Wednesday, July 30, 2008

आईशप्पथ!... शेवटी आपल्यावरच गेम आहे...

ए... तिला कशाला सांगितल यार
की माझं तिच्यावर प्रेम आहे
आता तिच्या बापाला कळलं
तर फुकट माझ्यावर गेम आहे...

साला सांगितलं कुणी तुम्हाला फुकट श्यानपना करायला
माझा टाका भिडत असताना मध्ये तंगड्या घालायला
उगा शानपत्ती करु नका
नाजुक माझ प्रेम आहे
काही झाल तरी...
शेवटी साला आपल्यावरच गेम आहे

तसं तिच्या बापाला काय आपण मरणाला सुद्धा घाबरत नाही
पण प्रेमात साला मरायचं असेल तर प्रेम करुन काही उपयोग नाही
तुम्ही घाबरुन प्रेम केलंत?
साला तुमच्यावर शेम आहे
आणि काही झाल तरी...
शेवटी आपल्यावरच गेम आहे

माहीत आहे यार!!! ती आपल्याला भाव देत नाही
पण प्रेम केलंय तिच्यावर बघतोच कशी ऐकत नाही
तीही अशी ऐकायची नाही
ती पण मोठी मेम आहे
म्हणुनच तर म्हणतो यार...
शेवटी आपल्यावरच गेम आहे

तो शेजारच्या गल्लीतला पक्या, नेहमीच तिच्यावर टवके टाकतो
एकदा आपल्या एरियात येउ दे! बघाच त्याला कसा झापतो
जाउ दे ना ! ती त्याला पण भिक घालत नाही
त्याची पण कंडीशन सेम आहे
तरी पण च्यायला आपल्याला वाटतं...
शेवटी आपल्यावरच गेम आहे

अरे अप्सरा पण फिक्या पडतिल असा रापचिक आपला माल आहे
पहाल तर तुम्ही पण म्हणाल, आयला! ये तो कुदरत का कमाल है
कभी इधर तो कभी उधर
ह्या चिकन्या पोरिंचा काय नेम आहे?
म्हणून तर आपण म्हणतो, यार
शेवटी आपल्यावरच गेम आहे

आपल्याल पण सेटल व्ह्यायचय यार, पण ही पोरगी काही पटत नाही
आपण पण फेविकॉल लाउन बसलोय, साला आपण पण हटत नाही
आपल्या लव्ह लाईफ मध्येच काय तो लोचा
बाकी सारं क्षेम आहे
आता तरी कळलं ना, यार...
शेवटी आपल्यावरच गेम आहे...

आयशप्पथ सांगतो... शेवटी आपल्यावरच गेम आहे... - सत्याभाय...(सत्यजित)

शाना लोग हो गया ना पढके अभी .. चलो वटलो इधर से.. अपना आराम करने का टाईम हो गयेला है क्या...
और टेंशन नई लेने का, बिनधास्त आते रहेने का क्या!!!.

और बिना बोले वो हप्ता फेको सुमडी मे.. नाटक नई.. बोले तो प्रतिक्रिया मामू...

Thursday, July 24, 2008

हाय मेरी जहरी नागिन...

झाली मज विषबाधा
तव जहरी नयनांची
झाली राख आज
मी रचिल्या कवनांची

दिला डंख उरी अन
पंख दिले मनाला
तू तरू हो मनाचा
दे आसरा खगाला

असा घाव केलास
जो लागला जिव्हारी
तरी कवटाळूनी घ्यावे
तुझे डंख हे विखारी

ह्या सावजास सांगा
का आवडे शिकारी?
झेलुन डंख सारे
मरणास ये खुमारी

मी घायाळ काळजानी
आकरंदतो तुला स्मरुनी
मी विषावर जगतो आहे
तुजवर कित्येकदा मरूनी...

-सत्यजित.

Monday, July 21, 2008

कलंकी

अंधाराचे घर माझे न कुठेही प्रकाश
सावल्याही नसती आता न अवसे आकाश

माता ज्योती होती बाप दिव्यातली वात
वणव्याच्या तेजा भुले विदग्धी ही साथ

कधी पांघरुन उषा कधी चांदणे लेवुन
जे जे भासले ते तेज गेले चटके देउन

तिच्या पदराखाली उन कधी ना लागले
तिच्या उरीचे दुध आज कसे गा नासले

कुणी ओरबाडुनी देतो कुणी दांभिक उदार
अंधाराच्या हाता हवा निज उघडा पदर

माझ्या बाहुललीला कधी तू तिटं लावु दिला नाही
त्या निष्कलंकी बाहुलीत माझी माय मला पाही

-सत्यजित

Friday, July 11, 2008

चोर नजरेने

पाहशील जितक्यांदा चोर नजरेने
फुलतील तितक्यांदा मोर नजरेने

तुझ्या पापण्या ह्या माझा मोरपिसारा
पाहताच मजला का मिटतो हा बरा?
लाजशील जितक्यांदा चोर नजरेने
लावशील तितक्यांदा घोर नजरेने

ही ओढ कुठली मज ओढुन नेते
हे बांध कुठले मज तोडू न देते
खुणावशील जितक्यांदा चोर नजरेने
बांधशील तितक्यांदा दोर नजरेने

सांग सखे मी कसा शांत राहु?
वाटे सदैव मला का तुलाच पाहु?
छळशील जितक्यांदा चोर नजरेने
सोसशील तितक्यांदा जोर नजरेने

-सत्यजित.

Wednesday, July 2, 2008

चांदुल्याला घातल ढगांच टोपडं (अंगाई)

चांदुल्याला घातल ढगांच टोपडं
आभाळाची शाल पांघरुन झोपी गेलं बापडं

चांदुल्याच्या शालीवर लुकलुक तारे
टकामका पाहती चांदुल्याला सारे
दृष्ट लागेल असं माझ्या, चांदुल्याच रुपडं

चांदुल्याचे लाड बाबा करती आती
आत्या, मामा खेळणी आणती किती
कुणी आणलं असवल, नी कुणी आणली माकडं

तुझ्या सवे खेळताना वाटते बरे
सर्व नित्य चिंतांना विसरती सारे
तुझ्या सवे झालं बघ, घर सार बोबडं

चांदुल्याला बर नसता आई गं जागते
पदर पसरुन देवाकडे आजी गं मागते
आजोबाही घालती देवा कडे साकडं

बघता बघता माझं बाळ मोठ होईल
बंगला नी गाडी काय विमान ही घेईल
आत्ताच होउ लागल बघा, झबलं ही तोकडं

उत्कर्षाला असावी संस्कारांची साथ
आपण ही व्हाव कुणा आधाराचा हात
येवढच माझ मागणं, आज गं देवाकड

चांदुल्याला घातल ढगांच टोपडं
आभाळाची शाल पांघरुन झोपी गेलं बापडं

चांदुल्याच्या शालीवर लुकलुक तारे
निजता गं चांदुल्याला झोपी सारे
बोलू नका कुणी आता बाळ आहे झोपल...

-सत्यजित.

Monday, June 16, 2008

रिटायरमेंट

रिटायरमेंटची सकाळ
जिवनाची संध्याकाळ
मिणमीणते डोळे
टाळू पर्यंत कपाळ

कपाळवर आट्या
भेडसावणारे विचार
ईच्छाशक्ती असते
सांधेदुखीने लाचार

जाड भिंगाच्या चष्म्यातून
जेव्हा भुतकाळात पाहीलं
बरच काही केल तरी
बरच काही राहीलं

अरे बाप आहे मी तुझा
असं सांगाव का लागतं?
हक्काने पॉकेटमनी घेणार्‍याकडे
आज मागाव का लागतं?

आता कमी जरी दिसलं
तरी मनं वाचता येतात
सबबीचे खडे नुसत्या
बोटांनीच वेचता येतात

प्रत्येक घासागणिक हात
आता जास्तच थरथरतात
नुसता मायेच्या स्पर्श मागता
उच्श्वास नुसतेच घुरघूरतात

हाताचा पाळणा माझा
आता पुरता गंजला आहे
राजाच्या गोष्टीतला महल
पडका पत्त्यांचा बंगला आहे

आपल्याच पोटचाच गोळा
झाल्या चुकांवर बोट ठेवतो
कालचा देव्हार्‍यातला दिवा
आज अडगळीत एकटाच तेवतो

हातात कोंबल्या जपमाळेतील
राम देखिल मरा होतो
’अयुष्य एक जुगार’
येवढाच शाप खरा होतो?

-सत्यजित.

Sunday, June 8, 2008

पवार आयपीलात रमला गो नखवा...

चालः गोमू माहेरला जाते गो नाखवा..

पवार आयपीलात रमला गो नाखवा
ह्याला देशातले शेतकरी दाखवा

संसाराची आमच्या झाली होळी
IPLवर भाजतोय करोडोची पोळी
हा भाजतोया करोडोची पोळी
ह्या शेतकर्‍यांना विष तरी चाटवा..

परदेशी पोरींचा नंगा तमाशा
आमची विरली पोलकी हा बघतो कशाला
विरली पोलकी हा बघतो कशाला
नागव्या शेतकर्‍यांना IPLमध्ये नाचवा

कितीही भरला जरी ह्यांनी भरणा
तरी मेल्यांची काही भुक भागना
तरी मेल्यांची भुक भागना
कॄषीमंत्र्यांना कुणी तरी जागवा
ह्यांना देशातले शेतकरी दखवा.....

हय्या हो हय्या हो...

Monday, April 14, 2008

फुलपाखरू (बडबड गीत)

फुलपाखरू फुलपाखरू
पिवळं पिवळं धम्मक
कधी फुल कधी पाखरू
कशी करत गंम्मत

सगळ्यांना फसवून
खदाखदा हसतं
पंखांचे हात करुन
टाळ्या पिटत बसतं

इकडे तिकडे बागडून
खुप खुप थकलं
मधाच कोल्ड्रींक पित
फुलावर बसलं

उडता उडता फुलपाखरू
एकदम गडप झालं
जादुचा मध पिऊन
त्याच फुल होतं झाल...

मी जादूची काडी काढून
सुर्रकन फिरवली
फुल झाली फुलपाखरं
भुर्रकन उडवली...

-सत्यजित.

Saturday, April 12, 2008

आई मला लवकर मोठ्ठ व्हायचय

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय

नसतो कुठला होमवर्क न असतो कुठ्ला त्रास
ऑफिस मधुन आल्यावर नसतो कुठला क्लास
घरी येउन आरामात टीव्ही पहात रहायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...

सगळे असतात फ़्रेंड आणि टिचर कुणीच नसतात
चॉकलेट देणार्या काकानां बाबा बॉस म्हणतात
छान छान बॉस कडुन रोज चॉकलेट खायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...

ऑफिसमध्ये जाउन भरपूर मज्जा करतात
तरीच बर नसल तरी ऑफिसला जातात
ऑफिसमध्ये जाउन मला पण खेळायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...

कॉमप्यूटरवर बसुन कसल काम करतात?
कॉमप्यूटरवरती तर नुसतेच गेम असतात
रोज रोज गेम खेळुन टॉप स्कोरर व्हायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...

ऑफिसच्या रोसेस मध्ये हॉटेल मध्ये जातात
हॉटेल जाउन मस्त चमचमीत खातात
बरगर पिज्झा फ़्राईस आणि आईसफ्रूट खायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...

महिन्याच्या शेवटी ह्यांना केवढे पैसे मिळतात
न जाणो येवढ्या पैशांच हे काय करतात
मला तर महिन्याला फक्त एक खेळण घ्यायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय

Wednesday, March 26, 2008

छाया चित्रकाराची

एका छायाचित्रकाराचे मनोगत टिपण्याचा एक प्रयत्न...

निर्मात्याने निर्मिलेली प्रत्येक गोष्ट आत्मियतेने पहाणारा मी
कुणी म्हाणतं ढोंग आहे
कुणी म्हाणतं व्यासंग आहे
कुणी म्हाणतं कुतुहला पोटी सारं
कुणी म्हाणतं चार दिवसाच वेड सारं
कुणी म्हाणतं की कुणाच्या दुःखाच भांडवल करणारे आम्ही
तर कुणी म्हाणतं कुणच्या हसर्‍या आठवणी विकणारे आम्ही
तरीही ह्या सर्वां पासुन अलिप्त रहाणारे आम्ही
आम्ही प्रेमात पडतो पण प्रेमात अडकत नाही
कारण आम्ही नुसत बंदीस्थ करतो कधीच कुणाला अडकवत नाही
कधी जे दिसतं ते टिपत जाणं असत
तर कधी जे दिसत त्या पलिकडे जाउन पहाणं असत
कधी खोल खोल गाभार्‍यात जाणं असत
तर कधी उंच उंच आभाळातून पहाणं असत
कधी जे दिसत ते तसच असत
कधी जे दिसत ते तस नसत
तर कधी ते असं दिसत हे दाखवण असत
तर कधी न दिसलेल नुसत भासवण असत
म्हंटल तर अर्थशुन्य
म्हंटल तर भावपुर्ण
म्हंटल तर अस्तित्वहीन अर्थ
म्हंटल तर कोर्‍याकागदाहुनही व्यर्थ
पण, इथे प्रत्येक अनर्थालाही एक अर्थ असतो
तर कधी प्रत्येक अर्थात एक अनर्थ असतो
कधी मलाच कळत नाही की हे काय आहे?
कधी हसू टिपण तर कधी अश्रू टिपण
कधी प्रकाश टिपतो तर कधी अंधार
कुणी म्हणत अंधार नाही टिपता येत
पण खर तर उजेड नाही टिपता येत
आम्ही टिपतो तो अंधार,
कधी रंगीत तर कधी बेरंगी
पण असतो तो फ़क्त अंधार
म्हणुनच कदाचीत ह्याला ’छायाचित्र’ म्हणत असवेत...

-सत्यजित

Sunday, March 16, 2008

गोरापान चांदोमामा (बालकविता)

का गं आई चांदोमामा
असतो गोरा गोरा पान?
शुभ्र ढगांच्या फेसात तो
आंघोळ करतो छान..

उंच उंच ढगात
त्याचा बाथटब असतो
दिवसभर शुभ्र फेसात
आंघोळ करत बसतो

त्याची झाली आंघोळ की
ढग काळे काळे होतात
भराभर पाणी ओतुन
चांदण्या त्यांना धुतात

पाऊस पडुन गेला की
कसं स्वच्छ स्वच्छ वाटतं
मग चांदण पण पावडर लावुन
छान छान नटतं.

-सत्यजित.

तू जाताना...

मातलेला चंद्र आहे चांदणे विझवून जा
चेतल्या स्वप्नांस माझ्या तू जरा निजवून जा

भांडते आकाश सारे त्या जरा रिझवून जा
रातीच्या गर्भात उद्याचा तेजपूंज उजवून जा

गोंदल्या क्षणांस पुन्हा एकदा गिरवुन जा
वाहत्या जखमांवरी हात प्रिये फीरवून जा

काळजातील वेदनांना तू सुरांनी सजवून जा
बहकाल्या गात्रांत माझ्या कैफ़ तुझा उरवून जा

Wednesday, March 12, 2008

आई ताप आलाय.... (बालकविता)

मला जे दिसत
ते तुम्हाला पण दिसत का?
कळोखात न दिसणार भुत
तुम्हाला पण बघुन हसत का?

मी नाही घाबरत त्याला
तेच घाबरत मला
येवढी जर हिम्मत असेल
तर उजेडात ये म्हणाव त्याला

तुम्हाला माहित्ये का?

वर वर ढगात
एक लांब दाढीवाला असतो
गडगड गडाड आवाज करत
मोठ्यांदा हसतो

"मी नाही घाबरत तुला"
मी त्याच्यावर ओरडतो
तो मला घाबरुन त्याची
चड्डीच ओली करतो

ए पावसात काय भिजताय
तो वरतून सू सू करतोय
ताप आलाय मला म्हणुन
मी तुम्हाला सावध करतोय

श्शी.. आत्ता जाईल ताप
मग उद्या पुन्हा शाळा
तापाला म्हंटल रहा जरा
तर म्हणतो आलाय कंटाळा

उन्हाळ्याच्या सुट्टीत येतोस
तेंव्हा कसा रे रहातोस?
शाळा असलीकी मात्र
लगेच निघुन जातोस

बघतोच तुला ह्या सट्टी मध्ये
यायलाच देणार नाही
गार पाणी, आईसक्रीम, गोळा
काहीच खाणार नाही

श्शी.. कित्ती आवाज करतायत मुल
जरा आराम देत नाहीत
शाळेतल्या टिचर ह्यांना
खुप आभ्यास का देत नाहीत?

तस मला बरं वाटतय
पण आई नको म्हणेल
आता खेळायला जातो म्हंटल
तर उद्या शाळेत जा म्हणेल

जाऊंदे ना तसे पण सगाळे
सुस्सू मध्ये खेळ्तायत
शी.. सुसू मध्येच उड्या मारतायत
सुसू मध्येच लोळतायत.....

शी अले ए..
ऐकत नाही??
तिकडे पान्यात सापए..
आणि टिव्ही वर स्पाईडरमॅन पण लागला आहे.. मस्त..

-सत्यजित

माझी मुंबई... एक जंगल

नजर जाईल तोवर
पसरलेल जंगल
विटा दगडांच्या समाधीत
विसरलेल जंगल
हिंस्र श्वापदांना मुक्याने
झेलणार जंगल
काळाजावर आघात
पेलाणार जंगल
भजेल त्याला नित्य
पावणार जंगल
धगधगत्या रुळांवर
धावणार जंगल
जुन्याच प्रश्णांच्या थारोळ्यात
लोळणार जंगल
आपल्याच धुनीत सदैव
पोळणार जंगल
विवीध रंगाच्या दिव्यानी
सजलेल जंगल
धुरांची शाल पांघरुन
निजलेल जंगल
सचेतन शरिरात अचेतन मनं
गाढलेल जंगल
शेत खाणार्‍या कुंपणानी
वेढलेल जंगल
भिषण स्फोटाने बिचारं
बावरलेल जंगल
आपल्याच हाकेने आपणच
सावरलेल जंगल
तुमच्या आमच्या दु:खाने
कुढलेल जंगल
तुमच्या आमच्या संगे
रडलेल जंगल
तुम्हा आम्हा सगळ्यांनी
वाढलेल जंगल
तुम्हा आम्हा सगळ्यांनी
तोडलेल जंगल...

सगळ्यांच असुनही माझं माझं जंगल...

-सत्यजित

Tuesday, March 11, 2008

गोंदण

अजुनही ह्रुदयात गोंदली आहे तुझी नी माझी पहीली भेट
बावरलेली नजर तुझी ह्रुदयात शिरली होती थेट
मनात दाटल्या भावनांच ओठी येता झाल गाणं
ह्रुदयानी छेडल्या सुरांच मनात असच तरळत रहाणं
वाटल होत तेंव्हा तुझे हात हाती घ्यावेत
वाटल होत तेंव्हा तुझे हात मुठीत घट्ट धरावेत
मग म्हंटल जाउ दे! नाहीच भरल हातानी मन
तर ह्रुदयानी काय करावे?
माझं ह्रुदय म्हणता म्हणता उनाड पाखरु झाल
तुला भाळी आट्या बघताच पुन्हा भानावर आल
आता तुझी नजरही जरा सावरली
मीही माझी स्वप्न आवरली
तु 'येते हं' म्हणताच माझी स्वप्न बावरली!
’येते हं’ या शब्दांनी सारं आकाश भरुन गेलं
’येते हं’ या शब्दांना आज उभं तप सरुन गेलं
तु ’येते हं’ म्हणुन पुन्हा कधीच आली नाहीस
तुझी नी माझी राहीली भेट पुन्हा कधीच झाली नाही
आजुनही मनात सल आहे तुझी मला साथ नाही
मीही खुळ्या मनाला समजवतो
एकदा गोंदलं कधी जात नाही..

Thursday, March 6, 2008

आज्जीचा बत्तासा.. (बालकविता)

आ़जी ने दिला बत्तासा वर आभाळात फेकला
आभाळातच अडकून त्याचा चांदोमामा झाला

वाटत रोज चोरुन बप्पा, माझा बत्तासा खातो
तरीच रोज चंद्र अस्सा छोटा छोटा होतो

हळुहळू करत त्याने एकदा सगळाच गटम केला
थांब म्हणालो, तुझ नाव आता सांगतो आजीला..

आजीच नाव घेताच एकदम घेला घाबरुन
देईन म्हाणाला बत्तासा पण थोडा थोडा करुन

बप्पा बिच्चारा एकच बत्तासा पुरवुन पुरवुन खातो
थांब म्हणालो आज्जीकडुन तुला पण एक देतो

:( प्रसाद आहे म्हणाली आज्जी एकच बत्तासा मिळेल
पण मी बप्पासाठीच मागतोय ना, पण ते तिला कसं कळेल?

आज्जी म्हणाली..
अर्धा पण खात नाहीस पण रोज दोन बत्तासे मागतोस
तुझा उष्टावलेला अर्धा मग बप्पा समोर का ठेवतोस?

अगं आज्जी..रोज चंद्र खाण्यापेक्षा बप्पाला बत्तासा खाऊ दे
मला म्हातारीला फसवतोस काय? चल मला जाउ दे..

आज्जी देत नाही म्हणुन हा रोज चंद्र खातो
नाव सांगु का आज्जीला? म्हणताच सगळा परत देतो... :))

हा.. हा घाबलला...
-सत्यजित

Monday, January 28, 2008

चांदोमामाचा पॉपकॉर्न (बालकविता)

हनुवटीवर हात ठेवुन
चांदोमामा बसला
मनात विचार आला
विचार करत असेल कसला?

करत असेल का हा विचार
त्याच्या बदलणार्‍या रुपाचा?
की समोर मांडुन ठेवल्या,
लाह्या भरल्या सुपाचा?

वाटत असेल जेंव्हा
त्याला खावासा पॉपकॉन
हळुच एक चांदणी उचलुन
तोंडात टाकत असेल गपकन.

सत्यजित.

मी राधिका...

ती...
गुपित मनाचे
कुपित मनाच्या
मी लाजेने जपले
ती साक्ष मनाची
अप्रोक्ष मनाच्या
कुणी कसे ओळाखले?

तो..
जरी आणुन आव
डोळ्यात भाव
तुझ्या कधी ना लपले
हे बंध कशाचे?
का डोळ्यात कुणाच्या
दिसे स्वप्न आपुले

तू भासवले ना
मला कधी जे
ते मला गं होते कळले
ना जाणुन काय
आपसूक पाय
त्या वळणा वरती वळले

रेशिम नाजुक
रेशिम साजुक
नाते जाते विणले
का कुणास ठाउक
होता भावुक
मन गाणे तुझे गुणगुणले

नयनांस आस
कानास भास
सारे तुझेच होती
क्षण विरहाचे
क्षण मिलनाचे
मनात झाले मोती

शिंपला मनाचा
कधी मोर घनाचा
किती हा रुपे घेतो
सोडुन कावा
वाजवित पावा
कान्हा राधेचा होतो.

-सत्यजित.

Wednesday, December 19, 2007

साकी

नको पिऊ म्हणतेस
काळीज जळेल म्हणतेस
साकी,
दगडाच काळीज कधी जळत का?
जळाल तरी कुणाला कळतं का?

दारुण अवस्थेतल्या मनाला
दारुनेच बर वाटत
शुद्धीत असलना की उगाच
आठवुन आठवुन मन आटत

भर दोन पेग,
प्याला आपटत 'चिअर्स' म्हणू
दोन घोट जाताच वाटेल
काही झालच नाही जणू

धुंध होत हसेन मी
माझ्यावर ह्सणार्‍या नशीबावर
ह्रुदयातल्या आठवणी गुंफुन
विणल्या रेशमी कशिद्यावर

साकी भरत रहा पेग पेग..
ही आठवण जाइस तोवर
नाहीच गेली जरही आठवण
तर मी आठवण होइस तोवर

सांडू नकोस दारू, साकी
पुन्हा निसटण्याची भावना दाटते
रित्या पेल्यात,सांडल्या थेंबात
तीच तीच आठवण दाटते

साकी..
साकीकुणी मजे साठी पितं
कुणी भोगत्या सजे साठी पितं
कुणी पेटुन उठण्या साठी पितं
कुणी पेटुन विझण्या साठी पितं

सगळंच दु:खाने भरलेल
मज दु:खही पिता येईना
जहरच सु:ख देईल पण
मज जहरही पिता येईना

पिऊ देत गं... सखे साकी
ही दारू काय माझा जिव घेईल?
एकदा गतप्राण झालेल्याचा
सांग पुन्हा कसा जिव जाईल?

सांग पुन्हा कसा जिव जाईल.. चिअर्स!!!

-सत्यजित

Tuesday, December 18, 2007

ओळखीचे मुखवटे

रोज नवे मुखवटे बदलताना आपण आपल्यालातर विसरुन जात नाही ना... असूही किंवा नसूही... पण अनोळखी जगात वावरताना...

अनोळखी जगात ओळखीच असं कुणीच नाही
मीही आपणहून माझी ओळख सांगत नाही
मी दडपण मुक्त होत नवी ओळख पांघरुन घेतो
माझ्यातल्या अनोळखीला धरुन
माझ्यातला मी सोडुन देतो

मी भरुन घेतो एक दिर्घ श्वास
आणि पवलावर पावलं आपटावीत म्हणून घेतो एक उडी
छे! नाही जमत...
माझ्यावरच मी हसतो
आणि माझ्यावर हसणार्‍यांवरही
हा आनंद कसला?
मी ह्यांना ओळखत नाही म्हणून?
की हे ज्याच्यावर हसता आहेत
ते त्याला ओळखत नाही म्हणुन?

हसू देत, मीही हसतो..
पण का?माझी नविन ओळख झाली म्हणुन?
की मी माझी पुसली म्हणुन?
मग मनात विचार येतो
लोकांसाठी का मी खोटं जगतो?
माझी ओळख जपायला
मीच माझ्या पासुनच लपुन बसतो

पुन्हा कपाळ सुरकूतं
मन जरास कुरकूरत
माझं अनोळखी मन
माझ्यावरच गुरगूरतं

हे सारं जगच असं
येथे मुखवट्यांचीच जास्त जंत्री
हे अंतिम सत्य अंगिकारत
मी माझ्या सुरुकूत्यांवर मारतो ईस्त्री...

सुरुकूत्याही जाता जाता
पाठ माझी थोपटतात
मी पुन्हा एक उडी घेतो
आणि पावलांवर पावलं आपटतात...

मी आनंदाने मुठ आवळत
मुठ मागे खेचून घेतो
अन अनोळखी डोळ्यातले
कौतुकाचे भाव टिपुन घेतो

ह्या अनोळखी जगात
माझी खरी ओळख असते
जगाला पटो न पटो
माझीच मला ओळख पटते

मग सारं अनोळखी जग हिंडुन
मी ओळखीच्या दारावर थबकतो
माझा मुखवटा सावरतानाच...
दार उघडताच हबकतो

मी घोघर्‍या आवाजात विचारतो
'ओळखलं का मला?
'ते 'हो' म्हणताच
माझच हसु येत मला... माझच हसु येत मला...

-सत्यजित.