Wednesday, April 25, 2007

फ़ुलराणी. . .

छोटीशी कळी
आतूर होती फ़ुलायला
खूप खूप मध होता
तीच्या प्रियकराला द्यायला

पहाटेच्या थंडीत तिला
कुणी हलकेच हलवलं
"कळी तुझं फ़ुल झालं" असं
कानात कुणी गुणगुणलं

थंडगार वार्‍यावर
छान डोलत होती
हिरव्या गार झाडीत
खूलून दिसत होती

तिच्या सौंदर्याचा सुगंध
लागला वार्‍यावर पसरायला
कशी छान नटली होती
प्रियकराला भेटायला

मुंग्या फ़ुलपाखरांची
तर रांगच लागली होती
पण सारा मधूरस होता
ज्याच्यासाठी ती सजली होती

गुणगुणत येणार्‍या भ्रमराची
चाहूल तिला लागली
मीलनाच्या संकेताने
ती मनोमनी लाजली

पाकाळ्यांचे बाहू पसरून
त्याला मीठीत घेतले
सारा रस पिउन भ्रमराने पंखांची फ़ड्फ़ड केली
आपलं सारं सारं देउन फ़ुलराणी तृप्त झाली

आता विरहाचा क्षण
क्षणावर आला
मध चाखून सारा
भ्रमर दूरदूर उडाला

त्याला निरोप द्यायला
हसत वार्‍यावर डोलत होती
मनोमनी मात्र ती
खरच हिरमुसली होती

वाटत होतं तीला
तो परत एकदा येईल
प्रेमाचा अविट राग
पुन्हा तिच्या कानी गाईल

दुपारचं उन झेलून पण
त्याची वाट पहात होती
पण मावळल्या सुर्याबरोबर
तिची आशा पण मावळली होती

ती एकाकी आनंदली
त्याला येताना बघून
खरंच तो आला होता
पण अनोळखी बनून

त्याच्या पंखांचा आवाज
आता कर्कश्श वाटत होता
संपलेला मध बघून तो
दूरदूर गेला होता

सारं सारं मावळत होतं
फ़क्त रात किड्यांची कीरकीर होती
सकाळी फ़ुललेली फ़ुलराणी
आता मात्र कोमेजली होती. . .

सत्यजित.

No comments:

Post a Comment