Tuesday, November 13, 2012

"शुभ दिपावली"



क्षितीजाच्या मुठी हळुवार उघडते
अन होते एक सकाळ
मुठीतला सूर्य हळूवार उधळते
अन होते एक सकळ

सूर्यही अजुन दवांना लपेटून
क्षितीजाच्या दुलईत लपतो
गुलाबी स्वप्नांची तुटलेली रे़कॉर्ड
मी पुन्हा प्ले होते का बघतो

ओल्या केसांनी वावरत असतं
कुंकवान भरल कपाळ
सूर्यही फिका चंद्रही फिका
नक्षत्रांनी उजळली सकाळ

शीळ घालता मस्तवाल वारा
माझ्या खिडकीशी येउन अडतो
त्यालाही ठाव ती सुकवताना केस
प्राजक्ताचा सडा पडतो

रंगानी सजली, रांगोळी भिजली
दिव्याची ज्योत न्हाऊन बसली
हिरवा चुडा अन हळद ओली
नववधूशी भासे झेंडूची माळ

नविन कपड्यात अवघडला कंदील
चूळबूळ करत असतो
आईची हाक आणि बांबाचा धाक
नसला तरीही मी ऊठतो

मी भरभर उठतो, सरसर आवरतो
हात जोडण्या आधी घरी फोन करतो
आई तितक्याच कौतूकाने बघते
अन हसते एक सकाळ

"शुभ दिपावली"
शब्द औक्षण करतात,
नभीचा सुर्य मुठीत कोंबते
पुन्हा हसते एक सकाळ..

-सत्यजित.

No comments:

Post a Comment