Thursday, April 26, 2007

मीरा. . .

आज तिने केस धुतले अन
ओल्या केसांचा आंबाडा घातला
ती वेचायला येणार म्हणून
पारिजातकाने सडा सांडला

धुके उतरले मंद मंद
आसमंती गंध दरवळला
त्या कोमल म्लान स्पर्षाने
पारीजातही थोडा सळसळला

ती फ़ुलं जितकी कोमल
तितकच हृदयही तीचं कोमल
गुलबक्षीला स्पर्ष होताच
उठला फ़ुलपाखरांचा मोहोळ

तुळसही थोडी तिष्ठली
तीज फ़ुलझाडांचा वाटे हेवा
स्पर्ष पहिला प्राजक्तास
मज प्राजक्त का नाही केलेस देवा ?

आरक्त ओठ हळूवार
श्रीकृष्णाला आळवी
आर्त ती साद ऐकूनी
हळवी होई पालवी

चरणी तुझ्या विलीन होण्या
आळवी तुज ही मीरा
अरूणोदय होण्या समयी
कुठे रे गुंतलास श्रीधरा . . .

सत्यजित.

आई सांग ना . . .

आई मी गर्भात असताना तुला विचारलं होतं
मी येणार ते जग कसं आहे ?
तू म्हणाली होतीस
शब्दात नाही सांगता यायचं
इतकं ते लोभस आहे
आई आई तू मला फ़सवलंस
ह्या जगाचं सारं लोभस रूपच दाखवलंस
दुथडी भरून वहाणार्‍‍या नद्या
झुळझुळणारं पाणी
चिमण्यांचा किलबिलाट
आणि कोकिळेची गाणी
पौर्णीमेचा चंद्र आणि
सुखद निद्रेची रात्र
राम कॄष्णाच्या गोष्टी नी
देवादिकांची स्तोत्र
सारं सारं लोभस
आई सारं सारं बोगस
इथे दुष्काळात करपलेली जमिन
अन पूरात वाहणारी घरे
कुठे कोरडा आक्रोश तर
कुठे अश्रुंचे झरे
इथे दारिद्र्याच्या विळखा आहे
अन कुपोषणाचे बळी
दैत्यांच्या पापांचा फ़ास
निष्पापांच्या गळी
धर्मा अधर्माच्या झगड्यात
शेवटी धर्माचेच मरण
चांगल्या तत्वांनी घ्यावी
परिस्थीती पुढे लोळण
आई सांग तू मला का फ़सवलंस ?
आई सांग तू मला का फ़सवलंस ?
ह्या निर्दयी जगाचं लोभस रूपच का दाखवलंस ?

आई म्हणते . . .

बाळा मी जगायला तुला शिकवतेय
तर तू मरणाचं दु:ख घेउन बसलास
मी लढायला तुला शिकवताना
तू पराजयाच्या कल्पनेनेच खचलास ?
रोज सुर्याचा प्रकाश असताना तुला
अमावस्येच्या रात्रीचं भय कशाला ?
जीवनातील सुखाचे क्षण वेचताना
दु:खाची पर्वा कशाला ?
जीवनात दु:ख नसले की
सुखाचे मोल रहात नाही
दु:खाना कवटाळून सुखाने
सुखातही जगता येत नाही
उचलताना पहिले पाउल
पडण्याची भीती बाळगू नकोस
कीतीदा जरी पडलास तरी
पडण्याचे दु:ख आळवू नकोस
नेहमी वर पहावं
खाली कधी पाहू नये
जीवनातील चांगलं ते घ्यावं
वाईट कधी घेउ नये
तू संकटात असताना
राम धाउन येण्याची
इच्छा बाळगू नकोस
तू संभ्रमात असताना
कृष्णाने गीता सांगण्याची
इच्छा ठेऊ नकोस
तुझ्या संकटातून तुलाच तरून जायचंय
दुसरे संकटात असताना
त्यांचा राम तू व्हायचंय
कृष्णाची गीता वाचून
कृष्ण तुला व्हायचंय
दु:खाशी एकट्याने लढताना हसत हसत तुला जगायचंय
बाळा हसत हसत तुला जगायचंय. . .
बाळा हसत हसत तुला जगायचंय. . .

सत्यजित.

Wednesday, April 25, 2007

फ़ुलराणी. . .

छोटीशी कळी
आतूर होती फ़ुलायला
खूप खूप मध होता
तीच्या प्रियकराला द्यायला

पहाटेच्या थंडीत तिला
कुणी हलकेच हलवलं
"कळी तुझं फ़ुल झालं" असं
कानात कुणी गुणगुणलं

थंडगार वार्‍यावर
छान डोलत होती
हिरव्या गार झाडीत
खूलून दिसत होती

तिच्या सौंदर्याचा सुगंध
लागला वार्‍यावर पसरायला
कशी छान नटली होती
प्रियकराला भेटायला

मुंग्या फ़ुलपाखरांची
तर रांगच लागली होती
पण सारा मधूरस होता
ज्याच्यासाठी ती सजली होती

गुणगुणत येणार्‍या भ्रमराची
चाहूल तिला लागली
मीलनाच्या संकेताने
ती मनोमनी लाजली

पाकाळ्यांचे बाहू पसरून
त्याला मीठीत घेतले
सारा रस पिउन भ्रमराने पंखांची फ़ड्फ़ड केली
आपलं सारं सारं देउन फ़ुलराणी तृप्त झाली

आता विरहाचा क्षण
क्षणावर आला
मध चाखून सारा
भ्रमर दूरदूर उडाला

त्याला निरोप द्यायला
हसत वार्‍यावर डोलत होती
मनोमनी मात्र ती
खरच हिरमुसली होती

वाटत होतं तीला
तो परत एकदा येईल
प्रेमाचा अविट राग
पुन्हा तिच्या कानी गाईल

दुपारचं उन झेलून पण
त्याची वाट पहात होती
पण मावळल्या सुर्याबरोबर
तिची आशा पण मावळली होती

ती एकाकी आनंदली
त्याला येताना बघून
खरंच तो आला होता
पण अनोळखी बनून

त्याच्या पंखांचा आवाज
आता कर्कश्श वाटत होता
संपलेला मध बघून तो
दूरदूर गेला होता

सारं सारं मावळत होतं
फ़क्त रात किड्यांची कीरकीर होती
सकाळी फ़ुललेली फ़ुलराणी
आता मात्र कोमेजली होती. . .

सत्यजित.

Monday, April 23, 2007

एक घास काउचा . . .

कावळा ह्या पक्ष्याबद्दल मला नेहमीच कुतूहल वाटत आलं अन ह्या कुतूहलापोटी काहितरी लिहीत गेलो .. आणि कविता झाली.

ह्या कावळ्यांचं बरं असतं
त्याना कुठेही बसता येतं
गांधीजींचं डोकं, आंबेडकरांचा खांदा
मन मानेल तिथे शिटता येतं

बलवान पंख असतात
उंच उंच उडता येतं
तिक्ष्ण काकदॄष्टीने
सावज अचूक टिपता येतं

चोच कशी टोकदार
अन चाल अशी ऐटदार
मेमेली घूस वा तुपातली पोळी
स्वारी नेहमीच तयार

कुबेराचं वाहन म्हणून
फ़ुकट भाव खाउन जाणार
कधी हा शीटता अंगावर
म्हणे धन लाभ होणार

एरवी लोक उष्ट्या हाताने
कावळा नाही हाकणार
पण दशपिंडाला पक्वान्न वाढून
ह्याची हाजी हाजी करणार

ह्याच्या उठण्या बसण्या
शिवण्याचा वेग वेगळा अर्थ असतो
ह्याचा स्थलपरत्वे भेटण्याचा
वेग वेगळा हेतू असतो

ह्या कावळ्यांची काव काव नसेल
तर सारं शांत शांत वाटेल
नुसतीच कावळ्याची काव काव असेल
तर मनी भीती दाटेल

कुणी काकदृष्टी म्हणून
माणसाचं वाढवतील भुषण
कुणी "कावळाच आहे मेला"
म्हणून देतीलही दुषण

लहानपणी भरवलेल्या घासात
काउचा घास हमखास होता
घर शेणाचं असून देखील
काउच माझा खास होता . . .

सत्यजित.

टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

माझ्यातल्या कवीला पाउस नेहमीच मोह घालतो आणि मग
पावसाच्या टपटपणार्‍या आवाजात कॅलीडोस्कोप काही टिपतो. . .

छपरावरुन गळणारं पाणी
आकाश ढवळत होतं
मला सुकं ठेवण्यासाठी
माझं छप्पर भिजत होतं

छपरावरुन ओघळून पाणी खाली बादली भरत होतं
त्या बादलीत पाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

तो आडोश्याला उभा
छत्री बंद करुन
भीजलेली पॅंट
वर गुढघ्यात धरुन

ओल्या भाळी आठ्या पावसाला बघून
त्याच्या छत्रीतून पाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

तिच्या केसातलं पाणी
टप टप गालावर
कानाच्या पाळीवरून
ट्प टप खांद्यावर

अंग चोरून तिने ओढला पदर
तिच्या पदरातून पाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

त्याचं लक्ष तिथे
ओघळणार्‍या थेंबावर
त्याचं लक्ष तिथे
ओल्याचिंब वक्षावर

त्याचं लक्ष तिथे थरथरणार्‍या ओठांवर
त्याच्या ओठांतून पाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

पावसाला लाच देती
चिमुकली बोटं
डबक्यातील चिखलाचं
तेव्हा उटणं होतं

बेडकाची गाणी गात कागदाची बोट
चिमण्या पंखातून पाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

गरीबाचं घर
गळकं छप्पर
लेकराला ज्वर
नाही दूध अंगावर

तिच्या जीवाला घोर रडे कवटाळून पोर
तिच्या डोळ्यातून पाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

पनावरून ओघळता थेंब
पनावर थबकला
अंतरंगात विश्व पाहून
क्षणभर हबकला

मागून येणार्‍या थेंबानी त्याला पुढे रे रेटला
मग रानभर पाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

पाउस गातो गाणी
टीबूक . . . टीबूक . . . टीबूक . . .

सत्यजित.

निमित्तमात्र

पावणे सहाचा गजर लाव म्हणालास
पण गजर सहा पन्नासला झाला
तुला तेवढच निमित्त मिळालं
माझ्यवर रागवायला

घाईघाईतच तुझा डबा भरला
भाजीत मीठ जरा कमी पडलं
आणि तू तेवढच निमित्त केलंस
हॉटेलचं खायला

पाच पन्नासची लोकल चुकली
आणि विरारच्या घर्दीतुन घर गाठलं
तरीही उशीर झालाच
आणि तुला तेवढच निमित्त मिळालं
घड्याळाकडे बोट दाखवायला

तू टी. व्ही. समोर पाय सोडून बसला होतास
चपात्या करताना सिलेंडर संपला
दुसरा सिलेंडर देखील रिकामा होता
तुला तेवढच निमित्त मिळालं
माझी अक्कल काढायला

मी वैभव लक्ष्मीचा उपवास केला
आणि तुझच यश मागितलं
तू सिगरेट्चा धूर हवेत सोडत
सुट्ट्या पैशांचं निमित्त केलंस
फ़ुलांची वेणी विसरायला

मी भराभर सगळं आवरलं
पाच चाळीसचा गजर लावला
फ़ॅनखाली केस मोकळे सोडले
तुला तेवढच निमित्त मिळालं
तुझा पुरुषार्थ दाखवायला

पावणे सहाचा गजर चुकेल ह्या विचारात
निवांत झोप लागलीच नाही
तू जागरणाचं निमित्त केलंस
उशीरा उठायला

मी अहोरात्र झटत होते
तुला यशशिखरावर पहायला
आणि संसारचं निमित्त झालं
माझ्यातली मी निमित्तमात्र व्हायला . . .

सत्यजित.

एकाच वेळी

तू असशील तू नसशील
तरी असतील ह्या आठवणी
शुन्यात पहाताना
एकटीच हसशील

डोळे भरून येताना
ओठांत हुंदके दाबशील
आणि जाणवतील माझे हात
तुझ्या गालावरचे अश्रु पुसताना

तुझ्या हुंदक्यांमध्ये
मिसळतील माझे हुंदके
अन आठवणींचा वेगळाच गंध दरवळेल
तुझ्या आणि माझ्या मनात एकाच वेळी. . .

सत्यजित.

ओलेती

नउवार ती नार लेउनी
गेली पाणथळी
गंधीत झाले पाणी
स्पर्शता निशीगंधाची कळी

ती चाल चालली नागीणीची
कटेवर घेउनी कुंभ
पाहुन ती सिंहकटी
सारे मर्द ठाकले शुंभ

पाठीवरती वेणी डोलते
लयबद्ध कंबर लचके
त्या चालीवरती ताल धरूनी
माठातील पाणी गचके

ओल्या ओल्या केसातुन पाणी
जेव्हा चेहर्‍यावर ओघळते
पौर्णिमेच्या चंद्रावर जणू
मकरंदाचे ओघळ ते

वक्षांवरती थेंब धावीता
ओल्या पदराने ते पुसते
चिंब वस्त्र बिलगे अंगाला
अन मज ओलेती ती भासते. . .

सत्यजित.

आठवणी

आठवणी तर नेहमीच असतात पाठीशी
काही क्षण आपसुक बांधले गेलेले असतात गाठीशी
त्या आठवणीत ठेवताना विसरलेल्या
त्या विसरायच्या म्हणून जपलेल्या

त्यांचं गाठोडं सोडताच त्या चित्रा सारख्या भासतात
एकांतात असताना मित्रा सारख्या असतात
त्या आठवणी दुसर्‍या साठी जगलेल्या
त्या आठवणी दुसर्‍यांनी जागवलेल्या
त्या आठवणी . . .

कधीतरी दाटून येतो कंठ आणि ढळतो एक अश्रु
त्या कनवाळू क्षणांना सांगा कसा विसरू ?
त्या आठवणी मायेने भिजलेल्या
दुसर्‍याला प्रकाशीत करुन स्वत: विझलेल्या

ह्या आठवणीच स्वप्नांना वेग देतात
मार्गस्थ असताना अनुभावाचं रूप घेतात
त्या आठवणी पराभवातून शिकवणार्‍या
त्या आठवणी विजयानी सुखावणार्‍या
त्या आठवणी . . .

काही विसरायच्या म्हणून आपण उगाळत असतो
पुन्हा पुन्हा स्मरून आतल्याआत जळत असतो
त्या आठवणी जळून देखील उरलेल्या
त्या आठवणी काळा संगे विरलेल्या
त्या आठवणी . . .

कधी वाटतं आपणही कुणाच्या तरी आठवणीत रहावं
आठवणीत राहून अनंत रुपात जगावं
आठवणीत जगताना
फ़क्त एक आठवण होऊन रहावं . . .

सत्यजित.

शाळेत जायचे नाही मजला (बाल कविता)

शाळेत जायचे नाही मजला
बाई अभ्यास देतात फ़ार
नाही केला अभ्यास सारा
तर खरपुस देतात मार

गणित मराठी इंग्लिश इतिहास
शिकवतात तासन तास
मधली सुट्टी मात्र असते
फ़क्त अर्धाच तास

कोणी केली मस्ती थोडी
तर चांगलाच धोपटतात
कोणी केली गडबड थोडी
तर डस्टर आपटतात

पाठीवरती नकोच मजला
पुस्तकांचे ओझे
दप्तर घेउनी गेले होते का कधी
शाळेत शिवाजी राजे ?

पाऊस (बाल कविता)

मोठ्ठा पाऊसलागला
धो धो पडायला
आभाळातला देवबप्पा
लागला असेल रडायला

देवबप्पाने हट्टाचा
लावला असेल सपाटा
देवबप्पाच्या आईने
घातला असेल धपाटा

जोरात रडला देवबप्पा
नद्या लागल्या वहायला
देवबप्पाला हसवायला
वारा लागला गायला

रडताना काढला फ़ोटो
म्हणून देवबप्पा चिडला
धडामकन आवज करून
आभाळातच पडला

पाणीच पाणी चोहीकडॆ
शाळेला दिली सुट्टी
तेव्हा पासून बप्पाशी
माझी जमली आहे गट्टी . . .

- सत्यजित.

http://satyajit-m.blogspot.com/

जुगार

मी तुला एकदा विचारलं
इंद्रधनुष्य कधी गं फ़ुलतं ?
तू म्हणालीस,
मी तुझ्या डोळ्यात बघताना
तुझ्या अंतरंगात ते खुलतं

मी म्हणालो,
तुझे डोळे फ़क्त काळे पांढरे
त्यात सप्तरंग कधी दिसत नाही
अंतरंग वगैरे सारं काल्पनीक
असा कुठला अवयव माणसाला असत नाही

तू चिडलीस,
असा कसा रे तू अकवी मनाचा,
तुला काहीच कसं कळत नाही ?
पाकळ्या तोडताना फ़ुलाच्या
तुझं मन कसं जळत नाही ?

अग,
झाडापासून तुटलेलं फ़ुल ते
त्याला कसलीच वेदना होत नाही
कविता म्हणजे सारे शब्दांचे खेळ
तुम्ही शाश्वतात का जगत नाही ?

तू रागावलीस,
कविता म्हणजे नुसतेच शब्द नसतात
त्या शब्दांतून भावना व्यक्त होते
भौतिकशास्त्राचे नियम लाउन
प्रेम का कधी सिद्ध होते ?

प्रेम म्हणजे एक सौदा
एकमेकांच्या सहवासाचं सुख घेण्याचा
प्रेम म्हणजे एक जुगार
एकदा तरी खेळून पहायचा . . .

सत्यजित

Sunday, April 22, 2007

रानवारा . . .

नागीण काळ्या वाटे भोवती
पिवळी नाजूक रानफ़ुले
दरी दरीतुन सफ़ेद धारा
पर्वतांवर धुके झुले

हिरव्या कुंचलांनी शिंपली
लपली सारी पाने फ़ुले
क्षणात वाटे तिथे जावे
जिथे पावसा उन मिळे

कधी ढगांत श्वास घ्यावा
कधी पहावे आभाळ खुले
कधी आडोशी पाउस पहावा
कधी व्हावे बाळ खुळे

ओढ्यांचे चाळ बांधता
खळखळ पावलांस वेग मिळे
थरथर कांती उठे शहारा
परी न आवरे मन खुळे . . .

सत्यजित.

श्रुंगार . . .

थरथरत्या पाण्यावरती
मिणमिणत्या ज्योती
जणू चांदण्या नभीच्या
दर्पणात नहाती

इवलीशी किनार झुळझुळते
त्या तळ्याच्या काठाशी
घेते सामाउन कुशीत
झिलमिलत्या लाटेशी

कधी खुदकन हासे लाट
त्याच्या खोडकर स्पर्षाने
मज सतावू नकोस सजणा
मी मोहरले हर्षाने

किती वेळ चाले श्रुंगार
लाटंचा काठाशी
मना कसा घालू आवर
चांदणं उगवलंय आत्ताशी . . .

सत्यजित.

बालपण . . .

बालपण खरच छान असतं
सारं जग कसं मोकळं रान असतं
त्या चिमुकल्या पंखांना
आभाळ देखील लहान असतं

बालपण खरच छान असतं ..

आईचं धरलेलं बोट
जगाचं एक एक टोक असतं
माउलीच्या कुशी मध्ये
आपलं सारं ब्रम्हांड वसतं

बालपण खरच छान असतं ..

आईचा पदर हेच आपलं
आभाळ असतं
आभाळ गवसण्या आभाळ
देखील लहान असतं

बालपण खरच छान असतं ..

चॉकलेटचा बंगला
स्वप्नांचे विषय असतात
रडून गोष्टी मिळतात
असे जीवनाचे आषय असतात

बालपण खरच छान असतं ..

रूसून बसल्यावर पुर्ण होणारे
छोटे छोटे हट्ट असतात
विद्वानाला संभ्रमीत करणारे
छोटे छोटे प्रष्ण असतात

आज सार्‍या बालगोपालांचा वाटे मज हेवा ..
बालपण देगा देवा ... बालपण देगा देवा . . .

सत्यजित.

प्रेमदान . . .

हृदय हे तिला द्यावे । प्रेम तिच्याशी योजावे ।
अर्पूनी हृदय घ्यावे । प्रेम दान हे ।

भले बाप तिचा किती भांडो । भले मत्सर किती वाढो ।
वाटल्यास तो उघडो । भांडार शिव्यांचे ।

बधीर पड्दे कानांचे होवो । तरी सय्यम मनी राहो ।
तो जे वांछील तो ते न लाहो । शेवटी सासर्‍याची जात ।

जमतील शत्रु मंडळी । प्रेमदेष्ट्यांची मांदीयाळी ।
त्यांत माजवून बंडाळी । त्यासी घालाव्या लाथा ।

मनी कालवाकालव। सासर मंडळींचा डाव ।
दाखवी भय । पोलिसांचे ।

लावले जरी किती लांच्छन । केल्या कृती किती हीन ।
भले किती दुर्जन । सासरा होवो ।

निर्लज्जम सदा सुखी । होवोनी प्रेमलोकी ।
कलांतरे बोलणी सासर्‍याची । होतील खंडीत ।

आणि प्रेमोपजीवीये । मिठीत घेता प्रिये ।
ओठांवर ओठ तिचे । ठेवावे जी ।

येथ मात्र सय्यम राहो । येथे आगतीक न होवो ।
होतो ती लग्ना नंतर होवो । म्हणजे सुखीया झालां ।

सत्यजित.

स्मरुन ये त्या वचनांस. . .

रंगात आलेली संध्याकाळ
तुझ्या आठवणीत भिजलेली
माझ्या स्वप्नांची फ़ुलं
रात्रीच्या प्रतिक्षेत निजलेली

त्या स्वप्नांच्या कळ्यांना
बेधुंद गंध आहे
फ़ुलपाखरांस विचारांच्या
तुझाच छंद आहे

आळवीत अवीट राग
वारा संथ वाहे
ह्या जादूई क्षणात
विरहाची खंत आहे

स्मरून ये त्या वचनांस
तुज चांदण्यांची शपथ आहे
तू चंद्र होऊनी ये मनाचा
मन तिमीर जपत आहे. . .

सत्यजित.

Friday, April 20, 2007

प्राजक्त. . .

रात्रीच्या अंधारत तो
वेडा प्राजक्त बहरला
त्याच्या धुंद सुगंधाने
वाराही शहारला

करत फ़ुलांची उधळण
चांदण्यांचा पडला सडा
त्या चांदण्यात खेळायला
चंद्रही धावला वेडा

त्या खुळ्या चांदण्याला
घातले कुणी ढगांचे कुंपण
त्या नभात विरली
किरणांची मधू शिंपण

रातकिड्यांनी फ़ुंकले
कीर कीर रणशिंग
त्या नभांची जुंपली
वार्‍याशी झुंज

वार्‍याने पिंजला
नभांचा पिसारा
चंद्राने फ़ुलविला
किरणांचा पिसारा

लागताच रवीची कुणकुण
चांदण्या पळाल्या
वेचताना पारीजात
काही ओंजळीत मिळाल्या. . .

सत्यजित.

सावज. . .

आत्ताच पाउस पडून गेला
त्याचा हवेतील ओलावा अजून जाणवतोय
सर्वस्व देऊन रीता झालेला तो
पांढर्‍या पुंजक्यांतून खुणावतोय

अंग चोरुन बसलेलं रोप
थंडीने शहारलंय
त्याच्या पानात लपून पाणी
मोत्यांनी बहरलंय

एका ओल्या तारेवर
एकटाच ओला पक्षी
त्याची समाधी न्याहाळतेय
पाण्याची ओघळ नक्षी

पारव्यांच्या जोड्या गेल्या
ओसरीत ओसरीला
माझा राजस गं भला
एक पारवी सांगे दुसरीला

एक छोटंसं पिल्लु
रुसून गूपचूप बसलेलं
अन आता आईला शोधताना
पावसांत चिंब भिजलेलं

त्याच्या डोळ्यातील पाउस
त्याच्या आईला शोधतोय
पाउस थांबला तरी
तो त्याच्या आसवांत भिजतोय

एकच होती छ्त्री
त्याने तिच्या खांद्यावर ठेवला हात
तीही त्याला बिलगली
पावसाचे गीत गात

पाठीवरील ओले केस
ओल्या कांतीला बिलगले
शहारता सारं अंग
ओठे ओठांपासून विलगले

पॅंट गुढग्या पर्यंत दुमडली
तरीही झाली ओली
चाक लुडबुडलं डबक्यात
आणि रिक्षा मागे धावत शिवी गेली

हा सारा पाउसच होता
थांबलेला पाउस
जलद जलद जाता म्हणे
इतक्यात नको जाउस

पाउस थांबला होता
तरी माझ्या आजूबाजूला तो जगत होता
नवं सावज शोधायला
नभांमागे दडून बघत होता. . .

. . . नभांमागे दडून बघत होता.

सत्यजित.

तू होतीस तोवर. . .

तू होतीस तोवर

मला एकटेपणाची खंत
कधीच नव्ह्ती पण
आता मी चारचौघातही
एकटाच असतो

तू होतीस तोवर

तुझ्या शब्दांनी माझी
स्वप्ने फ़ुलायची पण
त्या पत्राचा पसारा पसरताच
मी माझ्यात नसतो

तू होतीस तोवर

आजही फ़ुले तशीच फ़ुलतात
चंद्राच्या कलाही बदलतात
पण उगवत्या सूर्यात
तुझा चेहरा नसतो

तू होतीस तोवर

प्रेमाची उब होती
पण आता
त्या आठवणींनीही
चटका बसतो. . .

सत्यजित.

वेडा. . .

वेडा वेडा म्हणून हिणवताय
पण तुम्हा सगळ्यांना हुशारीचे धडे शिकवीन
भर चौकात सार्‍या शहाण्यांना नागवीन
असुनदेत फ़ाटके कपडे माझे
पण तुमच्या कपड्यांनी तरी कितीसं झाकलंय ?
माझ्य नजरेतून बघा, मला तर सारं उघडंच दिसतंय
सगळी बोगस तत्वे तुमची सगळी पोकळ भाषा
पेकाट्यात कुणी लाथ हाणता गुंडाळाल लगेच गाषा
कुणीही यावं फ़ाडून न्यावं,
लोकलज्जेच्या नावाखाली त्याला थिगळं जोडत बसावं
सगळा तुमचा भेकडपणा सहिष्णुतेच्या नावाखाली गोंजारताय
नेसणं ओलं झालं तुमचं, कशाला शूरपणा दाखवताय ?
कधीच मेला कृष्ण आणि आता एकही पांडव नाही जीता
रोज नागवल्या जातात द्रौपद्या आणि तुम्ही डोळे मिटून वाचताय गीता
प्रेत्यक घरात एक द्रौपदी आहे, तिचं रक्षण कोण करेल ?
माना खाली घालून जर पांडव झालात, तर कृष्ण कोण बनेल ?
घेतला कृष्णानेही जन्म आणि जर सांगायला घेतली गीता,
तर त्यालाही वेडयात काढाल तुम्ही, त्याचं काही ऐकून न घेता
तोही कशाला येतो म्हणा, आता त्याला पांडव कुठे मिळणार ?
चार पाच वेड्या टाळक्यांसह, तो सहस्त्र कौरवांशी कसं लढणार ?
त्यालाच सोडवूदेत त्याचे प्रष्ण, आपण विचार कशाला करा ?
किड्या मुंग्यांसारखं जगा आणि कुत्र्यासारखं मरा
वेडा आहे हो मी, असं उगाच काहीही बरळत रहातो
आणि त्या अज्ञातवासातल्या पांडवांना तुमच्यात शोधत रहातो. . .

सत्यजित.

ऋण. . .

कण कण भिजू लागतो
घन बरसून मोकळा होतो
क्षण क्षण फ़ुलू लागतो
नी मी माझ्या पासून वेगळा होतो

थेंबा थेंबानं आभाळ
माझं सर्वांग चुंबतं
मी कवटाळतो त्याला
वारं रोमारोमांत झोंबतं

धावतात अल्लड थेंब
मना पर्यंत खोल
त्या अगणीत थेंबांचं
कसं चुकवावं मोल ?

मी दास बनून रहातो
खिडकीच्या गजांआडून पहातो
त्याच ऋण काही फ़िटत नाही
तरीही तो बरसत रहातो

एक दिवस असाच येतो
तो अबोल निघून जातो
दूरवर त्याचा ठाव घेत
मी अंगण ओलांडून जातो

मग सर्वांग निथळू लागतं
त्याचे थेंब तो परत घेतो
आणि अबोल गेलेला तो
गरजत बरसत परत येतो

माझं मन आवरत नाही
मी पुन्हा थेंबांचं ऋण घेतो
दर वेळी मुद्दल हडपून
फ़क्त काही थेंबांचं व्याज देतो

असा कर्जबाजरी मी
त्याचा सदैव ऋणी रहातो
आणि व्याज फ़ेडायची पाळी येताच
मी त्याचीच आवर्जून वाट पहातो. . .

सत्यजित.

Thursday, April 19, 2007

११ सप्टेंबर. . .

तो काळा डोंगर अंगावर धाउन येणारा
तरी चिरकाल तटस्थ असणारा
मी हालचाल करत नाही त्याच्या छायेखालीच जगतोय
मनातली भीती मारुन तो कोसळण्याची वाट बघतोय
रोजच कोसळते त्या पर्वतावरुन दरड
अन उद्ध्वस्त करुन जाते एखादे छोटे घरटे
मग काही दिवे पेटतात,
पांढरी पाखरे उडतात
वर्तमानाचे मथळे बदलून
पुन्हा निद्रिस्त होतात
त्याचीही वामकुक्षी संपते
त्यालाही कंटाळा येतो घरटी पाडायचा
आणि तो शोधायला लागतो बहरलेले डेरेदार वृक्ष
त्या लाकडानी रचायच्या असतात त्याला चिता
नितळ पाण्याच्या आणि निळ्या स्वच्छ आकाशाच्या
पण आम्हाला आता सवय झालीय पडणारी घरटी बघायची
त्या मोडलेल्या काटक्यां पासून स्वत:ची घरटी सावरायची
परवाच्या दरडी बरोबर त्या डोंगरावरचा एक गाव कोसळला
अन डोंगरावर वसलेला गाव डोंगराच्या मुळावर उठला
अजुन तो डोंगर आमच्या माथ्यावर उभा आहे
त्यानी उपसल्या वर डोंगर, दरड आमच्यावर कोसळणार आहे
तरीही मी हलणार नाही कारण काठीवाला पुतळा इथेच जन्मला होता
त्याच्या काठीवर टांगायला फ़लक लिहून घेतोय "इथे माझा गाव होता". . .

सत्यजित.

झोका. . .

आपणच बांधलेल्या झोक्याला
आपणच धक्का देतो
उमेदीने झोका उंच नेतो
पण खाली येताना बावरुन जातो

उंच जाण्याची उमेद असावी
नी खाली येण्याचं भय नसावं
मनी भीती दाटून येता
मनमोक्ळं जोर जोरत हसावं

झोका जेवढ्या वेगाने वर जातो
तेवढ्याच वेगाने खाली येतो
त्याच्या साखळीवर पकड घेत असता
त्या झोक्यांमधून तरून जातो

प्रत्येकाच्या जीवनाच्या
झोक्याला असे चढ उतार असतात
मनाची पकड घट्ट असली की
माणसं दु:खातही हसतात

उंच जाताना सगळेच हसतात
आपण खाली येतानाही हसावं
चढ उतारात जीवनाच्या आनंद असतो
हे झोक्या कडून शिकावं. . .

सत्यजित.

श्री गणेशाय नम: ।









मंगलमुर्ती मोरया ।

गणपती बाप्पा मोरया ॥

मंगलमुर्ती मोरया ।

गणपती बाप्पा मोरया ॥

शुभ कार्याशी देसी स्पुर्ती
वचनांची होई पुर्ती
काय वर्णवू त्याची कीर्ती
तो देव माझा मंगलमुर्ती ॥१॥

पापांचे करी क्षालन
करी दीनांचे पालन
जेथे रामभक्तीचे होई मिलन
तो देव माझा गजानन ॥२॥

जेथे क्लेश शमले जाती
जो सुखदु:खाचा साथी
जो करी दु:खाची माती
तो देव माझा गणपती ॥३॥

रिद्धी सिद्धी चा मालक
जो सर्वांचा पालक
तोच दूरित तिमीर हारक
तो देव माझा विनायक ॥४॥

ज्याच्या चरणी नांदती संत
जो करी उपकार अनंत
न राहे कसली खंत
तो देव माझा एकदंत ॥५॥

जो घालवी बुद्धीचा म्लेश
अरजकतेचा होई विशेष
जेथे लोपती सारे क्लेश
तो देव माझा श्री गणेश ॥६॥

फ़ुटे भक्तीचा पाझर
जो ज्ञानाचा सागर
ज्याचा त्रिलोक करे आदर
तो देव माझा लंबोदर ॥७॥

षडरिपूची करी राख
धाऊनी येई सुख
जेथे वाढे भक्तीची भूक
तो देव माझा गजमुख ॥८॥

निराशेचे होई उच्चाटन
करी अज्ञानाचे मोचन
विश्व करी ज्याला वंदन
तो देव माझा गौरीनंदन ॥९॥

दूर करीशी न्युनगंड
अधर्मा विरुद्ध करिशी बंड
अत्याचारा देसी दंड
तो देव माझा वक्रतुंड ॥१०॥

सदैव घाली प्रेमाची फ़ुंकर
निरंतर करीशी कृपा आम्हावर
अशिक्षीता देई विद्येचा वर
तो देव माझा विद्येश्वर ॥११॥

चला दर्शनासी जाउया
डोळे भरूनी पाहुया
एक मुखाने सारे गाउया
मंगलमुर्ती मोरया । गणपती बाप्पा मोरया ॥१२॥

फ़क्त एक सुस्कार

ती चिमुकली पावलं पाहून
अंत:करण हेलावलं
ठेचाळलेल्या जखमेवर
फ़ुंकर घालायला कुणीच नाही धावलं

तापलेल्या रस्त्यावर अनवाणी पावलं
मंदगतीने पडत होती
जड पेटीचा भार
आपल्या अंगावर झेलत होती

जखडलं होतं बालपण
त्या पेटीच्या पट्ट्यानं
त्यांचं खेळणं बागडणं
विकत होती कवडीच्या मोलानं

पोटामध्ये भूक होती
डोळ्यांत होता थकवा
दैवाचा खेळ म्हणा
किंवा नशीबाचा चकवा

त्या पोळल्या रक्ताळल्या पावलांचा
कुणीतरी फ़ोटो घेतला
कुणा धनाढ्याने तो
लाखाला विकत घेतला

वातानुकुलीत दालनात
फोटोला मध्यभागी स्थान होतं
पण चिमुकल्या पावलांचं
निखार्‍यांवरून चालणं काही संपत नव्हतं

लाखाला फोटो घेतला
पण पावलं फ़ुकट कुणी घेत नव्ह्तं
पोटातली आतडी पिळली जात होती
साधं पाणी कुणी देत नव्ह्तं

प्रेत्येकजण करी स्तुती
पाहून तो किमती फ़ोटो
म्हणे "पाहणार्‍याचं अंत:करण
हेलावतो हा फ़ोटो"

छायाचित्रकाराचं नाव आवर्जून
प्रत्येकजण निरखून पाही
पण "ही पावलं कुणाची ?"
असं कुणीसुद्धा विचारत नाही

त्याच कलादालना बाहेर
तीच चिमुरडी हात पसरून उभी होती
पण कुणा एक रसिकानं त्यांना
साधी दमडी सुद्धा दिली नव्हती

उन चटके देत होतं
पोटात भुकेची लाट उसळत होती
छातीवर पेटीचा भार घेउन
चिमुरडी खाली कोसळत होती

दुसर्‍या दिवशी वृत्तपत्राच्या
मथळ्यात मजकुर होता आला
कलादालनातल्या त्या फोटोला
पुरस्कार होता मिळाला

वृत्तपत्राच्या कुठेतरी कोपर्‍यात
छापल्या होत्या दोन ओळी
कला दालना बाहेरील फ़ुटपाथवर
कुपोषणाचे दोन बळी

उद्या कुपोषणावरील लेखालाही
गौरवतील अनेक पुरस्कार
आपण हळहळ व्यक्त करू
सोडू फ़क्त एक सुस्कार . . .

सत्यजित.

क्षितीज. . .

उमललेल्या कळ्या आता
मिटायला लागल्या आहेत
भावनांचे बांध आता
तुटायला लागले आहेत

भरून आलय आभाळ
काळजातल्या भिती संगे
हृदयाची वाढलीय धड्धड
श्वासांच्या घरघरी संगे

दूर क्षितीजा पर्यंत नजरा
कुणाचा तरी ठाव घेताहेत
माझे श्वास उच्छ्वासही
आता तुझेच नाव घेताहेत

वाटतं पळत सुटावं
त्या क्षितीजापलिकडे तू उभी असशील
ती वेड्या मनाची आशा आहे
क्षितीजं का कधी संपतील ?

मन आणि हृदय लागलेत
मेंदूशी भांडायला
आणि मी पळत सुटलोय
ती क्षितीजं ओलांडायला. . .

सत्यजित.

नातं. . .

काही नातं आहे आपल्या मध्ये
असं मला होतं वाटलं
पण माझ्या शब्दांनी माझ्या
भावनांना कधीच नाही गाठलं

तू निखळ सुंदर हसायचीस
लाडे लाडे बोलायचीस
माझ्या कवीता वाचताना
प्रेत्येक शब्द मधामध्ये घोळायचीस

मला वाटलं आपल्यामध्ये फ़ुलणारं
नातं म्हणजे प्रित आहे
एकमेकांच्या सहवासात घुलणं
हीच प्रेमाची रीत आहे

आपल्यातील नातं निखळ मैत्री आहे
असं तू म्हणालीस
मग बोलणं अर्ध्यात टाकून
माझी नजर टाळत का पळालीस ?

आता साचली आहे धूळ
त्या कवितांच्या पानांवर
सतत भळभळणारी जखम
करुन गेलीस मनावर. . .

वेडसर. . .

का मागे लागली आहेस
त्या निष्पाप फुलपाखराच्या
ते बागडत नाही आहे
ते पळतंय जीवाच्या आकांताने
त्याच्या रंगाचं कौतुक करीत
अलगद चिमटीत पकडलेस त्याचे पंख
आणि झटकून पुसून टाकलीस बोटं
त्याचे रंग बोटांना चिकटताच
मन भरताच मुठीत हलकेच घेऊन
भिरकावलंस त्याला आकाशात
आणि पंखांची असहाय्य फ़ड्फ़ड करत
कोसळलं ते धरतीवर
एक कळकळीचा सुस्कार टाकून निघून गेलीस
माझ्या हृदयाचं घायळ फ़ुलपाखरु करुन. . .

ठेच. . .

जीवनाच्या वाटेकडे
डोळे लाउन चालत नाही
डोळे थिजतिल पण
वाट काही संपत नाही

पावलागणिक खळगे आहेत
आणि ठेच काही चुकत नाही
रक्ताळलेल्या पावलांची
तमा बाळगून चालत नाही

झालेल्या जखमांवर
काळाची खपली धरते
वरील सुक्या खपली खाली
जखम मात्र ओली असते

कालांतराने खपली मात्र जाते
पण व्रण काही जात नाही
एकदा ठेचाळलेल्या दगडावर
कोणी परत ठेच खात नाही. . .

Wednesday, April 18, 2007

प्रष्ण. . .

त्याच जुन्या क्षणांनी
पुन्हा एकदा गर्दी केलिय
त्या भेडसावणार्‍या प्रष्णांनी
पुन्हा एकदा वर्दी दिलीय
दिल्या घेतल्या सुखदु:खांची
कधी आकडेमोड केली नाही
पण तुझ्या वचनांची नोंद
कोरलेली हृदयाची ही वही
त्या वहीची पानं फाडताना
काळीज तीळ तीळ तुटतंय
सांग सखे एकदा तरी
माझं कुठे काय चुकतंय ?

नुसतं प्रेम उरलंय. . .

तुझं दबक्या पावलांनी येणं
आणि माझे डोळे मिटणं मला नित्याचं झालंय
तुझ्या ड्रेसचा रंग माहीत असूनही
खोटं बोलणं माझ्या सरावाचं झालंय
तुझ्या नखरेल घुश्श्या पुढे
माझं हृदय नेहमीच हरलंय
उगाच का लाखातून हृदयाने
तुलाच एकटीला वरलंय
सारं जग म्हणतय मला
’तुझ्या डोक्यात प्रेमाचं खूळ भरलंय’
नाही कळायचं त्यांना
सारं शहाणपण जाऊन
आता नुसतं प्रेम प्रेम उरलंय. . .

पारिजात. . .

अंगणातील पारिजातावर
छानसे घरटे चिमण्यांचे
त्या घरट्या खाली सांडते
रोज आभाळ चांदण्यांचे

वेचून त्या चांदण्या
फुले माळ केसात लांब तुझ्या
चांदणे पसरेल निशेवर
भिनेल रुधीरात गंध माझ्या

सांज रूप घेउन यावस
मग विझतील रवीकिरणे म्लान
सांजेच्या उंबरठ्यावर निशा
घेत असेल चांदण्यांचे स्नान

असेल हात तुझा हातात
सर्वदूर चांदण्यांचे आभाळ
होइल चांदणेही रुपेरी
पाहून रंग तुझा गव्हाळ

मग क्षण येइल तो
हळूवार सोडवून घेशील हात
मग कित्येक रात्री जागवणारी
हासत निरोप घेइल रात. . .

प्राक्तन. . .

मला सारथी पद स्वीकरायचं होतं
पण लगाम हाती आला नाही
तू रथारुढ हो म्हणाला
आणि स्वत: बेलगाम झाला

यशापयशाचे अश्व जोडले
आणि स्वप्नांचा लगाम दिला
वर्तमानाची धूळ उडवत
भविष्याचा प्रवास सुरु झाला

सगळ्याच वाटा खळग्यांच्या
वेगाने तुडवायच्या
भावनांच्या वेदना
हास्यात उडवायच्या

काळ एकावर एक आसूड ओढतोय
पण हूं नाही की चूं नाही
सुख दु:खाचा संघर्ष म्हणतोय
मी नाही किंवा तू नाही

रथ माझ्या जीवनाचा पण
मी कधीच नाही हाकला
प्राक्तनाचा सारथी माझ्यापुढे
कधीच नाही झुकला. . .

आवेग. . .

रात्र अशी बहरुन यावी
गंध चांदण्याला सुटावा
अन ओठांतील तुझ्या मकरंद
ओठांनी लुटावा

निशब्द व्हावे सारे
श्वासात श्वास घुलावेत
मदहोशी त्या स्पर्शाने
मग रोम रोम फ़ुलावेत

दाटून येता रात्र
हृदयी तुला धरावे
बेभान गारवा होताच
मिठीत तुझ्या शिरावे

ओघळतिल चांदण्या मुठीतून
मोत्यांची माळ तुटता
हा चंद्र मिठीत असावा
रंगीत पहाट फ़ुटता. . .

एक पहाट. . .

रात्रभर खेळ खेळून
एक दवबिंदू थकलं
मग गवताच्या पात्यावर
निमुटपणे झोपलं

कोंबड्याने बांग देताच
मोत्या सारखं हसलं
त्याला रविचं बाळ समजून
सारं रान हललं

वा‍र्‍याने शीळ घालताच
सारं रान हललं
ते ही खुळं घाबरून
धरेच्या कुशीत शिरलं. . .

-सत्यजित.

एकांगी. . .

अजुनही तू तशीच
जेव्हा पहील्यांदा तुला होतं पाहिलं
त्या पहिल्या वहिल्या क्षणात
हृदय तुझ्या चरणी होतं वाहिलं

अजुनही तू तशीच
डोळ्यांच्या कोनातून बघणारी
अजुनही तू तशीच
नजर चुकवत बोलणारी

अजुनही आठवतं तुझं
ओठ दाबून हसणं
अजुनही आठवतं तुझं
श्रुंगाराविना सजणं

तुझं अंगठ्याने जमीन उकरणं
माझ्या मनात खोलवर रुतलंय
त्या क्षणात पेरल्या बिजाचं
आज एक छानसं रोपटं बनलय

त्या सर्व आठवणींचा सुगंध
मनात दरवळत रहातो
त्या चित्रासम आठवणींना
मी तासन तास निहाळत रहातो

डोळे मिटून ऐकताना
एखादं रोमँटीक गाणं
मग दबक्या पावलाने तुझं
बंद पापण्यांमधे येणं

स्वप्न नाहीत ती माझी
त्या तुझ्या आठवणी आहेत
माझ्या एकांत जगण्याला
त्याच खत पाणी आहेत

मी ही जपून ठेवलय
माझं एकांगी चकोरपण
चंद्र पहाताना प्रत्येकवेळी
येते तुझीच आठवण

प्रेमाच्या गंधावर जगणारा मी
मला मकरंदाची आस नाही
तू माझी व्हावीस असा
मज क्षणभरही भास नाही

कधीच लांधल्या सीमा
मी परकेपणाच्या
माझ्याच मी जपल्या प्रतिमा
आपल्या आपुलेपणाच्या

माझी स्वप्नं, माझ्या आठवणी
तुला कधीच कळणार नाहीत
माझी पावलं तुझ्या दिशेने
कधीच वळणार नाहीत. . .