Showing posts with label छोट्या छोट्या पिल्लांसाठी. Show all posts
Showing posts with label छोट्या छोट्या पिल्लांसाठी. Show all posts

Saturday, March 10, 2012

वाद्यवृंद - बालकविता Audio स्वरुपात :)

वाद्यवृंद - विविधतेत एकता म्हणजेच Unity in Diversity

पेटी म्हणते सा रे ग
तबला म्हणतो धाक धिक ध
शिळ घाले बासुरी अन
ढोल म्हणतो धडाम ध

धुम तना धिंदिंत ननाना
धुम तना धिंदिंत ननाना
धुम तना धिंना धिना

गिटार म्हणतं डिंग डींग डिंग
मेंडॉलीनची टींग टींग टींग
वायोलिन करे कूईं-कूईं कुई-कुई
तान घेते सतार गं

टींन टींन टिडी टीडी टिडी टीडी टींन
टींन टींन टिडी टीडी टिडी टीडी टींन

पैंजण करती छन छन छन
टाळ करती खण खण खण
घुंगरांची रुणझूण चाले
ताशा वाजे ढडाम ढं

ढींकचिका ढींकचिका ढींकचिका ढींकचिका
ए.. ए.. ए... ए.. ए.. ए.. ए... ए..

ट्रंपेट काढतो रे भोंगा
सेक्साफोनचा रे दंगा
शेहनाई ती सुरात गाते
नादस्वरम करे पॅप्याप प
पॅपॅप प्यां पॅपॅप प्या पॅपॅप प्या पॅपॅप प्या..
पॅपॅप प्यां पॅपॅप प्या पॅपॅप प्या पॅपॅप प्या..

ना एक सारखे जरी दिसती
ना एक सारखे स्वर देती
सुरां मध्ये सुर गुंफता
करती मग ते कंमाल रं
ढीपाडी डिपांग, डिचीपाडी डिपांग,
हेढीपाडी, डिचीपाडी, डिपांग कु...डु....

एक होऊनी गाऊया
धुंद होऊनी नाचूया
गोंगाट मस्ती कल्ला दंगा
चला करुया धामल हो

हम मैं है हीरो (2)
हम मैं हैं हीरो .. ओ ओ ओ ओ ...
हम हीं हैं हीरो.... आम्ही तर हीरो....

-सात्यजित

हे गाणं वाचण्यापेक्षा ऐकण्यात जास्त धमाल येईल. हे गाणं इथे ऐकता येईल


किंवा ईथे क्लिक करा

मी काही गायक नाही, तेंव्हा एका दमात गाणं म्हणताना माझी बरीच दमछाक झाली. मी प्रथमच ध्वनीरूपात सादर करतोय, त्यामुळे चुकांबद्द्ल क्षमस्व.

बच्चापार्टी तुम्हाला. हे गाणं कसं वाटल नक्की कळवा...

Friday, July 8, 2011

ग्लोबल वॉर्मींग ड्रावं-ड्रांव... ड्रूक... ( बालकविता )

एक बेडु़क होता करत ड्रांव ड्रावं
"बेडुक दादा असं काय करताय रावं?"

'पाऊस नाही आला, आलाय मला राग
जरा गाऊन बघतो, मी मेघ-मल्हार राग'

"अरे बेडुक दादा, असा चिडुन नको गाऊस
नाहीतर येणार नाही, कधीच पाऊस"

'ढग नाही, वारा नाही, पाऊस पडत नाही
तुमच्या घरी नळ आहे तुमच अडत नाही'

'अरे..
बघ जरा टीव्ही लाऊन, काही बातमी देतात काय?
मासा काल म्हणत होता ग्लोबल वॉर्मींग हाय'

'ग्लोबल वॉर्मींग, ग्लोबल वॉर्मींग....ग्लोबल वॉर्मींग
आता हे आणि काय?'
"अरे दादा, आभाळातला एसी बंद पडला हाय"

"म्हणुन बाबांनी नवा बसवुन घेतलाय एसी"
'पुन्हा तुम्ही तुमचं बघा, आमची ऐशी-तैशी'

"मग काय करू? सांगतो, एसी लाऊ नका"
' नको, आम्ही प्राणि कुणा त्रास देतो का?"

'येवढच एक निरोप जाउन बाबांना तू सांग
सगळ्या प्राण्यांची, आमची येवढीच आहे मांग

तळ्या मधे, नदी मधे टाकू नका कचरा
सगळ्या सांड पाण्याचा नीट करा निचरा

प्लास्टीकच्या पिशव्या तुम्ही वापरु नका
उघड्यावरती कचरा कधीच टाकू नका'

"आत्ताच जाउन सांगतो तुझा निरोप
पण बेडुक दादा तू रागावू नकोस"

पुन्हा बेडु़क करू लागला ड्रांव.. ड्रावं...
"आता काय झालं? असं काय करताय रावं?"

"अरे,खुप आनंद झाला म्हणुन गातो आहे गाणं
वेड्या सारखे वागतात मोठे, एक बाळ शहाणं'
आहे एक बाळ शहाणं...
निरोप सांगणार ना रे बाळांन्नो..? :) '

ड्रांव, ड्रावं, ड्रांव ड्रावं-ड्रांव ड्रावं-ड्रांव... ड्रूक..
ड्रांव, ड्रावं, ड्रांव ड्रावं-ड्रांव ड्रावं-ड्रांव... ड्रूक...

-सत्यजित.

Friday, March 4, 2011

टीक टीक, टीक टीक... कीट कीट, कीट कीट...

आई बाबांचं घड्याळ झालंय
टीक टीक, टीक टीक, टीक टीक
क्षणा क्षणाला चालली असते
कीट कीट, कीट कीट, कीट कीट

वाजले सात, चालवा हात
वाजले आठ, गृहपाठ
सहाला उठून शाळेत जायचं
सातच्या आत घरात यायचं

वाजणार म्हणुन आईचा गजर
वाजले म्हणुन बाबांचा गजर
कशाला हवाय घड्याळाला गजर
गजरा आधी हेच हजर

घड्याळ तेवढं चालत असतं
घड्याळा शिवाय चालत नाही
वेळे आधी, वेळे नंतर
काही सुद्धा मिळंत नाही

चंद्रावरती देखिल मजला
दिसतात दोन काटे
सूर्याचे देखिल केलेत ह्यांनी
मोजुन बारा वाटे

इतक्याच वाजता सुर्योदय
इतक्याच वाजता चंद्रोदय
मागे पुढे झालं तर
त्यांची देखिल नाही गय

जगणं म्हणजे सारखं
घड्याळ पहात राहणं
जगणं म्हणजे क्षणांचा
हिशोब घालत रहाणं

Success Is Life बेटा
Success म्हणजे खेळ नाही
Time is Money बेटा
घालवायला वेळ नाही

माझ्याशी बोलावं तर
वेळ फुकट जातो?
माझा वेळ जावा म्हणुन
खेळणी विकत घेतो

खेळणी नकोयत मला
आता पैसे हवे आहेत
आईबांबांचे थोडे क्षण
विकत घ्यायचे आहेत

माझ्यासाठी पैसे नको
थोडे क्षण इनवेस्ट करा
जीवना पुढे धावणारं
घड्याळ अ‍ॅडजेस्ट करा...

प्लिज तेवढं... तुमचं घड्याळ अ‍ॅडजेस्ट करा...

टीक टीक, टीक टीक... कीट कीट, कीट कीट...
टीक टीक, टीक टीक... कीट कीट, कीट कीट...

-सत्यजित.

Monday, December 13, 2010

भुर्र ...जायचय

माझ्याकडे आहे डॉल
निळे डोळे गोरे गाल

दुदू काही पित नाही
पप्पी कुणा देत नाही

आडवं करता झोपते
अंगठा सारखा चोखते

माझ्या मागे मागे करते
फिरायला ने मला म्हणते

बाहुली लागली रडायला
तिला जायचय फिरायला

मला देखिल रडू येतय
सांगा कोण फिरायला नेतय?

-सत्यजित.

Monday, July 19, 2010

गोळा गोळा ..सुर्र सुर्र (बालकविता)

थंड थंड बर्फाला
किस किस किसला
किस किस किसता
खस खस हसला

पाण्यासारखा बर्फ झाला
गोरा गोरा पान
गोळेवाला त्याचा आता
मेकअप करणार छान

सुर्र... सुर्र....

सुर्र... भुरका मारत
मस्त गोळा खाऊ
रंगलेली जिभ मग
आरशात पाहू

-सत्यजित.

(Satyajit Malavde)

Monday, July 27, 2009

प्राण्यांचं सा रे ग म (बालकविता)

एकदा जंगलात प्राण्यांनी ठेवलं सा रे ग म
गाणी गात बसले सगळे सोडुन आपली कामं

पहीला राउंड होता पाळीव प्राण्यांचा
मनीला दिला चान्स पहिला गाण्याचा
मनी गायली मन लाउन म्यॅवं म्यॅवं म्यॅवं...
जज म्हणाले बंद करा हीची ट्यॅंव ट्यॅवं...
मनी खुप चिडली म्हणाली , मला माणसं म्हणतात 'मनी'
पहीला आहे 'म' बरं का? आणि दुसरा आहे 'नी'

नंतर आला कुत्रा, भाँव भाँव.. भूंSSSS....
करत लावली वरची तान
जज म्हणाले मित्रा किती गातोस रे छान..

नंतर गाढव गायलं करत हॅहूंS हॅहूंSS हॅहूंSS...
जज म्हणाले "गाढवा, हे काय गातोस तू?"
अहो.. हिंदी मध्ये मिळाला मला वरचा 'ग' आणि 'धा'
म्हणुन तर हींदी मध्ये मला सगळे म्हणतात 'गधा'

नंतर आला राऊंड जंगली प्राण्यांचा
वाघोबाचा डाव होता प्राणी खाण्याचा

पहीलं गाणं गायला आला एक जिराफ
येवढ्या वरती माईक ओढला झाला तो खराब
मग माईक न घेताच गायला आला एक हत्ती
सोंड वर करुन जोरात गायला तो कित्ती.... हॅऋंSSSS....

लाजत मुरडत मुरके घेत, होतं हरण गात
जज म्हणाले तुझ गाणं साजुक वरण भात

सिंह महाराज आले म्हणाले "दे पट्टी, चार काळी"
सगळे हसताच चिडुन त्यांनी फोडली रे डरकाळी

डरकाळी ऐकताच सगळ्या प्राण्यांनी ठोकली धुम
गाणंबीणं काहीच नाही, झाली सगळीच सामसुम.... झाली सगळीच सामसुम....

शूंSSSS..... इतना सन्नाट क्यूं है भाई?

आहे ना, आयडीया सारेगम?

-सत्यजित.

Sunday, July 5, 2009

बडबड गित

एक मणी दोन मणी
मण्यांवरती ओवले मणी

मण्यांची झाली माळ
चिउला झालं बाळ

माळ दिली बाळाला
चोर घेउन पळाला

मग आले पोलिस
चोर लपला खोलित

खोली मध्ये नव्हतं कोणी
खोली मध्ये होती गोणी

गोणी मध्ये होतं झुरळं
चड्डी मध्ये शिरलं सरळं

चोराने झुरळाला मारलं
पोलिसांनी त्याला धरलं..

-सत्यजित

फाजिल लाड ( बालकविता )

मुर्खाचा घोडा
पायी सोन्याचा तोडा

तोडा होता जड
घोडा चालेना धड

मालकाला खटके
तो मारी त्याला फटके

सोन्याने मढविलं
चाबकाने बडविलं

काढुन घेतला तोडा
आणला नविन घोडा

तोडा होता जड
पुन्हा तिच रडरड...

-सत्यजित

चतुर कावळा (बालकविता)

एक होता कावळा
मुळीच नव्हता बावळा

कावळ्याला लागली तहान
मडके होते लहान

मडक्यात पाणी थोडे
कावळ्याने टाकले खडे

पाणी आले वरवर
कावळ्याने पिले भरभर

-सत्यजित.

Tuesday, June 23, 2009

शिवाजी महाराज की जय!!! (बालपोवाडा)

टप, टप, टप, टप चाले
घोडा शिवाजी राजांचा
शिवबांनी पार उडविला
धुव्वा रे मुघलांचा

बाळकडु स्वभिमानाचे
जिजा बाळ शिवाला पाजे
आईच्या गर्भात नसते
कुणीच कुठले राजे

स्वराज्य स्थापना करीन म्हणाला...
धरिली रायेश्वरावर रक्ताची धार
वय कोवळे ते हुंदडण्याचे
चौदा,पंधरा फार तर फार

मावळ्यांची फौज बनवली
हे वंशज प्रभू रामाचे
देश, देव अन धर्म रक्षिण्या
ठाकले उभे शिवाजी राजे

ते वाघांचे बछडे होते
अन एक सिंहाचा छावा
बलाढ्य शत्रूला नमविण्या
रचिला गनिमी कावा

रक्षण दिन दुबळ्यांचे
वर्तन माणुसकीला साजे
शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ
सांगती शिवाजी राजे

हर हर महादेव!!!

सत्यजित.

पोळपाट आणि लाटणं (बालकविता)

लाटणं म्हणाल पोळपाटाला
कशास रे तुझी इतकी मिजास?
रोज रोज पोळ्या लाटुन
मीच का करावी तुला मसाज?

पोळपाट म्हणालं..
तुला लाटता यावं म्हणून
मी उपडा पडुन रहातो
पोळी नाही, तवा नाही,
मी तर जमिन पहात रहातो

लाटण्याला कळालं त्याच
चुकीचं होतं वागणं
कधीच नाही भांडत म्हणून
पोळपाट आणि लाटणं

-सत्यजित

Thursday, March 26, 2009

मी परी...(बालकविता)

परी गं परी तू आहेस का खरी?
कधी तरी येशील का माझ्या पण घरी?

येशील का सांग तू माझ्या बर्थडेला?
करशील का सांग तू मला सिंड्रेला?

चमचमता ड्रेस अन काचेचे बूट
जादूच्या कांडीने खेळण्यांची लूट

असंच एकदा रात्री, काय गंमत झाली
एक छोटीशी परी घरी माझ्या आली

पंख लाउन म्हणाली, चल पर्‍यांच्या देशात
मीही परी झाले छान परीच्या वेशात

केवढा मोठ्ठा सी-सॉ होता मस्त चंद्राचा
सी-सॉचा रथ होता पांढर्‍या शुभ्र उंदरांचा



उंदरांना घातले होते मऊ ढगांचे बूट
रथवान घालुन होता पांढरा सुंदर सूट

रथातुन निघालो परी राणीला भेटायला
हळुच लगाम देता लागला उंदीर उडायला

छोट्या छोट्या पर्‍यांची सुंदर सुंदर घरं
ते जादुच गाव होतं, पण होतं खरंखुरं!

खुदूखुदू हसत होतं झुळुझुळू पाणी
पानं फुलं गात होती सुंदर सुंदर गाणी

प्राणि होते उडत, नी झाडे होती चालतं
फुल, पक्षी, दगड, माती सगळेच होते बोलतं !!

बडबडणार्‍या वस्तूंची चालली होती सहल
सगळे पहायला चालले होते राणीचा महल

राणीचा महल होता दुर ढगांच्या पार
राणीचा महल होता सुंदर फार फार

गोळ्या, केक, आईसक्रीम खुप होता खाउ
चला लवकर लवकर परीराणीला पाहू

राणीला बघायला सगळ्याचीच घाई
राणी तर दिसत होती एकदम माझी आई (?)

राणी म्हणाली "चल उठं बघु आता"... ?
आई म्हणाली "चलं उठ बघु आता"
"येईन पुन्हा" म्हणाली परी जाता जाता

घाई घाईत गेली परी माझे पंख विसरुन
मीही उडू शकत होते माझे हात पसरुन

आईनी आणला होता तोच परीचा ड्रेस
(म्हणाली)आधी खाउ खाउन घे मग नंतर नेस

खर्‍या परी राणीची आत्ता भेट झाली
तरी म्हंटल परी कशी पंख विसरुन गेली...!!!

-सत्यजित.

Tuesday, February 17, 2009

हनुमॅन माझा मित्र...(बालगीत)



सुपरमॅनला स्पाईडरमॅनला नाही अनुमान
सर्वात शक्तीशाली आहे माझा हनुमान

सुपरमॅनला दिली जर त्यानी एक फाईट
चड्डी वरची चड्डी पण होउन जाईल टाईट

स्पाईडरमॅनच्या छातीतुन निघेल एक कोळी
एकच फाइट देता घेईल जुलाबाची गोळी

एक उडी घेउन जातो साता समुद्राच्या पार
डोंगर उचलू शकतो त्याला शक्ती आहे फार

एकटाच गेला उडून नी लंका आला जाळून
रावण गेला घाबरुन, सगळे राक्षस गेले पळून

भक्ती त्याची शक्ती, नी भक्तीच त्याचं काम
छाती फाडुन दाखवेल तो अंतरातले राम

बोलो सियावर रामचंद्र की जय !!
बोलो हनुमान की जय.. !!

संकट येता कुठलेही तो करतो माझी रक्षा
मी सकाळ संध्याकाळी म्हणतो रोज रामरक्षा

मी दर शनिवारी म्हणतो मारुतीचं स्तोत्र
हनुमान झाला आहे खरंच माझा मित्र...

बोलो बंजरंग बली की जय !!!
बोलो हमुमान की जय.. !!!

-सत्यजित.

Wednesday, January 28, 2009

अशी असावी माझी शाळा ...(बालकविता)

अशी असावी माझी शाळा यावा न मजला कंटाळा
समुद्र तळाशी वर्ग भरावेत मधली-सुट्टी आभाळा

पुस्तक वाचे धडे धडाधड
गोष्टी सांगे छानच छान
प्रष्णच देती उत्तरे भराभर
पेनच काढे अक्षर छान

मिक्की डोनाल्ड शिक्षक अमुचे,
कार्टून नेटवर्कचा फळा
(अशी असावी माझी शाळा..)

टाईम मशीनमध्ये बसुनी
इतिहासात मारु चक्कर
शिवबांचा आदर्श घेवुनी
य्ये.. शत्रूला देउ टक्कर

ग्रह-तार्‍यांचा भुगोल शिकण्या
रॉकेट नेईल अंतराळा
(अशी असावी माझी शाळा..)

देणे घेणे काहीच नाही
मग गणिताचे काय रे काम?
पाढ्यांचे झुले बांधुनी
झोके घ्यावे लांबच लांब

न गुणिले, उरले, हातचे, बाकी
न भाग भागिल्यांचा चाळा
(अशी असावी माझी शाळा..)

येथे नसतिल तास कुठले
नसतिल तासांच्या वेळा
नंतर करुया आभ्यास सगळा
आधी नाचा नी खेळा

कधी नसावी सुट्टी मजला
न कधीच यावा उन्हाळा
अशी असावी माझी शाळा यावा न मजला कंटाळा...!!!

-सत्यजित.

Tuesday, November 25, 2008

बप्पा तुला पेंटींगला केवढा मोठ्ठा पेपर (बालकविता)

मायबोली.कॉमच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली ही बालकविता.
बप्पा तुला पेंटींगला केवढा मोठ्ठा पेपर
सका्ळी संध्याकाळी वेगवेगळे वेगळे कलर

बप्पा तुझ्या पेंटींग मध्ये ढग कीती छान
दडुन बसला सुर्य बघतो हळुच काढुन मान

अरे!डोंगराच्या पेंटींगवर पाखरांचे थवे
रोज कसे देतोस सांग आकार नवे नवे

शुभ्र ढगां देतोस का पावसाळ्यात टांग
विजे साठी वापरलास रंग कुठला सांग

पावसाच्या पेंटींगवर थेंब खरे खरे
सप्तरंगी धनुष्य काढलेस कसे बरे?

रात्री तुझ्या डब्यातले रंग संपतात का रे
काळ्या पांढर्‍या रंगानीच रंगवतोस का सारे

पट्टी, कंपास शिवाय कसं जमत तुला रे?
उन्हाळ्याच्या सुट्टीत माझी ट्युशन घेशील का रे?

बप्पा तुला पेंटींगला केवढा मोठ्ठा पेपर
सकाळ संध्याकाळी वेगळे वेगळे कलर...

सत्यजित.

Tuesday, September 16, 2008

आई... हळुहळू हळुहळू सुर्य कुठे गेला? (बालकविता)

आई... हळुहळू हळुहळू सुर्य कुठे गेला?
जाता जाता सांग त्याने प्रकाश का नेला?

ठेवुन जा प्रकाश म्हणाले मी त्याला जाताना
नाही म्हणाला उद्या आणिन सोबत पुन्हा येताना
अंधाराची भीती सांग वाटते का त्याला?
आई, अंधाराची भीती सांग वाटते का त्याला?...

थांब म्हणाले थोडा वेळ येतिल चांदण्या आकाशात
त्या म्हणाला येणार नाहीत येवढ्या माझ्या प्रकाशात
खरच सांग चांदण्या का घाबरतात त्याला? आई...

ऐकत नाहीस माझं काहीच आहेस किती हट्टी रे
चांदोबाशी सांग कशाला घेतलिस उगा कट्टी रे
चांदोबाशी बट्टी घ्यायला सांग ना तू त्याला.. आई...

थांब म्हटलं थोडा वेळ मिळुन सारे खेळू खेळ
जायला हव म्हणाला आता घालवुन चालणार नाही वेळ
संध्याकाळीची सांग त्याला असते का शाळा? आई...

-सत्यजित

Thursday, September 4, 2008

बप्पा दे गोड चॉकलेट सारखं सुखं....

बप्पा तू करतोस खरच आयडीया किती मस्त
येवढ्या सगळ्यां गोंगाटात बसतोस कसा स्वस्थ?

आम्ही काही मागता टिचर आमच्यावर ओरडतात
वन बाय वन म्हणतं, सगळ्यांना रांगेत उभे करतात

हं... तरीच तुझे सुपा येवढे मोठ्ठे मोठ्ठे कान
एकदम सगळ्यांच एकुन घेतोस देवा तू महान

कशी मस्त आईडिया तुझी, तुला केवढी मोठ्ठी सोंड
कानात गंम्मत सांगायला, न्यायला नको जवळ तोंड

लाल लाल शेला छान, पिवळं धोतर आहेस नेसलस,
अरे वाजेल ना थंडी तुला, तू शर्ट का नाही घातलस?

आजींनी विणलं स्वेटर त्यावर मस्त जॅकेटचा ड्रेस
देतो नविन जिन्स पँट वाटल्यास त्यावर धोतर नेस

किती घातलेस दागिने आणि किती घातलेस हार?
सगळ्यात दुर्वा नी जास्वंद, तुला आवडत ना फार

कुठे मोदकांच ताट, कुठे शि-याचा टोप
काहीच न खाता तुझं वाढलं कसं पोट?

आई सारखंच तुझही मी खाता का पोट भरतं?
आइच म्हणते तुझ्या चरणी सर्वाच दु:ख हरत

बप्पा मला सांग जरा हे दु:ख काय असतं
कान, नाक, गुढगा, पोट नक्की काय दुखतं?

काहीच नको दुखायला, कुणा देउ नकोस दु:ख
शहाणा कर सगळ्यांना, दे चॉकलेट सारखं सुखं

बप्पा दे गोड चॉकलेट सारखं सुखं....

-सत्यजित.

Monday, August 25, 2008

किरकिर... कुरकुर... (बाल कविता)

एकदा सगळ्या कीड्यांची रानात भरली सभा
गवतामध्ये पाना मागे धरुन बसले दबा

आला तिकडुन भुंगा त्यानी केला खुप दंगा
चाविन कडकडुन म्हणाला जर घ्याल कुणी पंगा

तिकडुन आली मुंगी हलवत तिची ढुंगी
मुंगळा म्हणाला नाच तिला मी वाजवितो पुंगी

इतक्यात उड्या मारत कोठुन आला नाकतोडा
अंधाराला घाबरलेला वाटत होता थोडा

अंधारात काजवा मात्र मिरवत होता ऐट
लुकलुक हींडत होता ठेउन चड्डीत लाईट

रातकीडा म्हणाला.. मित्रांनो! चला देउया का नारे ?
किरकिर किरकिर कुरकुर कुरकुर ओरडुया रे सारे !

किरकिर किरकिर कुरकुर कुरकुर ओरडुया रे सारे..

किरकिर किरकिर... कुरकुर कुरकुर...
किरकिर किरकिर... कुरकुर कुरकुर...

काट्यानां लाउन जेल शाईन मारतय सुरवंट
झूरळ जाउन कोपर्‍यात खात बसलय सुंठ

गोगलगाय म्हणाली, मित्रांनो मी येउन करणार काय?
तुम्हा सगळ्यांना सहा पाय पण मला एक पण नाय

तुम्ही सगळे जाल पळुन नी कोणी जाईला उडुन
मला सोडुन जात म्हणाल तू बस तुझ्या शंखात दडुन

फुलांचा लागलाय सेल फुलपाखारांना नाही मुळीच वेळ
आणि माशी, मच्छर खाता बसलेत रस्त्यावरची उघडी भेळ

बाकी सगळे किडे इकडुन तिकडुन पळतायत
किटकनाशके मारुन मारुन... ही माणस त्यांना छळतायत... वात आणला आहे ह्या माणसांनी....

निषेद नोंदवा जाहीर सभा... किरकीर.. कुरकूर....


-सत्यजित.

Wednesday, August 20, 2008

दे मला माझी आई...

अगदी परवा बॅंगलोरच्या टाईमस मध्ये बातमी वाचली."आता ह्यांच कोण?" एका दांपत्याचा अपघाती मृत्यू, सिग्नल वर दुचाकीवर उभे असता मागुन आलेल्या अर्थमुव्हर धडक दिली दोघे जागिच मरण पावले. त्यांना दोन लहान मुलं, एक ३ आणि दुसरा ५ वर्षाचा असवा कदाचीत. रोज कामासाठी बाहेर पडलेले आईबाबा घरी परत आलेच नाहीत. बिचा-या बाळाना हे पण माहीत नव्हत की काय झालं आहे. म्हणे घरी जमलेल्या गर्दीत आईला शोधत होती, आईला हाका मारत होती. ते चित्र डोळ्या समोरुन काही केल्या जात नाही. हे अस का होत? हा विचारच माझ्या सहन करण्या पलिकडचा आहे, देव(?) किंवा दैव अस का करत?

काही नको मज देवबप्पा
मी काही मागणार नाही
शहाण्या सारखा वागेन मी
मज देशिल का रे आई?
नसते आता अंगाई
न केसातुन फिरणारा हात
पाठीवरती थोपटणारा
तिचा निरंतर हात
मज अंधाराची भीती वाटते
वाटते भीती एकांताची
मिणमिणणार्‍या प्रकाशातल्या
मोठाल्या सावल्यांची
येता संकट कोणतेही
आईला बिलगत होतो
तिचा हातातुन सुटता हात
मी कीती बर दचकत होतो
आई आई हाक मारता
मजला उचलून घेई आई
तू जाना तुझ्या आईकडे
दे मला माझी आई...

-सत्यजित

Thursday, August 7, 2008

माझ्या चिऊच बाळं....(बालकविता)

चिऊताई चिऊताई गातेस का गं गाणे
एक उडी, दोन उडी, टिपत जाते दाणे

चिऊ चिऊ खिडकीतून टकामका पाही
हळुच येशी घरात पहता कुणी नाही
मला पाहता तुझी कशी धांदल उडते
इकडे उडत, तिकडे उडत, बाहेर पळते

कुठुन आणलस गवत? नी कुठुन आणलास चारा?
अरे देवा! कपाटावर मांडलास किती हा पसारा
अस करु नको बाई, तुला आई गं रागवेल
सांगतो तिला तुझ्यासाठी बेड ती मागवेल

ह..म.. इवल्या इवल्या बाळाला मऊ बेड हवा
कपाटवर झोपेल खात फॅनची मस्त हवा
मऊ मऊ पिसांवर लोळत बसत छान
मला बोलवत असत काढुन बाहेर मान

दाणे हवे तुला? का हव तुला पाणी?
आता घेउन खाउ, आई येईल, गं राणी
चिऊ चिऊ करत बाळ कीत्ती कीत्ती रडे
चिऊ चिऊ बाळाला हवे होते कीडे

चिऊ चिऊ करत बाळ केवढं मोठ्ठ झालं
चिऊ चिऊ करत बाळ आभाळात उडालं
चिऊ चिऊ बाळ गातं, चिऊ चिऊ गाणे
एक उडी, दोन उडी, टिपत जातं दाणे

एक उडी, दोन उडी, टिपत जातं दाणे.... सत्यजित.