परी गं परी तू आहेस का खरी?
कधी तरी येशील का माझ्या पण घरी?
येशील का सांग तू माझ्या बर्थडेला?
करशील का सांग तू मला सिंड्रेला?
चमचमता ड्रेस अन काचेचे बूट
जादूच्या कांडीने खेळण्यांची लूट
असंच एकदा रात्री, काय गंमत झाली
एक छोटीशी परी घरी माझ्या आली
पंख लाउन म्हणाली, चल पर्यांच्या देशात
मीही परी झाले छान परीच्या वेशात
केवढा मोठ्ठा सी-सॉ होता मस्त चंद्राचा
सी-सॉचा रथ होता पांढर्या शुभ्र उंदरांचा
उंदरांना घातले होते मऊ ढगांचे बूट
रथवान घालुन होता पांढरा सुंदर सूट
रथातुन निघालो परी राणीला भेटायला
हळुच लगाम देता लागला उंदीर उडायला
छोट्या छोट्या पर्यांची सुंदर सुंदर घरं
ते जादुच गाव होतं, पण होतं खरंखुरं!
खुदूखुदू हसत होतं झुळुझुळू पाणी
पानं फुलं गात होती सुंदर सुंदर गाणी
प्राणि होते उडत, नी झाडे होती चालतं
फुल, पक्षी, दगड, माती सगळेच होते बोलतं !!
बडबडणार्या वस्तूंची चालली होती सहल
सगळे पहायला चालले होते राणीचा महल
राणीचा महल होता दुर ढगांच्या पार
राणीचा महल होता सुंदर फार फार
गोळ्या, केक, आईसक्रीम खुप होता खाउ
चला लवकर लवकर परीराणीला पाहू
राणीला बघायला सगळ्याचीच घाई
राणी तर दिसत होती एकदम माझी आई (?)
राणी म्हणाली "चल उठं बघु आता"... ?
आई म्हणाली "चलं उठ बघु आता"
"येईन पुन्हा" म्हणाली परी जाता जाता
घाई घाईत गेली परी माझे पंख विसरुन
मीही उडू शकत होते माझे हात पसरुन
आईनी आणला होता तोच परीचा ड्रेस
(म्हणाली)आधी खाउ खाउन घे मग नंतर नेस
खर्या परी राणीची आत्ता भेट झाली
तरी म्हंटल परी कशी पंख विसरुन गेली...!!!
-सत्यजित.