वेडा वेडा म्हणून हिणवताय
पण तुम्हा सगळ्यांना हुशारीचे धडे शिकवीन
भर चौकात सार्या शहाण्यांना नागवीन
असुनदेत फ़ाटके कपडे माझे
पण तुमच्या कपड्यांनी तरी कितीसं झाकलंय ?
माझ्य नजरेतून बघा, मला तर सारं उघडंच दिसतंय
सगळी बोगस तत्वे तुमची सगळी पोकळ भाषा
पेकाट्यात कुणी लाथ हाणता गुंडाळाल लगेच गाषा
कुणीही यावं फ़ाडून न्यावं,
लोकलज्जेच्या नावाखाली त्याला थिगळं जोडत बसावं
सगळा तुमचा भेकडपणा सहिष्णुतेच्या नावाखाली गोंजारताय
नेसणं ओलं झालं तुमचं, कशाला शूरपणा दाखवताय ?
कधीच मेला कृष्ण आणि आता एकही पांडव नाही जीता
रोज नागवल्या जातात द्रौपद्या आणि तुम्ही डोळे मिटून वाचताय गीता
प्रेत्यक घरात एक द्रौपदी आहे, तिचं रक्षण कोण करेल ?
माना खाली घालून जर पांडव झालात, तर कृष्ण कोण बनेल ?
घेतला कृष्णानेही जन्म आणि जर सांगायला घेतली गीता,
तर त्यालाही वेडयात काढाल तुम्ही, त्याचं काही ऐकून न घेता
तोही कशाला येतो म्हणा, आता त्याला पांडव कुठे मिळणार ?
चार पाच वेड्या टाळक्यांसह, तो सहस्त्र कौरवांशी कसं लढणार ?
त्यालाच सोडवूदेत त्याचे प्रष्ण, आपण विचार कशाला करा ?
किड्या मुंग्यांसारखं जगा आणि कुत्र्यासारखं मरा
वेडा आहे हो मी, असं उगाच काहीही बरळत रहातो
आणि त्या अज्ञातवासातल्या पांडवांना तुमच्यात शोधत रहातो. . .
सत्यजित.
No comments:
Post a Comment