Tuesday, July 13, 2021

चांदणभूल - Girl in the moonlight

मुग्ध चंद्रमा नभात

यक्ष मी तू कामिनी
गगनातून अवतरली
भासली सौदामिनी

लख्ख सारे लखलखले
शुभ्र अश्व अवतरले
बरसले बघ चांदणे
तरुवरही झगमगले

पावलांचे ठसे तुझ्या
बघ पाखरते चांदणे
पदाराची झूल तुझ्या
बघ पांघरते चांदणे

तारकांच्या रांगोळ्या
रेखीयल्या नभी कुणी
झणी नक्षत्रे चितारती
कंकणांची झिणिझिणी

तम् देखील लख्ख झाले
लख्ख झाले कृष्णतळे
चमचमत्या लाटांतुन
चमचमते मीन पळे

शुभ्र पंख पसरूनी
अश्व नभी उधळले
मोत्यांचे थेंब तुझ्या
कुंतलातून ओघळले

शुभ्र अभ्र विखुरले
बघ आसमंत साजरा
पदारातून झरे समीर
चांदण्याचा उडे चुरा

लक्ष लक्ष चांदण्या
अक्ष होऊनी पाहती
लक्ष लक्ष किरणांनी
नजर तुझी काढती

एकला मी लुब्ध उभा
स्तब्ध होऊनी पाहतो
नक्षत्रेशी अप्सरेस
हेशब्द अर्घ्य वाहतो

- सत्यजित.

झिणी - त्वरित, भरभर
नक्षत्रेश - चंद्र

No comments:

Post a Comment