आत्ताच पाउस पडून गेला
त्याचा हवेतील ओलावा अजून जाणवतोय
सर्वस्व देऊन रीता झालेला तो
पांढर्या पुंजक्यांतून खुणावतोय
अंग चोरुन बसलेलं रोप
थंडीने शहारलंय
त्याच्या पानात लपून पाणी
मोत्यांनी बहरलंय
एका ओल्या तारेवर
एकटाच ओला पक्षी
त्याची समाधी न्याहाळतेय
पाण्याची ओघळ नक्षी
पारव्यांच्या जोड्या गेल्या
ओसरीत ओसरीला
माझा राजस गं भला
एक पारवी सांगे दुसरीला
एक छोटंसं पिल्लु
रुसून गूपचूप बसलेलं
अन आता आईला शोधताना
पावसांत चिंब भिजलेलं
त्याच्या डोळ्यातील पाउस
त्याच्या आईला शोधतोय
पाउस थांबला तरी
तो त्याच्या आसवांत भिजतोय
एकच होती छ्त्री
त्याने तिच्या खांद्यावर ठेवला हात
तीही त्याला बिलगली
पावसाचे गीत गात
पाठीवरील ओले केस
ओल्या कांतीला बिलगले
शहारता सारं अंग
ओठे ओठांपासून विलगले
पॅंट गुढग्या पर्यंत दुमडली
तरीही झाली ओली
चाक लुडबुडलं डबक्यात
आणि रिक्षा मागे धावत शिवी गेली
हा सारा पाउसच होता
थांबलेला पाउस
जलद जलद जाता म्हणे
इतक्यात नको जाउस
पाउस थांबला होता
तरी माझ्या आजूबाजूला तो जगत होता
नवं सावज शोधायला
नभांमागे दडून बघत होता. . .
. . . नभांमागे दडून बघत होता.
सत्यजित.
No comments:
Post a Comment