Monday, December 13, 2010

भुर्र ...जायचय

माझ्याकडे आहे डॉल
निळे डोळे गोरे गाल

दुदू काही पित नाही
पप्पी कुणा देत नाही

आडवं करता झोपते
अंगठा सारखा चोखते

माझ्या मागे मागे करते
फिरायला ने मला म्हणते

बाहुली लागली रडायला
तिला जायचय फिरायला

मला देखिल रडू येतय
सांगा कोण फिरायला नेतय?

-सत्यजित.

Saturday, December 11, 2010

जेंव्हा बाप जन्माला येतो..

बाप झाल्यावर कळलं बाप होणं म्हणजे काय
जन्म दिल्यावर कळल जन्म घेणं म्हणजे काय

बाप म्हणजे पाऊस असतो बाप असतो हिरवळ
स्वतः जळत असताना, लेकराच्या चटक्यांची कळवळ

किती उशिरा कळू लागला खाल्ल्या फटक्यांचा अर्थ
काळजीला जनरेशन गॅप म्हणणं किती होतं व्यर्थ

समजवून सांगायला जाता, तो जातो चिडून निघून
रागातंही मला हसू येतं, समोर माझं बालपण बघून

समजवुन समजला नाहीच तर देतो चार फटके
आई-बाप ते आई-बापच ! कुणीच नसतं हटके

दु:ख खाल्ल्या फटक्यांचं नाही, दु:ख दिल्या फटक्यांचं नाही
मी जसा बाप बनलो तस त्याचंही त्याला कळेलच की नाही ?

दु:ख येवढच आहे अजुन कितीश्या चुका म्हातारपणी कळतील ?
तेंव्हा वळुन वळायचं म्हंटलं तरी, म्हातारी पावलं कीतीशी वळतील ?

आज किती सहज काढत जातो आपण त्यांच्या चुका
त्यांनाही आपले पाढे वाचता येतात, पण बाप राहतो मुका

उन्हात होरपळल्या शिवाय पाण्याची वाफ होत नाही
पाण्याची वाफ झाल्या शिवाय पाऊस होता येत नाही !

जळण्यामध्येही जगणं असतं येवढं आज ग्राह्य आहे
बाबा, तुमच बोट धरुन चालतोय म्हणुन सारं सुसह्य आहे !!

-सत्यजित.

Friday, September 24, 2010

सहिष्णुतेचे गोडवे गाऊ- जय श्री राम..!!!

आता हया कवितेत राम उरला नाही... 22 जानेवारी 2024... 😂

अमाचा राम आता अयोध्येत , जय श्री राम...

आज देवाचा खटला
मानवाच्या दरबारी
देवा तुझं खरं होत 
मानवा पेक्षा माकडं बरी

आता कसा काय कुणाला
अयोध्येत उरला नाही राम?
सत्ता उपभोगुन झाली
आता तुझं काय काम?

कुणी मस्जिद पाडुन जिंकुन येत
कुणी मस्जिद बांधुन येतील जिंकुन
ढूंगणं वर होताना तुलाही पाहतील डूंकुन

त्यांची मात्र खरी श्रद्धा
आमची सारी थेरं आहेत
तुझी वानरं वनात राहीली 
इथे धोब्याची पोरं आहेत

मंदिर बांधण सोप नाही
आता कायदा आड येतो
निधर्मी देशात आमच्या 
भगवा हीरव्या आड होतो

तेंव्हा चौदा वर्षांनी वनवास संपला
आता चौदा वर्षांनी करतात कोर्टात उभा
तुला पुन्हा वनवासात धाडण्याची
 कायद्या अंतर्गत आहे मुभा

तेव्हा पितृ वचनासाठी गेलास
आता आमच्यासाठी जा
इथे बंदी होऊन रहाण्या पेक्षा 
वनवासात सुखी रहा..

संकट येता आजही
आम्ही तुझचं स्तोत्र गाऊ
राम-रहीम एक म्हणतं 
सहिष्णुतेचे गोडवे गाऊ

-सत्यजित.

Monday, September 20, 2010

क्षणभर जिंदगी

उन्ह कोवळं कोवळं
तुझ्या कांतीहुन सावळं
तुझ्या ओल्या केसां मध्ये
दडे दवाचं सोवळं

तुझ्या पापणीशी झुले
एक दवबिंदू प्यारा
तुझ्या पापण्यांनी उडे
फुलपाखरी मोहोळ

चुके क्षणांचा मेळ
कधी येते सांजवेळ
दूर तारकांस मिळे
तुझा प्रकाश नितळ

जेंव्हा फुलारून येते
नभी नक्षत्रांची वेल
अन रात काळी होते
डोह डोळ्यांचे काजळ

माझ्या मनात उठले
भाव-विभोर तुफान
घाल थोडीशी फुंकर
बघ क्षमेल वादळ

-सत्यजित.


--------------------------------------------------------------------------------------
माझी कविता मलाच उलघडते तेंव्हा...


उन्ह कोवळं कोवळं
तुझ्या कांतीहुन सावळं
तुझ्या ओल्या केसां मध्ये
दडे दवाचं सोवळं

एका सुंदरश्या सकाळी नववधू प्रमाणे दवाचा घुंगटा ओढुन बसलेली धरा, तिचा घुंगटा उलघडण्यासाठी आतुर झालेली सुर्याची कोवळी किरण पुढे सरसावतात आणि तू दिसतेस. आत्ता न्हाउन निघालेली, ओले केस हळुवार बांधलेली. त्या सोनेरी किरणां पेक्षा तुझं रुप अधिक मोहक दिसतंय आणि वाटतंय...

तुझ्या पापणीशी झुले
एक दवबिंदू प्यारा
तुझ्या पापण्यांनी उडे
फुलपाखरी मोहोळ

तुझ्या केसातील पाण्याचा एक थेंब कुठे तरी लगबगीने निघालाय, आणि तुझे सुंदर डोळे पाहताच तुझ्या पापणीवर स्थिरावलाय, तुझ्या पापणीवर स्थिरावलेला हा थेंब गुलाबाच्या पाकळ्यांवरील दबबिंदू सारखा दिसतो आहे. त्याच्या ह्या धिटाईला दटावण्या साठी तू पापण्यांची उघडझाप करतेस आणि माझ्या अंतरंगात अनेक फुलपाखरं उडु लागतात....

चुके क्षणांचा मेळ
कधी येते सांजवेळ
दूर तारकांस मिळे
तुझा प्रकाश नितळ

वेळेचं भान राहीलं नाही, कितीसे क्षण एका क्षणात सामावुन गेले आहे "एक पल में जींली जिंदगी सारी", मी पार हरवुन गेलो आहे. हळुवार सांज कधी आली कळलं सुद्धा नाही. चांदण प्रकाशात तुझं रुप येवढं खुललं आहे की वाटतंय ह्या तारका तुझाच प्रकाश घेउन लखलखताहेत.

जेंव्हा फुलारून येते
नभी नक्षत्रांची वेल
अन रात काळी होते
डोह डोळ्यांचे काजळ

सांज मावळली, एक दोन तारकांचं आभाळ आता नक्षत्रांनी भरुन गेलं आहे. ही काळी रात्र तुझ्या डोळ्यांचं काजळ झाल्या सारखी भासते आहे. तुझ्या खोल अथांग डोळ्यात हरवुन जावसं वाटत आहे.

माझ्या मनात उठले
भाव-विभोर तुफान
घाल थोडीशी फुंकर
बघ क्षमेल वादळ

माझी मनस्थिती मला काही कळण्याच्या पलिकडे निघुन गेली आहे. मनात भावनांचं काहूर उठलं आहे. तू माझ्याशी बोलावंस असा माझा हट्ट नाही पण, एखादा कटाक्ष देखिल ह्या वेड्या मनाला स्वस्थ करील.

-सत्यजित. (Satyajit Malavde)

क्षणांचा पिंजरा

तुझ्या मुठीतील माझे हात
हे स्पर्शाचे इंद्रीय तुझ्याचसाठी

तुज साठी जागते सारी रात
हे स्वप्नांचे इंद्रीय तुझ्याचसाठी

शहार्‍यांस जेंव्हा येते जाग
हे जाणिवांचे इंद्रीय तुझ्याचसाठी

पापणी लांधून वाहते पाणी
हे भावनांचे इंद्रीय तुझ्याच साठी

तुझ्या क्षणांचा होतो पिंजरा
हे आठवांचे इंद्रीय तुझ्याचसाठी

-सत्यजित.

Monday, July 19, 2010

जिवनसखा... पाउस..

पावसाची नी माझी मैत्री झाली दाट
हाती दिला पावसाने थेंबांचा हात
असा कसा मित्र तू? आत्ता सुकून जाशील
वार्‍यावरती झूलताना दिशा चुकून जाशील

मी सुकून जात नाही मित्रा! झिरपत जातो खोल
वरवरचा ओलावा, ती मैत्रीच असते फोल

नदी, नाले, ओढे, झरा तो सतत वहात राहतो
मैत्रीचा अंथांग समुद्र मी किनार्‍यावरुन पहातो
मी चालत जातो ओल्या वाळूत, पाय खोल रुततात
धावत येतात लाटा आणि खळखळून हसतात
मीही खळखळून हसतो, ओंजळीत घेतो त्याला
माझ्या वाचुन वाळला नाहीस? उगाच दाटवतो त्याला

तो म्हणतो वाळणं माझ्या नशिबी नाही
पण कीत्ती खारावलोय बघ...
आभाळ भरुन आलय इतका भारावलोय बघ

मी पुन्हा हात पसरतो, तो थेंबांचा देतो हात
पाउस झिरपत झिरपत, बरसत रहातो आतल्या आत...

माझा जिवनसखा.... पाउस..

-सत्यजित.

गोळा गोळा ..सुर्र सुर्र (बालकविता)

थंड थंड बर्फाला
किस किस किसला
किस किस किसता
खस खस हसला

पाण्यासारखा बर्फ झाला
गोरा गोरा पान
गोळेवाला त्याचा आता
मेकअप करणार छान

सुर्र... सुर्र....

सुर्र... भुरका मारत
मस्त गोळा खाऊ
रंगलेली जिभ मग
आरशात पाहू

-सत्यजित.

(Satyajit Malavde)

जिवन

माणसाच्या खरतर दोनच गरजा, आधी शारिरीक आणि मग मानसिक. तशा माणसाला व्याधीही दोनच शारिरीक आणि मानसिक. जिवनातला फोलपणा कळल्यावर देखिल जिवनाबद्दल तत्वज्ञान सांगणार्‍या संतांना तरी काय म्हणवं? त्यांना जिवन खरच कळलं असतं की नाही कुणास ठाउक? ना आगा, ना पिछा. जावं गप-गुमान जंगलात, हिमालयात रहावं. स्वतःचा काय नी दुसर्‍याचा काय, संसार तो संसारच, आणि संसार म्हंटला की गुरफटण आलच. पण काही संत मात्र समाधी घेतात तर काही संत लोक कल्याणाचा वसा उचलतात. हे तर तसच आहे ना, तुला माझं पटणार नाही "मी घर सोडुन गेलेला बरा" तर दुसरा म्हणतो "तुला माझं पटो न पटो, तुझ्या समजण्याच्या पलिकडे आहे सगळं". थोडक्यात काय तर, जिवनाच्या फोलपणातही फोलपणा आहेच. पण एक मात्र खरं प्रत्येकाला आपला व्हूव पॉइंट आहे, इथे निरर्थक असं काहीच नाही, एक जिवन सोडलतर... प्रजनन ह्या निव्वळ धेय्याला कीती फाटे फोडलेत आपण.

-सत्यजित.

भयभीत सावल्या

तू शांत समई सारखी तेवत असलिस
तरी भींतीवरच्या सावल्यां सतावतात
तुझ्या तेजा पेक्षा तुझ जळणं जाणवत राहतं
शेवटच्या धुराचा दर्प दरवळे पर्यंत
कोणाला कळणारही की तू जळत होतीस
"तेजासाठी कुणाच तरी जळणं अपरीहार्यच"
हे तुझ तत्वज्ञान मला कधीच पटलं नाही
प्रत्येकवेळी माझ्या विचाराना मुर्खात काढत तू म्हणतेस...
सावल्यांच अस्तित्वचमुळी ज्योतीने असतं
सावल्यांच तरी काय? आपलाच आभासतात त्या
जे दुसर्‍याला जाळतं ते जळणं आणि
जे दुसर्‍याला प्रकाशमान करत ते उजळणं
ज्योत कधीच जळत नही ती फक्त उजळतं असते
आता डोळे मिट आणि म्हण "तमसो मा ज्योतिर्गमय"

-सत्यजित.

Monday, February 1, 2010

अनाथांची माय

एक झोळी पाठीवरती
एक शिळीपाकी पोळी
भीक मागत्या हातावरती
मातृत्वाच्या ओळी

कुरवाळल्या रातीचा
अंधार मनाला जाळी
अंगावरचा पान्हा सुकला
सुकल्या पान्ह्याची होळी

माय असते बिना नखांची
ती वांझोटे कुरवाळी
दोन अश्रू स्तनातले
बाळाच्या ओठी ढाळी

केली उकीरडयात रिकामी
भरलेली झोळी
मातृत्व कुणाचे पोटी
दातृत्व कुणाच्या भाळी

माय! तिला फुटतो पान्हा
ऐकुन ती कींकाळी
कोण कुणाची खळगी भरतो?
परी तो मेघ तू हो आभाळी

कितीक तोंडे पाठीवरली
ह्रुदयाशी कवटाळी
घास नको घासातला
ती मागते शीळी पोळी.

-सत्यजित.

Friday, January 29, 2010

एक घास चंद्र ..

आई... तो का गं म्हणतो खेळायला एक चंद्र आण?
आई... मला नको चंद्र फक्त त्याचा एक तुकडा वाढ
आई... ह्या फुटक्या पत्र्याच्या डब्ब्यामध्ये
लाउया का गं एक स्वप्नाचं झाड?
स्वप्नाच्या झाडामागे तरी चंद्र लपेल का?...!!!
रात्र असली तरी अंधार कुठेच नसेल का?
त्या झाडाला लगतील ती स्वप्न मी पाहुन घेईन
माझ्यासाठी थोडी ठेवेन आणि...
थोडी आई तुला देईन..

-सत्यजित.

Tuesday, January 26, 2010

विडंबन : हा वास हा छळतो मला (आभास हा छळतो मला)

मुळ गाणे इथे ऐकता येईल: आभास हा.. http://kahigani.blogspot.com/2008/05/blog-post_6006.html - शेड्यां पासुन मुळां पर्यंत सर्वाची माफी मागुन.

खर तर ह्या विडंबना साठी आभास हा. चे "हा वास हा" येवढेच करणे पुरेसे होते. तरी इतर बदल भावना पुरेपुर उतरवण्या साठी केले आहेत.

विषेश टीपः हे विडंबन वाताचा त्रास , अपचन, बद्ध कोष्ठतेचा त्रास असताना ऐकल्यास विषेश आराम मिळतो. फिदीफिदी तरी प्रयोग अ‍ॅट ओन रीस्क करावा, त्रास वाढल्यास मी जबाबादार नाही.

कधी पूर पूर, कधी टूर टूर, पोट कळवळे आज का
का हे कसे, होते असे, ही आस लागे जीवा
कसा सावरू मी; आवरू ग मी स्वत:
दिसे स्वप्न का हे कुंथतानाही मला

हा वास हा, हा वास हा
छळतो तुला, छळतो मला !

क्षणात सारे उधाण वारे, झुळुक होऊन जाती
कधी दूर तू ही, जवळ वाटे पण, काहीच नाही हाती

मी अशीच हासते; उगीच लाजते, पुन्हा तुला साठवते
मग मिटून डोळे तुला दाबते; तुझ्याचसाठी नाचते

तू नसताना असल्याची कळ का?;
दिसे स्वप्न का हे बसतानाही मला
हा वास हा, हा वास हा
छळतो तुला, छळतो मला !

मनात माझ्या हजार शंका, तुला मी ताणू कसा रे
तू असाच आहेस, तसाच नाहीस, आहेस तू खरा कसा रे

तू इथेच बस न, हळूच हस न, अशीच हवी मला तू
पण माहीत नाही मलाही अजुनी तशीच आहेस का तू

नवे रंग सारे नवी वाटे ही हवा
दिसे स्वप्न का हे कुंथतानाही मला
हा वास हा, हा वास हा
छळतो तुला, छळतो मला !

-सत्यजित