Thursday, April 26, 2007

आई सांग ना . . .

आई मी गर्भात असताना तुला विचारलं होतं
मी येणार ते जग कसं आहे ?
तू म्हणाली होतीस
शब्दात नाही सांगता यायचं
इतकं ते लोभस आहे
आई आई तू मला फ़सवलंस
ह्या जगाचं सारं लोभस रूपच दाखवलंस
दुथडी भरून वहाणार्‍‍या नद्या
झुळझुळणारं पाणी
चिमण्यांचा किलबिलाट
आणि कोकिळेची गाणी
पौर्णीमेचा चंद्र आणि
सुखद निद्रेची रात्र
राम कॄष्णाच्या गोष्टी नी
देवादिकांची स्तोत्र
सारं सारं लोभस
आई सारं सारं बोगस
इथे दुष्काळात करपलेली जमिन
अन पूरात वाहणारी घरे
कुठे कोरडा आक्रोश तर
कुठे अश्रुंचे झरे
इथे दारिद्र्याच्या विळखा आहे
अन कुपोषणाचे बळी
दैत्यांच्या पापांचा फ़ास
निष्पापांच्या गळी
धर्मा अधर्माच्या झगड्यात
शेवटी धर्माचेच मरण
चांगल्या तत्वांनी घ्यावी
परिस्थीती पुढे लोळण
आई सांग तू मला का फ़सवलंस ?
आई सांग तू मला का फ़सवलंस ?
ह्या निर्दयी जगाचं लोभस रूपच का दाखवलंस ?

आई म्हणते . . .

बाळा मी जगायला तुला शिकवतेय
तर तू मरणाचं दु:ख घेउन बसलास
मी लढायला तुला शिकवताना
तू पराजयाच्या कल्पनेनेच खचलास ?
रोज सुर्याचा प्रकाश असताना तुला
अमावस्येच्या रात्रीचं भय कशाला ?
जीवनातील सुखाचे क्षण वेचताना
दु:खाची पर्वा कशाला ?
जीवनात दु:ख नसले की
सुखाचे मोल रहात नाही
दु:खाना कवटाळून सुखाने
सुखातही जगता येत नाही
उचलताना पहिले पाउल
पडण्याची भीती बाळगू नकोस
कीतीदा जरी पडलास तरी
पडण्याचे दु:ख आळवू नकोस
नेहमी वर पहावं
खाली कधी पाहू नये
जीवनातील चांगलं ते घ्यावं
वाईट कधी घेउ नये
तू संकटात असताना
राम धाउन येण्याची
इच्छा बाळगू नकोस
तू संभ्रमात असताना
कृष्णाने गीता सांगण्याची
इच्छा ठेऊ नकोस
तुझ्या संकटातून तुलाच तरून जायचंय
दुसरे संकटात असताना
त्यांचा राम तू व्हायचंय
कृष्णाची गीता वाचून
कृष्ण तुला व्हायचंय
दु:खाशी एकट्याने लढताना हसत हसत तुला जगायचंय
बाळा हसत हसत तुला जगायचंय. . .
बाळा हसत हसत तुला जगायचंय. . .

सत्यजित.

2 comments: