Tuesday, March 27, 2012

मै हूं जुग-जुग जुग-जुग जुगनू - सैल वेणीतल्या स्वैर त्रिवेण्या

सैल वेणीतल्या स्वैर त्रिवेण्या...

खिडकीच्या बारांवर दवबिंदूंच्या ओळी
किरणांनी गाठले पहाटेच्या वेळी
मला वाटलं काजवे थिजलेत...

==================================

आभाळभर लूकलूकते पसरले तारे
तारे नाहीत ते काजवेच सारे
काळ्या चिकट कागदाला रात्र समजले असतिल..

==================================

प्रभांगणी तारे
अंगणी प्राजक्त
मध्ये प्रचंड पो़कळी, आपला गंध आपल्या पाशी..

==================================

काही काजवे मुठीत धरावेत
काही भोकाच्या पेटीत बंद करावेत
तरी पहाट ती येणारच...

==================================

एक कोसळता तारा
इच्छा: वाचव रे त्याला
आणि काजवा उडू लागला...

==================================

सूर्य वाहतो तमाच्या पखाली
निशेचा मोर्चा, काजव्यांच्या मशाली
चंद्राने म्हणे बंद पुकारलाय...

==================================

काजव्यांची रात्र
चांदण्यांची रात्र
अवसेचा झगमगाट...

==================================

जुगनू म्हणजे काजवा ना रे?
काजवा म्हणजेच जुगनू
पण मला जुगनूच आवडतं....

==================================

-सत्यजित.

Wednesday, March 14, 2012

कागदाची चिता

माझी पत्र अजुन का
ठेवली असशील जपून
तुझा चेहरा बोलका होता
कुठवर ठेवशील लपून

कगदाचं काय येवढं
आठवणींच लख्तरं होईल
शाई उडुन जाता जाता
तिच देखिल अत्तर होईल

जर ठेवायची असतील जपुन
तर उत्तरांची तयारी कर
माझ्या पर्यंत प्रश्न पोहचतील
येवढं आत्ताच गृहीत धर

बघ त्या पत्रांतून मला
वगळता येतं का?
त्या पत्रांची चिता रचून
मला जाळता येतं का?

तुझ्या हातानी पाणी नाही
पण अग्नी तरी मिळेल
प्रत्येक पत्र जळताना
तुझे अशृ पाहून उजळेल.

-सत्यजित.

Saturday, March 10, 2012

वाद्यवृंद - बालकविता Audio स्वरुपात :)

वाद्यवृंद - विविधतेत एकता म्हणजेच Unity in Diversity

पेटी म्हणते सा रे ग
तबला म्हणतो धाक धिक ध
शिळ घाले बासुरी अन
ढोल म्हणतो धडाम ध

धुम तना धिंदिंत ननाना
धुम तना धिंदिंत ननाना
धुम तना धिंना धिना

गिटार म्हणतं डिंग डींग डिंग
मेंडॉलीनची टींग टींग टींग
वायोलिन करे कूईं-कूईं कुई-कुई
तान घेते सतार गं

टींन टींन टिडी टीडी टिडी टीडी टींन
टींन टींन टिडी टीडी टिडी टीडी टींन

पैंजण करती छन छन छन
टाळ करती खण खण खण
घुंगरांची रुणझूण चाले
ताशा वाजे ढडाम ढं

ढींकचिका ढींकचिका ढींकचिका ढींकचिका
ए.. ए.. ए... ए.. ए.. ए.. ए... ए..

ट्रंपेट काढतो रे भोंगा
सेक्साफोनचा रे दंगा
शेहनाई ती सुरात गाते
नादस्वरम करे पॅप्याप प
पॅपॅप प्यां पॅपॅप प्या पॅपॅप प्या पॅपॅप प्या..
पॅपॅप प्यां पॅपॅप प्या पॅपॅप प्या पॅपॅप प्या..

ना एक सारखे जरी दिसती
ना एक सारखे स्वर देती
सुरां मध्ये सुर गुंफता
करती मग ते कंमाल रं
ढीपाडी डिपांग, डिचीपाडी डिपांग,
हेढीपाडी, डिचीपाडी, डिपांग कु...डु....

एक होऊनी गाऊया
धुंद होऊनी नाचूया
गोंगाट मस्ती कल्ला दंगा
चला करुया धामल हो

हम मैं है हीरो (2)
हम मैं हैं हीरो .. ओ ओ ओ ओ ...
हम हीं हैं हीरो.... आम्ही तर हीरो....

-सात्यजित

हे गाणं वाचण्यापेक्षा ऐकण्यात जास्त धमाल येईल. हे गाणं इथे ऐकता येईल


किंवा ईथे क्लिक करा

मी काही गायक नाही, तेंव्हा एका दमात गाणं म्हणताना माझी बरीच दमछाक झाली. मी प्रथमच ध्वनीरूपात सादर करतोय, त्यामुळे चुकांबद्द्ल क्षमस्व.

बच्चापार्टी तुम्हाला. हे गाणं कसं वाटल नक्की कळवा...

Monday, March 5, 2012

अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा...

थांबा बसू नका
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

बाबा पाय दुखले
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

थांब उचलून घेतो हं,
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

बाबा चला ना...
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

बसलात काय?
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

दोघांना उचलून नाही हां जमणार..
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा...

-सत्यजित.