Wednesday, December 19, 2012

व्यसनी

अजुनही आपसूक वळते


नजर त्या खिडकी पाशी

फरक इतकाच की

आता प्रश्न पडतात

तेंव्हा वादळं उठायची



आता नकोशी उत्तरं असलेले

नको ते प्रश्न

तेंव्हा हवीहवीशी असणारी

नको ती वादळं...



तशी खिडकी सामान्यच

पण ह्या खिडकीत, "भुरळ" होती

पाडगावकरांच्या कवितेतला बकूळ होता

नाधोंच्या कवितांतला पाऊस होता

बोरकरांच्या कवितांतला 'पहिला' रोमांस होता

ग्रेसांच्या कवितांतली हुरहुर होती

त्या पलिकडे जाऊन

शब्दां शिवाय मनात रेंगाळत

रहाणारी 'एक' कविता होती



काही गोष्टी सवयीने

किती सवयीच्या होतात

तर काही गोष्टी

सवयी लावून जातात



मी इतकी वर्ष बघतो आहे

त्या खिडकी कडे

पण कधीच थांबलो नाही

पण...काल अचानक मनात विचार आला

की खिडकीतुनही कोणी बघत असेल का

इतकी वर्ष...?  मी थांबायची वाट पहातं...



मगाशी म्हंटलं ना..

नकोशी उत्तरं असलेले... नको ते प्रश्न



-सत्यजित.

Wednesday, December 12, 2012

सचिन तेंडूलकर- The God Of Cricket

सचिन ने शतकी शतक केलं होतं तेंव्हाची ही कविता... Sachin Ramesh Tendulkar -God of cricket...

आज महाराष्ट्राचा सह्याद्री
हिमालयाहून उंच झाला
फक्त पाच फूट पाच इंच
हाईट दिली आहे त्याला

तू टोलवलेला चेंडु जेव्हा
सीमेपार जातो
तुझं कौतूक पाहायला
प्रत्येक डोळा आई होतो

दुडूदूडू पावलांची चिंता
फक्त आईच्या मनाला
सारा देश तुझी आई होतो
तू लागलास की खेळायला

पदकांचेही शतक
शतकांचेही शतक
कौतूक तुझं पहातं रहावं
तू खेळत रहावस अथक

कुणी खुळे विचारतात
देव कधी का पाहीला?
अहो परवाच नाही का...
टीम इंडियाने त्याला विश्वचषक वाहीला

  -सत्यजित.