Thursday, April 19, 2007

११ सप्टेंबर. . .

तो काळा डोंगर अंगावर धाउन येणारा
तरी चिरकाल तटस्थ असणारा
मी हालचाल करत नाही त्याच्या छायेखालीच जगतोय
मनातली भीती मारुन तो कोसळण्याची वाट बघतोय
रोजच कोसळते त्या पर्वतावरुन दरड
अन उद्ध्वस्त करुन जाते एखादे छोटे घरटे
मग काही दिवे पेटतात,
पांढरी पाखरे उडतात
वर्तमानाचे मथळे बदलून
पुन्हा निद्रिस्त होतात
त्याचीही वामकुक्षी संपते
त्यालाही कंटाळा येतो घरटी पाडायचा
आणि तो शोधायला लागतो बहरलेले डेरेदार वृक्ष
त्या लाकडानी रचायच्या असतात त्याला चिता
नितळ पाण्याच्या आणि निळ्या स्वच्छ आकाशाच्या
पण आम्हाला आता सवय झालीय पडणारी घरटी बघायची
त्या मोडलेल्या काटक्यां पासून स्वत:ची घरटी सावरायची
परवाच्या दरडी बरोबर त्या डोंगरावरचा एक गाव कोसळला
अन डोंगरावर वसलेला गाव डोंगराच्या मुळावर उठला
अजुन तो डोंगर आमच्या माथ्यावर उभा आहे
त्यानी उपसल्या वर डोंगर, दरड आमच्यावर कोसळणार आहे
तरीही मी हलणार नाही कारण काठीवाला पुतळा इथेच जन्मला होता
त्याच्या काठीवर टांगायला फ़लक लिहून घेतोय "इथे माझा गाव होता". . .

सत्यजित.

No comments:

Post a Comment