Friday, June 15, 2012

अनावृत्त पाऊस

ती खिडकीतुन बघता पाऊस

पाऊस काचेवर रेंगाळला

नभ गुरगुरता त्याचे वरती

पाऊस किती बरं ओशाळला



नभास दिसते नुसती खिडकी

अन दिसते ना काही

स्पर्शावे तिने थेंबास म्हणोनी

पाऊस रेंगाळत राही



कोपे नभ ओढी पाठीवर

लकलकता आसूड

लखलखली ती विजेहून

पाऊस वेडा अल्लड हूड



नभास आले कळोनी सारे

तिरक्या केल्या धारा

काचेवरुनी थेंब झटकण्या

घोंगावत ये वारा



फरफरटले ते काचेवरती

तरी न सोडला धीर

वादळात त्या उभे ठाकले

ईवलेसे प्रेम वीर



काचेवरती आर्त थाप

पण तिला कसे कळावे?

थेंबांचे न दिसती अश्रू

मग कोणी कसे पुसावे?



काय भासले तिला कळे ना

ठेवले अधर काचेवरती

गहिवरला कोसळला पाऊस

पुलकित झाली धरती



-सत्यजित.