Saturday, January 8, 2011

सराईतपणे जगण्याच कसब मला दे..

सरल्या क्षणांना सराईतपणे विसरण्याचं कसब मला दे...
उरल्या क्षणांना सराईतपणे जगण्याचं कसब मला दे !

पाउस का पडतो? फुले का फुलतात? झूले का झुलतात?
दुःखा पलिकडे जगण्याची एकतरी सबब मला दे !

जरी झाली नाही थोर, दे पावलांत जोर, चालेन म्हणतो...
स्वप्नांना पावलं, पावलांना स्वप्न थोडी अजब जरा दे !

उरल्या क्षणांना सराईतपणे जगण्याच कसब मला दे

-सत्यजित.

Sunday, January 2, 2011

अगदी तस्सं...

जिवनमूल्यांच गाठोडं बांधुन
पाठीवर त्याचं ओझं वहात
अखंड चाललेली पायपिट
कुठल्याश्या टप्प्यावर
गाठोडं उलगडून बघायचं
आणि फक्त जमेच्या फुल्ल्या मारायच्या
टप्पा?...
ईप्सीत माहीत नसताना उगाच
विश्रांतीच्या क्षणांना टप्पा म्हणायचं
म्हणजे कसं जगल्या सारखं वाटतं

मग हे ओझं वहायचंच कशाला?
पालक म्हणुन मुलांच्या खांद्यावर द्यायला...
मन या नसलेल्या अवयवाला
काहीतरी दुखणं नको का ?... नसलेलं का असेना..
वयातही न आलेल्या मुलीला विचारतोच ना..
"सासरी जाउन कसं व्हायचं तुझं?"
अगदी तस्सं...

-सत्यजित.

आस्तिक की पराधीन

मी तुझ्या समोर हात जोडुन
जेंव्हा तुझ्या डोळ्यात पहातो
पहातो तू काही खुणावतोस का?
तूझे डोळे नेहमी सारखेच
प्रेमळ आणि निश्चल
मी तुझ्या डोळ्यात पहात रहतो
मला वाटतं तू हसलास
मला वाटतं तू फ़सलास
मग कधीतरी कुठेतरी
घडतं मना विरुद्ध
मी धावत येतो तुझ्या कडे
तुझ्या समोर हात जोडुन
तुझ्या डोळ्यात पहातो
तुझे डोळे नेहमी सारखेच
प्रेमळ आणि निश्चल
आणि मला वाटतं तू हसलास...

-सत्यजित.