Showing posts with label मनोगत. Show all posts
Showing posts with label मनोगत. Show all posts

Monday, March 5, 2012

अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा...

थांबा बसू नका
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

बाबा पाय दुखले
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

थांब उचलून घेतो हं,
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

बाबा चला ना...
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

बसलात काय?
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

दोघांना उचलून नाही हां जमणार..
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा...

-सत्यजित.

Sunday, February 5, 2012

डाव रडीचा

तू माझा एक प्यादी मारलास
मी रडलो चिडलो डाव उधळून दिला
तू तो डाव तसाच लावलास,
माझी खेळी खेळलास, डाव जिंकून दिलास...

Big cheater you are...

Sunday, January 29, 2012

Ifs 'n Buts

अयुष्यात जर-तर,
असायला नको खरतर
जर नसता, तर नसता
सुख असतं खरोखर

जर असं झालं
तर असं होईल
जर तसं झालं
तर कसं होईल?

जर असं झालं तर?
काढुन ठेवा विमा
जर लॉटरी लागली तर?
सुखाला ना सीमा

देवा देवा असं कर
देवा देवा तसं कर
देवा केलस असं तर
देवा केलस तसं तर

जर-तरनी तर
वाट लावलिय पूरी
आजच्या जगण्याला
उद्याची सुरी

एक जर सुखाचा
शंभर तर दु:खाचे
एक जर मौलाचा
शंभर तर फुकाचे

-सत्यजित.

Tuesday, July 5, 2011

आधारवड

कितीदा तपासुन पाहीली होती फांदी
या वेळी अख्ख झाडच उन्मळून पडलं आहे
गेल्या खेपेस वादळ तरी होत...
आता मात्र.. मी निरखून घेणार आहे
झाड, त्याची मुळं, त्याची फांदी
आजुबाजूची जमिन,
गेल्या दहा वर्षाचे हवामानाचे आराखडे
पण मग सहाशे फुट खोल पाण्याचा साठा?
शेवटी काय अजुन एक कारण राहुन जाईलच
There is nothing called stability,
it is just ability to survive.
एका पायावर तोल सांभाळायचा म्हंटलं
की दोन पायांवरही अस्थिर वाटायला लागतं

-सत्यजित.

Thursday, June 30, 2011

काळ देहासी आला खाऊ

कधी तरी बोलावं आपणच आपल्याशी
कधी तरी एक संवाद साधावा आतल्याशी

तेच व्याप, तेच शाप
तेच पुण्य, तेच पाप
माझ्याच विचारांना मीच होतो पारखा
खरच जगतो का मी आतल्या सारखा?
किती वेळा रेटत जातो मी उगाच आपला मुद्दा
माझ्याच विचारांचा माझ्याच पाठीत गुद्दा

निजताना असते स्वप्नांची भीती
जागताना स्वप्ने तुटण्याची भीती
भीती...? नुसती भीती नाही..
दबक्या पावलांच्या वाटांनी गाठता येणारे
महाल रचलेत मी...
या वाटेत लागतात काही उन्मळूंन पडलेले आधारवड
तर काही घट्ट पारंब्या रोवून उभे असलेले स्थितप्रज्ञ
त्यावरिल चिमण्यांची कधी किलबिल, तर कधी आक्रोश

आधारवड, किलबिल, आक्रोश, चिमण्या... सारे मी ठरवलेले : स्मित :
माझं घेणं ना देणं त्या चिमण्यांशी ना आधारवडांशी
मला हवाय म्हणून, मी केलेला आक्रोश
मला हवाय म्हणून, मी केलेली किलबिल

आता त्याच्याशी संवाद होत नाही, वाद होत जातात
तरिही अजुन एक दिवस काळ आणून ठेवतो हातात
म्हणतो... बघ जमलं तर अजून एक दिवस प्रयत्न कर
"अरे.. काळ आहे मी
प्राण घेतो, तुझ्या सारख्या मृतात्म्यांच काय करू मी?
मला साद हवी आहे तुझी, प्राण नको"
मी हसतो... "आज टळला ना, उद्या पाहू" म्हणतो...

-सत्यजित

Tuesday, April 19, 2011

रांगोळीशी नातं..

किती सवय असतेना आपल्या
नाती जोडत जाण्याची
एका ओळीत चार ठिपके दिसले
की त्यात रेघ पाहण्याची

ठिपक्यांची रांगोळी, ठिपक्यांची चित्र
न जोडलेले ठिपके, किती विचित्र?
कधी वाटतं, पुसाव्यात सगळ्या रेषा
पुन्हा करावेत ठिपके स्वतंत्र

पण स्वतंत्र ठिपक्यांमध्ये रंग भरता
येत नाहीत, असं मला उगा वाटतं
हातात घट्ट धरलेले हात आणि
ठिपके जोडण्याचा पुन्हा हट्ट

ओळीतले बगळे, ढगांचे आकार
असंबंधातुन होतं काहीसं साकार
एक अनामिक ओढ, एक वेडी उर्मी
जोडत जावे ठिपके पुन्हा एक आकार

खरचं का, ठिपक्यांच्या रांगोळी
सोपी असते म्हणुन शिकवलीस?
की रंगाची आणि नात्यांची समज
अलगद होती रुजवलीस?...
अलगद होती रुजवलीस...

-सत्यजित.

Thursday, April 7, 2011

तुकड्यांनाही महत्व आहे

सोडुन आले स्वप्ने सारी डोळ्यांच्या काठांवर
अजुनही फुलतिल वसंत काही सोडलेल्या वाटांवर

भळभळत्या जखमांतून अश्रू अखंड वाहत राहतात
ते भळभळणारे अश्रू पिउन जखमा भरत जातात

आणि, माझ्या वाटेवरती धरू लागतो मोहर
वसंत दारी थाप देतो, मागतो माझा बहर

डोळ्यांच्या तळी हळूच दाटू लागतात स्वप्ने
पुन्हा एक काचेचं घर, पुन्हा नशीबी जपणे

या वेळी मी निवडुन घेते फक्त रंगीत काचा
नव्या वाटेवर करीन म्हणते कॅलीडोस्कोप त्याचा

तुकड्यांनाही महत्व आहे फक्त रंगीत असायला हवेत
मोठे मोठे सोडुन देउन छोटे सोबत घ्यायला हवेत

-सत्यजित

Saturday, January 8, 2011

सराईतपणे जगण्याच कसब मला दे..

सरल्या क्षणांना सराईतपणे विसरण्याचं कसब मला दे...
उरल्या क्षणांना सराईतपणे जगण्याचं कसब मला दे !

पाउस का पडतो? फुले का फुलतात? झूले का झुलतात?
दुःखा पलिकडे जगण्याची एकतरी सबब मला दे !

जरी झाली नाही थोर, दे पावलांत जोर, चालेन म्हणतो...
स्वप्नांना पावलं, पावलांना स्वप्न थोडी अजब जरा दे !

उरल्या क्षणांना सराईतपणे जगण्याच कसब मला दे

-सत्यजित.

Sunday, January 2, 2011

अगदी तस्सं...

जिवनमूल्यांच गाठोडं बांधुन
पाठीवर त्याचं ओझं वहात
अखंड चाललेली पायपिट
कुठल्याश्या टप्प्यावर
गाठोडं उलगडून बघायचं
आणि फक्त जमेच्या फुल्ल्या मारायच्या
टप्पा?...
ईप्सीत माहीत नसताना उगाच
विश्रांतीच्या क्षणांना टप्पा म्हणायचं
म्हणजे कसं जगल्या सारखं वाटतं

मग हे ओझं वहायचंच कशाला?
पालक म्हणुन मुलांच्या खांद्यावर द्यायला...
मन या नसलेल्या अवयवाला
काहीतरी दुखणं नको का ?... नसलेलं का असेना..
वयातही न आलेल्या मुलीला विचारतोच ना..
"सासरी जाउन कसं व्हायचं तुझं?"
अगदी तस्सं...

-सत्यजित.

आस्तिक की पराधीन

मी तुझ्या समोर हात जोडुन
जेंव्हा तुझ्या डोळ्यात पहातो
पहातो तू काही खुणावतोस का?
तूझे डोळे नेहमी सारखेच
प्रेमळ आणि निश्चल
मी तुझ्या डोळ्यात पहात रहतो
मला वाटतं तू हसलास
मला वाटतं तू फ़सलास
मग कधीतरी कुठेतरी
घडतं मना विरुद्ध
मी धावत येतो तुझ्या कडे
तुझ्या समोर हात जोडुन
तुझ्या डोळ्यात पहातो
तुझे डोळे नेहमी सारखेच
प्रेमळ आणि निश्चल
आणि मला वाटतं तू हसलास...

-सत्यजित.

Monday, October 19, 2009

कृत्रीम पाउस

तू आल्यावर पाहू म्हणून, छप्पर गळकंच सोडून दिलं
काल माझं छप्पर, सारं वार्‍यावर सोडून, उडून गेलं

बाबा म्हणाला होता....

आभाळातून बघेल तो, खाली वाकून बघत नाही
दोन-चार कवडशांनी कुणी जळून मरत नाही

बाबा, बघ तुला आधार देत वाशांना तडा गेला
वाशांचा आधार छप्पर सोडून उडून गेला

रहाटाचा कोरडा दोर टोचला असेल ना त्याला
कितीदा तुटला दोर.. कालच कसा तरून गेला ?

आभाळ पाहणारे डोळे आता आभाळातून पाहतात
आभाळातून रडतो बाबा तिथेही अश्रू कोरडे वाहतात

कृत्रिम पाऊस तलावांवर, शेत मात्र करपून जातं
करपलेलं जाळायला, सरकार दुष्काळी पॅकेज देतं !

-सत्यजित.

गीतोपदेश

पुन्हा भिक मागून भडवे
जिंकून येतील निवडणूका
उद्या साले हेच भडवे
करतील आपल्या अडवणूका
खरंच कुणास ठाउक
ह्या देशात कधी होतील का सोडवणूका ?

कुणाला दोष द्यायचा ?
साला... नागडेपणाची फॅशन आलिये
घोटाळे, फ्रॉड, रेप हीच आजची पॅशन झालिये
अगदी असेच नाही, पापभीरूही आहेत
लांब रांगा तासनतास
गंडे, महाराज, रुद्राक्ष, मंत्र तंत्र यंत्र
करा देवाचा धावा
देवही सैतानाच्या आधीन
फक्त पुजारीपणाचा कावा

पूर आला, मदत करा
कारगील झालं, मदत करा
रस्ता केला, टोल भरा
मग आम्ही भरल्या टॅक्सची
सुरळी केलीत कि काय ?
देश विकण्या आधी
तुमच्या आया-बहिणींची मुरळी केलीत कि काय ?

पण मी तरी काय करणार ?
प्रतिज्ञा केलीये लहानपणी
सारे भारतीय माझे बांधव आहेत
हाताबाहेर गेलेले कौरव
थोट्याचा बोटांएवढे पांडव आहेत

आयला ! कृष्णा ?
तू पण बाप आहेस
एवढ्या दिवस झेपलीच नव्हती बघ तुझी गीता !

-सत्यजित.

Thursday, January 22, 2009

अगदी ठाम ठरवून..

परवाच मी आवरायचं म्हणून
पुन्हा पसरुन बसले आवरलेलं
आणि सारं सारं घरंगळलं
मी इतक्या हट्टाने सावरलेलं

काही जीर्ण चिटोर्‍यात..
तर काही गंजल्या कटोर्‍यात
सारं कसं रंजूनही खदखदत होतं
सारं कसं गंजूनही लखलखत होतं...

हळुवार स्पर्शांनी सरल्या क्षणांची
वाढू लागते वर्दळ
हळुवार, मंद.. मंद.. पसरु लागतो..
अगदी.. अगदी त्या वेळीचा दरवळ

तेव्हा हे सारं का जपलं होत?
तेव्हा हे सारं कसं, माझं...
फक्त माझं, आपलं होतं...

पावसाच्या पहिल्या थेंबाप्रमाणे
फुटतं एक खुदकन हसू
आणि गवसतात काही
अंतर्मुख करणारी स्मितं..

मी ओंजळीत पुन्हा पकडू लागते
मायेच्या अंगणातले
सळसळत्या पानातले
ते झुळझुळते कवडसे....
बंद पापण्या लख्ख लख्ख तेजाळतात
ती भरली ओंजळ बघायला मी डोळे उघडते......
ए वेडाबाई... कुठे हरवली होतीस?
मलाच पुसते.. माझी रिती ओंजळ
मी हळुवार डोळे मिटते
आणि उधळून देते माझी भरली ओंजळ...

मी भूतकाळाशी समरस असताना
इथे वर्तमानाची समरं पेटलेली असतात
मी पुन्हा घाईघाईने आवरु लागते
पुन्हा पसरायचं नाही हं, असं ठाम ठरवून...

-. (सत्यजित)

Friday, November 28, 2008

उठा बापू उठा

उठा बापू उठा आणि
द्या पुन्हा अंहीसेचे धडे
तुम्ही उभारल्या पोकळ भींतीना
जाउ लागलेत तडे
रक्ताळलेला हा शुभ्र पंचा
कुठवर मिरवत फिराल
वाटल नव्हत.. त्याच्या शस्त्रास्त्रांच्या ढिगार्‍यात
तुम्ही एक रिकाम काडतुस होउन उराल
अस का केल बापू तुम्ही?
घर झाडू पण दिल नाहीत
आता घर साफ कराव म्हणल
तर भीतींच उरल्या नाहीत
एक गोचिड चिरडवी म्हटल तर
तुमच महात्म्य आडव येत
आपलच रक्त बोटाला लागव
तर हीरव्यांना वावड होत
तुमची आधराला घ्यावी काठी
तर ते उगारली म्हणतात
ती हाणुन आमच्या पाठी
ते सदैव कण्हत असतात
तुम्ही येवढी सवय केलीत
दुसर्‍यांचा मार खायची
त्यांनी एक हात छाटला
तर दुसरा पुढे करायची
तुम्हाला नोटेवरती छापलय
तुम्ही सारं जग व्यापलय
पिसाळलेल कुत्र देखिल
गोंजाराव म्हणत आपलय
तुमच्या अंहीसेच्या कुर्‍हाडीला
अर्धमाचा दांडा
पित्यानेच का घालावा
पोराच्या म्स्तकी धोंडा?
उठा बापू उठा आणि
द्या पुन्हा अंहीसेचे धडे
आम्ही अंगाखांद्यावर खेळवतोय
तुमचे रक्तपिपासु किडे...

Thursday, November 6, 2008

सिगरेटचं थोटूक

एका अशाच काविळलेल्या संध्याकाळी
धुरकटलेल्या श्वासासंगे
हातातल अर्धवट थोटूक सुद्धा प्रकाशत होत,
मला वेड्याच हसु आलं,
थोड्याच वेळात, तो शेवटच्या घटाका मोजत असताना
मी कुठलीही दया न दाखवता
चिरडणार होतो त्याला, ह्या कट्ट्यावर
आणि भिरकावणार होतो अंथांग समुद्रात
तो विझणार होता , तो सुटणार होता,
तो मोकळा होणार होता, मला न विझवता....
भुरभुरणारा वारा होता
हेलकावणारा अंथांग समुद्र
एखादी लाट येउन आदळत होती
माझ्या अर्धोन्मिलीत मनातल
मिणमिण चैतन्य जागत ठेवायला ...
ही संध्याकाळ कधी तरी सोनेरी असायची
अगदी लख्ख सोनेरी...
तिच्या सहवासात, तिच्या गंधात अखंड बुडालेली
अंथांग समुद्राच्या आणि केशरी वर्तुळाच्या साक्षीने
रंगवली जायची कीतीतरी उद्याची स्वप्ने
मग चांदण भरून यायच,
त्या अंधारात लखलखत चांदण पांघरुन सजायचा तो समुद्र..
मी तिला म्हणायचो,
'तू देखिल अशीच सजशिल ना त्या रात्री नुसत लखलखत चांदण लेउन'
ती माझ्या दंडाला चिमटा काढत.. घट्ट बिलगायची
मला कधीच कळायच नाही की तिच अंग का शहारत..?
पश्चिमेच्या गार वार्‍या मुळे.. की माझ्या उधाणलेल्या रुधिरामुळे?
आता कधीच कळणारही नाही...
आता ती उब नाही, ते केशरी वर्तुळ नाही...
आता उरलिय ती फक्त मिणमिणत्या विस्तवाची साथ..
मला दया आली त्याची
एक शेवटचा झुरका घेउन,
मी त्याला बसवल माझ्या शेजारी
माझ्या सारखच कणा कणान
मरण त्याच्याही नशिबी आल होतं ना...
म्हटल "बस! दोघे एकदम राख होउ"
तुला पेटवुन ती काढी कधीचीच विझुन गेली नाही
माझ्या देखिल अयुष्यात ती अशीच आली
एका उजळलेल्या फुरफुरत्या काडी प्रमाणे
नशिबाशी ओंझळ तिच्या प्रकाशाने उजळुन गेली, भरुन गेली
मी देखिल तेवू लागलो होतो तिच्या संगे
वाटल होत आता असेच तेवत राहू एकमेकांसाठी अयुष्याभर..
पण छे! नशिबाची ओंझळ ती...
झटक्यात विरुन गेली,
तिला विझवुन गेली...
आणि मी जगतोय अजुन कणाकणाने जळत.. कणाकणाने जळत...
आता अयुष्य एक सिगरेट थोटुक होउन राहीलय...
कुणी चिरडतय का याची वाट बघत...

-सत्यजित

पाकीजा

उमराव शोधातात की शोधताय नरगिस
इथे पाकीजा शब्दच मुळी खोटा आहे,
वेड्यांन्नो हा फक्त कोठा आहे

उदरात काय पेक्षा पदरात काय
फायद्याच्या सौद्यात तोटा आहे
हा कोठा आहे हा कोठा

चेहरा नाही ना मोहरा नाही
सारा बंद निनावि लखोटा आहे
हा कोठा आहे हा कोठा आहे

कायद्याचा देव, वायद्याचा देव
पुजलेला देव देखिल थोटा आहे
हा कोठा आहे हा कोठा आहे

न दिव्यात वात ना मदतीचा हात
इथे पैसा फक्त मोठा आहे
हा कोठा आहे हा कोठा आहे

अंगाला रंग रंगाला अंग
अंगाचा संग वांझोटा आहे
काय शोधतोस खुळ्या हा कोठा आहे

Thursday, September 11, 2008

जगुन घे रे गड्या.. राहुन जाईल जगायचं...

जगुन घे रे गड्या.. राहुन जाईल जगायचं
मारुन घे रे उड्या.. राहुन जाईल उडायचं
बघता बघता कुपीतलं
अत्तर उडुन जाईल
लाउ लाउ म्हणता म्हणता
कुपी नाहीशी होइल
आज आहे.. उद्या येईल
असेलही परवा
नाही पाहिला उद्या कोणी?
मग कशा फुका पर्वा
जगुन घे रे गड्या एकदाच असत जगायचं
जगताना जगण्यावर ओझ नसत व्हायचं

जगुन घे रे गड्या.. राहुन जाईल जगायचं
मारुन घे रे उड्या.. राहुन जाईल उडायचं....

Tuesday, December 18, 2007

ओळखीचे मुखवटे

रोज नवे मुखवटे बदलताना आपण आपल्यालातर विसरुन जात नाही ना... असूही किंवा नसूही... पण अनोळखी जगात वावरताना...

अनोळखी जगात ओळखीच असं कुणीच नाही
मीही आपणहून माझी ओळख सांगत नाही
मी दडपण मुक्त होत नवी ओळख पांघरुन घेतो
माझ्यातल्या अनोळखीला धरुन
माझ्यातला मी सोडुन देतो

मी भरुन घेतो एक दिर्घ श्वास
आणि पवलावर पावलं आपटावीत म्हणून घेतो एक उडी
छे! नाही जमत...
माझ्यावरच मी हसतो
आणि माझ्यावर हसणार्‍यांवरही
हा आनंद कसला?
मी ह्यांना ओळखत नाही म्हणून?
की हे ज्याच्यावर हसता आहेत
ते त्याला ओळखत नाही म्हणुन?

हसू देत, मीही हसतो..
पण का?माझी नविन ओळख झाली म्हणुन?
की मी माझी पुसली म्हणुन?
मग मनात विचार येतो
लोकांसाठी का मी खोटं जगतो?
माझी ओळख जपायला
मीच माझ्या पासुनच लपुन बसतो

पुन्हा कपाळ सुरकूतं
मन जरास कुरकूरत
माझं अनोळखी मन
माझ्यावरच गुरगूरतं

हे सारं जगच असं
येथे मुखवट्यांचीच जास्त जंत्री
हे अंतिम सत्य अंगिकारत
मी माझ्या सुरुकूत्यांवर मारतो ईस्त्री...

सुरुकूत्याही जाता जाता
पाठ माझी थोपटतात
मी पुन्हा एक उडी घेतो
आणि पावलांवर पावलं आपटतात...

मी आनंदाने मुठ आवळत
मुठ मागे खेचून घेतो
अन अनोळखी डोळ्यातले
कौतुकाचे भाव टिपुन घेतो

ह्या अनोळखी जगात
माझी खरी ओळख असते
जगाला पटो न पटो
माझीच मला ओळख पटते

मग सारं अनोळखी जग हिंडुन
मी ओळखीच्या दारावर थबकतो
माझा मुखवटा सावरतानाच...
दार उघडताच हबकतो

मी घोघर्‍या आवाजात विचारतो
'ओळखलं का मला?
'ते 'हो' म्हणताच
माझच हसु येत मला... माझच हसु येत मला...

-सत्यजित.

Saturday, May 19, 2007

लोच्या झाला रे. . .

पेरूच्या फ़ांदीवर बसुन देखील
पोपट उपाशी
सारे पेरू खाउन गेले
कावळे मघाशी

पोपट म्हणतो. . .

आह ! पेरूच खरा
पेरूच्या पानालादेखील काय स्वाद आहे
सारे कावळे म्हणजे
जन्माची ब्याद आहेत !

कावळे म्हणतात. . .

पोपट पेरू पेरू काय खातो
म्हणून आम्ही सुद्धा मारल्या टोचा
आता बिया अडकल्या आहेत बुडाशी
आणि झालाय सगळाच लोच्या. . .

सत्यजित.

बोचरं देवपण. . .

एवढंही देव होऊ नये
की देवपण टोचू लागेल
तुला सुखावेल आणि
आप्तेष्टांना बोचू लागेल

मागेल जो क्षण दान
हो जरासा सावधान
रहाता नितीचे भान
तेची सुखे करावे दान

दाना सारखे सुख नाही
ऐसी अहंपणाची भूक नाही
कुणा दुखावेल ऐसे दान
ऐसी महाघोर चूक नाही. . .

सत्यजित.