Monday, July 19, 2010

जिवनसखा... पाउस..

पावसाची नी माझी मैत्री झाली दाट
हाती दिला पावसाने थेंबांचा हात
असा कसा मित्र तू? आत्ता सुकून जाशील
वार्‍यावरती झूलताना दिशा चुकून जाशील

मी सुकून जात नाही मित्रा! झिरपत जातो खोल
वरवरचा ओलावा, ती मैत्रीच असते फोल

नदी, नाले, ओढे, झरा तो सतत वहात राहतो
मैत्रीचा अंथांग समुद्र मी किनार्‍यावरुन पहातो
मी चालत जातो ओल्या वाळूत, पाय खोल रुततात
धावत येतात लाटा आणि खळखळून हसतात
मीही खळखळून हसतो, ओंजळीत घेतो त्याला
माझ्या वाचुन वाळला नाहीस? उगाच दाटवतो त्याला

तो म्हणतो वाळणं माझ्या नशिबी नाही
पण कीत्ती खारावलोय बघ...
आभाळ भरुन आलय इतका भारावलोय बघ

मी पुन्हा हात पसरतो, तो थेंबांचा देतो हात
पाउस झिरपत झिरपत, बरसत रहातो आतल्या आत...

माझा जिवनसखा.... पाउस..

-सत्यजित.

गोळा गोळा ..सुर्र सुर्र (बालकविता)

थंड थंड बर्फाला
किस किस किसला
किस किस किसता
खस खस हसला

पाण्यासारखा बर्फ झाला
गोरा गोरा पान
गोळेवाला त्याचा आता
मेकअप करणार छान

सुर्र... सुर्र....

सुर्र... भुरका मारत
मस्त गोळा खाऊ
रंगलेली जिभ मग
आरशात पाहू

-सत्यजित.

(Satyajit Malavde)

जिवन

माणसाच्या खरतर दोनच गरजा, आधी शारिरीक आणि मग मानसिक. तशा माणसाला व्याधीही दोनच शारिरीक आणि मानसिक. जिवनातला फोलपणा कळल्यावर देखिल जिवनाबद्दल तत्वज्ञान सांगणार्‍या संतांना तरी काय म्हणवं? त्यांना जिवन खरच कळलं असतं की नाही कुणास ठाउक? ना आगा, ना पिछा. जावं गप-गुमान जंगलात, हिमालयात रहावं. स्वतःचा काय नी दुसर्‍याचा काय, संसार तो संसारच, आणि संसार म्हंटला की गुरफटण आलच. पण काही संत मात्र समाधी घेतात तर काही संत लोक कल्याणाचा वसा उचलतात. हे तर तसच आहे ना, तुला माझं पटणार नाही "मी घर सोडुन गेलेला बरा" तर दुसरा म्हणतो "तुला माझं पटो न पटो, तुझ्या समजण्याच्या पलिकडे आहे सगळं". थोडक्यात काय तर, जिवनाच्या फोलपणातही फोलपणा आहेच. पण एक मात्र खरं प्रत्येकाला आपला व्हूव पॉइंट आहे, इथे निरर्थक असं काहीच नाही, एक जिवन सोडलतर... प्रजनन ह्या निव्वळ धेय्याला कीती फाटे फोडलेत आपण.

-सत्यजित.

भयभीत सावल्या

तू शांत समई सारखी तेवत असलिस
तरी भींतीवरच्या सावल्यां सतावतात
तुझ्या तेजा पेक्षा तुझ जळणं जाणवत राहतं
शेवटच्या धुराचा दर्प दरवळे पर्यंत
कोणाला कळणारही की तू जळत होतीस
"तेजासाठी कुणाच तरी जळणं अपरीहार्यच"
हे तुझ तत्वज्ञान मला कधीच पटलं नाही
प्रत्येकवेळी माझ्या विचाराना मुर्खात काढत तू म्हणतेस...
सावल्यांच अस्तित्वचमुळी ज्योतीने असतं
सावल्यांच तरी काय? आपलाच आभासतात त्या
जे दुसर्‍याला जाळतं ते जळणं आणि
जे दुसर्‍याला प्रकाशमान करत ते उजळणं
ज्योत कधीच जळत नही ती फक्त उजळतं असते
आता डोळे मिट आणि म्हण "तमसो मा ज्योतिर्गमय"

-सत्यजित.