Monday, March 14, 2011

थोडासा बादल, थोडासा पानी, और इक कहानी...

तेच ठिकाण, तीच टेकडी... तो कधीचा तिथे पोहचला आहे, आणि तिला, उशीर झाला आहे. ती निघाली आहे... सारखा फोन, तिचं नक्की येण्याच वचन...आणि दाटून आलेला पाउस.

रंग उधळती संध्याकाळ, सोसाट्याचा वारा, पावसाची चाहुल, मिलनाची ओढ आणि चलबिचल मन... अजुन काय लागतं कविता सुचायला? ही ओळचं एक कविता आहे.
पण आता पाउस आला तर ती कशी येणार? ती येईल नक्की येईल, पण भिजेल ना ती.. इतकी कोमल, इतकी सुंदर... आणि तिला इतका त्रास? आणि इतका त्रास, कुणासाठी? फक्त माझ्यासाठी ...
प्लिज.... प्लिज... प्लिज... हे घनांनो आता बरसू नका, थोडा वेळ थांबा... तिला एकदा इथे येउ देत मग काय थयथयाट घालायचा आहे तो घाला.. पण थोडा वेळ थांबा... तू जगाचा पाउस असशील पण माझा पाउस तर तीचं आहे... माझी सखी...

तो मनातल्या मनात घनांना विनवणी करतो आहे, आळवणी करतो आहे आणि तेवढ्यात पावसाचा एकच थेंब त्याच्या गालावर पडतो... असहाय्य...अस्वस्थ मनाला तेवढसं पुरे आहे.
विनवणीचे सुर रागत बदलतात... तो त्या घनांनाच दोष देतो की माझी इतकी सुंदर प्रेयसी बघुन तुमचाही तोल ढळला आहे.. म्हणूनच इतके अधीर होताय... शोभत नाही हे तुम्हाला...

इतका राग, इतकी अस्वस्थता पण पाउस म्हणजे "रोमांस".. ज्याला पावसात रोमँटीक वाटतं नाही त्याला प्रेम तरी कसं होईल? हा तर प्रेमवेडा आहे.. मगास पासुन गुणगुणत असलेल्या गाण्याचे सुर तसेच तरंगतायत त्याच्या मनात... तुमने इश्क का नाम सुना है... हमने इश्क किया है... इमली से खट्टा इश्क..इश्क.. ( वाह रे रेहमान...!!)
सुरांचं आणि काळजातल्या भावनांच मिलन झालं की कविता आपसूकच उमलते... आणि अशीच गुणगुणलेली ही कविता...

कॄष्ण घनांनो बरसू नका रे
सखीस माझ्या भिजवू नका रे

माझा येणार साजण... रिमझीम
पायातील पैंजण... रिमझीम
हातातील कंकण... रिमझीम
ओठातील गुणगुण... रिमझीम... ... ...

सर सर येते तुझीच रे सर
सलतील तिज हे थेंबांचे शर
स्व:तास इतके रिझवू नका रे ... सखीस माझ्या...

झोंबेल तिज हा शितल वारा
कोमल कांती निळा शहारा
स्व:तास इतके झुकवू नका रे... सखीस माझ्या

माझ्याहूनही तुलाच हुरहूर
आवर तुझीही आतूर भुरभूर
दिलाचे चोचले पुरवू नका रे... सखीस माझ्या

तिचा पदर ना थेंबाचे घर
तिचे अधर ना फुलांचे दल
उगाच स्वप्ने उजवू नका रे... सखीस माझ्या

रंग उधळते तुझे नभांगण
भुलेल तुज हा माझा साजण
भास मनात हा रुजवू नका रे ... सखीस माझ्या

-सत्यजित.

1 comment:

  1. माझ्याहूनही तुलाच हुरहूर
    आवर तुझीही आतूर भुरभूर
    दिलाचे चोचले पुरवू नका रे... सखीस माझ्या

    Sundar jamliye kavita...!

    ReplyDelete