Wednesday, October 2, 2019

असा पोटुशी पाऊस

असा पोटुशी पाऊस
शोधे मायेच अंगण
तिच्या लेकरांची दाटी
तिथे तिचं माहेरपण
तिच्या येण्याने अंगण
पुन्हा झाले लेकुरवाळे
इवल्या तृणांच्या पायी
साजे थेंबाचे गं वाळे
थेंबा थेंबांनी ती पापे
घेते मुक्या लेकारांचे
त्या लेकरांच्या कुशीत
गाती थवे पाखरांचे
आली माहेरवाशिण
तीच लिंबलोण करा
तिची वृक्षलतावल्ली
त्यांच लाडगोडं करा
चारमासाची पाहुणी
पुन्हा जाईल सासुरा
तिच्या लेकरांची तिने
तुझ्या हाती दिली धुरा
पोटच्या पोरा परी
त्यांचं संगोपन करा
मग पोटुशी पाऊस
तुझ्या येईल रे घरा....
मग पोटुशी पाऊस
पुन्हा येईल रे घरा....
-सत्यजित.

रुळावल्या आठवणी

रुळावरून गेली गाडी
दूर आठवांच्या गावा
तिथे मायेचा निर्झर
इवल्या स्वप्नांचा थवा
पारिजात अंगणात
गंध ओतत सांडेल
मोहक अबोली
फिक्या जुईशी भांडेल
तिथे कुंकवाची डबी
जास्वंदीत लवंडली
नवी गुलाबाची कळी
लाल होईतो लाजली
माझं बालपण तिथे
खेळताना सापडेल
तिच्या मऊसूत ओल्या
पदरात आढळेल
माझ्या राठल्या केसात
फिरे मायेचा गं हात
सोडे आठवांचा धूर
गाडी दूर दूर जात...
सोडे आठवांचा धूर
गाडी दूर दूर जात...

पाऊस - सोवळा सोहळा.

जपे स्पर्शाचं पावित्र्य
असा सोवळा पाऊस
बांध आतुर थेंबांना
धुकं बनला पाऊस


मन इतकं आतुर
झाले विचार फितूर
धुकं धुकं नजरेला
पार क्षितिजापातूर


अशा पावसाचे गडी
वृक्ष लतावल्ली झाडी
त्यांच्या पानात लपून
चाले पावसाची खोडी


झरे धुकं पानावर
थेंब दाटुनिया आले
त्याचे आतुरले स्पर्श
दबा धरून बसले


सखा वारा खोडसाळ
बघा आला मदतीला
ओल्या थेंबांच्या मिठीत
घेई पाऊस धरेला


तिज स्पर्शता पाऊस
लव हिरवी शहारे
तेव्हा माना उंचावून
वृक्ष देतीया पहारे


फुले रानात पानात
छुपा मिलन सोहळा
तिचा तलम पदर
त्यात धुकं झालं गोळा


त्याची धुकधुक धुकं
धुकं चुंबन सोहळा
असा भामटा पाऊस
तरी किती गं सोवळा


असा भामटा पाऊस
तरी किती गं सोवळा
धुकं पाऊस पाऊस
धुकं सोवळा सोहळा..

नाजूक साजूक मेहेंदी गं

मुकुल फुलांचा भार व्हावा तू इतुकी नाजूक फांदी गं
पुष्पदलांच्या तळव्यांवरती नाजूक साजूक मेहेंदी गं
डोळ्यां मधले भाव भाबडे ओल्या कडा पाणावती गं
डवरलेल्या आम्र तरु तळी स्पंदन घटिका दुणावती गं
हळद लागल्या गालांवरली लज्जित लाली केसंर गं
बांध घातल्या नयनजळातील प्रतिमा झाली धुंसर गं
रिंगण सावळे डोळ्यां भवती ती माय कावरी हसते गं
दीली तुळस जगदीशा घरी तरी धुकधुक मनी असते गं
कोकरां परी कुशीत शिरून घे जावळ तुझे कुरवाळून घे
गंध मायेचा उरात भरून घे स्पर्श मलमली गोंजारून घे
जपेल तुझा ती सारा पसारा राहिल सारे तुझे आहे तसे
आंगण प्रांगण तुझेच सारे लेक परकी ना कधी होत असे...
-सत्यजित.