Monday, June 15, 2020

इतकं साधं गणित आहे

कामाला येतं त्याला देव मानणं
इतकं साधं गणित आहे
वाटल्यास तुमचेही पुजू दोनचार
तसेही इथे अगणित आहेत

इतके शहाणे झालो आम्ही
की देवालाही देतो सल्ले
इतके मोठे झालो आम्ही
की देववरही भरतो खटले

गाय पवित्र आहे कारण
तीच तर खरी कामी येते
आईचा सुकता पान्हा
तीच तर तीच दूध देते

देवाच्या लेकराला सांगा
नांगरला कुणी झुंपत का?
तिच्या लेकरा साठी आलं दूध
सांगा कोणी चोरत का?

शेळ्यांच आणि डुकराचे पिल्लू
जर नांगराला जोडता येत असेल
त्यांना ही पुजू आम्ही जर
त्यांना नांगर ओढत येत असेल

कामाला येतं त्याला देव मानणं
इतकं साधं गणित आहे
वाटल्यास तुमचेही पुजू दोनचार
तसेही इथे अगणित आहेत

दृष्टांत

अदृश्यातही तूच भासतेस
श्वासांच्या अंतरावर
अखंड चाले आपुली बडबड
भासांच्या तंत्रावर

अदृश्यातल्या तुझ्या गं गाली
पडते जेंव्हा खळी
माझी मी मलाच देतो
कचकन कोपरखळी

फसवे होते तुझे ते नसणे
हसणे कानी येते
माझे असणे तुझेच असणे
ऐसी ग्वाही देते

दिन सरला मी तुला संगतो
स्वप्न उद्याची तुला सांगतो
सांगतो मी सारे सारे
अविचल अंतरिक्ष
निश्चल वारा
अबोल सारे तारे

ग्वाही ना कुणाची
सही ना कुणाची
कुठले करार झाले
फितूर क्षणांचे
आतुर मनाचे
साक्षी फरार झाले

सारे साक्षी फरार झाले...

हे ब्रिंग इट ओन बेबी - राऊत्या

हे ब्रिंग इट ओन बेबी..

ढोरं जमली येशीवरती
चर्चा बोरिंग झाली,
चल रे रावत्या पार्टी ला मंग
पारावरती आली,
टपरी मागे रिचली क्वार्टर
रावत्या ला मग बसला स्टार्टर
चल रे उद्धव मिटवू आपल्या
सीएम मेकिंग खाजेला
पार्टीवाल्या वाल्या बोलाव माझ्या सीएम ला -४

आरं मेजॉरटी नसून
वर्षा वरती हा बघतो जायला
अन नरेंद्रला डीचवतो ते
नसतं लागुदे बोलया
आला निवडणुकीत रावत्या
कधी दांडिया खेळतुया रावत्या
युती फोडाया वर आदित्या
खाली नाचुन घेतोय रावत्या
टांगा पलटी सुटले घोडे
पवारांनी पण हाणले जोडे
गिरक्या घेतो करून मुजरा
देतो सोडून लाजेला
पार्टीवाल्या वाल्या बोलाव माझ्या सीएम ला -४


आला पवार बी रंगात
खेटून-खेटून लावतो आयटम
रावत्या भरून गल्लास
करतो खल्लास TOP to BOTTOM
हा आला पवार बी रंगात
खेटून-खेटून लावतो आयटम
भावड्या भरून गल्लास
करतो खल्लास TOP to BOTTOM
आला राज्यपालांना भेटून रावत्या
कसा लेझीम खेळतोय रावत्या
बसला दमून कडाला उद्धव
त्याला खेचून ओढतोय रावत्या
लात घालून म्हणला SORRY
उद्धव डार्लिंग आपली यारी
NCP सांगे काँग्रेस तसं
आपला हाय एक दुजेला
पार्टीवाल्या वाल्या बोलाव माझ्या सीएम ला -४



Are you ready? म्हणतो रावत्या
वर्षा वर्षा गातो,
काय बी कर पण बनव सीएम
देवेंद्र त्याला भ्येतो…
बाचाबाची घालून राडे
एक टक्के बारा घोडे
बाळासाहेबांचं ओल्डर वरजन
मागे नुसतं फोटोला
पार्टीवाल्या वाल्या बोलाव माझ्या सीएम ला -४

बोलाव म्हणजे बोलाव
हे रावत्या हिट इट रावत्या..

रावत्या… माइंड ब्लोविंग रावत्या
रावत्या… नाचुन घे रावत्या

अथांग डोळे

अथांग डोळे हसरे तरीही सांगून जाती काही
शब्दा वाचून लिहिते गाथा डोळ्यां मधली शाई

नकोच कुठला आधार कुणाचा नकोच दुबळी कुबडी
झाकले सारे मुठीत ज्या ती मूठ पडो ना उघडी

पाठीवरती थाप नको नी माथ्यावरती हात नको
उगाच उसने पुण्य नको नी व्याजावरती पाप नको

कुणीच नसते इथे कुणाचे वेळही नसते आपुली
काळाच्या जखमांवर बसते काळाचीच खपली

तरीही वाटे फुंकर एखादी झुळूक होऊनी यावी
तहानलेल्या मना शमावण्या सर एखादी बरसावी

हळवे होणे सोसत नाही मग सोसत जाते सारे
मुठीतले फुंकरण्या तिने जपून ठेवलेत तारे..
तिने जपून ठेवलेत तारे...


आपली दुःख लपवून सतत हसत राहणाऱ्या, मुठीतले तारे फुंकून सुखाची पाखर करणाऱ्या ह्या जादूगार आणि झुंझार मैत्रिणींना माझा हा मानाचा मुजरा...

सत्यजित. 

फितूर डोळे

फोटोच्या काचेतुन बघ दिसतात दोन डोळे
फोटोच्या काचेवर पण असतात दोन डोळे
फोटोच्या काचेतले बघ हसतात दोन डोळे
फोटोच्या काचेवरले बघ भिजतात रोज डोळे
काचेच्या पल्याड बघ बोलके दोन डोळे
काचेच्या अल्याड जग पोरके दोन डोळे
काचेच्या पल्याड जग मुकलेले दोन डोळे
काचेच्या अल्याड बघ चुकलेले दोन डोळे
शोधत रहातात इकडे तिकडे ओळखीच्या डोळ्यांना
फसवत जातात जिकडे तिकडे ओळखीच्या डोळ्यांना
अंधारात टक्क बघत रहातात दोन डोळे
उजेडात मख्ख बघत राहतात दोन डोळे
उजेडातलं स्वप्नांना मोडण्या आतूर झाले दोन डोळे
आपल्यावरच सूड उगवण्या फितूर जाहले दोन डोळे...

Miss call

अवेळी तिचा असा
मिस कॉल आला
अन स्वप्नांचा ताफा
सहलीला निघाला

ती रंगीत स्वप्न
जेंव्हा रंगात आली
आवेळी पुन्हा मग
मला जाग आली

कसे विचारे म्हणून
फक्त प्रश्नचिन्ह टाकले
एका अर्जाला जोडले
मी कितीक दाखले

न दाखल्यांची दखल?
न चिन्हाची चिंता?
एक गाठ सोडविताना
झाला भलताच गुंता

वाचला होता मेसेज
की नव्हता कळे ना
वा निरोपाची पावती
मिळता मिळे ना

काही क्षणातच का
इतका अस्वस्थ झालो?
ती देईल रिप्लाय
उगा आश्वस्त झालो

न कॉल येतो
न मिसकॉल येतो
मी माझ्या मनाला
मिसकॉल देतो

तेवढ्यातच तिथून
तिचा Hi येतो
'सॉरी हं चुकून'
असा रिप्लाय येतो

मिसकॉल होता मग
कसा कनेक्ट झाला?
मिसकॉलच होता
अता डिस्कनेक्ट झाला.


मंथन

विचार करायला नाही वेळ घडवून आणायचीय क्रांती आता
मिळणार नाही बऱ्या बोलानी बडवून आणायचीया क्रांती आता
तख्त बदलायचं देशाचं अरक्षणावरून मोर्चा काढायचंय
धर्मावरून लाखोली वाहायचीय जातीवरून वचपा काढायचंय
टीव्ही वरच्या बातम्या पाहून पेटून उठते अशी आग
कुणी केलं माहीत नाही शेजाऱ्यावर काढायचा राग
कोण कसले मित्र आणि कोण कुठले शेजारी
आधी माझा धर्म खरा आधी त्यांची जात खरी
प्रत्येकजण ग्रासलेला आणि प्रत्येकजण त्रासलेला
प्रत्येकजण माजलेला तरी प्रत्येकजण मागासलेला
मागासलेपण मिरवण्यात आता खरं आहे भूषण
मदत करायला गेलात तर सबळ म्हणून देतील दूषण
संभाजीच्या शिवाजीच्या विड्या फुकुन काढायचा धूर
भिमाच चाक चिखलात बोंबालत राहायचं आला पूर
आधीच छाटल्या शेंडीला चोळून ठेवायचं मणभर तूप
आग पेटवायची म्हणून फकीर जळतोय मूठभर धूप
पुजारी झालेत नेते देवाला ठेवलाय करायला प्रचार
एकाला चढवलाय सुळावर एकाला वनवासी पाचर
आता नेता सांगेल तीच आई नेता सांगेल तोच बाप
आता नेता सांगेल कोण तुम्ही नेता सांगेल कुणाचं पाप
VR गॉगल देऊन त्यांनी केलेत तुमचे उघडे डोळे
एवढं भयंकर आहे सगळं? तुमच्या पोटात तोफेचे गोळे
ते गोळे डागायला तुम्ही जन्माला घालता एक तोफ
मायेने पोसणाऱ्या आईच्या हृदयाला पाडते रोज भोक
हे जे बाळ आहे तुमचं तेही हळू हळू मोठं होईल
प्रेमाने पोसणाऱ्या आईला एक दिवस उडवून देईल
पोरके व्हाल पुन्हा तेंव्हा ते तोफा घालतील मुशीत
पुन्हा बाहेरचे येतील आणि राज्य करतील खुशीत

- सत्यजित








Monday, June 8, 2020

Social नेटवर्किंग

मेलो आहे मी
फक्त आत्मा होऊन फिरतो आहे
नाहीतर कसं काय शक्य आहे
एकाच वेळी इतक्या ठिकाणी
इतक्या लोकां सोबत वावरणं
तुमच्या दुःखात, तुमच्या सुखात
निषेध मोर्च्यांमध्ये,
निवडणुकांच्या सभांमध्ये
रोज सकाळी उजेडताना
संध्याकाळ मावळताना
दिवाळी, ईद, नाताळ,
स्वातंत्र्य साजरं करताना
हसताना, कण्हताना
रडताना, पडताना
Get well soon म्हणताना
अपघातात मरताना....
मी माझ्या आयुष्यात नसतो
तितका असतो तुमच्या आयुष्यात
कारण मी मेलो आहे माझ्यासाठी...
मी मेलो आहे तरीही अमर राहीन
माझ्या प्रत्यके ट्वीट मधून
फेसबुक मधल्या कमेंट मधून
इन्स्टाग्राम वरल्या फोटों मधून
व्हाट्सएपच्या फोरवर्डस् मधून
ब्लॉग्स वरच्या पोस्ट्स मधून
तुम्ही लिहिलेल्या RIP मधून
लाईव्ह येइनहीअधून मधून
पण फक्त तुमच्यासाठी...
कारण मी मेलो आहे... आणि तुम्हीही....

-सत्यजित.

फितूर

फोटोच्या काचेतुन बघ दिसतात दोन डोळे
फोटोच्या काचेवर पण असतात दोन डोळे
फोटोच्या काचेतले बघ हसतात दोन डोळे
फोटोच्या काचेवरले बघ भिजतात रोज डोळे
काचेच्या पल्याड बघ बोलके दोन डोळे
काचेच्या अल्याड जग पोरके दोन डोळे
काचेच्या पल्याड जग मुकलेले दोन डोळे
काचेच्या अल्याड बघ चुकलेले दोन डोळे
शोधत रहातात इकडे तिकडे ओळखीच्या डोळ्यांना
फसवत जातात जिकडे तिकडे ओळखीच्या डोळ्यांना
अंधारात टक्क बघत रहातात दोन डोळे
उजेडात मख्ख बघत राहतात दोन डोळे
उजेडातलं स्वप्न मोडण्या आतूर झाले दोन डोळे
आपल्यावरच सूड उगवण्या फितूर जाहले दोन डोळे..

बातम्या


हल्ली रोज रोज वाचायला मिळतात
नवीन नवीन बातम्या
हल्ली रोज रोज टोचायला मिळतात
नवीन नवीन बातम्या

एक बातमी ह्याला खुपस
एक बातमी त्याला खुपस
आंतरजालाच्या उकिरड्यातून
रोज नवी बातमी उपस

हल्ली रोज रोज वाचायला मिळतात
नवीन नवीन बातम्या.....

-सत्यजित.

देव मानणं

उपयोगी त्याला देव मानणं
इतकं साधं गणित आहे
वाटल्यास तुमचेही पुजू दोनचार
तसेही इथे अगणित आहेत

झाडे, नद्या, प्राणी, पक्षी,
किडे मुंग्या सगळेच देव
ग्रह, तारे, चंद्र, सूर्य
दगडा मध्येही दिसतो देव

गाय पवित्र आहे कारण
तीच तर खरी कामी येते
आईचा सुकता पान्हा
तीच तर तीच दूध देते

सांगा देवाच्या लेकराला
नांगरला कुणी झुंपत का?
लेकरा साठी आलं दूध
सांगा कोणी चोरत का?

शेळ्यांच अन डुकराला जर
नांगराला जोडता येत असेल
पुजू आम्ही त्यांनाही जर
नांगर ओढत येत असेल

ऑनलाईन बिनलाईन

सर्वपित्री अमावास्येच्या शुभेच्छांचा
मेसेज बघून मनात चर्रर्र झालं
मग मोबाईलचा चंद्र हातात घेऊनच बाहेर पडलो
GB मध्ये occupied भूतकाळ चाळला
Current stats मध्ये वर्तमान
Available space मधलं भविष्य जोखत
पितरांच Online श्राद्ध घालून मोकळा झालो ...
कावळेही online होतेच....

अंतरातली भाषांतरे

स्पर्शाची भाषांतरे ... अंतरातले अंतर संपले की स्पर्शाला अर्थ उरत नाही म्हणूनही अंतरातली भाषांतरे

चंद्रावरल्या ढगांना वारा
झुलवत राहिला रात्रभर
भुरभुरल्या ढगांचा गंध
दरवळत राहिला रात्रभर
निजलाही असता चंद्र पण
त्याच पाहणं झोपू देईना
निजला असता तोही पण
त्यांचं चांदणं झोपू देईना
बोल घेवडा अबोला
बोलत राहिला कित्ती वेळ
स्पर्शाने विस्कटणारे,
नजर मांडून बसली खेळ
नजर बोलकी
अबोल तिढा
तिढा काही सुटेना
स्पर्श अडकले वेढ्या मध्ये
वेढा काही उठेना
शहाण्या सारखे वागत राहिले
दोन्ही वेडे किती वेळ
वेडया सारखी पहात राहिली
थांबली वेळ त्यांचे खेळ

अले गंपती बप्पा मोलया....


छान छान छान देवा
छान छान छान
भली मोठी सोंड तुझी
सुपा एवढे कान ||

कधी मोदकाचे ताट
कधी दुधामध्ये साखर
कधी तुला पुरणपोळी
कधी नुसती भाकर

सगळ्यांचं सगळं कसं
गोड लागतं सांग?
तरीच तुझ्या दर्शनाला
एवढी मोठी रांग... |

कधी असतोस पिटुकला तर
कधी डोंगरा एवढा
खात नाहीस तरी तुला
प्रसाद हा केवढा?

अरे का नाही खातं काहीच
एवढं तरी सांग
हे माझ्यासाठीच मागवतोस ना
आईला तरी सांग... |

एवढा छोटा उंदीर तुझी
ओढतो कशी गाडी?
आटोमॅटिक असावी ती नुसती
Acting करतो buddy

दोस्ती असते भारी तुझी
दोस्ती आपली जान
सगळ्यांचीच काळजी घेतोस
देवा तू महान….. |

केवढी सुंदर आरास तुझी
किती हा झगमगाट
डोळे मिटून मागायचं तर
किती हा गोंगाट

पण माझी पण आहे
डेंजर दंगेखोर गँग
सगळेच आम्ही नाचतो भारी
धडांग धडांग ढ्यांग...

धडांग ढ्यांग ढ्यांग.. धडांग ढ्यांग ढ्यांग...
धडांग ढ्यांग ढ्यांग...ढ्यांग ढ्यांग...ढ्यांग ढ्यांग... ढ्यांग ढ्यांग....

ए नाचो... गणपती बाप्पा मोरया!!!

सोवळा सोहळा


जपे स्पर्शाचं पावित्र्य
असा सोवळा पाऊस
बांध आतुर थेंबाना
धुकं बनला पाऊस

मन इतकं आतूर
झाले विचार फितूर
धुकं धुकं नजरेला
पार क्षितिजा पातूर

अशा पावसाचे गडी
वृक्ष लतावल्ली झाडी
त्यांच्या पानात लपून
चाले पावसाची खोडी

झरे धुकं पानावर
थेंब दाटुनिया आले
त्याचे आतुरले स्पर्श
दबा धरून बसले

सखा वारा खोडसाळ
बघा आला मदतीला
ओल्या थेंबाच्या मिठीत
घेई पाऊस धरेला

तिज स्पर्शता पाऊस
लव हिरवी शहारे
तेंव्हा माना उंचावून
वृक्ष देतीया पहारे

फुले रानात पानात
छुपा मिलन सोहळा
तिचा तलम पदर
त्यात धुकं झाले गोळा

त्याची धुकधुक धुकं
धुकं चुंबन सोहळा
असा भामटा पाऊस
तरी किती गं सोवळा

असा भामटा पाऊस
तरी किती गं सोवळा
धुकं पाऊस पाऊस
धुकं सोवळा सोहळा..

-सत्यजित.

प्राची ते गच्ची


कल्पनेच्या समुद्रात
टाकून बसतो कवितांचं जाळ
बघूया सापडतात काही जाणिवा
काही लादबदलेले शब्द
कल्पनेचा समुद्रच मुळी
असते एक कल्पना
असते ते छोटंसं डबकं
आणि त्यात सापडतात
काही बेडूक मासे
काहींना वाटतात त्या
पावसाच्या कविता
पण जरा वाढल्या की
त्या करतात फक्त
डरांव डरांव..
डरांव डरांव..
डरांव डरांव..

आपुली कविता

लिहू द्यावी प्रत्येकाला आपुली कविता
प्रत्येक कविता तुम्हाला कळेलच असे नाही
प्रत्येक कविता तुम्हाला भिडेलच असे नाही
दिसणार नाहीत तुम्हाला कवीने पाहिलेले सूर्य
किंवा त्याने अनुभवलेला अंधकार
तो रडला असेल तेंव्हा त्याने साधलं असेल का मीटर?
तो हसला असेल तेंव्हा त्याने तोडलं असेल का मीटर?
असे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर..
 तुम्ही न वाचलेलीच बरी कविता...
लिहू द्यावी प्रत्येकाला आपुली कविता

तुझं असं बावरण

तुझं असं बावरण
ढळता ढळता सावरणं
अवघड होऊन बसतं
माझं मलाच सावरण

तिरक्या तिरक्या डोळ्यांनी
कसलासा घेतेस अंदाज
शांत कोपरा निवडतेस
मैफिल होते घरंदाज

समाधिस्त

समाधिस्त होणं म्हणजे तरी काय?
इतकं आत्मकेंद्रित होणं की तुमच्या शिवाय जगात काहीच नसणं, मी पणाच एक कृष्णविवर होणं.
शोषून घेत जावं सारं स्वतःत इतकं की शोषून घ्यायची क्षमता संपली तरी मी पण उरलं पाहिजे. मग ते उरलेलं 'मी' पण फुटतं एक तारा बनून, शोषलेला प्रत्येक कण उधळतो आणि उजळतो मी पण सोडून.

असे सूर्य असतील पण ते दिसत नाहीत आपल्याला, त्यांच्या प्रकाशाने उजळलेले चंद्रच जगतात यौगी किंवा सिद्धपुरुष म्हणवून आणि मिरवून घेतात स्वतःला सूर्य म्हणून. पण त्यांना तो सूर्य दिसतो जो आपल्याला दिसत नाही. आपल्याला दिसतो तो फक्त प्रकाश. काही जण तर रस्त्यावरील खाब्यां वरच्या दिव्यांनाही सूर्य समजून पूजा करतात. प्रकाश तेज वहातो तो स्वतः तेज असत नाही, तेंव्हा तेजाची पूजा करा. प्रकाश म्हणजे तेज नव्हे. स्वतःला प्रतिसूर्य म्हणवून घेणाऱ्या चंद्रां पासून सावधान.
वेड्या मना माहेरा जा
जाऊन तिथला आरसा पहा
सापडशील स्वतःला
आणि उघडतील काही दरवाजे
काही दरवाज्यांत कोंडून घे स्वतःला
वेड्या मना माहेरा जा...

दुःखाला माहेरा सारखं सोडून येता आलं पाहिजे
आपलं असलं तरी परत जाता परकं भासलं पाहिजे
सासर नसतंच आपलं पण आपण आपलं म्हणतो
जे आपलं आहे त्याला परकं करून बसतो
एवढी किमया साधणाऱ्या
वेड्या मना जा माहेरा जा
जाऊन तिथला आरासा पहा...

-सत्यजित.

Breast cancer

तिच्या वक्षी दोन पक्षी
तरुण्याचे दोन साक्षी

तिच्या वक्षी दोन पक्षी
मातृत्वाचे दोन साक्षी

तिच्या वक्षी एकच पक्षी
कर्करोगाच्या एक भक्षी

कृष्णवलय तिच्या अक्षी
तिच्या पक्षि कोण साक्षी?

-सत्यजित.

आर्त डोळे 

इतुके तुझे आर्त डोळे भासती डोह खोल
सांग कीती जपायचे सावरू कसा गं तोल

हळुवार तुझ्या पापण्यांची घ्यावीत अनेक चुंबने
क्षुधा मनीची शांत होता संथ व्हावीत स्पंदने

गंध तुझ्या कुंकवाचा रुधिर होऊनी धावू दे
आत्मा तुझा नी माझा एक होऊनी तेवूदे

ब्रेकींग न्यूज

बागडून जाशील वाटलं होतं
तू घालून गेलास थैमान
सखा सखा म्हणता म्हणता
तू झालास कसा सैतान?

सैतान मला म्हणायला
जीभ कशी धजावली तुझी?
अरे तुमच्या पापांची
सांगा कुठवर व्हायची ओझी?

मग काय?
बिचारा पाऊसच तो....

पाऊस पडला रात्रभर
पाऊस रडला रात्रभर...
स्वतःलाच दोष देत
पाऊस कुढला रात्रभर....

आता..
उदास उदास पडून राहील
खितपत राहील चिखला मध्ये
नाकारलेलं ते एकटं पोरं
वाहत राहील नाल्या मध्ये...

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे...

पुन्हा दाखवतील ब्रेकींग न्यूज
मथळे बदलेल वर्तमान
मुंबईत पावसाचा कहर
पुन्हा पावसाचे थैमान....

-सत्यजित.

क्लासमेट्स


स्वप्नांची ना धेय्यांची
ऱ्हासांची ना त्रासांची
स्वतःची जेंव्हा स्वतःशी
झाली नव्हती भेट

अगदी तेंव्हाचे
अगदी  तेंव्हा पासून...
आम्ही जिगरी बिगरी मेट
आम्ही क्लासमेट्स ...
आम्ही क्लासमेट्स

शाळेच्या पहिल्या दिवशी
एक पिल्लू बावरलेल
अगदी आईच्या मायेने
बाईंनी गोंजारलेलं

ओळख बोबड्या बोलांची
त्या लुकलुकत्या डोळ्यांची
न मागता मिळालेली
ही पहिली वहिली भेट

अगदी  तेंव्हाचे ...

इतके होतो कोवळे
जसा नुकता फुटला कोंब
इतके होतो हळवे
पावसाचा पहिला थेंब

ना लपून छपून
ना अडून दडून
जेंव्हा मित्रांना मनातलं
सांगत होतो थेट

अगदी  तेंव्हाचे...

शाळेच्या बाकावरती
ठेका धरली गाणी
शाळेच्या नळा वरती
ओंजळीने प्यायलो पाणी

ना बुटाचे ना सुटाचे
ना हायजीनचे
ना डायजीनचे
जेंव्हा नव्हते नसते पेच

अगदी तेंव्हाचे...

शाळा सुटल्यावरती
रेंगाळायचो तासंतास
ना करिअरचे टेंशन
ना ट्राफिकचा त्रास

खेळायचो हसायचो
खरे खरे जगायचो
जेंव्हा प्रत्येक गोष्टीवरती
लिहिले नव्हते रेट

अगदी  तेंव्हाचे...

कुणी टारगट टक्के टोणगे
कुणी नाजूक तर कुणी दांडगे
कुणी उगाच घाबरणारे
कुणी मार खाऊन हसणारे

हळवे होऊन रडलो
तावातावाने भांडलो
कधी दणादण कधी रडारड
पण दोस्ती होती सेट

अगदी  तेंव्हाचे ...

नकळत कळतेपणाला
हलकेच आली जाग
अल्लड कोवळ्या कळ्यांचे
हुल्लड भुंगे घेती माग

सांगून ही ना कळले
कधी न सांगता ओळखले
ती कोवळ्या मनात
जपलेली कोवळी सिक्रेटस

अगदी  तेंव्हाचे....

आजही मजला तुम्ही
युनिफॉर्म मधले दिसता
व्हाट्सऍपवर दंगा करताना
वर्गात जाउनी बसता

स्मृतींचा पसरे गंध
भेटीचा जडला छंद
आपल्यात दडलं बालपण
आज पुन्हा देणार भेट

अगदी आत्ताचे
अगदी आत्ता पासून...
 करतो आहोत wait


अगदी तेंव्हाचे
अगदी  तेंव्हा पासून...
आम्ही जिगरी बिगरी मेट
आम्ही क्लासमेट्स ...
आम्ही क्लासमेट्स

पाऊस राधा

पाऊस राधा

ज्यांचा हा संसार सारा
त्यांनी संसार येथे मंडला
बंध ना होते कुणाचे
त्यांनी बांध होता लांधला

कृष्ण दाटला आसमंती
राधा पहुडली धारेवर
पश्चिमेचा गोल भाळी
करी इंद्रधनूचे बिल्वर

भासे सावळी धरा राधा
पाऊस गोमटा सावळा
सावळा बिलगे राधेला
पाऊस चुंबन सोहळा

ह्यां न होत्या पाऊसधारा..
होता राधापाऊस साजरा...

-सत्यजित.

इष्क

वाह रे इष्क तुने तो खूबसुरतीके के माईने बदल डाले
में तो वंही हू, बिलकूल वंही हू तुने शायद आईने बदल डाले

रुद्र

कृत्रिम पाऊस पाडणाऱ्या
माणसा  मी होऊन आलोय रुद्र
निसर्गावरती मात ह्या विचारा इतकाच तुही क्षुद्र

भोपळ्या सारखे डुलायचे

दिवस तुझे गं फुलायचे
भोपळ्या सारखे डुलायचे

अर्बट चर्बट खाणे
सरियल पहात रहाणे
काडीचे काम न करायचे

पुरी नी पुरणपोळी
वडा समोसा दाबेली
मोकाट बकाणे भरायचे

मोडली सोफ्याची तार
सोसेना पलंगा भार
खुर्च्याना जखमी करायचे

माझ्या ह्या जिमच्या पाशी
थांबशील जाडे जराशी
ह्या स्वप्नांत तरी मी भुलायचे

भोपळ्या सारखे डुलायचे...

-सत्यजित

श्रावणी - एक आख्यायिका



आवरायचे सांग कसे? सांगायचे काय मनाला?
इंद्रधनूचे वेध लागलेत श्रावणातल्या उन्हाला

तू ऋतू होऊनी येशील... होशील श्रावण धारा
सूर मल्हाराचे देतील... ह्या खांबां वरल्या तारा

हो सर, ये सरसावूनी तशी तू ... दूर नको राहुस
मी मग, हात पसरूनी घेईन... अंगोपांगी पाऊस

एक इवलासा नाजूक कोंब... दाखवायचाय तुला
त्या इवल्याश्या पातीवरती... बांधू स्वप्नांचा झुला

ही प्रेमाची भरती आहे की उधाणलेला सागर
मी भरकटलेली नौका तू स्थिर-स्थावर नांगर

माझ्या वेडाला या सांग.. मी काय उतारा देऊ
तू हो म्हणालीस तर बरं.. नाहीतर आख्यायिका होऊ...

-सत्यजित.

अश्रूंचे हे घर माझे

ओठांच्या उंबरठ्यावर हुंदका रेंगाळलेला
हास्याचा फक्त मुलामा तोही भेगाळलेला

अश्रूंचे हे घर माझे थेंबा थेंबांनी रचलेले
सुखाचे चढवून पाणी दुःखांनी सजलेले

आवंढा गळ्यात माझ्या गाणे होवून येतो
शब्दातीत वेदनांना सूर मल्हारंगाचे देतो
कैफ हा मराठीचा
झिंग ही मराठीची
डाव हा मराठीचा
पैज ही मराठीची

ही अपुली मायबोली
आम्ही तीची लेकरे
तुम्हा आम्हाला जोडते
नाळ ही मराठीची

ज्ञानोबाच्या बोटांतली
आली आमुच्या ओठी
देखणी ती लेखणी
लेक ही मराठीची

थोरा संतांना भुरळ
घाली हिचा घाट
पुरवावी तरी उरते
हौस ही मराठीची

अभंगाची गोडी इथे
इथे लावणीचा बाज
सोवळ्या श्रुंगाराची
मौज ही मराठीची

कशाची ही भीती?
कशा हीची चिंता?
युगे वादळे झेलते
शीड ही मराठीची....

अर्थ हिचे सैनिक
झाले शब्दांवर आरुढ
पुढे पुढे चालते
फौज ही मराठीची

-सत्यजित.

अर्घ्य

होतेच व्यर्थ जागणे जीवनास अर्थ दे तू
सूर्य कर मला अन प्रेमाचे  घे तू

तू स्पर्षले तमास आज तेथे चांदणी आहे
तू चुंबले नभास आज तोच चंद्र आहे

तू रुसलिस अशी म्हणोनी निखळला एक तारा
नकोच ढाळु अश्रू होईल मोकळा आसमंत सारा

स्पर्शांची भाषांतरे

तुझे हात हाती आले
अन जगणे स्वप्न झाले
मागू कशास काही
मज सर्व सर्व मिळाले

हातात तुझे हात
देती अर्थ जीवनाला
हेची अर्चित माझे
मी सांगते मनाला

स्पर्श ओझरता तरिही
मनी गोंदवून गेला
कृष्णेच्या खांद्यावरला
झाला राघव शेला

स्पर्शात जे तुझ्या
ते शब्दात येत  नाही
स्पर्शांची भाषांतरे
शब्दात होत नाहीत

-सत्यजित.

कृष्णा - द्रौपदी