तुझ्या सवे घालवलेला प्रत्येक क्षण हा स्वप्ना सारखा असतो, पण म्हणुन स्वप्न थांबत नाहीत ना! तिथेही तुच असतेस सदैव.
अवेळी कधीही... अशी तुझी याद यावी
मी जगल्या स्वप्नांना... पुन्हा जाग यावी
तू नकळत माझा हात धरलास आणि लक्षात येताच... अलगद सोडवुन घेतलास हळुवार, अगदी पारिजात वेचावा ना... तसा. तू हात सोडवुन घेतलास पण तुझा स्पर्श ? तू तसाच गोंदवुन गेलीस...
माझी ती अवस्था न माझी मला कळावी
तू दिल्या पाकळ्यांची पुन्हा कळी व्हावी
माझ्या नजरेत गुंतलेली तुझी नजर... तू केसांत माळलेल्या गजर्या प्रमाणे हळुवार सोडवुन घेतलीस खरी....पण तुझ्या नजरेने कोरल्या कवितांच काय?
तुझे शांत डोळे मुक्या वासराचे
त्या नयनांची भाषा मला का कळावी ?
आपल्यातला हा अबोला कित्ती काही बोलतो नाही?... तुझ्याशीही आणि माझ्याशीही... माझ्या स्वगतावर तुझं असं दचकणं, मी माझ्या मनातल्या मनात केलेल्या धारिष्ट्यावरही तुझं जोवघेंण लाजणं... सारंच कसं अद्भुत... सारंच कसं अद्वैत...
आज कळे भावनांना कधी शद्ब नसतात
ह्या शब्दांनी भावनांची नुसती वकालत करावी
मग मनाच्या कोर्टात भावनांचा खटला चालू होतो. ह्रुदयाला आरोपीच्या पिंजर्यात उभं केल जातं आणि विचारल जातं, की तू असा का वागतोस? तू असा का बहकतोस... ती येता? त्या वकिल शब्दांना आरोपी मन अबोल उत्तरं देत.. आणि हे शब्दच मग आरोपीच वकिलपत्र घेतात.. आणि अगदी तेंव्हाच एक कविता जन्म घेते...
तुझे ते इथे तिथे उगा काही बाही पहाणे
तू गुंतलेली अनंतात, मी वसंताच्या गावी
तुझ्या मनातली हुरहुर लपवण्यासाठी, तू कुठल्याश्या विचारात गुंतली आहेस असं भासवण्याची तुझी धडपड.... हातातल्या पुस्तकांवर तुझी नजर खिळलेली आणि हळुवार तुझ्या बटांना रागवणारे... तुझे प्रेमळ हात... तू डोळ्यांच्या कोनातुन माझ्या हलचाली निहाळत रहातेस, मी डोळ्यांतल्या मनातून तुला निहाळत रहातो. डोळ्यांना डोळे भिडले नाहीत तरी आपल्या नजरा सदैव जुळलेल्या...
तुझ्या पदरांवर होती, फुले फुलली गुलाबी
का वाटे माझ्या हातांची फुलपाखरे व्हावी?
तू डवरलेली जुई.... तू बहरलेला परिजात... तू अंग चोरुन बसलेली... दवओली श्रावण पहाट...
तू अशीच बसुन रहा मी असाच हरवत जाईन, तुझे हे नजरेचे खेळ.. असाच पिसा होउन पाहीन...
तू अबोला सोडत म्हणालीस... "निघुया?"
मी माझ्याशीच हसत म्हणालो, आत्ता?
मी तर कधीचाच निघालो कुठल्याश्या गावी...
अवेळी कधीही ... अशी तुझी याद यावी
मी जगल्या स्वप्नांना.. पुन्हा जाग यावी ....
-सत्यजित.
This entry was posted
on Monday, 22 June 2009
at 1:06:00 AM
and is filed under
दिल से...
. You can follow any responses to this entry through the
comments feed
.

