जून वाट पहातो. . .
सत्यजित.
No comments:
Post a Comment