Showing posts with label अवती भवती. Show all posts
Showing posts with label अवती भवती. Show all posts

Saturday, September 10, 2011

एक रसग्रहण - भय इथले संपत नाही

मला ही कविता म्हणजे एक विरह गीत जाणवते...त्यात वेडं प्रेम जाणवतं. इतर रसग्रहणात गॅप आहेत .. बर्‍याचदा एक कडवं/ओळ आणि त्या नंतरच्या कडव्यात/ओळीत कवि ट्रॅक चेंज करतो असं लिहीलं आहे. पण ही एक कविता आहे, गझल नाही. कविता स्फुरताना असं होत नाही. कविता पहील्या ओळी पासुन शेवटच्या ओळी पर्यंत एक विचार उलघडत जाते.. त्यात भावनेचा ओघ असतो, त्या प्रत्येक कडव्यात प्रत्येक ओळीत भावनेची गुंफण असते. एका ओळी मागे किती मोठी कहाणी असते हे कवीच सांगु शकतो. प्रचंड एकवटलेल्या भावनांनी एक ओळ स्फुरते, ती तुमच्या पर्यंत पोहचली तर ठीक, नाहीतर ती निर्बोध होते. अशा एकवटलेल्या भावना उलगडुन सांगणं कवीला जड जातं, जे म्हणायच आहे ते पुर्ण एकाच वेळी सांगता येईल हे सांगता येणे अवघड. आणि येवढं उलगडुन सांगायचं होत तर मग कविता कशाला लिहीली असती? स्मित
कवि जे लिहितो ते त्याच्या अनुभवातुन, ती त्याची अनुभुती ती वाचकाच्या अनुभवाशी जुळेल का? आणि नाही जुळली तर तिची गोडी कमी होईल. जसं "गोड आवडतं" म्हंटल की तुम्हाला साखर सुचेल, कुणाला बासुंदी, तर कुणाला जिलेबी, इथे सगळेच गोड आवडणारे एकमत होतात, तरी प्रत्येकाच्या संकल्पना वेगळ्या, पण "जिलेबी हे गोड आवडत" म्हटल की बाकी तुटले. म्हणुन कविने कविता उलगडुन सांगु नये म्हणतात ते ह्याच साठी.. मग ती काहीं साठी निर्बोध ठरते तर काहीं साठी अर्थपुर्ण पण मग तित अनुभुती नाही. ती कविता वाचणार्‍याची होत नाही ती कविचीच रहाते. जी ओळ अनुभुती देते ती कविता आणि जे अर्थ स्पष्ट करते ते गद्य... अस मला वाटतं. पण ज्यांना अनुभुती मिळत नाही आणि जेंव्हा इतर शहाणे त्यांना हेटाळतात तेंव्हा लोक कविते पासुन दुर जातात. म्हणुनच बरेच लोक मला कवितेतल काही कळत नाही, कविता माझा प्रांत नाही, म्हणत कविते पासुन दुर जातात, अशा साठी कविता दुसर्‍यांनी उलगडुन सांगण गरजेच असत. किंवा कविने हिंट देणं गरजेचं आहे. पण जो तो आपल्या अनुभवाने समृद्ध असतो, माझा अनुभव तुम्हाला द्यावा कसा? त्यात अध्यात्म हे असं आहे की ते सगळी कडे फिट होतं, पण अध्यात्म सगळ्यांन झेपत नाही आणि रुचतही नाही. आकाशा कडे बोट दाखवलं तरी अध्यात्म जमिनी कडे बोट दाखवलं तरी अध्यात्म.. जो देवाशी एकरुप झाला त्याला चोहीकडे तोच दिसतो. पण तो आम्हाला कसा दिसावा? .. तसंच कवितेच.. पण तरी काही ठिकाणी उलगडुन सांगणं गरजेच.. आपला आनंद शेअर करावा.. स्मित तोच मीही करतो आहे..

ही ग्रेसची कविता एका प्रियकराच मनोगत आहे... हे एक विरह गीत आहे. ज्यांना काहीच अनुभुती मिळाली नाही त्यांच्या साठी मी माझी अनुभुती प्रकट करण्याचा प्रयत्न करतो, कदाचीत इतर कविता वाचताना त्यांना अनुभुती कशी घ्यावी हे कळेल... स्मित

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

किती काळ लोटून गेला, किती वर्ष उलटुन गेली तरी तुझी आठवण आली की श्वासांचा वेग वाढतो, काळिज धडधडु लागत. माझ्या मनातल कुणाला कळेल का याची भीती वाटू लागते. ते क्षण डोळ्या समोर तसेच उभे रहातात. अजुन किती वर्ष मी हे ओझं घेउन जगायचं? आणि तू आताही समोर आलीस तर... छे.. भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते.

किती संध्याकाळी आपण एकत्र घालवल्या. दिवस रेटारेटीत निघुन जातो पण सांज उतरलीकी त्या सार्‍या आठवणी सध्याकाळी एकवटतात. प्रेमाच खरा अर्थ तुच तर मला शिकवलास, तु नेहमी म्हणायचीस, प्रेम हे बंदीशी सारख आहे, एकदा का ती बंदिश आपण आळवू लागलो की मग कुणाच भान रहात नाही. गात रहावं आणि भान विसरुन एकरुप व्हाव. जे आळवलं ते प्रेम कसलं, जे एकरुप होऊन आळवलं जातं तेच प्रेम.. तेच तुझे शब्द मनात रेंगाळत रहातात एखाद्या बंदीशी प्रमाणे. मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

हा चंद्र म्हणजे तुच ना.. हे चांदण तुझा झरा होउन वाहतं आहे आणि हे तुझ्या जाणिवांचं स्नान मला घालतं आहे. ही माझ्या आजुबाजूची धरती, हे जग ही सारी माया आहे. तू सत्य आहेस, तू शास्वत आहेस... माझं जगण ही जगणं नसुन एक विरक्ती आहे. तू माझं सर्वस्व आहेस ....हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया

तुला आठवतंय किती तास झाडा खाली हातात हात गुंतवुन बसायचो, किती स्वप्न रंगावायचो. कधी मी तुझ्या मांडीवर डोकं ठेउन निजायचो तर कधी तू माझ्या, कधी डोळे मिटले जायचे, कधी मिठी विरघळायची, कधी अधरांना अधर मिळायचे..मग जाणवायची ती फक्त स्पंदन... मग तिही एकरुप होत विरघळून जायची. जगाच भान आणि स्वत:ची जाणिवच नाहीशी व्हायची, जशी योग्याची योग निद्राच.. असा किती वेळ निघुन जायचा कुणास ठाऊक पण भानावर येताच.. हाताच्या मुठी पुन्हा घट्ट व्हायच्या... विलगण्या साठी. उद्या पुन्हा इथेच भेटायचं वचन देत आपण पुन्हा मिठीत विरघळुन जायचो, नुसतं शरिराने वेगळं व्हायला.. झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेली नाजुक भोळ्या, वार्‍याला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेउन, दारावर आली भरती

किती भोळे होतो आपण, सारी स्वप्नं खरी होतील असं वाटायच ना आपल्याला. हे जग आहे, त्याच्या प्रथा आहेत, त्या प्रथांची कुंपणं आहेत ह्याची जाणिवच नव्हती... ते क्षण नाजुक होते खरे पण ते नाजुक का ते आत्ता कळत आहे, लोकं नाजुक वय का म्हणायचे तेही आत्ता कळतय, त्या नाजुक वयातिल घाव खोल होतात हेच खरं.. . मन अस वार्‍या सारखं सैरभैर किंवा वार्‍या पेक्षाही चंचल की वार्‍यचीही खोडी काढुन पळुन जाता येईल इतकं चंचल, पण तितकच भोळं.. त्या वेली नाजुक भोळ्या, वार्‍याला हसवून पळती

तारूण्यांचा जोश असा की क्षितीजं ही पदाक्रांत कराता येतिल असा विश्वास, आणि त्यातच हे वेडं वय प्रेमाची जाणिव घेउन येत. भरतीच पाणी जसं किनारे व्यापत खोलवर शिरतं तसच हे प्रेम तारुण्याच्या दारावर भरती होऊन येत आणि अयुष्य व्यापुन जातं.. क्षितिजांचे तोरण घेउन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातिल जणू अंगी राघव शेला

"माझं तुझ्यावर प्रेम आहे..." येवढ हे हळवं वाक्य सारं अयुष्य व्यापुन गेलं. "जे कधीच संपणार नाही, जे कधीच सरणार नाही अस आपलं प्रेम..सार्‍या जगाशी भांडुन, कुणाची पर्वा न करता मी तुझा/तुझी होईन" हे वचन त्या चार शब्दात होत. आता सारं सारं तू होतिस, श्वासातिल वारं तू होतिस....तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला

पण तेंव्हा समाजची भीती होती, रुढी आड येणार ह्याची कुठे ना कुठे जाणिव होतिच. परिस्थिती मुळे प्रभुरामा पासुन विलगलेल्या सितेला प्रभूरामांचा शेला हा विश्वास देत होता की , "राम येणार, सार्‍या विपदा पार करुन येणार, समुद्र लांधुन येणार, सार्‍या अडचणींवर मात करत येणार.. फक्त माझ्या साठी, आमच्या प्रेमासाठी.. राम येणार... याच विश्वासाने प्रभुरामाचा शेला तिने पांघरुन घेतला असेल, त्यात रामाच्या प्रेमाची उब तिला मिळाली असेल.. तसेच तुझे शब्द ... सीतेच्या वनवासातिल जणू अंगी राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळापाशी, मी उरला सुरला थेंब

जसं भाविकांस देवाच दर्शन होण्या पुर्वी देऊळ दिसत असतं, तेच त्याच ध्येय असतं. त्याला विश्वास असतो की देउळ गाठलं की देव हा भेटणारच. तस प्रत्येक प्रेम करणार्‍याच लग्न हे ध्येय असतं एक मंदिर असतं जेथे प्रेमाची पुर्ती होणार असते. ह्या मंदिराची वाट किती खडतर असली तरी एकमेकांच्या साथीने मंदिर गाठुच येवढा दृढ निश्चय होता पण आपण मंदिर गाठण्या पुर्वीच खांब फोडुन आलेल्या दानवाला तू देव समजुन बसलिस तो नृसिंह नाही गं, तो तुझा देव नाही तु जेथे जातेस ते तुझे देऊळ नाही.... देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब

तुझ्या ओंझळीत जे आहे तो देव नाही हे तुला ही माहीत आहे, तुझे कावरेबावरे डोळे, आक्रोश करते अश्रू मला सांगत आहेत की तू माझी आहेस आणि मी तुझा... हा आक्रोश, हा आवेग, हे तुफान परिस्थिती पुढे इतक हतबल झालं आहे की मी तुझ्या पापणी वरला एक उरला सुरला थेंब होउन राहीलो आहे. एकदा का तो पापणीवरुन घरंगळला की त्याचं त्या डोळ्यांशी काही नातं नाही, तो उरतो फक्त पाणी होऊन.. थरथरत्या बुबुळापाशी, मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फुलासम, मी नटलो शृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

तू नाहीस... तू माझी नाहीस म्हणजे मीही नाही. मला अस्थित्वच नाही. झाडापासुन विलगलेलं फुल, पाण्या पासुन विलगलेलं कमळ आता फक्त देवावर वाहण्या पुरतं उरतं आणि मग निर्माल्य होतं, मी तर संध्येच्या पुजेतल कमळ त्याच निर्माल्य होण्यास आता कितीसा वेळ, तरीही मी शृंगार केला आहे कुणाच्या चरणी वाहण्यासाठी... संध्येतील कमल फुलासम, मी नटलो शृंगाराने

काय करणार? जगावं तर लागलच, मी ही लग्नाच्या बेडित अडकलो, मीही कुणाचा झालो.. पण फक्त देहाने.. मी मनाने तुझा होतो आणि तुझाच आहे. हे भोग, हा आनंद फक्त देहा पुरता, ह्या जाणिवा ही फक्त देहा पुरत्याच... देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

लग्न झालं, मुल झाली, संसार सुखात आहे.. पण ही पंचेंद्रीये आजुन तुझ्या जाणिवा कुरवाळत आहेत, तुझा स्पर्श, तुझा गंध, तुझ रुप, तुझ्या अधरांची चव, तुझा आवाज अजुनही ह्या इंद्रीयांत तसाच जिवंत आहे. छान गाणं संपल तरी मन ते गुणगुणत रहातं तशी माझी इंद्रिय तुझी संवेदना गुणगुणत आहेत तरीही दु:ख आहेच... स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे

मी काही केल्या तुला विसरु शकत नाही... हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

माझी कर्तव्यं मी पार पाडली आहेत, आता वाटतंय की पुरे झालं हे आता जिवन. पुन्हा एकदा जन्म घ्यावा आणि तुझं होऊन जावं. बस झालं ना.. आता लवकर लवकर हे अयुष्य संपू दे, पुढल्या जन्मी मी तुझा होईन, तु माझी होशील.. हे खरच होईल? का कुणास ठाउक, सारं धुसर आहे.. पण मला परातायची घाई लागली आहे मला विश्वास आहे तू मला भेटशील, हे अवेळी असेल कदाचीत.. पण मला परतु दे..
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई

हे जिवन हे एक जंगल आहे, भरपुर झाडं आहेत इथे, पण तुझ्याविना ती सारी निष्पर्ण आहेत. तू नाही तर वंसत नाही फक्त आहे ती पानझड... मेंदूतुन ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

पुढल्या जन्मी आपण पुन्हा एकमेंकांचे होऊ कधीच न विलगण्या साठी..

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

-- ग्रेस

अपनी अनुभुती अपने पास.. नंथींग व्रॉंग इन इट.. हॅप्पी कविता रिडींग..!!!

खर तर ग्रेस यांच्या कवितेत 'आई' न शोधता सापडते ह्याही कवितेच तसच...  तरी मला जे सुचल ते लिहीलं

-सत्यजित.

Monday, July 21, 2008

कलंकी

अंधाराचे घर माझे न कुठेही प्रकाश
सावल्याही नसती आता न अवसे आकाश

माता ज्योती होती बाप दिव्यातली वात
वणव्याच्या तेजा भुले विदग्धी ही साथ

कधी पांघरुन उषा कधी चांदणे लेवुन
जे जे भासले ते तेज गेले चटके देउन

तिच्या पदराखाली उन कधी ना लागले
तिच्या उरीचे दुध आज कसे गा नासले

कुणी ओरबाडुनी देतो कुणी दांभिक उदार
अंधाराच्या हाता हवा निज उघडा पदर

माझ्या बाहुललीला कधी तू तिटं लावु दिला नाही
त्या निष्कलंकी बाहुलीत माझी माय मला पाही

-सत्यजित

Wednesday, March 12, 2008

माझी मुंबई... एक जंगल

नजर जाईल तोवर
पसरलेल जंगल
विटा दगडांच्या समाधीत
विसरलेल जंगल
हिंस्र श्वापदांना मुक्याने
झेलणार जंगल
काळाजावर आघात
पेलाणार जंगल
भजेल त्याला नित्य
पावणार जंगल
धगधगत्या रुळांवर
धावणार जंगल
जुन्याच प्रश्णांच्या थारोळ्यात
लोळणार जंगल
आपल्याच धुनीत सदैव
पोळणार जंगल
विवीध रंगाच्या दिव्यानी
सजलेल जंगल
धुरांची शाल पांघरुन
निजलेल जंगल
सचेतन शरिरात अचेतन मनं
गाढलेल जंगल
शेत खाणार्‍या कुंपणानी
वेढलेल जंगल
भिषण स्फोटाने बिचारं
बावरलेल जंगल
आपल्याच हाकेने आपणच
सावरलेल जंगल
तुमच्या आमच्या दु:खाने
कुढलेल जंगल
तुमच्या आमच्या संगे
रडलेल जंगल
तुम्हा आम्हा सगळ्यांनी
वाढलेल जंगल
तुम्हा आम्हा सगळ्यांनी
तोडलेल जंगल...

सगळ्यांच असुनही माझं माझं जंगल...

-सत्यजित

Wednesday, April 25, 2007

फ़ुलराणी. . .

छोटीशी कळी
आतूर होती फ़ुलायला
खूप खूप मध होता
तीच्या प्रियकराला द्यायला

पहाटेच्या थंडीत तिला
कुणी हलकेच हलवलं
"कळी तुझं फ़ुल झालं" असं
कानात कुणी गुणगुणलं

थंडगार वार्‍यावर
छान डोलत होती
हिरव्या गार झाडीत
खूलून दिसत होती

तिच्या सौंदर्याचा सुगंध
लागला वार्‍यावर पसरायला
कशी छान नटली होती
प्रियकराला भेटायला

मुंग्या फ़ुलपाखरांची
तर रांगच लागली होती
पण सारा मधूरस होता
ज्याच्यासाठी ती सजली होती

गुणगुणत येणार्‍या भ्रमराची
चाहूल तिला लागली
मीलनाच्या संकेताने
ती मनोमनी लाजली

पाकाळ्यांचे बाहू पसरून
त्याला मीठीत घेतले
सारा रस पिउन भ्रमराने पंखांची फ़ड्फ़ड केली
आपलं सारं सारं देउन फ़ुलराणी तृप्त झाली

आता विरहाचा क्षण
क्षणावर आला
मध चाखून सारा
भ्रमर दूरदूर उडाला

त्याला निरोप द्यायला
हसत वार्‍यावर डोलत होती
मनोमनी मात्र ती
खरच हिरमुसली होती

वाटत होतं तीला
तो परत एकदा येईल
प्रेमाचा अविट राग
पुन्हा तिच्या कानी गाईल

दुपारचं उन झेलून पण
त्याची वाट पहात होती
पण मावळल्या सुर्याबरोबर
तिची आशा पण मावळली होती

ती एकाकी आनंदली
त्याला येताना बघून
खरंच तो आला होता
पण अनोळखी बनून

त्याच्या पंखांचा आवाज
आता कर्कश्श वाटत होता
संपलेला मध बघून तो
दूरदूर गेला होता

सारं सारं मावळत होतं
फ़क्त रात किड्यांची कीरकीर होती
सकाळी फ़ुललेली फ़ुलराणी
आता मात्र कोमेजली होती. . .

सत्यजित.

Friday, April 20, 2007

प्राजक्त. . .

रात्रीच्या अंधारत तो
वेडा प्राजक्त बहरला
त्याच्या धुंद सुगंधाने
वाराही शहारला

करत फ़ुलांची उधळण
चांदण्यांचा पडला सडा
त्या चांदण्यात खेळायला
चंद्रही धावला वेडा

त्या खुळ्या चांदण्याला
घातले कुणी ढगांचे कुंपण
त्या नभात विरली
किरणांची मधू शिंपण

रातकिड्यांनी फ़ुंकले
कीर कीर रणशिंग
त्या नभांची जुंपली
वार्‍याशी झुंज

वार्‍याने पिंजला
नभांचा पिसारा
चंद्राने फ़ुलविला
किरणांचा पिसारा

लागताच रवीची कुणकुण
चांदण्या पळाल्या
वेचताना पारीजात
काही ओंजळीत मिळाल्या. . .

सत्यजित.

Wednesday, April 18, 2007

पारिजात. . .

अंगणातील पारिजातावर
छानसे घरटे चिमण्यांचे
त्या घरट्या खाली सांडते
रोज आभाळ चांदण्यांचे

वेचून त्या चांदण्या
फुले माळ केसात लांब तुझ्या
चांदणे पसरेल निशेवर
भिनेल रुधीरात गंध माझ्या

सांज रूप घेउन यावस
मग विझतील रवीकिरणे म्लान
सांजेच्या उंबरठ्यावर निशा
घेत असेल चांदण्यांचे स्नान

असेल हात तुझा हातात
सर्वदूर चांदण्यांचे आभाळ
होइल चांदणेही रुपेरी
पाहून रंग तुझा गव्हाळ

मग क्षण येइल तो
हळूवार सोडवून घेशील हात
मग कित्येक रात्री जागवणारी
हासत निरोप घेइल रात. . .

एक पहाट. . .

रात्रभर खेळ खेळून
एक दवबिंदू थकलं
मग गवताच्या पात्यावर
निमुटपणे झोपलं

कोंबड्याने बांग देताच
मोत्या सारखं हसलं
त्याला रविचं बाळ समजून
सारं रान हललं

वा‍र्‍याने शीळ घालताच
सारं रान हललं
ते ही खुळं घाबरून
धरेच्या कुशीत शिरलं. . .

-सत्यजित.