Monday, April 23, 2007

टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

माझ्यातल्या कवीला पाउस नेहमीच मोह घालतो आणि मग
पावसाच्या टपटपणार्‍या आवाजात कॅलीडोस्कोप काही टिपतो. . .

छपरावरुन गळणारं पाणी
आकाश ढवळत होतं
मला सुकं ठेवण्यासाठी
माझं छप्पर भिजत होतं

छपरावरुन ओघळून पाणी खाली बादली भरत होतं
त्या बादलीत पाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

तो आडोश्याला उभा
छत्री बंद करुन
भीजलेली पॅंट
वर गुढघ्यात धरुन

ओल्या भाळी आठ्या पावसाला बघून
त्याच्या छत्रीतून पाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

तिच्या केसातलं पाणी
टप टप गालावर
कानाच्या पाळीवरून
ट्प टप खांद्यावर

अंग चोरून तिने ओढला पदर
तिच्या पदरातून पाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

त्याचं लक्ष तिथे
ओघळणार्‍या थेंबावर
त्याचं लक्ष तिथे
ओल्याचिंब वक्षावर

त्याचं लक्ष तिथे थरथरणार्‍या ओठांवर
त्याच्या ओठांतून पाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

पावसाला लाच देती
चिमुकली बोटं
डबक्यातील चिखलाचं
तेव्हा उटणं होतं

बेडकाची गाणी गात कागदाची बोट
चिमण्या पंखातून पाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

गरीबाचं घर
गळकं छप्पर
लेकराला ज्वर
नाही दूध अंगावर

तिच्या जीवाला घोर रडे कवटाळून पोर
तिच्या डोळ्यातून पाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

पनावरून ओघळता थेंब
पनावर थबकला
अंतरंगात विश्व पाहून
क्षणभर हबकला

मागून येणार्‍या थेंबानी त्याला पुढे रे रेटला
मग रानभर पाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

पाउस गातो गाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

सत्यजित.

1 comment:

  1. satya chaan lihiles

    pan romantic pasun daridrya kade jast zukleli kavita vate

    shabda sahaj astat

    greeat

    Tushar

    ReplyDelete