Thursday, April 19, 2007

फ़क्त एक सुस्कार

ती चिमुकली पावलं पाहून
अंत:करण हेलावलं
ठेचाळलेल्या जखमेवर
फ़ुंकर घालायला कुणीच नाही धावलं

तापलेल्या रस्त्यावर अनवाणी पावलं
मंदगतीने पडत होती
जड पेटीचा भार
आपल्या अंगावर झेलत होती

जखडलं होतं बालपण
त्या पेटीच्या पट्ट्यानं
त्यांचं खेळणं बागडणं
विकत होती कवडीच्या मोलानं

पोटामध्ये भूक होती
डोळ्यांत होता थकवा
दैवाचा खेळ म्हणा
किंवा नशीबाचा चकवा

त्या पोळल्या रक्ताळल्या पावलांचा
कुणीतरी फ़ोटो घेतला
कुणा धनाढ्याने तो
लाखाला विकत घेतला

वातानुकुलीत दालनात
फोटोला मध्यभागी स्थान होतं
पण चिमुकल्या पावलांचं
निखार्‍यांवरून चालणं काही संपत नव्हतं

लाखाला फोटो घेतला
पण पावलं फ़ुकट कुणी घेत नव्ह्तं
पोटातली आतडी पिळली जात होती
साधं पाणी कुणी देत नव्ह्तं

प्रेत्येकजण करी स्तुती
पाहून तो किमती फ़ोटो
म्हणे "पाहणार्‍याचं अंत:करण
हेलावतो हा फ़ोटो"

छायाचित्रकाराचं नाव आवर्जून
प्रत्येकजण निरखून पाही
पण "ही पावलं कुणाची ?"
असं कुणीसुद्धा विचारत नाही

त्याच कलादालना बाहेर
तीच चिमुरडी हात पसरून उभी होती
पण कुणा एक रसिकानं त्यांना
साधी दमडी सुद्धा दिली नव्हती

उन चटके देत होतं
पोटात भुकेची लाट उसळत होती
छातीवर पेटीचा भार घेउन
चिमुरडी खाली कोसळत होती

दुसर्‍या दिवशी वृत्तपत्राच्या
मथळ्यात मजकुर होता आला
कलादालनातल्या त्या फोटोला
पुरस्कार होता मिळाला

वृत्तपत्राच्या कुठेतरी कोपर्‍यात
छापल्या होत्या दोन ओळी
कला दालना बाहेरील फ़ुटपाथवर
कुपोषणाचे दोन बळी

उद्या कुपोषणावरील लेखालाही
गौरवतील अनेक पुरस्कार
आपण हळहळ व्यक्त करू
सोडू फ़क्त एक सुस्कार . . .

सत्यजित.

No comments:

Post a Comment