Wednesday, April 18, 2007

एकांगी. . .

अजुनही तू तशीच
जेव्हा पहील्यांदा तुला होतं पाहिलं
त्या पहिल्या वहिल्या क्षणात
हृदय तुझ्या चरणी होतं वाहिलं

अजुनही तू तशीच
डोळ्यांच्या कोनातून बघणारी
अजुनही तू तशीच
नजर चुकवत बोलणारी

अजुनही आठवतं तुझं
ओठ दाबून हसणं
अजुनही आठवतं तुझं
श्रुंगाराविना सजणं

तुझं अंगठ्याने जमीन उकरणं
माझ्या मनात खोलवर रुतलंय
त्या क्षणात पेरल्या बिजाचं
आज एक छानसं रोपटं बनलय

त्या सर्व आठवणींचा सुगंध
मनात दरवळत रहातो
त्या चित्रासम आठवणींना
मी तासन तास निहाळत रहातो

डोळे मिटून ऐकताना
एखादं रोमँटीक गाणं
मग दबक्या पावलाने तुझं
बंद पापण्यांमधे येणं

स्वप्न नाहीत ती माझी
त्या तुझ्या आठवणी आहेत
माझ्या एकांत जगण्याला
त्याच खत पाणी आहेत

मी ही जपून ठेवलय
माझं एकांगी चकोरपण
चंद्र पहाताना प्रत्येकवेळी
येते तुझीच आठवण

प्रेमाच्या गंधावर जगणारा मी
मला मकरंदाची आस नाही
तू माझी व्हावीस असा
मज क्षणभरही भास नाही

कधीच लांधल्या सीमा
मी परकेपणाच्या
माझ्याच मी जपल्या प्रतिमा
आपल्या आपुलेपणाच्या

माझी स्वप्नं, माझ्या आठवणी
तुला कधीच कळणार नाहीत
माझी पावलं तुझ्या दिशेने
कधीच वळणार नाहीत. . .

1 comment: