Tuesday, October 13, 2015

प्रिझम आणि कुर्म अवतार

जेंव्हा मी वाचातो काही कविता
तेंव्हा बुचकळ्यात टाकतात त्या मला
ह्या कविता असतात 'प्रिझम' सारख्या
आपल्या रोजच्याच जिवनातल्या
रोजच्याच घटना ह्यातुन पहाता
उलघडून दाखवता ह्या जिवनाचे
अनेक रंग, अनेक पैलू
एर्‍हवी कुर्म अवतारात जगणारे आम्ही
टाळत असतो त्याच्या कडे पहाणं
सारी इंद्रिय पोटाशी घेउन
विचारतो असतो स्वतःलाच
"कसं काय सुचत असेल ना ह्याना?"
इतकं अवघड नाही हो कविता लिहीण....

-सत्यजित.

Tuesday, August 26, 2014

प्रेमाच दुखणं

इतकी साधी सरळ गोष्ट
इतकी अवघड होउन बसते
रोजच तर बोलतो आम्ही
आजच का ती इतकी हसते?

सहजच हसता हसता
सहजच हाती देते हात
सहजच सहजच म्हणता म्हणता
वणवा पेटतो खोल आत

सहजच सहजच म्हणते ती
पण इतकं काही सहज नसतं
मेंदू, छाती, ह्रुदय याहून
मन काही तरी वेगळच असतं

का हा मनीचा नवा छंद
की हा मनीचा चाळा आहे
तिच्या आठवांच्या तरू खाली
स्वप्नांची भरली शाळा आहे

माझच मला कळतय की
हे माझ असं होऊ नये
आणि समजुन उमजुन झालं
तर प्रेम त्याला म्हणू नये

पण सांगाव तरी तिला कसं?
एकवार वाटतं होईल हसं
सांगुन टाकलं जरी कसं बसं
नाही म्हणाली तर होईल कसं?

"TO BE OR NOT TO BE?"
इतका का सोप्पा पेच आहे?
प्राजक्ताने भरली ओंजळ
वा भळभळणारी ठेच आहे....

-सत्यजित.

Tuesday, March 4, 2014

अजब सोहळा - Fall Colors

एक जीर्ण पोक्त पान
झाडावरुन कोसळलं
त्या पडत्या पानाला पाहून
झाडंही थोडं हळहळलं

हिरव्या कोवळ्या पालवीच्या
कडा तेंव्हा झाल्या ओल्या
वादळ तगल्या पानाचाही
कधीतरी होतो पाचोळा

वार्‍यावरती चालली होती
फरफट त्या पानाची
मृत्यू का ठरवतो किंमत
प्रत्येकाच्या जगण्याची?

वार्‍यावरती उडत पान
झाडाहून ही उंच गेलं
डवरलेलं झाड पाहुनी
पान मात्र हबकून गेलं

क्षणात साक्षात्कार झाला
जीवनाचा अर्थ कळाला
वार्‍या संगे फेर धरोनी
नाचू लागला पाचोळा

कुणी तरी ते पान
भगवद्गीतेत जपलं आहे
त्या जीर्ण पानाच्या जाळीत
जीवनसार लपलं आहे.

-सत्यजित.

Sunday, January 26, 2014

नयनामृत

आता फारसं जाणं होत नाही
की जाववत नाही कुणास ठाऊक?
पण गेलो की जाऊन बसतो
विहीरीवर तासंतास
ही विहीर बघितली की
आठवतात तुझे कथिल पाणेरी डोळे..

कधी दुथडी भरुन वाहणारे
तर कधी गहन खोल
आता विहीरीच्या काठावरती
तुझ्या डोळ्यांची आर्त ओल

दिसते मा़झी छबी खोल
पण आता थोडीशी अंधूक
विहीर होते डोळ्या देखत
ओल्या आठवणींची संदूक

इतक्यात कुणी माहेरवाशीण
विहीरीचे ओढते पाणी
मी ओंझळ पसरुन मागुन घेतो
तिच्या कळशीतले थोडे पाणी
.....
...
-सत्यजित.

Saturday, September 14, 2013

घोर

ती थांबली दचकली बिचकली सटकली
मी तिथेच उभा
ती का थांबली?
ती का दचकली?
ती का बिचकली?

जेव्हा कळले
तेव्हा सटकली
येवढेच सलले
पैंजणतले झूल
आडोशाशी हलले
हॄदयातुन कानात
बांधललेल्या तारा
गिटारच्या शेवटच्या तारे
सारख्या झनकारू लागल्या
आणि आडोशीच्या सावल्या
तेवढ्यातच भागल्या

खरच होत्या का सावल्या?
का ती खरच होती दचकली?
ती पुन्हा दिसे पर्यत
कल्पनेच्या कुरणात
अनेक स्वप्न फुलतिल
घोर घोंगावत राहील अधुन मधुन...

Friday, April 19, 2013

नाटक काय ? हम्म्म... (बालगीत)

मुसूमुसू मुसूमुसू रडतंय कोण ?
हातांमागे दडतंय कोण
दोन बोंटाचा झाला कोन
... गुपचुप बघतात डोळे दोन

कुठुनी आला राज कुमार
बोटां वरती होऊन स्वार
दुडुदुडु दुडुदुडु पळू लागता
खुदकन झाले रडू पसार

गुदुगुदु गुदुगुदु गुदगुल्या
खुदूखुदू खुदूखुदू खुदखुदल्या

नाटSSSक काय ? हम्म्म...

-सत्यजित.

Saturday, April 13, 2013

काचभर तडा....

काल पुस्तकांच्या कपाटातून
जुन्या पत्रांचा गठ्ठा पडला
काचेच्या तुकड्यां सारखी
विखुरली सारी पत्र
पण आवाज न करता...

कितीही सांभाळुन
वेचायच्या म्हंटल तरी
घुसतातच काही काचा
आणि ठुसठूसत रहातात बराच वेळ

वेदना सरावाच्या झाल्या की
मी पुन्हा त्या पत्रांचा गठ्ठा बांधतो
आणि जपून ठेवतो...

तडा गेलेल्या भांड्यालाही
फुटायच भय असतंच की

-सत्यजित.

Tuesday, April 2, 2013

एका शब्दाची अंगाई

"आई"

आई.... आई... आई
एका शब्दाची अंगाई

लहानपणी वाटायचं
कधी होईन मी मोठा
किती तरी असेल रुबाब
खिशामध्ये गच्च नोटा

खुप पैसे असले म्हणजे
किती किती मज्जा येईल
गोळ्या चिंचा बोरं चॉकलेटं
सारं काही घेता येईल

हट्ट सारे पुरवायचीस
कीती लाड करायचीस
शिंग अजुन छोटी आहेत
असं काहीस म्हणायचीस

तू कौतुकाने हसायचीस
कुशीत घेऊन बसायचीस
खुप मोठा हो रे राजा
कुरवाळत म्हणायचीस

कधी तरी शिंग फुटता
वाटलं मोठा झालो आता
मला सगळं कळतं बरं
काळजी करु नको आता

पंखा मध्ये बळ येता
पिल्लू घरटं सोडून उडतं
सुवर्ण कडांच्या नभांवर
त्याच तेंव्हा प्रेम जडतं

ढग म्हणजे नुसतं बाष्प
खरं काही असत नाही
इतके दुर जातो आपण
घरटं मागे दिसत नाही

तुझ्या कुशीत बघितलेली
सारी स्वप्न साकार झालीत
इतका मोठा झालो आई
शिंग कुठेशी पसार झालीत

त्या क्षणी कुशीत तुझ्या
खरं तर सगळं होत
आता जगतो आहे त्याहुन
स्वप्न ते काय वेगळ होतं

भीती वाटता आता तुझ्या
कुशीत शिरता येत नाही
आनंदात उडी मारुन
कडेवर चढता येत नाही

आई मला पुन्हा तसं
छोटं छोटं बाळ कर
आई माझे पुन्हा तसे
खरेखुरे लाड कर

बरं नसता उशापाशी
आई पुन्हा तशीच बस
घाबरुन तुला बिलगता
आई पुन्हा तशीच हस

तू हसलीस की कळायच
घाबरण्याच कारण नाही
तू घाबरलीस की म्हणायचीस
होशील तेंव्हा कळेल आई

अजुन जेंव्हा कुशीत तुझ्या
मी डोकं ठेऊन निजतो
तेंव्हा मी कुणीच नसतो
फक्त तुझ बाळ असतो

देवा मला शहाणा कर
देवा मला मोठा कर
देवा मला पुढल्या जन्मी
माझ्या आईची आई कर

आई... आई... आई
एका शब्दाची अंगाई
सार्‍या विश्वाची करुणाई
आई... आई... आई

-सत्यजित

Friday, March 29, 2013

तोतया

भावनांच्या भाऊगर्दीत
हरवतं जात माझं मन
आणि शोध घ्यावा
लागतो मलाच माझा
नाती धुंडाळावी लागतात
उपकारांचे हिशोब मांडावे लागतात
पालथे करावे लागतात
भुतकाळाचे अनेक खण
अनेक चाव्या लावुनही
न उघडणारे अनेक कप्पे तसेच..
नक्की कुठे दडलोय?
की हरवलोय मी?
काही सुगावा नाही
जुन्या अल्बमच्या ढिगात
शोधतो मी माझा फोटो
माझ्या सारख्या दिसणार्‍या
एका व्यक्तीच अस्तित्व जाणवतं
पण मी कुठेच नाही
तो तोतया का मी तोतया?
असा कसा काळाच्या ओघात
अख्खा माणुस हरवून जातो
आणि तो तोतया मलाच
त्याच घर करुन रहातो
आता मी सापडण्याची शक्यता नाहीच
ह्या तोतयाचा तोतया तरी सापडावा

-सत्यजित.

Saturday, March 16, 2013

डर की चिडीयां

शाम की दहलीज पर एक चिडिया


आके बैठी मेरे खिडकी पर

चिडीया जैसी चीडिया थी

सीधीसी पर बढिया थी

देख रही इधर-उधर डर के

कोई आ न जाये इस घर से

मैने सोचा कुछ दाने डालूं इसे

पर हिला तक नही बैठा रहा चुप से

शायद उसका डर मै ही था और मेरा भी

फिर एक ख़याल आया,

"बैठी होगी थक कर घर को लौटते हुवे"

मै झट से ऊठा और उसे डराया

'अंधेरा होने से है' कहके उसे भगाया

अब पहुंचही जायेगी अंधेरा होने से पहले

ऐसा कई बार हुवा है मेरे साथ भी पहले

-सत्यजित

Friday, March 15, 2013

जाणवेल इतका जवळ रहा...

असा कसा गेलास सोडून


सुजले डोळे लाल रडून

आता तुझे बोल नाही

जिवनाला मोल नाही



राहिल्या गप्पा अर्ध्या-वर्ध्या

पट उधळता कसल्या स्पर्धा



एक डाव मांडू पुन्हा

चल एकदा भांडू पुन्हा ....



निरोप पाठवून सुद्धा आता

तुला मिळणार नाही

कसा आहेस इतकं सुद्धा

आता कळणार नाही



राग येतो असा कसा

न सांगता सोडून गेलास

गृहित धरलं वचन तेवढं

न बोलता मोडून गेलास



शपथ घातली असती तर

थांबला असतास का रे?

खरच का रे माणुस जाता

होतात त्यांचे तारे?



खरच का रे दूर तार्‍यांत

बसला आहेस दडून?

तुझे देखिल डोळे लाल

झाले असतिल रडून



असा वाटत काल चक्र

पुन्हा मागे न्याव

तुझं माझं नशिब तेवढं

बदलता बदलून घ्यावं



बघ विज्ञानाने माणसाला

हेही साध्य होईल

तुझे माझे हरवले क्षण

काळ पुन्हा हाती देईल



सगळे म्हणतात तशी मला

सवय होईल का रे?

प्राणा शिवाय शरीर नुसत

हलत राहील ना रे



मी आवरुन येई

पर्यंत तिथेच थांब बरं

चालत बोलत असणं

म्हणजे जगणं नसत खरं



आता इथून पुढे मात्र

सोडून नको जाऊस

मागितलेलं वचन येवढं

तोडून नको जाऊस



मी आपलं बोलत राहीन

तू तेवढं ऐकत रहा

अदृष्यात असलास तरी

जाणवेल इतका जवळ रहा...



-सत्यजित.

Wednesday, March 13, 2013

जल्ला मेला फेसबुकच्या आवशी चो घो (मालवणी फोडणी)

गाव वाल्यान्नू फेसबूकान लई वात आणलेलो असा, ह्याचा काय कारुचा मका सुचाक न्हाय म्हणुन ह्या गाणा. ह्या कोळी गीताच्या (हिच काय गो) चालीवरचा मालवणी गीत असा, कसा वाटता ता नक्की कळवा बरे..


हाडलाय गो कुठुनशी मोबाईल, मारता मेलो स्टाईल
नेटवर्कचो नाय पत्तो नी व्हया थ्री -जी मोबाईल

फोटोंका करता लाईक
टाकता फाल्तू कमेंट
मोबाईलचो माज इलो
व्हयी कशाक इतकी घमेंड?
लाळ गाळता बघुन आयटम चेडवांचे प्रोफाईल
नेटवर्कचो नाय पत्तो नी व्हया थ्री -जी मोबाईल

काय करतंय देता हो
कशाक स्टेटस अपडेट?
परसाक गेल्यार थयसुन
केल्यान लोकेशन अपडेट
मित्रांनी इचारला ह्याका बरो असा का रे पाईल?
नेटवर्कचो नाय पत्तो नी व्हया थ्री -जी मोबाईल..... हाडलाय गो

बरा झाला असता जर
वाचली शाळयेची चार बूकं
इंग्लीश मेल्याक येणा नाय
नी करता फेसबूकं
सोड ह्यो नाद भलतो रे वाया जिंदगी ही जाईल
नेटवर्कचो नाय पत्तो नी व्हया थ्री -जी मोबाईल.....हाडलाय गो

अंट्या सगल्या लावत्यात फोटू
चेडवांचे बारक्या बारक्या
फोटू बघान टाकताहा रिक्वेस्ट
अंटींका सारख्या सारख्या
गावातली निघाली अंटी तर चपलेन मार खाईल
नेटवर्कचो नाय पत्तो नी व्हया थ्री -जी मोबाईल.....हाडलाय गो

म्हने शेतीयेची आवड ह्याका
म्हनून खे़ळताहा फार्मविल्ले
बापाशीक कळ्ळा तर ठोकतलो
ढूंगणात चार खिल्ले
बापाशीची ह्याच्या चल्ली वणवण मैलो-न-मैल
नेटवर्कचो नाय पत्तो नी व्हया थ्री -जी मोबाईल.....हाडलाय गो.

आयफोन व्हया गॅलेक्सी व्हये
कशाक नसते फॅड
काय तरी बनान दाखव
कर्तली चेडवा स्वता:हुन अ‍ॅड
लायकी कुणाची ठरत नसता पाहुन फेसबुक प्रोफाईल
नेटवर्कचो नाय पत्तो नी व्हया थ्री -जी मोबाईल.....हाडलाय गो

-सत्यजित.

* विषेश आभार: मालवणी सुधारणा केल्या बद्दल वैभव आयरे (vaibhavayare12345) यांचे खुप खुप आभार.

Wednesday, December 19, 2012

व्यसनी

अजुनही आपसूक वळते


नजर त्या खिडकी पाशी

फरक इतकाच की

आता प्रश्न पडतात

तेंव्हा वादळं उठायची



आता नकोशी उत्तरं असलेले

नको ते प्रश्न

तेंव्हा हवीहवीशी असणारी

नको ती वादळं...



तशी खिडकी सामान्यच

पण ह्या खिडकीत, "भुरळ" होती

पाडगावकरांच्या कवितेतला बकूळ होता

नाधोंच्या कवितांतला पाऊस होता

बोरकरांच्या कवितांतला 'पहिला' रोमांस होता

ग्रेसांच्या कवितांतली हुरहुर होती

त्या पलिकडे जाऊन

शब्दां शिवाय मनात रेंगाळत

रहाणारी 'एक' कविता होती



काही गोष्टी सवयीने

किती सवयीच्या होतात

तर काही गोष्टी

सवयी लावून जातात



मी इतकी वर्ष बघतो आहे

त्या खिडकी कडे

पण कधीच थांबलो नाही

पण...काल अचानक मनात विचार आला

की खिडकीतुनही कोणी बघत असेल का

इतकी वर्ष...?  मी थांबायची वाट पहातं...



मगाशी म्हंटलं ना..

नकोशी उत्तरं असलेले... नको ते प्रश्न



-सत्यजित.

Wednesday, December 12, 2012

सचिन तेंडूलकर- The God Of Cricket

सचिन ने शतकी शतक केलं होतं तेंव्हाची ही कविता... Sachin Ramesh Tendulkar -God of cricket...

आज महाराष्ट्राचा सह्याद्री
हिमालयाहून उंच झाला
फक्त पाच फूट पाच इंच
हाईट दिली आहे त्याला

तू टोलवलेला चेंडु जेव्हा
सीमेपार जातो
तुझं कौतूक पाहायला
प्रत्येक डोळा आई होतो

दुडूदूडू पावलांची चिंता
फक्त आईच्या मनाला
सारा देश तुझी आई होतो
तू लागलास की खेळायला

पदकांचेही शतक
शतकांचेही शतक
कौतूक तुझं पहातं रहावं
तू खेळत रहावस अथक

कुणी खुळे विचारतात
देव कधी का पाहीला?
अहो परवाच नाही का...
टीम इंडियाने त्याला विश्वचषक वाहीला

  -सत्यजित.

Tuesday, November 13, 2012

"शुभ दिपावली"



क्षितीजाच्या मुठी हळुवार उघडते
अन होते एक सकाळ
मुठीतला सूर्य हळूवार उधळते
अन होते एक सकळ

सूर्यही अजुन दवांना लपेटून
क्षितीजाच्या दुलईत लपतो
गुलाबी स्वप्नांची तुटलेली रे़कॉर्ड
मी पुन्हा प्ले होते का बघतो

ओल्या केसांनी वावरत असतं
कुंकवान भरल कपाळ
सूर्यही फिका चंद्रही फिका
नक्षत्रांनी उजळली सकाळ

शीळ घालता मस्तवाल वारा
माझ्या खिडकीशी येउन अडतो
त्यालाही ठाव ती सुकवताना केस
प्राजक्ताचा सडा पडतो

रंगानी सजली, रांगोळी भिजली
दिव्याची ज्योत न्हाऊन बसली
हिरवा चुडा अन हळद ओली
नववधूशी भासे झेंडूची माळ

नविन कपड्यात अवघडला कंदील
चूळबूळ करत असतो
आईची हाक आणि बांबाचा धाक
नसला तरीही मी ऊठतो

मी भरभर उठतो, सरसर आवरतो
हात जोडण्या आधी घरी फोन करतो
आई तितक्याच कौतूकाने बघते
अन हसते एक सकाळ

"शुभ दिपावली"
शब्द औक्षण करतात,
नभीचा सुर्य मुठीत कोंबते
पुन्हा हसते एक सकाळ..

-सत्यजित.

Friday, August 17, 2012

विडंबन - हाची सोनियाचा मनु

प्रेरणा : आजी सोनियाचा दिनु


हाची सोनियाचा मनु
वागे श्वानापरी जणू
दारी बांधीला रे... दारी बांधीला रे

सहाय्य मड्डमकरी
चाले तिच्या हुकमावरी
दारी बांधीला रे... दारी बांधीला रे.. हाची सोनियाचा..

मॅडमचे मन मोही
पाठीघाले देशद्रोही
हा ही वाहीला रे .. हा ही वाहीला रे

घडता भ्रष्ट उठाठेवी
कानावर हात ठेवी
नाही राहीला रे.. नर नाही राहीला रे.. हाची सोनियाचा

असला षंड सरदारु
आत्मघाती बुच मारु
नाही पाहीला रे... नाही पाहीला रे.. हाची सोनियाचा

कृपा करी भरणाभरु
पाप रक्कमा ठेवी करु
हा ही वाहीला रे .. हा ही वाहीला रे .. हाची सोनियाचा

हाची सोनियाचा मनु
वागे श्वानापरी जणू
दारी बांधीला रे... दारी बांधीला रे

- सत्यजित.

नभव्याकुळ

लाडानं पोसणार्‍या

मायेच्या सुरकुत्या
आता भेगा झाल्या
आणि पाऊस फक्त
उरला कवितां पुरता


पदराचा ओचा आणि
धोतराचा सोगा
असतोच मुळी साऊंडप्रूफ
नभव्याकुळ डोळे
 झालेत आता वॉटरप्रूफ


अँटी व्रिंकल्स अन
मॉईश्चराईजर्स
वापरणार्‍यांचा दावा
भेगांच काय येवढं?
क्रॅक क्रीम लावा !


तुमच्या व्रिंकल्स येवढ्या
भेगा काही खोल नाहीत
बाटली शिवाय पाण्याला
नी कुंडी शिवाय मातीला
तसंही इथे मोल नाही


कोण म्हणतो पाणी नाही?
पंधरा रुपये लिटरने
अख्खा समुद्र कसा
काय घाण करतात
ही शहरातली गटारं?


पाऊस आता फक्त
कवितेचं पीक घेतो
कधी रोमँटीक तर
कधी ओलेत्या
कल्पनांची भीक देतो.



-सत्यजित.

Friday, June 15, 2012

अनावृत्त पाऊस

ती खिडकीतुन बघता पाऊस

पाऊस काचेवर रेंगाळला

नभ गुरगुरता त्याचे वरती

पाऊस किती बरं ओशाळला



नभास दिसते नुसती खिडकी

अन दिसते ना काही

स्पर्शावे तिने थेंबास म्हणोनी

पाऊस रेंगाळत राही



कोपे नभ ओढी पाठीवर

लकलकता आसूड

लखलखली ती विजेहून

पाऊस वेडा अल्लड हूड



नभास आले कळोनी सारे

तिरक्या केल्या धारा

काचेवरुनी थेंब झटकण्या

घोंगावत ये वारा



फरफरटले ते काचेवरती

तरी न सोडला धीर

वादळात त्या उभे ठाकले

ईवलेसे प्रेम वीर



काचेवरती आर्त थाप

पण तिला कसे कळावे?

थेंबांचे न दिसती अश्रू

मग कोणी कसे पुसावे?



काय भासले तिला कळे ना

ठेवले अधर काचेवरती

गहिवरला कोसळला पाऊस

पुलकित झाली धरती



-सत्यजित.



Monday, May 28, 2012

बादल के बंद लिफाफे में

बादल के बंद लिफाफे में
कहीं उसका खत तो नहीं
पता नही लब्स गिले है या सुखे?
भेजे होंगे उसने हजार सपने और कईं ख्वाईशे 
या भेजी होगी उसने झिलमिलाती हुयी धुप
या फीर आसूंओं की गिली बारीश
लिफाफा खोलतेही गिला होना तय है
बस सोच रहा हूं के किस को साथ ले लूं
दिल को या दिमाग को?

बादल के बंद लिफाफे में
कहीं उसका खत तो नहीं...


-सत्यजित.

Monday, May 14, 2012

मै कभी बतलाता नही....

'आई', आई म्हणजे उगम, आई म्हणजे निर्माण, आई म्हणजे ओळख, आई म्हणजे संरक्षण, आई म्हणजे जिवन, आई म्हणजे अभय.


जिच्याशी जोडलेली नाळ तुटली की बाकी नाती जन्माला येतात ती आई. प्रत्येक जन्मल्याला येणर्‍याला बाय डिफॉल्ट आई ही असतेच. कुठल्याही गोष्टीचा उगम किंवा निर्माण करण्याची शक्ती म्हणजे आई.

तुमच्या साठी मी 'माझी आई' ह्या वर मी एक निबंध लिहू शकेन पण माझ्या स्वतःसाठी म्हणुन माझ्या आई बद्दल लिहायच झाल तर मात्र एक प्रबंध लिहावा लागेल. माझी आई कशी आहे, माझ्या आई माझ्यासाठी काय करते कींवा तिने माझ्यासाठी काय केलं ह्याचा विचार करणं म्हणजे फुटपट्टी ने पृथ्वीच्या व्यास मोजायला निघण्या सारखं आहे. आई बद्दल काही लिहणं म्हणजे मला बाळबोध वाटतं. तिने माझ्यासाठी काय केलं ह्याची कल्पना करण देखिल माझ्या अवाक्या बाहेरच आहे, म्हणुन मी माझ्या आईला डिस्क्राईब करुच शकत नाही. माझ्या साठी आई म्हणजेच मी आहे, ती अंनतरुपी आहे, ती ह्या चराचरात आहे, ती माझं अस्तित्व आहे आणि मी तिच अस्तित्व. मी माझ्या आईच अस्तित्व आहे ह्या विचारानेच मला शद्बात न सांगता येणारा आनंदानुभव मिळतो. 'अहं ब्राम्हास्मी' मध्ये जो आनंद आहे किंवा जी भावना आहे त्यापेक्षा कईक पटीने मला आनंद मी माझ्या आईचच अस्तित्व आहे हे म्हणण्यात आहे. आई म्हणजे मीच, तिच्या पासून वेगळा झालेला मी एक भाग. माझं ब्रम्ह म्हणजे आई, ह्या ब्राम्हाच चलत बोलतं मुर्त रूप म्हणजे आई. आई म्हणजे नुसत ब्रम्ह नाहीतर ती विष्णू देखिल आहे, माझा सांभाळ करणारी तीच आहे. ह्या संपुर्ण विश्वाच एकसंघ रुप म्हणजे माझी आई, एक चालतं बोलतं विश्वरुप म्हणजे आई.

मी लहानपणा पासुनच आईवेडा आहे, मी तिच्या भोवतीच घोटाळायचो, अगदी मोठा होई पर्यत मी कधी आई शिवाय राहीलो नाही. अजुनही तिच्या पसुन दुर रहायचा विचार केला की ते अनसिक्यूर फिलींग मला अजुनही येत. पण आता मी मोठा झालो तेव्हा ते फिलींग हे पोरकटपणाचे द्योतक आहे आणि मी पोरकट नाही असे स्वतःला समजवतो. मी "आईचा लाडका" असं माझा भाऊ म्हणतो मला नेहमी चिडवायचा (अजुनही त्याला असच वाटतं) आणि मी "आहेच मुळी' म्हटल की स्वतःच रडवेला व्हायचा आणि हे सांगायला तो आईकडे जायचा. मग आईची जी तारांबळ उडायची ते पाहुन मला वाटयच की मीच खरा आईचा लाडका आहे आणि म्हणुनच तिची तारांबळ उडते. पण आता कळतं एकच सफरचंद दोघाना हवं तेही अख्ख, वाटणी नको म्हंतल्यावर मग आईची तारांबळ उडणारच. पण तेही साध्य करण्याची किमया ही आईच जाणो.

साला, पुरूष म्हणुन जन्माला आल्याच एकच दु:ख आहे की आपल्याला आई होता येत नाही, अभागी रे अभागी. म्हणुनच स्त्री म्हणजे आई, माझी अस नाही पण कोणची ना कोणाची आई होणं स्त्रीलाच शक्य आहे. किती ते भाग्य.. तरी स्त्री जन्माला दोष देतात स्त्रीया.

पण खरा प्रॉब्लेम ईथेच आहे. स्त्री म्हणजे 'आई', मग हट्ट पुरवायला, रागवायला, मला हे असच हवं म्हणुन त्रास द्यायला आईच असते, म्हणुन मग त्याग करावा तर स्त्रीने असा आम्हा पुरषांचा बाय डिफॉल्ट समज आहे, नाही पक्की धारणाच आहे.

मला लहान मुलं आवडतात कारण त्याना फक्त आई असते, आपण जसे मोठे होतो तसे बाकी ईतर गरजांसाठी आणि अनेक इतर नाती निर्माण होतात. पण मुलांना फक्त आई असते ती असली की आणि कुणाची गरज नाही. त्यात मला मुली जास्त अवडतात असं माझ्या 'सौ'च मत आहे. म्हणजे तशा अर्थाने नाही हो... आमच्या घरातल्या पिल्लावळी मध्ये मी मुलींचे जास्त लाड करतो अस तीच मत आहे. कदाचीत खरही असेल मुली जास्त बदमाश असतात, मुलं नुसती खोडकर आणि मस्तीखोर एकंदरीत, मुली लाघवी आणि मस्का मारु असतात. आपले लाड कसे करुन घ्यायचे हे मुलींना जस्त माहीत असतं, मुलं त्या मानाने साळसूद असतात. पण विचार करता मुली ह्या उद्याच्या "आई" असतात आणि उद्या त्यांना बरच सोसायच आहे, हट्ट करण्याच त्यांच हेच वय आहे, उद्या हट्ट पुरवण्याची जबाबदारी आपसुक त्याच्यावर येणार आहे. कदाचित म्हणुनच त्यांचे जास्त लाड करावेसे वाटत असतिल. उद्या लाड पुरवतो म्हटलं तरी, उद्या एका 'आई'चे हट्ट मी काय पुरवणार, बापरे तेवढ सामर्थ्य नाही रे आपल्यात. म्हणुन ह्या सर्व आयांचे हट्ट आताच पुरवायला हवेत. माझा एक हट्ट असतो त्यांच्या कडे की मनाने आणि शरीराने आत्ताच सक्षम आणि बलवान व्हा... माझा हा एक हट्ट पुरवा, मी तुमचे सगळे हट्ट पुरवायला तयार आहे.

मी हिटलरच्या एका गोष्टीचा प्रचंड चाहता आहे, त्यानी म्हणे रुल काढला होत की प्रत्येक तरूणीने एक वर्ष शेतात राबायला हवं. का तर त्या मुळे त्या सुदृढ होतीत आणि पण येणारी पिढी सुदृढ होईल.

'आई' ह्या शब्दाचा खरा अर्थ कळालेला येवढा देशवेडा आणि येवढा द्रष्टा राजकारणी कसा काय येवढा कूप्रसिद्धीस गेला हे कोडंच आहे. (त्याला कदाचीत जाणुनबुजुन कूप्रसिद्ध केलं असवा असा मला दाट संशय आहे)

बघा मी म्हंटल होत ना आई म्हणजे विश्वरुप आहे काय आणि किती लिहाव...

कीती काही लिहण्या सारख आहे, धरती, माती, नद्या ह्यांना आपण आई का संबोधतो? लागलं, पडलो की 'आई ग्ग' का म्हणतो? अजुन काय नी काय नी किती लिहावं...

आई म्हंटल की हळवं होता येतं पण बाबा म्हंटल की नाही होता येत असं का?.. आई म्हणजे धरती आणि बाबा म्हणजे आभाळ...

हॅप्पी मदर्स डे.. मातृदिनाच्या शुभेच्छा... हे ईग्रजी डें ना देखिल महत्व आहे. आज पहील्यांदाच मी मदर्स डे म्हणुन काही लिखाण केलं आहे. आईशी तर रोजच बोलतो आणि आई बद्दल काय वाटतं हे सांगायला मदर्स डे हवा कशाला..,? मी नाही विश केलं आईला, ना ग्रिटींग... हे लिहील आहे तुमच्यासाठी...

प्रसून जोशी ने काय पर्फेक्ट लिहीलं आहे ना?..

मै कभी बतलाता नही...
कितना प्यार तुझसे करता हूं मै मां..... तुझे सब है पता... है ना... मेरी माँ...