किती सवय असतेना आपल्या
नाती जोडत जाण्याची
एका ओळीत चार ठिपके दिसले
की त्यात रेघ पाहण्याची
ठिपक्यांची रांगोळी, ठिपक्यांची चित्र
न जोडलेले ठिपके, किती विचित्र?
कधी वाटतं, पुसाव्यात सगळ्या रेषा
पुन्हा करावेत ठिपके स्वतंत्र
पण स्वतंत्र ठिपक्यांमध्ये रंग भरता
येत नाहीत, असं मला उगा वाटतं
हातात घट्ट धरलेले हात आणि
ठिपके जोडण्याचा पुन्हा हट्ट
ओळीतले बगळे, ढगांचे आकार
असंबंधातुन होतं काहीसं साकार
एक अनामिक ओढ, एक वेडी उर्मी
जोडत जावे ठिपके पुन्हा एक आकार
खरचं का, ठिपक्यांच्या रांगोळी
सोपी असते म्हणुन शिकवलीस?
की रंगाची आणि नात्यांची समज
अलगद होती रुजवलीस?...
अलगद होती रुजवलीस...
-सत्यजित.
मस्त कविता :-)
ReplyDelete