Monday, April 23, 2007

एक घास काउचा . . .

कावळा ह्या पक्ष्याबद्दल मला नेहमीच कुतूहल वाटत आलं अन ह्या कुतूहलापोटी काहितरी लिहीत गेलो .. आणि कविता झाली.

ह्या कावळ्यांचं बरं असतं
त्याना कुठेही बसता येतं
गांधीजींचं डोकं, आंबेडकरांचा खांदा
मन मानेल तिथे शिटता येतं

बलवान पंख असतात
उंच उंच उडता येतं
तिक्ष्ण काकदॄष्टीने
सावज अचूक टिपता येतं

चोच कशी टोकदार
अन चाल अशी ऐटदार
मेमेली घूस वा तुपातली पोळी
स्वारी नेहमीच तयार

कुबेराचं वाहन म्हणून
फ़ुकट भाव खाउन जाणार
कधी हा शीटता अंगावर
म्हणे धन लाभ होणार

एरवी लोक उष्ट्या हाताने
कावळा नाही हाकणार
पण दशपिंडाला पक्वान्न वाढून
ह्याची हाजी हाजी करणार

ह्याच्या उठण्या बसण्या
शिवण्याचा वेग वेगळा अर्थ असतो
ह्याचा स्थलपरत्वे भेटण्याचा
वेग वेगळा हेतू असतो

ह्या कावळ्यांची काव काव नसेल
तर सारं शांत शांत वाटेल
नुसतीच कावळ्याची काव काव असेल
तर मनी भीती दाटेल

कुणी काकदृष्टी म्हणून
माणसाचं वाढवतील भुषण
कुणी "कावळाच आहे मेला"
म्हणून देतीलही दुषण

लहानपणी भरवलेल्या घासात
काउचा घास हमखास होता
घर शेणाचं असून देखील
काउच माझा खास होता . . .

सत्यजित.

1 comment: