Saturday, December 11, 2010

जेंव्हा बाप जन्माला येतो..

बाप झाल्यावर कळलं बाप होणं म्हणजे काय
जन्म दिल्यावर कळल जन्म घेणं म्हणजे काय

बाप म्हणजे पाऊस असतो बाप असतो हिरवळ
स्वतः जळत असताना, लेकराच्या चटक्यांची कळवळ

किती उशिरा कळू लागला खाल्ल्या फटक्यांचा अर्थ
काळजीला जनरेशन गॅप म्हणणं किती होतं व्यर्थ

समजवून सांगायला जाता, तो जातो चिडून निघून
रागातंही मला हसू येतं, समोर माझं बालपण बघून

समजवुन समजला नाहीच तर देतो चार फटके
आई-बाप ते आई-बापच ! कुणीच नसतं हटके

दु:ख खाल्ल्या फटक्यांचं नाही, दु:ख दिल्या फटक्यांचं नाही
मी जसा बाप बनलो तस त्याचंही त्याला कळेलच की नाही ?

दु:ख येवढच आहे अजुन कितीश्या चुका म्हातारपणी कळतील ?
तेंव्हा वळुन वळायचं म्हंटलं तरी, म्हातारी पावलं कीतीशी वळतील ?

आज किती सहज काढत जातो आपण त्यांच्या चुका
त्यांनाही आपले पाढे वाचता येतात, पण बाप राहतो मुका

उन्हात होरपळल्या शिवाय पाण्याची वाफ होत नाही
पाण्याची वाफ झाल्या शिवाय पाऊस होता येत नाही !

जळण्यामध्येही जगणं असतं येवढं आज ग्राह्य आहे
बाबा, तुमच बोट धरुन चालतोय म्हणुन सारं सुसह्य आहे !!

-सत्यजित.

7 comments: