Monday, June 16, 2008

रिटायरमेंट

रिटायरमेंटची सकाळ
जिवनाची संध्याकाळ
मिणमीणते डोळे
टाळू पर्यंत कपाळ

कपाळवर आट्या
भेडसावणारे विचार
ईच्छाशक्ती असते
सांधेदुखीने लाचार

जाड भिंगाच्या चष्म्यातून
जेव्हा भुतकाळात पाहीलं
बरच काही केल तरी
बरच काही राहीलं

अरे बाप आहे मी तुझा
असं सांगाव का लागतं?
हक्काने पॉकेटमनी घेणार्‍याकडे
आज मागाव का लागतं?

आता कमी जरी दिसलं
तरी मनं वाचता येतात
सबबीचे खडे नुसत्या
बोटांनीच वेचता येतात

प्रत्येक घासागणिक हात
आता जास्तच थरथरतात
नुसता मायेच्या स्पर्श मागता
उच्श्वास नुसतेच घुरघूरतात

हाताचा पाळणा माझा
आता पुरता गंजला आहे
राजाच्या गोष्टीतला महल
पडका पत्त्यांचा बंगला आहे

आपल्याच पोटचाच गोळा
झाल्या चुकांवर बोट ठेवतो
कालचा देव्हार्‍यातला दिवा
आज अडगळीत एकटाच तेवतो

हातात कोंबल्या जपमाळेतील
राम देखिल मरा होतो
’अयुष्य एक जुगार’
येवढाच शाप खरा होतो?

-सत्यजित.

Sunday, June 8, 2008

पवार आयपीलात रमला गो नखवा...

चालः गोमू माहेरला जाते गो नाखवा..

पवार आयपीलात रमला गो नाखवा
ह्याला देशातले शेतकरी दाखवा

संसाराची आमच्या झाली होळी
IPLवर भाजतोय करोडोची पोळी
हा भाजतोया करोडोची पोळी
ह्या शेतकर्‍यांना विष तरी चाटवा..

परदेशी पोरींचा नंगा तमाशा
आमची विरली पोलकी हा बघतो कशाला
विरली पोलकी हा बघतो कशाला
नागव्या शेतकर्‍यांना IPLमध्ये नाचवा

कितीही भरला जरी ह्यांनी भरणा
तरी मेल्यांची काही भुक भागना
तरी मेल्यांची भुक भागना
कॄषीमंत्र्यांना कुणी तरी जागवा
ह्यांना देशातले शेतकरी दखवा.....

हय्या हो हय्या हो...