Tuesday, August 26, 2014

प्रेमाच दुखणं

इतकी साधी सरळ गोष्ट
इतकी अवघड होउन बसते
रोजच तर बोलतो आम्ही
आजच का ती इतकी हसते?

सहजच हसता हसता
सहजच हाती देते हात
सहजच सहजच म्हणता म्हणता
वणवा पेटतो खोल आत

सहजच सहजच म्हणते ती
पण इतकं काही सहज नसतं
मेंदू, छाती, ह्रुदय याहून
मन काही तरी वेगळच असतं

का हा मनीचा नवा छंद
की हा मनीचा चाळा आहे
तिच्या आठवांच्या तरू खाली
स्वप्नांची भरली शाळा आहे

माझच मला कळतय की
हे माझ असं होऊ नये
आणि समजुन उमजुन झालं
तर प्रेम त्याला म्हणू नये

पण सांगाव तरी तिला कसं?
एकवार वाटतं होईल हसं
सांगुन टाकलं जरी कसं बसं
नाही म्हणाली तर होईल कसं?

"TO BE OR NOT TO BE?"
इतका का सोप्पा पेच आहे?
प्राजक्ताने भरली ओंजळ
वा भळभळणारी ठेच आहे....

-सत्यजित.

Tuesday, March 4, 2014

अजब सोहळा - Fall Colors

एक जीर्ण पोक्त पान
झाडावरुन कोसळलं
त्या पडत्या पानाला पाहून
झाडंही थोडं हळहळलं

हिरव्या कोवळ्या पालवीच्या
कडा तेंव्हा झाल्या ओल्या
वादळ तगल्या पानाचाही
कधीतरी होतो पाचोळा

वार्‍यावरती चालली होती
फरफट त्या पानाची
मृत्यू का ठरवतो किंमत
प्रत्येकाच्या जगण्याची?

वार्‍यावरती उडत पान
झाडाहून ही उंच गेलं
डवरलेलं झाड पाहुनी
पान मात्र हबकून गेलं

क्षणात साक्षात्कार झाला
जीवनाचा अर्थ कळाला
वार्‍या संगे फेर धरोनी
नाचू लागला पाचोळा

कुणी तरी ते पान
भगवद्गीतेत जपलं आहे
त्या जीर्ण पानाच्या जाळीत
जीवनसार लपलं आहे.

-सत्यजित.

Sunday, January 26, 2014

नयनामृत

आता फारसं जाणं होत नाही
की जाववत नाही कुणास ठाऊक?
पण गेलो की जाऊन बसतो
विहीरीवर तासंतास
ही विहीर बघितली की
आठवतात तुझे कथिल पाणेरी डोळे..

कधी दुथडी भरुन वाहणारे
तर कधी गहन खोल
आता विहीरीच्या काठावरती
तुझ्या डोळ्यांची आर्त ओल

दिसते मा़झी छबी खोल
पण आता थोडीशी अंधूक
विहीर होते डोळ्या देखत
ओल्या आठवणींची संदूक

इतक्यात कुणी माहेरवाशीण
विहीरीचे ओढते पाणी
मी ओंझळ पसरुन मागुन घेतो
तिच्या कळशीतले थोडे पाणी
.....
...
-सत्यजित.