Friday, December 4, 2009

वेड्या मनाचे श्लोक

मना वेड्या सारखा वागु नको रे
जे दिसे सर्व सुंदर मागु नको रे

जी इतकी सुंदर दिसते परिशी
तिचे आधी जुळले असते कुणाशी

आधी निरखावे, आधी पारखावे
आधी नोंदुन घ्यावे तिचे बारकावे

मनाचे मित्रांसी आधी सांगुन द्यावे
टाळावे मित्रांमधले फुका हेवे दावे

तिचे लक्ष वेधेल ते ते करावे
तिच्या कटाक्षासी जिवे मरावे

जसा फुला भोवती फिरतो रे भुंगा
तसा तिच्या भोवती घालावा पिंगा

फ्रेंडशीप डेला भले फ्रेंडशीप करावी
वॅलेंटाईन डेची मनी आस असावी

तिला एकटीला एकटेची गाठावे
धडकत्या मनाचे गाठोडे सोडावे

का ती नुसते नाक मुरडुन गेली?
वा तू दिले फुल चिरडुन गेली?

जर नाक मुरडता... पटली रे बेटा....
जर फुल चुरडता पुन्हा घाला खेटा

मना धीर कधी सोडु नये रे
न जुळलेले नाते तोडु नये रे

जरा रागवेल, जरा तिमतिमेल
जरा धीर धरता एकदा ती हसेल

शहाणपणाचे बहु सल्ले देतिल शहाणे
हे शहाणेच बसती चघळत चणे-दाणे

सत्या अंतिम सत्य सांगतो ऐक
"यत्न नी प्रयत्न" हाची मार्ग एक

जर ना पटली तरी तिच न होती एक
कर यत्न -प्रयत्न तुज मिळतिल कैक...

जय जय प्रेमविर समर्थ....!!!

-सत्यजित.

Friday, October 30, 2009

पाउसमयी...

धुक्यांच्या दुपारी
डोंगराच्या माथी
पाउस जाहली ती
देत हात हाती

मी चिंब चिंब ओला
पाउसही भिजलेला
चेतऊनी शहारा
मीठीत निजलेला

श्वासात मंद होता
मृद्गंध वेडावणारा
आवेग तुफान होता
नसांत रोरावणारा

विरघळून गेले माझे
तन मातीचे होते
खळखळत्या गिरीघारा
ओघळ प्रीतिचे होते

हळुवार उतरली सांज
इंद्रधनू नभात
पाउस मृण्मयी झाला
करीत प्रीतिची बरसात.

-सत्यजित.

Monday, October 19, 2009

कृत्रीम पाउस

तू आल्यावर पाहू म्हणून, छप्पर गळकंच सोडून दिलं
काल माझं छप्पर, सारं वार्‍यावर सोडून, उडून गेलं

बाबा म्हणाला होता....

आभाळातून बघेल तो, खाली वाकून बघत नाही
दोन-चार कवडशांनी कुणी जळून मरत नाही

बाबा, बघ तुला आधार देत वाशांना तडा गेला
वाशांचा आधार छप्पर सोडून उडून गेला

रहाटाचा कोरडा दोर टोचला असेल ना त्याला
कितीदा तुटला दोर.. कालच कसा तरून गेला ?

आभाळ पाहणारे डोळे आता आभाळातून पाहतात
आभाळातून रडतो बाबा तिथेही अश्रू कोरडे वाहतात

कृत्रिम पाऊस तलावांवर, शेत मात्र करपून जातं
करपलेलं जाळायला, सरकार दुष्काळी पॅकेज देतं !

-सत्यजित.

गीतोपदेश

पुन्हा भिक मागून भडवे
जिंकून येतील निवडणूका
उद्या साले हेच भडवे
करतील आपल्या अडवणूका
खरंच कुणास ठाउक
ह्या देशात कधी होतील का सोडवणूका ?

कुणाला दोष द्यायचा ?
साला... नागडेपणाची फॅशन आलिये
घोटाळे, फ्रॉड, रेप हीच आजची पॅशन झालिये
अगदी असेच नाही, पापभीरूही आहेत
लांब रांगा तासनतास
गंडे, महाराज, रुद्राक्ष, मंत्र तंत्र यंत्र
करा देवाचा धावा
देवही सैतानाच्या आधीन
फक्त पुजारीपणाचा कावा

पूर आला, मदत करा
कारगील झालं, मदत करा
रस्ता केला, टोल भरा
मग आम्ही भरल्या टॅक्सची
सुरळी केलीत कि काय ?
देश विकण्या आधी
तुमच्या आया-बहिणींची मुरळी केलीत कि काय ?

पण मी तरी काय करणार ?
प्रतिज्ञा केलीये लहानपणी
सारे भारतीय माझे बांधव आहेत
हाताबाहेर गेलेले कौरव
थोट्याचा बोटांएवढे पांडव आहेत

आयला ! कृष्णा ?
तू पण बाप आहेस
एवढ्या दिवस झेपलीच नव्हती बघ तुझी गीता !

-सत्यजित.

Wednesday, August 26, 2009

!!! ॐ श्री गणेशाय नमः !!!

उठ उठ रे उठ गणराया
तुज आवडता, मोदक घे खाया

पुर्वेस तिष्ठली सुर्याची किरणे
दव ओली झाली दुर्वांची कुरणे
तुझविन जास्वंदी रुसली रे फुलाया
उठ उठ रे उठ गणराया

बघ आकाशी चंद्र गेला विलयाला
तुझ ओवाळीत ये रवि उदयाला
उठ उठ रे उठ जगाचे तम साराया
उठ उठ रे उठ गणराया

तुज संगे खेळाया जमले बघ रे गण
भावे आनंदे उत्सवती तुझाच रे सण
ह्या भक्तांची दु:खे ने विलयाला
उठ उठ रे उठ गणराया

!!! ॐ श्री गणेशाय नमः !!!

Saturday, August 15, 2009

चिमुटभर

अंगोपांगी उठलेल्या व्रणांना
तू मिलन खुणा म्हणालास
मी प्रेम तर तू अधिकार म्हणालास
यातच सगळ आलं
चिमुटभर वाळु झालं..


-सत्यजित

Friday, August 14, 2009

आला आला माखन चोर रे...



माझ्या राहूटीत शिरला मोर रे...
आला आला माखन चोर रे...

निळं निळं तनू भाळी मोर पिसारा
दुध, तुप, लोणी खाउन केला पोबारा
त्याला बांधावा तर मिळेना गं दोर रे...
आला आला माखन चोर रे...

भरलेला घडा होता टांगला वर
एका वर एक त्यांनी रचले गं थर
वर नंदाच कार्ट पोरं रे....
आला आला माखन चोर रे...

ऐकेना पोरं हाती घेतली मी काठी
एक एक रट्टा दिला एकेका पाठी
माझ्या जिवालाच लागला घोर रे...
आला आला माखन चोर रे...

मैया म्हणुन डोळ्यातले पुसतो गं अश्रू
माझ्या कुशीत गं शिरलं अवखळ वासरु
कसं लबाड हे यशोदेच पोरं रे...
आला आला माखन चोर रे....

-सत्यजित

Monday, July 27, 2009

प्राण्यांचं सा रे ग म (बालकविता)

एकदा जंगलात प्राण्यांनी ठेवलं सा रे ग म
गाणी गात बसले सगळे सोडुन आपली कामं

पहीला राउंड होता पाळीव प्राण्यांचा
मनीला दिला चान्स पहिला गाण्याचा
मनी गायली मन लाउन म्यॅवं म्यॅवं म्यॅवं...
जज म्हणाले बंद करा हीची ट्यॅंव ट्यॅवं...
मनी खुप चिडली म्हणाली , मला माणसं म्हणतात 'मनी'
पहीला आहे 'म' बरं का? आणि दुसरा आहे 'नी'

नंतर आला कुत्रा, भाँव भाँव.. भूंSSSS....
करत लावली वरची तान
जज म्हणाले मित्रा किती गातोस रे छान..

नंतर गाढव गायलं करत हॅहूंS हॅहूंSS हॅहूंSS...
जज म्हणाले "गाढवा, हे काय गातोस तू?"
अहो.. हिंदी मध्ये मिळाला मला वरचा 'ग' आणि 'धा'
म्हणुन तर हींदी मध्ये मला सगळे म्हणतात 'गधा'

नंतर आला राऊंड जंगली प्राण्यांचा
वाघोबाचा डाव होता प्राणी खाण्याचा

पहीलं गाणं गायला आला एक जिराफ
येवढ्या वरती माईक ओढला झाला तो खराब
मग माईक न घेताच गायला आला एक हत्ती
सोंड वर करुन जोरात गायला तो कित्ती.... हॅऋंSSSS....

लाजत मुरडत मुरके घेत, होतं हरण गात
जज म्हणाले तुझ गाणं साजुक वरण भात

सिंह महाराज आले म्हणाले "दे पट्टी, चार काळी"
सगळे हसताच चिडुन त्यांनी फोडली रे डरकाळी

डरकाळी ऐकताच सगळ्या प्राण्यांनी ठोकली धुम
गाणंबीणं काहीच नाही, झाली सगळीच सामसुम.... झाली सगळीच सामसुम....

शूंSSSS..... इतना सन्नाट क्यूं है भाई?

आहे ना, आयडीया सारेगम?

-सत्यजित.

Thursday, July 16, 2009

तुझे हासणे काळजावरी....!!!!

तुझे हासणे झुले काळजावरी
जशी वार्‍यावरती झुले सावरी

नदिच्या किनारी हळुवार लाटा
तुझ्या लाजण्याच्या अलवार छटा
अन फेनफुले... माझ्या उरी....

तुला पाहता मी बेधुंद होतो
मनाच्या व्यथांचा जुई गंध होतो
झाली स्पंदने ही... फुलपाखरी...

कसे शब्दाविन गित साकारते
मनाची सितार झनकारते
कधी एकतारी... कधी बासरी...

ह्या जगण्याचे आता नवे पेच झाले
स्वन्पात जगणे... नित तेच झाले
अता मरणे नेतो हसण्यावरी

तुझे हासणे काळजावरी....!!!!

-सत्यजित.

Tuesday, July 7, 2009

मैत्री

मैत्री म्हणजे काय?
सांगता येत नाही
मैत्री कधी मैत्रीचा
पुरावा देत नाही

मैत्री मुळीच नातं नसतं
मैत्री नसते बंधन
मैत्री म्हणजे श्वास असतो
मैत्री असते स्पंदन

मैत्री राधीकेच गाणं
मैत्री सावळ्याचा पावा
मैत्री सारं सारं देउन
मिळाल्याचा दावा

मैत्री छोटं बाळ असतं
मैत्री असते पोक्त
मैत्री सुदाम्याचे पोहे
मैत्री मथुरेच तख्त

मैत्री असते सागर
मैत्री असते झरा
मैत्री असते अथांग खोल
मैत्री खळखळणारी धारा

मैत्री कधीच मरत नसते
मैत्री कधीच सरत नसते
मैत्री अमृताचे थेंब होऊन
रितेपण भरत असते

मैत्री सांगता येत नाही
मैत्री असते जाणीव
मैत्रीत मागता येत नाही
मैत्रीत नसते उणीव

मैत्री नसते स्वार्थ
मैत्री ना परमार्थ
मैत्री असते साधासरळ
जिवनाचा अर्थ

मैत्री गालावरचे
अश्रू पुसणारा हात
मैत्री आत आत खोल खोल
रुजलेली साथ

मैत्री असते घट्ट मिठी
मैत्री असते झप्पी
मैत्री थुईथूई आनंदात
गालावरची पप्पी

मैत्री असते कुणासाठी
अविरत कळकळ
मैत्री असते शब्दांवाचुन
व्यक्त होणारी तळमळ

मैत्री असते दोन श्वास
मैत्री दोन श्वासातलं अंतर
मैत्री श्वासांचाही श्वास
मैत्री श्वासांच्याही नंतर

मैत्रीवर लिहीता लिहीता
आकाश भरुन जाईल
समुद्राच्याही शाईचा
दौत रीता होईल

मित्र दुर होतात तरी
मैत्री कधीच विरत नाही
मैत्री आठवणींचा गंध
मैत्री कधीच झुरत नाही

-सत्यजित

Sunday, July 5, 2009

बडबड गित

एक मणी दोन मणी
मण्यांवरती ओवले मणी

मण्यांची झाली माळ
चिउला झालं बाळ

माळ दिली बाळाला
चोर घेउन पळाला

मग आले पोलिस
चोर लपला खोलित

खोली मध्ये नव्हतं कोणी
खोली मध्ये होती गोणी

गोणी मध्ये होतं झुरळं
चड्डी मध्ये शिरलं सरळं

चोराने झुरळाला मारलं
पोलिसांनी त्याला धरलं..

-सत्यजित

फाजिल लाड ( बालकविता )

मुर्खाचा घोडा
पायी सोन्याचा तोडा

तोडा होता जड
घोडा चालेना धड

मालकाला खटके
तो मारी त्याला फटके

सोन्याने मढविलं
चाबकाने बडविलं

काढुन घेतला तोडा
आणला नविन घोडा

तोडा होता जड
पुन्हा तिच रडरड...

-सत्यजित

चतुर कावळा (बालकविता)

एक होता कावळा
मुळीच नव्हता बावळा

कावळ्याला लागली तहान
मडके होते लहान

मडक्यात पाणी थोडे
कावळ्याने टाकले खडे

पाणी आले वरवर
कावळ्याने पिले भरभर

-सत्यजित.

Tuesday, June 23, 2009

शिवाजी महाराज की जय!!! (बालपोवाडा)

टप, टप, टप, टप चाले
घोडा शिवाजी राजांचा
शिवबांनी पार उडविला
धुव्वा रे मुघलांचा

बाळकडु स्वभिमानाचे
जिजा बाळ शिवाला पाजे
आईच्या गर्भात नसते
कुणीच कुठले राजे

स्वराज्य स्थापना करीन म्हणाला...
धरिली रायेश्वरावर रक्ताची धार
वय कोवळे ते हुंदडण्याचे
चौदा,पंधरा फार तर फार

मावळ्यांची फौज बनवली
हे वंशज प्रभू रामाचे
देश, देव अन धर्म रक्षिण्या
ठाकले उभे शिवाजी राजे

ते वाघांचे बछडे होते
अन एक सिंहाचा छावा
बलाढ्य शत्रूला नमविण्या
रचिला गनिमी कावा

रक्षण दिन दुबळ्यांचे
वर्तन माणुसकीला साजे
शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ
सांगती शिवाजी राजे

हर हर महादेव!!!

सत्यजित.

सांग का घडतो गुन्हा?

पाहणे माझे तुला,
सांग का घडतो गुन्हा?
खेळ ना नजरेचे असती,
निमिषी तू पुन्हा पुन्हा?

सांग मी मग काय पाहू?
काय असे नजरेस दावू?
मग अशी वळणार नाही
पाहण्या तुजला पुन्हा

मी पापण्यांना पांघरुनी
पाहणे जगास टाळले
अंतरंगी साठलेल्या
टाळु कसे कोवळ्या उन्हा?

पाहणे स्पर्षाने असते
पाहणे गंधाने असते
पाहणे पंचेद्रियांनी
छंद माझा का गुन्हा?

तेजोगोलाने न पहावे
तर चंद्र ही उरता सुना
पाहणे माझे तुला,
सांग का घडतो गुन्हा?

-सत्यजित.

पोळपाट आणि लाटणं (बालकविता)

लाटणं म्हणाल पोळपाटाला
कशास रे तुझी इतकी मिजास?
रोज रोज पोळ्या लाटुन
मीच का करावी तुला मसाज?

पोळपाट म्हणालं..
तुला लाटता यावं म्हणून
मी उपडा पडुन रहातो
पोळी नाही, तवा नाही,
मी तर जमिन पहात रहातो

लाटण्याला कळालं त्याच
चुकीचं होतं वागणं
कधीच नाही भांडत म्हणून
पोळपाट आणि लाटणं

-सत्यजित

Monday, June 22, 2009

मंत्रमुग्ध....

तुझ्या सवे घालवलेला प्रत्येक क्षण हा स्वप्ना सारखा असतो, पण म्हणुन स्वप्न थांबत नाहीत ना! तिथेही तुच असतेस सदैव.

अवेळी कधीही... अशी तुझी याद यावी
मी जगल्या स्वप्नांना... पुन्हा जाग यावी

तू नकळत माझा हात धरलास आणि लक्षात येताच... अलगद सोडवुन घेतलास हळुवार, अगदी पारिजात वेचावा ना... तसा. तू हात सोडवुन घेतलास पण तुझा स्पर्श ? तू तसाच गोंदवुन गेलीस...

माझी ती अवस्था न माझी मला कळावी
तू दिल्या पाकळ्यांची पुन्हा कळी व्हावी

माझ्या नजरेत गुंतलेली तुझी नजर... तू केसांत माळलेल्या गजर्‍या प्रमाणे हळुवार सोडवुन घेतलीस खरी....पण तुझ्या नजरेने कोरल्या कवितांच काय?

तुझे शांत डोळे मुक्या वासराचे
त्या नयनांची भाषा मला का कळावी ?

आपल्यातला हा अबोला कित्ती काही बोलतो नाही?... तुझ्याशीही आणि माझ्याशीही... माझ्या स्वगतावर तुझं असं दचकणं, मी माझ्या मनातल्या मनात केलेल्या धारिष्ट्यावरही तुझं जोवघेंण लाजणं... सारंच कसं अद्भुत... सारंच कसं अद्वैत...

आज कळे भावनांना कधी शद्ब नसतात
ह्या शब्दांनी भावनांची नुसती वकालत करावी

मग मनाच्या कोर्टात भावनांचा खटला चालू होतो. ह्रुदयाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केल जातं आणि विचारल जातं, की तू असा का वागतोस? तू असा का बहकतोस... ती येता? त्या वकिल शब्दांना आरोपी मन अबोल उत्तरं देत.. आणि हे शब्दच मग आरोपीच वकिलपत्र घेतात.. आणि अगदी तेंव्हाच एक कविता जन्म घेते...

तुझे ते इथे तिथे उगा काही बाही पहाणे
तू गुंतलेली अनंतात, मी वसंताच्या गावी

तुझ्या मनातली हुरहुर लपवण्यासाठी, तू कुठल्याश्या विचारात गुंतली आहेस असं भासवण्याची तुझी धडपड.... हातातल्या पुस्तकांवर तुझी नजर खिळलेली आणि हळुवार तुझ्या बटांना रागवणारे... तुझे प्रेमळ हात... तू डोळ्यांच्या कोनातुन माझ्या हलचाली निहाळत रहातेस, मी डोळ्यांतल्या मनातून तुला निहाळत रहातो. डोळ्यांना डोळे भिडले नाहीत तरी आपल्या नजरा सदैव जुळलेल्या...

तुझ्या पदरांवर होती, फुले फुलली गुलाबी
का वाटे माझ्या हातांची फुलपाखरे व्हावी?

तू डवरलेली जुई.... तू बहरलेला परिजात... तू अंग चोरुन बसलेली... दवओली श्रावण पहाट...
तू अशीच बसुन रहा मी असाच हरवत जाईन, तुझे हे नजरेचे खेळ.. असाच पिसा होउन पाहीन...

तू अबोला सोडत म्हणालीस... "निघुया?"

मी माझ्याशीच हसत म्हणालो, आत्ता?
मी तर कधीचाच निघालो कुठल्याश्या गावी...

अवेळी कधीही ... अशी तुझी याद यावी
मी जगल्या स्वप्नांना.. पुन्हा जाग यावी ....

-सत्यजित.

Tuesday, June 2, 2009

तुझी आठवण...

पाउस आतला
एकांती मातला
बरसती धारा
निरंतर

कोरडे भिजणे
वाळले रुजणे
फुलण्याची ओढ
अनामिक

बुद्वुदा जलाचा
अवनी तनुचा
उरतो कितीसा?
क्षणातीत

-सत्यजित.

Wednesday, May 13, 2009

चंद्रमौळी गटार

गटार...,
दिवसभर दुर्गंधी वहात वाहणारं गटार...
रात्र होताच कसलीही तक्रार न करता तेही होत निवांत, स्थिर
त्या काळ्याशार पाण्यात दिसतं
चांदण्याचं मोहक प्रतिबिंब,
अगदी तुमच्या निळ्याशार समुद्रात किंवा
नितळ गंगेच्या पाण्यात दिसणार नाही इतकं मोहक

उद्या पुन्हा हे गटार वाहु लागेल,
रात्रीची घाण धुऊन, न्हाऊन, पुसून, टापटिप निघालेली लोकं
नाकं मुरडतिल त्याला पाहुन,
अगदी तशीच जशी मला पाहुन मुरडतात
दिवसभराचा कोलाहल संपला की
मी जाउन निजतो त्याच्या शेजारी
आणि मग पुन्हा
त्याच्यात आणि माझ्यात तेच चांदण फुलतं..
उद्याच्या सुखवस्तू स्वप्नांचं...

टापटिप लोक नावं ठेवत रहातात
त्यांचा समुद्र खराब झाला म्हणुन
ह्याचं येड्यांचही माझ्या सारखंच
कुणाचं पाप कुणाच्या माथी...

मी आणि माझं चंद्रमौळी गटार

-सत्यजित.

Tuesday, April 21, 2009

पाउसपान्हा

घनन घनन घन
आला ओलाव्याचा सण
पुन्हा मोहरली धरा
तिचा येणार साजण

थेंब थेंब रानभर
थेंब थेंब अंगभर
अंग अंग ओलावलं
सरे विरहाच ज्वर

उठे आवेग तुफान
सुटे मिलनाचा गंध
कुठे रानात पानात
तुटे काचोळीचा बंध

तिच्या कण कण वाहे
त्याचा थेंब थेंब थेंब
तिच्या मायेच्या कुशीत
त्याचा रुजलेला कोंब

तिच्या माउलल्या कटी
उद्या दिसेल गं कान्हा
ती देईल त्याचे ओठी
त्याने दिलेला गं पान्हा.

-सत्यजित.

Thursday, April 2, 2009

झुंजुमुंजू

रात्र ओलावलि अन चंद्र ओलेता रहिला
सुकवताना केशसंभार मी पहाटेला पाहिला

विखुरल्या चांदण्या तिने सोनकोवळ्या उन्हात
ओल्या कुंतलातुन ओघळता पाहिला उल्काप्रपात

हळुवार गुंफले केस तिने रात्र विझवुन टाकली
ओल्या पदराआड तिच्या पहाट दवांची झाकली

ती मालवणारी रात्र होती की उमलणारी उषा?
तिचीच झुंजुमुंजू राहिली व्यापुन दाही दिशा

-सत्यजित.

Thursday, March 26, 2009

मी परी...(बालकविता)

परी गं परी तू आहेस का खरी?
कधी तरी येशील का माझ्या पण घरी?

येशील का सांग तू माझ्या बर्थडेला?
करशील का सांग तू मला सिंड्रेला?

चमचमता ड्रेस अन काचेचे बूट
जादूच्या कांडीने खेळण्यांची लूट

असंच एकदा रात्री, काय गंमत झाली
एक छोटीशी परी घरी माझ्या आली

पंख लाउन म्हणाली, चल पर्‍यांच्या देशात
मीही परी झाले छान परीच्या वेशात

केवढा मोठ्ठा सी-सॉ होता मस्त चंद्राचा
सी-सॉचा रथ होता पांढर्‍या शुभ्र उंदरांचा



उंदरांना घातले होते मऊ ढगांचे बूट
रथवान घालुन होता पांढरा सुंदर सूट

रथातुन निघालो परी राणीला भेटायला
हळुच लगाम देता लागला उंदीर उडायला

छोट्या छोट्या पर्‍यांची सुंदर सुंदर घरं
ते जादुच गाव होतं, पण होतं खरंखुरं!

खुदूखुदू हसत होतं झुळुझुळू पाणी
पानं फुलं गात होती सुंदर सुंदर गाणी

प्राणि होते उडत, नी झाडे होती चालतं
फुल, पक्षी, दगड, माती सगळेच होते बोलतं !!

बडबडणार्‍या वस्तूंची चालली होती सहल
सगळे पहायला चालले होते राणीचा महल

राणीचा महल होता दुर ढगांच्या पार
राणीचा महल होता सुंदर फार फार

गोळ्या, केक, आईसक्रीम खुप होता खाउ
चला लवकर लवकर परीराणीला पाहू

राणीला बघायला सगळ्याचीच घाई
राणी तर दिसत होती एकदम माझी आई (?)

राणी म्हणाली "चल उठं बघु आता"... ?
आई म्हणाली "चलं उठ बघु आता"
"येईन पुन्हा" म्हणाली परी जाता जाता

घाई घाईत गेली परी माझे पंख विसरुन
मीही उडू शकत होते माझे हात पसरुन

आईनी आणला होता तोच परीचा ड्रेस
(म्हणाली)आधी खाउ खाउन घे मग नंतर नेस

खर्‍या परी राणीची आत्ता भेट झाली
तरी म्हंटल परी कशी पंख विसरुन गेली...!!!

-सत्यजित.

Tuesday, February 17, 2009

हनुमॅन माझा मित्र...(बालगीत)



सुपरमॅनला स्पाईडरमॅनला नाही अनुमान
सर्वात शक्तीशाली आहे माझा हनुमान

सुपरमॅनला दिली जर त्यानी एक फाईट
चड्डी वरची चड्डी पण होउन जाईल टाईट

स्पाईडरमॅनच्या छातीतुन निघेल एक कोळी
एकच फाइट देता घेईल जुलाबाची गोळी

एक उडी घेउन जातो साता समुद्राच्या पार
डोंगर उचलू शकतो त्याला शक्ती आहे फार

एकटाच गेला उडून नी लंका आला जाळून
रावण गेला घाबरुन, सगळे राक्षस गेले पळून

भक्ती त्याची शक्ती, नी भक्तीच त्याचं काम
छाती फाडुन दाखवेल तो अंतरातले राम

बोलो सियावर रामचंद्र की जय !!
बोलो हनुमान की जय.. !!

संकट येता कुठलेही तो करतो माझी रक्षा
मी सकाळ संध्याकाळी म्हणतो रोज रामरक्षा

मी दर शनिवारी म्हणतो मारुतीचं स्तोत्र
हनुमान झाला आहे खरंच माझा मित्र...

बोलो बंजरंग बली की जय !!!
बोलो हमुमान की जय.. !!!

-सत्यजित.

Thursday, February 12, 2009

देवा... I Just want to die

आली आली येउन बसली पहिल्या बाकावर
जिवघेणा एक तिळ होता तिच्या नाकावर

तिळतिळ ह्रुदय तुटले तिच्या ओल्या ओठांवर
तिळतिळ तुकडे झुलती तिच्या उडत्या बटांवर

नाजुक बोटां वरती लावला जालिम नेलपेंट
डाव्या छातीत धडकले उढला छातीवरती डेंट

झुळझूळ ओढणी उडता श्वासांमध्ये भिनला सेंट
झुळझूळ ओढणी ढळता आयला! मी तर झालो पुरता फेंट

ती पिट पिट पापण्या मिटता मी तर पुरता गेलो रे
उरले सुरले क्षणात विरले आता नावा पुरता उरलो रे

मंजुळ मंजुळ हसली गाली मजला पाहुन ऐसे रे
माझे माझे मलाच कळेना मी केले सहन कैसे रे

साखर पाकात घोळवत मजला म्हंटले तिने "हाय"
हाय हाय ...मी तर गेलो मेलो ...I Just want to die. देवा. I Just want to die

-सत्यजित.

Wednesday, January 28, 2009

अशी असावी माझी शाळा ...(बालकविता)

अशी असावी माझी शाळा यावा न मजला कंटाळा
समुद्र तळाशी वर्ग भरावेत मधली-सुट्टी आभाळा

पुस्तक वाचे धडे धडाधड
गोष्टी सांगे छानच छान
प्रष्णच देती उत्तरे भराभर
पेनच काढे अक्षर छान

मिक्की डोनाल्ड शिक्षक अमुचे,
कार्टून नेटवर्कचा फळा
(अशी असावी माझी शाळा..)

टाईम मशीनमध्ये बसुनी
इतिहासात मारु चक्कर
शिवबांचा आदर्श घेवुनी
य्ये.. शत्रूला देउ टक्कर

ग्रह-तार्‍यांचा भुगोल शिकण्या
रॉकेट नेईल अंतराळा
(अशी असावी माझी शाळा..)

देणे घेणे काहीच नाही
मग गणिताचे काय रे काम?
पाढ्यांचे झुले बांधुनी
झोके घ्यावे लांबच लांब

न गुणिले, उरले, हातचे, बाकी
न भाग भागिल्यांचा चाळा
(अशी असावी माझी शाळा..)

येथे नसतिल तास कुठले
नसतिल तासांच्या वेळा
नंतर करुया आभ्यास सगळा
आधी नाचा नी खेळा

कधी नसावी सुट्टी मजला
न कधीच यावा उन्हाळा
अशी असावी माझी शाळा यावा न मजला कंटाळा...!!!

-सत्यजित.

Thursday, January 22, 2009

अगदी ठाम ठरवून..

परवाच मी आवरायचं म्हणून
पुन्हा पसरुन बसले आवरलेलं
आणि सारं सारं घरंगळलं
मी इतक्या हट्टाने सावरलेलं

काही जीर्ण चिटोर्‍यात..
तर काही गंजल्या कटोर्‍यात
सारं कसं रंजूनही खदखदत होतं
सारं कसं गंजूनही लखलखत होतं...

हळुवार स्पर्शांनी सरल्या क्षणांची
वाढू लागते वर्दळ
हळुवार, मंद.. मंद.. पसरु लागतो..
अगदी.. अगदी त्या वेळीचा दरवळ

तेव्हा हे सारं का जपलं होत?
तेव्हा हे सारं कसं, माझं...
फक्त माझं, आपलं होतं...

पावसाच्या पहिल्या थेंबाप्रमाणे
फुटतं एक खुदकन हसू
आणि गवसतात काही
अंतर्मुख करणारी स्मितं..

मी ओंजळीत पुन्हा पकडू लागते
मायेच्या अंगणातले
सळसळत्या पानातले
ते झुळझुळते कवडसे....
बंद पापण्या लख्ख लख्ख तेजाळतात
ती भरली ओंजळ बघायला मी डोळे उघडते......
ए वेडाबाई... कुठे हरवली होतीस?
मलाच पुसते.. माझी रिती ओंजळ
मी हळुवार डोळे मिटते
आणि उधळून देते माझी भरली ओंजळ...

मी भूतकाळाशी समरस असताना
इथे वर्तमानाची समरं पेटलेली असतात
मी पुन्हा घाईघाईने आवरु लागते
पुन्हा पसरायचं नाही हं, असं ठाम ठरवून...

-. (सत्यजित)