Saturday, July 4, 2020

पाऊससराई

सरींचा हाती हात
धारांची बांधली गाठ
थेंबांच्या अक्षता अन
थेंबांचाच आंतरपाट
विजेची रोषणाई
चौघडा गडगडाट
नभांचा झुलता मंडप
सरींचा गलबलाट
वार्‍याचे वरातीला
आणले अबलक घोडे
किरणे रुळती मानेवर
पायी तृणांचे तोडे
रानातील शीळ सखी
कानी आचरट बोले
पागोळ्या ढाळती अश्रू
मायेचे डोळे ओले
दूरदेशी गेला पाऊस
अंगण झाले सुने
पाचोळा झाले हात
कुरवाळीती लेकीचे जुने
-सत्यजित.