Thursday, January 22, 2009

अगदी ठाम ठरवून..

परवाच मी आवरायचं म्हणून
पुन्हा पसरुन बसले आवरलेलं
आणि सारं सारं घरंगळलं
मी इतक्या हट्टाने सावरलेलं

काही जीर्ण चिटोर्‍यात..
तर काही गंजल्या कटोर्‍यात
सारं कसं रंजूनही खदखदत होतं
सारं कसं गंजूनही लखलखत होतं...

हळुवार स्पर्शांनी सरल्या क्षणांची
वाढू लागते वर्दळ
हळुवार, मंद.. मंद.. पसरु लागतो..
अगदी.. अगदी त्या वेळीचा दरवळ

तेव्हा हे सारं का जपलं होत?
तेव्हा हे सारं कसं, माझं...
फक्त माझं, आपलं होतं...

पावसाच्या पहिल्या थेंबाप्रमाणे
फुटतं एक खुदकन हसू
आणि गवसतात काही
अंतर्मुख करणारी स्मितं..

मी ओंजळीत पुन्हा पकडू लागते
मायेच्या अंगणातले
सळसळत्या पानातले
ते झुळझुळते कवडसे....
बंद पापण्या लख्ख लख्ख तेजाळतात
ती भरली ओंजळ बघायला मी डोळे उघडते......
ए वेडाबाई... कुठे हरवली होतीस?
मलाच पुसते.. माझी रिती ओंजळ
मी हळुवार डोळे मिटते
आणि उधळून देते माझी भरली ओंजळ...

मी भूतकाळाशी समरस असताना
इथे वर्तमानाची समरं पेटलेली असतात
मी पुन्हा घाईघाईने आवरु लागते
पुन्हा पसरायचं नाही हं, असं ठाम ठरवून...

-. (सत्यजित)

1 comment: