त्या जादूई क्षणात सांग काय दडले होते
मन काबुत नसताना सांग काय घडले होते
तव गोर्या नितळ कांती लव सांजेच्या उन्हाची
फुलल्या श्वासास संध्येचे पिसे जडले होते
अधरामृतात तुझ्या आकंठ संजीवताना
माळुन केसात जुई चांदणे उघडले होते
भाळी ठेवले ओठ सैल केली मिठी जराशी
पण रुणझुणत्या पैजणांत पाउल अडले होते
ढळला हळुच हुंदका अबोला बोलून गेला
तुझ्या पावलांत आसवांचे फुल पडले होते
सोडवून गेलो हात वळवाची होती रात
होता पाऊस खरा का आभाळ रडले होते
न सरली अजुन रात्र ती उरली उरात माझ्या
का कंबखत दैवाने मलाच निवडले होते?...
-सत्यजित.