Showing posts with label दिल से.... Show all posts
Showing posts with label दिल से.... Show all posts

Wednesday, March 14, 2012

कागदाची चिता

माझी पत्र अजुन का
ठेवली असशील जपून
तुझा चेहरा बोलका होता
कुठवर ठेवशील लपून

कगदाचं काय येवढं
आठवणींच लख्तरं होईल
शाई उडुन जाता जाता
तिच देखिल अत्तर होईल

जर ठेवायची असतील जपुन
तर उत्तरांची तयारी कर
माझ्या पर्यंत प्रश्न पोहचतील
येवढं आत्ताच गृहीत धर

बघ त्या पत्रांतून मला
वगळता येतं का?
त्या पत्रांची चिता रचून
मला जाळता येतं का?

तुझ्या हातानी पाणी नाही
पण अग्नी तरी मिळेल
प्रत्येक पत्र जळताना
तुझे अशृ पाहून उजळेल.

-सत्यजित.

Sunday, February 5, 2012

फुले कागदी दरवळती

तू माळल्या गजर्‍यातल्या
दोन कळ्या सांडल्या
मी द्याव्या तुला म्हंटल तर
त्याही खुळ्या भांडल्या

प्लिज नको ना देऊस
आम्हा तिथे मोल नाही
पण तुम्ही फुलाल इथे
तितकी इथे ओल नाही

हिरमुसल्या बिचार्‍या
मग मलाही मन मोडवेना
निष्पर्ण वहीच्या पानात फुललं
मलाही फूल तोडवेना

जुन्या वहीच्या पानात
अजुनही गंध दरवळतो
घमघमता वेणीतला गजरा
निष्पर्ण वहीवर जळफळतो

ह्या वहीच्या पानांची
सुंदर फुले करीन म्हणतो
"कागदी फुलं गंधहीन"
सांगा असं कोण म्हणतो?

-सत्यजित.

Saturday, November 26, 2011

तुझे नी माझे नाते अनामिक

मायबोलीच्या २०११ च्या दिवाळी अंकाचा विषय होता, "नाते संबंध" आणि मित्रांच्या आग्रहा खातर काही तरी सुचतय का बघु म्हणून आचानक एक नातं मनात आलं.
नातं जे सर्वात पवित्र तरीही खुप नाजुक, जे अनेकांना कळालच नाही, अगदी संत महंत देखिल हे नातं समजवून सांगताना भरकटलेले दिसले. असं हे नातं म्हणजे मैत्रीच, नुसतं मैत्रीच नाही तर स्त्री आणि पुरुष यांच्यातिल मैत्रीच. काही करंटे तर असंही म्हणतात की स्त्री आणि पुरुषात निखळ मैत्री असुच शकत नाही. असं म्हणणार्‍याच्या लक्षातही येत नाही की तेही ह्याच नात्याची नकळत पुजा करतात. ह्याच मैत्रीच्या प्रतिक म्हणजेच "राधा-कृष्णा". आधी राधा मग कृष्ण...जे नातं मंदिरात पुजलं जातं ते निखळ आणि पवित्र असल्या शिवाय का?

कृष्ण समजायला जेवढा कठीण तेवढंच हे नातं सुद्धा. श्री कृष्णाच्या म्हणे सोळा सहस्त्र बायका होत्या पण देवळात मात्र हा राधे सोबत. काही लोक राधेला श्री कृष्णाची पत्नी मानतात (हींदी विकी वर कुणा महाभागाने ते तसं लिहील आहे) तर काही म्हणतात की ती त्याची प्रेयसी होती. राधा ही एक विवाहीत स्त्री होती आणि कान्हा हा तिच्या पेक्षा वयाने खुप लहान होता. ती कृष्णाची ना प्रेयसी होती ना पत्नी होती, ती होती त्याची प्राण प्रिय मैत्रीण, जिवश्य कंठश्य सखी.

स्त्री-पुरुषातली ही निखळ मैत्री काही लोकांना कळत नाही, कारण त्यांनी अयुष्यात निखळ मैत्री कधी केलीच नाही, आणि मैत्री केली नाही म्हणजेच त्यांनी कधी निस्सीम प्रेमही केलं नाही.

राधा-कृष्णतल नातं म्हणजे निखळ मैत्रीच नातं, एकमेकां वरील प्रेमाचं नातं, एकमेकां वरील विश्वासाच नातं, एकमेकां वरच्या भक्तीच नातं, जितकं जवळच असुन तितकच अंतर ठेवणारं हे नातं... हे नातं जितकं सोप तितकच अवघड.
मी जेंव्हा जेंव्हा राधेकृष्णाच्या नात्याला प्रियकर आणि प्रेयसीचं रुप दिलेल पाहतो तेंव्हा तेंव्हा मला ओरडुन सांगावस वाटतं की ह्या नात्याच्या असा अपमान करु नका, कृष्ण-राधेला असं कलंकीत करु नका. "मैत्री" अलौकीक आहे, मैत्री अनमोल आहे, पवित्र आहे, त्याचा असा विपर्यास करू नका...

कविता पुर्ण झाली... नावही दिलं आणि माझंच माझ्या लक्षात आलं की मैत्रीच नातंच मुळी अनामिक असतं. हे पाण्या सारखं असतं, कुठल्याही नात्याच रुप घेणारं, कुठला ही आकार घेणारं, सगळ्यांना आपल्यात सामावुन घेणारं. जेंव्हा पाणी वाहत तेंव्हा ती असते "धारा" आणि ते जेंव्हा स्थिर होतं तेंव्हा ती होते "राधा", स्थिर आणि अचल, मैत्री सारखी. आपलीच कविता आपल्याच विचारांना नव रुप देउन जाते, राधा होऊन जाते...
 राधेच हे मनोगत, माझ्या मैत्रीच मनोगत आहे...

पुसते जग हे मला
नाते अपुले कोणते
न बोलले कुणी जरी
प्रश्न नयनी जाणते

ओढ लागते मना
ऐकू येता पावरी
श्वास हे दुणावती
नजर होई बावरी

तुझाच रंग घेऊनी
कुणी आभाळ रंगले
तू तमास स्पर्शता
नभ चांदण्यांनी शिंपले

आसमंती तूच रे
आत्मछंदी तूच रे
अंतरंगी तूच रे
मर्मबंधी तूच रे

गोपिकांचे प्रेम हे
श्याम रास खेळतो
आर्जवास राधेच्या
चक्रधारी भाळतो

ऐकू येते स्पंदनी
साद घालती वेणू
मी अशी गं नाचते
न पाहते कुणी जणू

नाते हे निष्पाप रे
का कुणी न जाणते?
ह्या जगाच्या नीतीला
नाव द्यावे कोणते?

नाव देता नात्याला
बंधनात बंधते
नाते अनामिक हे
नात्यांची वेस लांघते

- सत्यजित.

जरुर वाचा मायबोली दिवाळी अंक : http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2011/index.html

Monday, March 14, 2011

थोडासा बादल, थोडासा पानी, और इक कहानी...

तेच ठिकाण, तीच टेकडी... तो कधीचा तिथे पोहचला आहे, आणि तिला, उशीर झाला आहे. ती निघाली आहे... सारखा फोन, तिचं नक्की येण्याच वचन...आणि दाटून आलेला पाउस.

रंग उधळती संध्याकाळ, सोसाट्याचा वारा, पावसाची चाहुल, मिलनाची ओढ आणि चलबिचल मन... अजुन काय लागतं कविता सुचायला? ही ओळचं एक कविता आहे.
पण आता पाउस आला तर ती कशी येणार? ती येईल नक्की येईल, पण भिजेल ना ती.. इतकी कोमल, इतकी सुंदर... आणि तिला इतका त्रास? आणि इतका त्रास, कुणासाठी? फक्त माझ्यासाठी ...
प्लिज.... प्लिज... प्लिज... हे घनांनो आता बरसू नका, थोडा वेळ थांबा... तिला एकदा इथे येउ देत मग काय थयथयाट घालायचा आहे तो घाला.. पण थोडा वेळ थांबा... तू जगाचा पाउस असशील पण माझा पाउस तर तीचं आहे... माझी सखी...

तो मनातल्या मनात घनांना विनवणी करतो आहे, आळवणी करतो आहे आणि तेवढ्यात पावसाचा एकच थेंब त्याच्या गालावर पडतो... असहाय्य...अस्वस्थ मनाला तेवढसं पुरे आहे.
विनवणीचे सुर रागत बदलतात... तो त्या घनांनाच दोष देतो की माझी इतकी सुंदर प्रेयसी बघुन तुमचाही तोल ढळला आहे.. म्हणूनच इतके अधीर होताय... शोभत नाही हे तुम्हाला...

इतका राग, इतकी अस्वस्थता पण पाउस म्हणजे "रोमांस".. ज्याला पावसात रोमँटीक वाटतं नाही त्याला प्रेम तरी कसं होईल? हा तर प्रेमवेडा आहे.. मगास पासुन गुणगुणत असलेल्या गाण्याचे सुर तसेच तरंगतायत त्याच्या मनात... तुमने इश्क का नाम सुना है... हमने इश्क किया है... इमली से खट्टा इश्क..इश्क.. ( वाह रे रेहमान...!!)
सुरांचं आणि काळजातल्या भावनांच मिलन झालं की कविता आपसूकच उमलते... आणि अशीच गुणगुणलेली ही कविता...

कॄष्ण घनांनो बरसू नका रे
सखीस माझ्या भिजवू नका रे

माझा येणार साजण... रिमझीम
पायातील पैंजण... रिमझीम
हातातील कंकण... रिमझीम
ओठातील गुणगुण... रिमझीम... ... ...

सर सर येते तुझीच रे सर
सलतील तिज हे थेंबांचे शर
स्व:तास इतके रिझवू नका रे ... सखीस माझ्या...

झोंबेल तिज हा शितल वारा
कोमल कांती निळा शहारा
स्व:तास इतके झुकवू नका रे... सखीस माझ्या

माझ्याहूनही तुलाच हुरहूर
आवर तुझीही आतूर भुरभूर
दिलाचे चोचले पुरवू नका रे... सखीस माझ्या

तिचा पदर ना थेंबाचे घर
तिचे अधर ना फुलांचे दल
उगाच स्वप्ने उजवू नका रे... सखीस माझ्या

रंग उधळते तुझे नभांगण
भुलेल तुज हा माझा साजण
भास मनात हा रुजवू नका रे ... सखीस माझ्या

-सत्यजित.

Sunday, March 13, 2011

पाकीजा

उमराव शोधाताय की शोधताय नरगिस
इथे पाकीजा शब्दच मुळी खोटा आहे,
वेड्यांन्नो हा फक्त कोठा आहे

उदरात काय पेक्षा पदरात काय
इथे फायद्याच्या सौद्यातही तोटा आहे
हा कोठा आहे हा कोठा आहे

चेहरा नाही ना मोहरा नाही
सारा बंद निनावि लखोटा आहे
हा कोठा आहे हा कोठा आहे

कायद्याचा देव, वायद्याचा देव
पुजलेला देव देखिल थोटा आहे
हा कोठा आहे हा कोठा आहे

न दिव्यात वात, ना मदतीचा हात
इथे पैसा फक्त मोठा आहे
हा कोठा आहे हा कोठा आहे

अंगाला रंग रंगाला अंग
अंगाचा संग वांझोटा आहे
काय शोधतोस खुळ्या हा कोठा आहे

-सत्यजित.

’येते हं’

अजुनही ह्रुदयात गोंदली आहे तुझी नी माझी पहीली भेट
बावरलेली नजर तुझी ह्रुदयात शिरली होती थेट
मनात दाटल्या भावनांच ओठी येता झाल गाणं
ह्रुदयानी छेडल्या सुरांच मनात असच तरळत रहाणं
वाटल होत तेंव्हा तुझे हात हाती घ्यावेत
वाटल होत तेंव्हा तुझे हात मुठीत घट्ट धरावेत
मग म्हंटल जाउ दे!
नाहीच भरल हातानी मन तर ह्रुदयानी काय करावे?
माझं ह्रुदय म्हणता म्हणता उनाड पाखरु झालं
तुझ्या भाळी आठ्या बघताच पुन्हा भानावर आल
आता तुझी नजरही जरा सावरली
मीही माझी स्वप्न आवरली
तू 'येते हं' म्हणताच माझी स्वप्न बावरली!
’येते हं’ या शब्दांनी सारं आकाश भरुन गेलं
’येते हं’ या शब्दांना आज उभं तप सरुन गेलं
तू ’येते हं’ म्हणुन पुन्हा कधीच आली नाहीस
तुझी नी माझी राहीली भेट पुन्हा कधीच झाली नाही
आजुनही मनात सल आहे तुझी मला साथ नाही
मीही खुळ्या मनाला समजवतो
अरे वेड्या ... एकदा गोंदलं कधी जात नाही..


-सत्यजित

Wednesday, February 16, 2011

साजन गये परदेस....

पापण्यांत जपले मी
मेघ तुझ्या डोळ्यातले
वाहू कधी दिले नाही
भाव तुझ्या मनातले

दारातून पाहते मी
पाऊस गं दूरातला
डोळ्यातून वाहू लागे
अबोल पाउस आतला

होऊ लागले पिवळे
पान गुलाबी कोवळे
पुसाया अश्रू माझे
मेघ गालावरती ढळे

सांग कितीदा आखू मी
तू लांधलेली वेस
वेशीच्या अल्याड माझा
आपलासा परदेस

कुठली ती वाट सांग
मज तुजपाशी नेई?
वाटाड्या वाटूलीशी
असं वैर का गं घेई?

आळले नाहीत मेघ
जरी भेगाळली धरा
माझा पाचोळा वाहण्या
तुझाच असावा वारा

-सत्यजित.

Monday, September 20, 2010

क्षणभर जिंदगी

उन्ह कोवळं कोवळं
तुझ्या कांतीहुन सावळं
तुझ्या ओल्या केसां मध्ये
दडे दवाचं सोवळं

तुझ्या पापणीशी झुले
एक दवबिंदू प्यारा
तुझ्या पापण्यांनी उडे
फुलपाखरी मोहोळ

चुके क्षणांचा मेळ
कधी येते सांजवेळ
दूर तारकांस मिळे
तुझा प्रकाश नितळ

जेंव्हा फुलारून येते
नभी नक्षत्रांची वेल
अन रात काळी होते
डोह डोळ्यांचे काजळ

माझ्या मनात उठले
भाव-विभोर तुफान
घाल थोडीशी फुंकर
बघ क्षमेल वादळ

-सत्यजित.


--------------------------------------------------------------------------------------
माझी कविता मलाच उलघडते तेंव्हा...


उन्ह कोवळं कोवळं
तुझ्या कांतीहुन सावळं
तुझ्या ओल्या केसां मध्ये
दडे दवाचं सोवळं

एका सुंदरश्या सकाळी नववधू प्रमाणे दवाचा घुंगटा ओढुन बसलेली धरा, तिचा घुंगटा उलघडण्यासाठी आतुर झालेली सुर्याची कोवळी किरण पुढे सरसावतात आणि तू दिसतेस. आत्ता न्हाउन निघालेली, ओले केस हळुवार बांधलेली. त्या सोनेरी किरणां पेक्षा तुझं रुप अधिक मोहक दिसतंय आणि वाटतंय...

तुझ्या पापणीशी झुले
एक दवबिंदू प्यारा
तुझ्या पापण्यांनी उडे
फुलपाखरी मोहोळ

तुझ्या केसातील पाण्याचा एक थेंब कुठे तरी लगबगीने निघालाय, आणि तुझे सुंदर डोळे पाहताच तुझ्या पापणीवर स्थिरावलाय, तुझ्या पापणीवर स्थिरावलेला हा थेंब गुलाबाच्या पाकळ्यांवरील दबबिंदू सारखा दिसतो आहे. त्याच्या ह्या धिटाईला दटावण्या साठी तू पापण्यांची उघडझाप करतेस आणि माझ्या अंतरंगात अनेक फुलपाखरं उडु लागतात....

चुके क्षणांचा मेळ
कधी येते सांजवेळ
दूर तारकांस मिळे
तुझा प्रकाश नितळ

वेळेचं भान राहीलं नाही, कितीसे क्षण एका क्षणात सामावुन गेले आहे "एक पल में जींली जिंदगी सारी", मी पार हरवुन गेलो आहे. हळुवार सांज कधी आली कळलं सुद्धा नाही. चांदण प्रकाशात तुझं रुप येवढं खुललं आहे की वाटतंय ह्या तारका तुझाच प्रकाश घेउन लखलखताहेत.

जेंव्हा फुलारून येते
नभी नक्षत्रांची वेल
अन रात काळी होते
डोह डोळ्यांचे काजळ

सांज मावळली, एक दोन तारकांचं आभाळ आता नक्षत्रांनी भरुन गेलं आहे. ही काळी रात्र तुझ्या डोळ्यांचं काजळ झाल्या सारखी भासते आहे. तुझ्या खोल अथांग डोळ्यात हरवुन जावसं वाटत आहे.

माझ्या मनात उठले
भाव-विभोर तुफान
घाल थोडीशी फुंकर
बघ क्षमेल वादळ

माझी मनस्थिती मला काही कळण्याच्या पलिकडे निघुन गेली आहे. मनात भावनांचं काहूर उठलं आहे. तू माझ्याशी बोलावंस असा माझा हट्ट नाही पण, एखादा कटाक्ष देखिल ह्या वेड्या मनाला स्वस्थ करील.

-सत्यजित. (Satyajit Malavde)

क्षणांचा पिंजरा

तुझ्या मुठीतील माझे हात
हे स्पर्शाचे इंद्रीय तुझ्याचसाठी

तुज साठी जागते सारी रात
हे स्वप्नांचे इंद्रीय तुझ्याचसाठी

शहार्‍यांस जेंव्हा येते जाग
हे जाणिवांचे इंद्रीय तुझ्याचसाठी

पापणी लांधून वाहते पाणी
हे भावनांचे इंद्रीय तुझ्याच साठी

तुझ्या क्षणांचा होतो पिंजरा
हे आठवांचे इंद्रीय तुझ्याचसाठी

-सत्यजित.

Friday, December 4, 2009

वेड्या मनाचे श्लोक

मना वेड्या सारखा वागु नको रे
जे दिसे सर्व सुंदर मागु नको रे

जी इतकी सुंदर दिसते परिशी
तिचे आधी जुळले असते कुणाशी

आधी निरखावे, आधी पारखावे
आधी नोंदुन घ्यावे तिचे बारकावे

मनाचे मित्रांसी आधी सांगुन द्यावे
टाळावे मित्रांमधले फुका हेवे दावे

तिचे लक्ष वेधेल ते ते करावे
तिच्या कटाक्षासी जिवे मरावे

जसा फुला भोवती फिरतो रे भुंगा
तसा तिच्या भोवती घालावा पिंगा

फ्रेंडशीप डेला भले फ्रेंडशीप करावी
वॅलेंटाईन डेची मनी आस असावी

तिला एकटीला एकटेची गाठावे
धडकत्या मनाचे गाठोडे सोडावे

का ती नुसते नाक मुरडुन गेली?
वा तू दिले फुल चिरडुन गेली?

जर नाक मुरडता... पटली रे बेटा....
जर फुल चुरडता पुन्हा घाला खेटा

मना धीर कधी सोडु नये रे
न जुळलेले नाते तोडु नये रे

जरा रागवेल, जरा तिमतिमेल
जरा धीर धरता एकदा ती हसेल

शहाणपणाचे बहु सल्ले देतिल शहाणे
हे शहाणेच बसती चघळत चणे-दाणे

सत्या अंतिम सत्य सांगतो ऐक
"यत्न नी प्रयत्न" हाची मार्ग एक

जर ना पटली तरी तिच न होती एक
कर यत्न -प्रयत्न तुज मिळतिल कैक...

जय जय प्रेमविर समर्थ....!!!

-सत्यजित.

Thursday, July 16, 2009

तुझे हासणे काळजावरी....!!!!

तुझे हासणे झुले काळजावरी
जशी वार्‍यावरती झुले सावरी

नदिच्या किनारी हळुवार लाटा
तुझ्या लाजण्याच्या अलवार छटा
अन फेनफुले... माझ्या उरी....

तुला पाहता मी बेधुंद होतो
मनाच्या व्यथांचा जुई गंध होतो
झाली स्पंदने ही... फुलपाखरी...

कसे शब्दाविन गित साकारते
मनाची सितार झनकारते
कधी एकतारी... कधी बासरी...

ह्या जगण्याचे आता नवे पेच झाले
स्वन्पात जगणे... नित तेच झाले
अता मरणे नेतो हसण्यावरी

तुझे हासणे काळजावरी....!!!!

-सत्यजित.

Tuesday, June 23, 2009

सांग का घडतो गुन्हा?

पाहणे माझे तुला,
सांग का घडतो गुन्हा?
खेळ ना नजरेचे असती,
निमिषी तू पुन्हा पुन्हा?

सांग मी मग काय पाहू?
काय असे नजरेस दावू?
मग अशी वळणार नाही
पाहण्या तुजला पुन्हा

मी पापण्यांना पांघरुनी
पाहणे जगास टाळले
अंतरंगी साठलेल्या
टाळु कसे कोवळ्या उन्हा?

पाहणे स्पर्षाने असते
पाहणे गंधाने असते
पाहणे पंचेद्रियांनी
छंद माझा का गुन्हा?

तेजोगोलाने न पहावे
तर चंद्र ही उरता सुना
पाहणे माझे तुला,
सांग का घडतो गुन्हा?

-सत्यजित.

Monday, June 22, 2009

मंत्रमुग्ध....

तुझ्या सवे घालवलेला प्रत्येक क्षण हा स्वप्ना सारखा असतो, पण म्हणुन स्वप्न थांबत नाहीत ना! तिथेही तुच असतेस सदैव.

अवेळी कधीही... अशी तुझी याद यावी
मी जगल्या स्वप्नांना... पुन्हा जाग यावी

तू नकळत माझा हात धरलास आणि लक्षात येताच... अलगद सोडवुन घेतलास हळुवार, अगदी पारिजात वेचावा ना... तसा. तू हात सोडवुन घेतलास पण तुझा स्पर्श ? तू तसाच गोंदवुन गेलीस...

माझी ती अवस्था न माझी मला कळावी
तू दिल्या पाकळ्यांची पुन्हा कळी व्हावी

माझ्या नजरेत गुंतलेली तुझी नजर... तू केसांत माळलेल्या गजर्‍या प्रमाणे हळुवार सोडवुन घेतलीस खरी....पण तुझ्या नजरेने कोरल्या कवितांच काय?

तुझे शांत डोळे मुक्या वासराचे
त्या नयनांची भाषा मला का कळावी ?

आपल्यातला हा अबोला कित्ती काही बोलतो नाही?... तुझ्याशीही आणि माझ्याशीही... माझ्या स्वगतावर तुझं असं दचकणं, मी माझ्या मनातल्या मनात केलेल्या धारिष्ट्यावरही तुझं जोवघेंण लाजणं... सारंच कसं अद्भुत... सारंच कसं अद्वैत...

आज कळे भावनांना कधी शद्ब नसतात
ह्या शब्दांनी भावनांची नुसती वकालत करावी

मग मनाच्या कोर्टात भावनांचा खटला चालू होतो. ह्रुदयाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केल जातं आणि विचारल जातं, की तू असा का वागतोस? तू असा का बहकतोस... ती येता? त्या वकिल शब्दांना आरोपी मन अबोल उत्तरं देत.. आणि हे शब्दच मग आरोपीच वकिलपत्र घेतात.. आणि अगदी तेंव्हाच एक कविता जन्म घेते...

तुझे ते इथे तिथे उगा काही बाही पहाणे
तू गुंतलेली अनंतात, मी वसंताच्या गावी

तुझ्या मनातली हुरहुर लपवण्यासाठी, तू कुठल्याश्या विचारात गुंतली आहेस असं भासवण्याची तुझी धडपड.... हातातल्या पुस्तकांवर तुझी नजर खिळलेली आणि हळुवार तुझ्या बटांना रागवणारे... तुझे प्रेमळ हात... तू डोळ्यांच्या कोनातुन माझ्या हलचाली निहाळत रहातेस, मी डोळ्यांतल्या मनातून तुला निहाळत रहातो. डोळ्यांना डोळे भिडले नाहीत तरी आपल्या नजरा सदैव जुळलेल्या...

तुझ्या पदरांवर होती, फुले फुलली गुलाबी
का वाटे माझ्या हातांची फुलपाखरे व्हावी?

तू डवरलेली जुई.... तू बहरलेला परिजात... तू अंग चोरुन बसलेली... दवओली श्रावण पहाट...
तू अशीच बसुन रहा मी असाच हरवत जाईन, तुझे हे नजरेचे खेळ.. असाच पिसा होउन पाहीन...

तू अबोला सोडत म्हणालीस... "निघुया?"

मी माझ्याशीच हसत म्हणालो, आत्ता?
मी तर कधीचाच निघालो कुठल्याश्या गावी...

अवेळी कधीही ... अशी तुझी याद यावी
मी जगल्या स्वप्नांना.. पुन्हा जाग यावी ....

-सत्यजित.

Tuesday, June 2, 2009

तुझी आठवण...

पाउस आतला
एकांती मातला
बरसती धारा
निरंतर

कोरडे भिजणे
वाळले रुजणे
फुलण्याची ओढ
अनामिक

बुद्वुदा जलाचा
अवनी तनुचा
उरतो कितीसा?
क्षणातीत

-सत्यजित.

Tuesday, April 21, 2009

पाउसपान्हा

घनन घनन घन
आला ओलाव्याचा सण
पुन्हा मोहरली धरा
तिचा येणार साजण

थेंब थेंब रानभर
थेंब थेंब अंगभर
अंग अंग ओलावलं
सरे विरहाच ज्वर

उठे आवेग तुफान
सुटे मिलनाचा गंध
कुठे रानात पानात
तुटे काचोळीचा बंध

तिच्या कण कण वाहे
त्याचा थेंब थेंब थेंब
तिच्या मायेच्या कुशीत
त्याचा रुजलेला कोंब

तिच्या माउलल्या कटी
उद्या दिसेल गं कान्हा
ती देईल त्याचे ओठी
त्याने दिलेला गं पान्हा.

-सत्यजित.

Thursday, April 2, 2009

झुंजुमुंजू

रात्र ओलावलि अन चंद्र ओलेता रहिला
सुकवताना केशसंभार मी पहाटेला पाहिला

विखुरल्या चांदण्या तिने सोनकोवळ्या उन्हात
ओल्या कुंतलातुन ओघळता पाहिला उल्काप्रपात

हळुवार गुंफले केस तिने रात्र विझवुन टाकली
ओल्या पदराआड तिच्या पहाट दवांची झाकली

ती मालवणारी रात्र होती की उमलणारी उषा?
तिचीच झुंजुमुंजू राहिली व्यापुन दाही दिशा

-सत्यजित.

Thursday, February 12, 2009

देवा... I Just want to die

आली आली येउन बसली पहिल्या बाकावर
जिवघेणा एक तिळ होता तिच्या नाकावर

तिळतिळ ह्रुदय तुटले तिच्या ओल्या ओठांवर
तिळतिळ तुकडे झुलती तिच्या उडत्या बटांवर

नाजुक बोटां वरती लावला जालिम नेलपेंट
डाव्या छातीत धडकले उढला छातीवरती डेंट

झुळझूळ ओढणी उडता श्वासांमध्ये भिनला सेंट
झुळझूळ ओढणी ढळता आयला! मी तर झालो पुरता फेंट

ती पिट पिट पापण्या मिटता मी तर पुरता गेलो रे
उरले सुरले क्षणात विरले आता नावा पुरता उरलो रे

मंजुळ मंजुळ हसली गाली मजला पाहुन ऐसे रे
माझे माझे मलाच कळेना मी केले सहन कैसे रे

साखर पाकात घोळवत मजला म्हंटले तिने "हाय"
हाय हाय ...मी तर गेलो मेलो ...I Just want to die. देवा. I Just want to die

-सत्यजित.

Friday, December 5, 2008

तुला पाहले मी असे निजताना

तुला पाहले मी असे निजताना
जसा चंद्र भासे निशा विझताना

असतिल स्वप्ने तुझ्या पापण्यांत
उरते बेचैनी माझ्या वागण्यात

मी बेभान असतो तुझ्या चांदण्यात
की नशाखोरी असते माझ्या जागण्यात?

वाटे ठेवावे ओठ अलवार पापण्यांवर
का रुसेल चंद्र माझ्या या वागण्यावर

तुझ्या आरक्त ओठांवर विरजते पहाट
मी स्वप्नांत असता तू निजलेली दाट

हळुवार बोटांनी तुझ्या बटा सावरुन
माझी बेताल स्वप्ने मी घेतो आवरुन

मी सांग भावनांना कसे आवरावे
तुला जाग येता मी उगा बावरावे

न कळे का मी घेतो डोळे मिटुन
तू देतेस चुंबन मज निजता बघुन

तू निजता शांत मी अशी रात्र जागणार
मी का उठतो उशिरा तुज कैसे उमगणार?

-सत्यजित.

Wednesday, October 29, 2008

कंबखत दैव

त्या जादूई क्षणात सांग काय दडले होते
मन काबुत नसताना सांग काय घडले होते

तव गोर्‍या नितळ कांती लव सांजेच्या उन्हाची
फुलल्या श्वासास संध्येचे पिसे जडले होते

अधरामृतात तुझ्या आकंठ संजीवताना
माळुन केसात जुई चांदणे उघडले होते

भाळी ठेवले ओठ सैल केली मिठी जराशी
पण रुणझुणत्या पैजणांत पाउल अडले होते

ढळला हळुच हुंदका अबोला बोलून गेला
तुझ्या पावलांत आसवांचे फुल पडले होते

सोडवून गेलो हात वळवाची होती रात
होता पाऊस खरा का आभाळ रडले होते

न सरली अजुन रात्र ती उरली उरात माझ्या
का कंबखत दैवाने मलाच निवडले होते?...

-सत्यजित.

Wednesday, August 13, 2008

Love At First Sight....!!!

तुला पाहताच वाटलं मला
तुला पुर्वी आहे पाहिलं
आवरलेल मन माझं
बांध फोडून वाहिलं
कोण होतीस तू? आणि
कधी होती भेटलीस?
direct छातीत शिरत
ह्रुदयालाच जाउन खेटलीस
किती घट्ट आवळलस
तू माझ्या ह्रुदयाला
नसानसा धवलं रक्त नी
श्वास लागले फुलायला
कान झाले गरम आणि
घशाला पडली कोरड
"माझं तुझ्यावर प्रेम आहे"
अशी आतल्या आत ओरड
होता नजरा-नजर आपली
कित्ती सुंदर लाजली
घंटी म्हणतात ना तीच..
माझी होती वाजली
"मी प्रेमात पडणार नाही"
म्हणा-याची अशी जिरते ऐट
प्रेमात पडण्या आधीच होतं
Love At First Sight....!!!

-सत्यजित.