Wednesday, December 19, 2012

व्यसनी

अजुनही आपसूक वळते


नजर त्या खिडकी पाशी

फरक इतकाच की

आता प्रश्न पडतात

तेंव्हा वादळं उठायची



आता नकोशी उत्तरं असलेले

नको ते प्रश्न

तेंव्हा हवीहवीशी असणारी

नको ती वादळं...



तशी खिडकी सामान्यच

पण ह्या खिडकीत, "भुरळ" होती

पाडगावकरांच्या कवितेतला बकूळ होता

नाधोंच्या कवितांतला पाऊस होता

बोरकरांच्या कवितांतला 'पहिला' रोमांस होता

ग्रेसांच्या कवितांतली हुरहुर होती

त्या पलिकडे जाऊन

शब्दां शिवाय मनात रेंगाळत

रहाणारी 'एक' कविता होती



काही गोष्टी सवयीने

किती सवयीच्या होतात

तर काही गोष्टी

सवयी लावून जातात



मी इतकी वर्ष बघतो आहे

त्या खिडकी कडे

पण कधीच थांबलो नाही

पण...काल अचानक मनात विचार आला

की खिडकीतुनही कोणी बघत असेल का

इतकी वर्ष...?  मी थांबायची वाट पहातं...



मगाशी म्हंटलं ना..

नकोशी उत्तरं असलेले... नको ते प्रश्न



-सत्यजित.

No comments:

Post a Comment