Tuesday, December 18, 2007

ओळखीचे मुखवटे

रोज नवे मुखवटे बदलताना आपण आपल्यालातर विसरुन जात नाही ना... असूही किंवा नसूही... पण अनोळखी जगात वावरताना...

अनोळखी जगात ओळखीच असं कुणीच नाही
मीही आपणहून माझी ओळख सांगत नाही
मी दडपण मुक्त होत नवी ओळख पांघरुन घेतो
माझ्यातल्या अनोळखीला धरुन
माझ्यातला मी सोडुन देतो

मी भरुन घेतो एक दिर्घ श्वास
आणि पवलावर पावलं आपटावीत म्हणून घेतो एक उडी
छे! नाही जमत...
माझ्यावरच मी हसतो
आणि माझ्यावर हसणार्‍यांवरही
हा आनंद कसला?
मी ह्यांना ओळखत नाही म्हणून?
की हे ज्याच्यावर हसता आहेत
ते त्याला ओळखत नाही म्हणुन?

हसू देत, मीही हसतो..
पण का?माझी नविन ओळख झाली म्हणुन?
की मी माझी पुसली म्हणुन?
मग मनात विचार येतो
लोकांसाठी का मी खोटं जगतो?
माझी ओळख जपायला
मीच माझ्या पासुनच लपुन बसतो

पुन्हा कपाळ सुरकूतं
मन जरास कुरकूरत
माझं अनोळखी मन
माझ्यावरच गुरगूरतं

हे सारं जगच असं
येथे मुखवट्यांचीच जास्त जंत्री
हे अंतिम सत्य अंगिकारत
मी माझ्या सुरुकूत्यांवर मारतो ईस्त्री...

सुरुकूत्याही जाता जाता
पाठ माझी थोपटतात
मी पुन्हा एक उडी घेतो
आणि पावलांवर पावलं आपटतात...

मी आनंदाने मुठ आवळत
मुठ मागे खेचून घेतो
अन अनोळखी डोळ्यातले
कौतुकाचे भाव टिपुन घेतो

ह्या अनोळखी जगात
माझी खरी ओळख असते
जगाला पटो न पटो
माझीच मला ओळख पटते

मग सारं अनोळखी जग हिंडुन
मी ओळखीच्या दारावर थबकतो
माझा मुखवटा सावरतानाच...
दार उघडताच हबकतो

मी घोघर्‍या आवाजात विचारतो
'ओळखलं का मला?
'ते 'हो' म्हणताच
माझच हसु येत मला... माझच हसु येत मला...

-सत्यजित.

No comments:

Post a Comment