Friday, September 24, 2010

सहिष्णुतेचे गोडवे गाऊ- जय श्री राम..!!!

आता हया कवितेत राम उरला नाही... 22 जानेवारी 2024... 😂

अमाचा राम आता अयोध्येत , जय श्री राम...

आज देवाचा खटला
मानवाच्या दरबारी
देवा तुझं खरं होत 
मानवा पेक्षा माकडं बरी

आता कसा काय कुणाला
अयोध्येत उरला नाही राम?
सत्ता उपभोगुन झाली
आता तुझं काय काम?

कुणी मस्जिद पाडुन जिंकुन येत
कुणी मस्जिद बांधुन येतील जिंकुन
ढूंगणं वर होताना तुलाही पाहतील डूंकुन

त्यांची मात्र खरी श्रद्धा
आमची सारी थेरं आहेत
तुझी वानरं वनात राहीली 
इथे धोब्याची पोरं आहेत

मंदिर बांधण सोप नाही
आता कायदा आड येतो
निधर्मी देशात आमच्या 
भगवा हीरव्या आड होतो

तेंव्हा चौदा वर्षांनी वनवास संपला
आता चौदा वर्षांनी करतात कोर्टात उभा
तुला पुन्हा वनवासात धाडण्याची
 कायद्या अंतर्गत आहे मुभा

तेव्हा पितृ वचनासाठी गेलास
आता आमच्यासाठी जा
इथे बंदी होऊन रहाण्या पेक्षा 
वनवासात सुखी रहा..

संकट येता आजही
आम्ही तुझचं स्तोत्र गाऊ
राम-रहीम एक म्हणतं 
सहिष्णुतेचे गोडवे गाऊ

-सत्यजित.

Monday, September 20, 2010

क्षणभर जिंदगी

उन्ह कोवळं कोवळं
तुझ्या कांतीहुन सावळं
तुझ्या ओल्या केसां मध्ये
दडे दवाचं सोवळं

तुझ्या पापणीशी झुले
एक दवबिंदू प्यारा
तुझ्या पापण्यांनी उडे
फुलपाखरी मोहोळ

चुके क्षणांचा मेळ
कधी येते सांजवेळ
दूर तारकांस मिळे
तुझा प्रकाश नितळ

जेंव्हा फुलारून येते
नभी नक्षत्रांची वेल
अन रात काळी होते
डोह डोळ्यांचे काजळ

माझ्या मनात उठले
भाव-विभोर तुफान
घाल थोडीशी फुंकर
बघ क्षमेल वादळ

-सत्यजित.


--------------------------------------------------------------------------------------
माझी कविता मलाच उलघडते तेंव्हा...


उन्ह कोवळं कोवळं
तुझ्या कांतीहुन सावळं
तुझ्या ओल्या केसां मध्ये
दडे दवाचं सोवळं

एका सुंदरश्या सकाळी नववधू प्रमाणे दवाचा घुंगटा ओढुन बसलेली धरा, तिचा घुंगटा उलघडण्यासाठी आतुर झालेली सुर्याची कोवळी किरण पुढे सरसावतात आणि तू दिसतेस. आत्ता न्हाउन निघालेली, ओले केस हळुवार बांधलेली. त्या सोनेरी किरणां पेक्षा तुझं रुप अधिक मोहक दिसतंय आणि वाटतंय...

तुझ्या पापणीशी झुले
एक दवबिंदू प्यारा
तुझ्या पापण्यांनी उडे
फुलपाखरी मोहोळ

तुझ्या केसातील पाण्याचा एक थेंब कुठे तरी लगबगीने निघालाय, आणि तुझे सुंदर डोळे पाहताच तुझ्या पापणीवर स्थिरावलाय, तुझ्या पापणीवर स्थिरावलेला हा थेंब गुलाबाच्या पाकळ्यांवरील दबबिंदू सारखा दिसतो आहे. त्याच्या ह्या धिटाईला दटावण्या साठी तू पापण्यांची उघडझाप करतेस आणि माझ्या अंतरंगात अनेक फुलपाखरं उडु लागतात....

चुके क्षणांचा मेळ
कधी येते सांजवेळ
दूर तारकांस मिळे
तुझा प्रकाश नितळ

वेळेचं भान राहीलं नाही, कितीसे क्षण एका क्षणात सामावुन गेले आहे "एक पल में जींली जिंदगी सारी", मी पार हरवुन गेलो आहे. हळुवार सांज कधी आली कळलं सुद्धा नाही. चांदण प्रकाशात तुझं रुप येवढं खुललं आहे की वाटतंय ह्या तारका तुझाच प्रकाश घेउन लखलखताहेत.

जेंव्हा फुलारून येते
नभी नक्षत्रांची वेल
अन रात काळी होते
डोह डोळ्यांचे काजळ

सांज मावळली, एक दोन तारकांचं आभाळ आता नक्षत्रांनी भरुन गेलं आहे. ही काळी रात्र तुझ्या डोळ्यांचं काजळ झाल्या सारखी भासते आहे. तुझ्या खोल अथांग डोळ्यात हरवुन जावसं वाटत आहे.

माझ्या मनात उठले
भाव-विभोर तुफान
घाल थोडीशी फुंकर
बघ क्षमेल वादळ

माझी मनस्थिती मला काही कळण्याच्या पलिकडे निघुन गेली आहे. मनात भावनांचं काहूर उठलं आहे. तू माझ्याशी बोलावंस असा माझा हट्ट नाही पण, एखादा कटाक्ष देखिल ह्या वेड्या मनाला स्वस्थ करील.

-सत्यजित. (Satyajit Malavde)

क्षणांचा पिंजरा

तुझ्या मुठीतील माझे हात
हे स्पर्शाचे इंद्रीय तुझ्याचसाठी

तुज साठी जागते सारी रात
हे स्वप्नांचे इंद्रीय तुझ्याचसाठी

शहार्‍यांस जेंव्हा येते जाग
हे जाणिवांचे इंद्रीय तुझ्याचसाठी

पापणी लांधून वाहते पाणी
हे भावनांचे इंद्रीय तुझ्याच साठी

तुझ्या क्षणांचा होतो पिंजरा
हे आठवांचे इंद्रीय तुझ्याचसाठी

-सत्यजित.