Tuesday, February 17, 2009

हनुमॅन माझा मित्र...(बालगीत)



सुपरमॅनला स्पाईडरमॅनला नाही अनुमान
सर्वात शक्तीशाली आहे माझा हनुमान

सुपरमॅनला दिली जर त्यानी एक फाईट
चड्डी वरची चड्डी पण होउन जाईल टाईट

स्पाईडरमॅनच्या छातीतुन निघेल एक कोळी
एकच फाइट देता घेईल जुलाबाची गोळी

एक उडी घेउन जातो साता समुद्राच्या पार
डोंगर उचलू शकतो त्याला शक्ती आहे फार

एकटाच गेला उडून नी लंका आला जाळून
रावण गेला घाबरुन, सगळे राक्षस गेले पळून

भक्ती त्याची शक्ती, नी भक्तीच त्याचं काम
छाती फाडुन दाखवेल तो अंतरातले राम

बोलो सियावर रामचंद्र की जय !!
बोलो हनुमान की जय.. !!

संकट येता कुठलेही तो करतो माझी रक्षा
मी सकाळ संध्याकाळी म्हणतो रोज रामरक्षा

मी दर शनिवारी म्हणतो मारुतीचं स्तोत्र
हनुमान झाला आहे खरंच माझा मित्र...

बोलो बंजरंग बली की जय !!!
बोलो हमुमान की जय.. !!!

-सत्यजित.

Thursday, February 12, 2009

देवा... I Just want to die

आली आली येउन बसली पहिल्या बाकावर
जिवघेणा एक तिळ होता तिच्या नाकावर

तिळतिळ ह्रुदय तुटले तिच्या ओल्या ओठांवर
तिळतिळ तुकडे झुलती तिच्या उडत्या बटांवर

नाजुक बोटां वरती लावला जालिम नेलपेंट
डाव्या छातीत धडकले उढला छातीवरती डेंट

झुळझूळ ओढणी उडता श्वासांमध्ये भिनला सेंट
झुळझूळ ओढणी ढळता आयला! मी तर झालो पुरता फेंट

ती पिट पिट पापण्या मिटता मी तर पुरता गेलो रे
उरले सुरले क्षणात विरले आता नावा पुरता उरलो रे

मंजुळ मंजुळ हसली गाली मजला पाहुन ऐसे रे
माझे माझे मलाच कळेना मी केले सहन कैसे रे

साखर पाकात घोळवत मजला म्हंटले तिने "हाय"
हाय हाय ...मी तर गेलो मेलो ...I Just want to die. देवा. I Just want to die

-सत्यजित.

Wednesday, January 28, 2009

अशी असावी माझी शाळा ...(बालकविता)

अशी असावी माझी शाळा यावा न मजला कंटाळा
समुद्र तळाशी वर्ग भरावेत मधली-सुट्टी आभाळा

पुस्तक वाचे धडे धडाधड
गोष्टी सांगे छानच छान
प्रष्णच देती उत्तरे भराभर
पेनच काढे अक्षर छान

मिक्की डोनाल्ड शिक्षक अमुचे,
कार्टून नेटवर्कचा फळा
(अशी असावी माझी शाळा..)

टाईम मशीनमध्ये बसुनी
इतिहासात मारु चक्कर
शिवबांचा आदर्श घेवुनी
य्ये.. शत्रूला देउ टक्कर

ग्रह-तार्‍यांचा भुगोल शिकण्या
रॉकेट नेईल अंतराळा
(अशी असावी माझी शाळा..)

देणे घेणे काहीच नाही
मग गणिताचे काय रे काम?
पाढ्यांचे झुले बांधुनी
झोके घ्यावे लांबच लांब

न गुणिले, उरले, हातचे, बाकी
न भाग भागिल्यांचा चाळा
(अशी असावी माझी शाळा..)

येथे नसतिल तास कुठले
नसतिल तासांच्या वेळा
नंतर करुया आभ्यास सगळा
आधी नाचा नी खेळा

कधी नसावी सुट्टी मजला
न कधीच यावा उन्हाळा
अशी असावी माझी शाळा यावा न मजला कंटाळा...!!!

-सत्यजित.

Thursday, January 22, 2009

अगदी ठाम ठरवून..

परवाच मी आवरायचं म्हणून
पुन्हा पसरुन बसले आवरलेलं
आणि सारं सारं घरंगळलं
मी इतक्या हट्टाने सावरलेलं

काही जीर्ण चिटोर्‍यात..
तर काही गंजल्या कटोर्‍यात
सारं कसं रंजूनही खदखदत होतं
सारं कसं गंजूनही लखलखत होतं...

हळुवार स्पर्शांनी सरल्या क्षणांची
वाढू लागते वर्दळ
हळुवार, मंद.. मंद.. पसरु लागतो..
अगदी.. अगदी त्या वेळीचा दरवळ

तेव्हा हे सारं का जपलं होत?
तेव्हा हे सारं कसं, माझं...
फक्त माझं, आपलं होतं...

पावसाच्या पहिल्या थेंबाप्रमाणे
फुटतं एक खुदकन हसू
आणि गवसतात काही
अंतर्मुख करणारी स्मितं..

मी ओंजळीत पुन्हा पकडू लागते
मायेच्या अंगणातले
सळसळत्या पानातले
ते झुळझुळते कवडसे....
बंद पापण्या लख्ख लख्ख तेजाळतात
ती भरली ओंजळ बघायला मी डोळे उघडते......
ए वेडाबाई... कुठे हरवली होतीस?
मलाच पुसते.. माझी रिती ओंजळ
मी हळुवार डोळे मिटते
आणि उधळून देते माझी भरली ओंजळ...

मी भूतकाळाशी समरस असताना
इथे वर्तमानाची समरं पेटलेली असतात
मी पुन्हा घाईघाईने आवरु लागते
पुन्हा पसरायचं नाही हं, असं ठाम ठरवून...

-. (सत्यजित)

Friday, December 5, 2008

तुला पाहले मी असे निजताना

तुला पाहले मी असे निजताना
जसा चंद्र भासे निशा विझताना

असतिल स्वप्ने तुझ्या पापण्यांत
उरते बेचैनी माझ्या वागण्यात

मी बेभान असतो तुझ्या चांदण्यात
की नशाखोरी असते माझ्या जागण्यात?

वाटे ठेवावे ओठ अलवार पापण्यांवर
का रुसेल चंद्र माझ्या या वागण्यावर

तुझ्या आरक्त ओठांवर विरजते पहाट
मी स्वप्नांत असता तू निजलेली दाट

हळुवार बोटांनी तुझ्या बटा सावरुन
माझी बेताल स्वप्ने मी घेतो आवरुन

मी सांग भावनांना कसे आवरावे
तुला जाग येता मी उगा बावरावे

न कळे का मी घेतो डोळे मिटुन
तू देतेस चुंबन मज निजता बघुन

तू निजता शांत मी अशी रात्र जागणार
मी का उठतो उशिरा तुज कैसे उमगणार?

-सत्यजित.

Friday, November 28, 2008

उठा बापू उठा

उठा बापू उठा आणि
द्या पुन्हा अंहीसेचे धडे
तुम्ही उभारल्या पोकळ भींतीना
जाउ लागलेत तडे
रक्ताळलेला हा शुभ्र पंचा
कुठवर मिरवत फिराल
वाटल नव्हत.. त्याच्या शस्त्रास्त्रांच्या ढिगार्‍यात
तुम्ही एक रिकाम काडतुस होउन उराल
अस का केल बापू तुम्ही?
घर झाडू पण दिल नाहीत
आता घर साफ कराव म्हणल
तर भीतींच उरल्या नाहीत
एक गोचिड चिरडवी म्हटल तर
तुमच महात्म्य आडव येत
आपलच रक्त बोटाला लागव
तर हीरव्यांना वावड होत
तुमची आधराला घ्यावी काठी
तर ते उगारली म्हणतात
ती हाणुन आमच्या पाठी
ते सदैव कण्हत असतात
तुम्ही येवढी सवय केलीत
दुसर्‍यांचा मार खायची
त्यांनी एक हात छाटला
तर दुसरा पुढे करायची
तुम्हाला नोटेवरती छापलय
तुम्ही सारं जग व्यापलय
पिसाळलेल कुत्र देखिल
गोंजाराव म्हणत आपलय
तुमच्या अंहीसेच्या कुर्‍हाडीला
अर्धमाचा दांडा
पित्यानेच का घालावा
पोराच्या म्स्तकी धोंडा?
उठा बापू उठा आणि
द्या पुन्हा अंहीसेचे धडे
आम्ही अंगाखांद्यावर खेळवतोय
तुमचे रक्तपिपासु किडे...

Tuesday, November 25, 2008

बप्पा तुला पेंटींगला केवढा मोठ्ठा पेपर (बालकविता)

मायबोली.कॉमच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली ही बालकविता.
बप्पा तुला पेंटींगला केवढा मोठ्ठा पेपर
सका्ळी संध्याकाळी वेगवेगळे वेगळे कलर

बप्पा तुझ्या पेंटींग मध्ये ढग कीती छान
दडुन बसला सुर्य बघतो हळुच काढुन मान

अरे!डोंगराच्या पेंटींगवर पाखरांचे थवे
रोज कसे देतोस सांग आकार नवे नवे

शुभ्र ढगां देतोस का पावसाळ्यात टांग
विजे साठी वापरलास रंग कुठला सांग

पावसाच्या पेंटींगवर थेंब खरे खरे
सप्तरंगी धनुष्य काढलेस कसे बरे?

रात्री तुझ्या डब्यातले रंग संपतात का रे
काळ्या पांढर्‍या रंगानीच रंगवतोस का सारे

पट्टी, कंपास शिवाय कसं जमत तुला रे?
उन्हाळ्याच्या सुट्टीत माझी ट्युशन घेशील का रे?

बप्पा तुला पेंटींगला केवढा मोठ्ठा पेपर
सकाळ संध्याकाळी वेगळे वेगळे कलर...

सत्यजित.

Thursday, November 20, 2008

वनराणी

पायी पाचोळ्याचे चाळ
पानोपानी सळसळ
तिच्या अंकुरल्या ज्वानी
कांती काचोळीचे वळ

झुळझुळता ओढा
तिने घेतला स्तनावर
अंग अंगभर काटा
शिरशिरी मनभर

ती केतकी नहाली
ओढा नागिण सरसर
धुंध गंध जलावर
ओढा वाही दुर दुर

उघड्या पाठीवर केस
कुरळ्या लता लांब लांब
तिच्या डहुळल्या कटी
तळी चंदनाचे खांब

ओल्या केसातुन पाणी
थबकले पाठीवर
जसा थेंब तेजाळतो
झुळझुळ अळवावर

काळ्या कातळाच्या पाठी
ओल्या पावलांचे ठसे
उत्तान नागीण नागवी
कोवळे उन खात बसे

-सत्यम

Thursday, November 6, 2008

सिगरेटचं थोटूक

एका अशाच काविळलेल्या संध्याकाळी
धुरकटलेल्या श्वासासंगे
हातातल अर्धवट थोटूक सुद्धा प्रकाशत होत,
मला वेड्याच हसु आलं,
थोड्याच वेळात, तो शेवटच्या घटाका मोजत असताना
मी कुठलीही दया न दाखवता
चिरडणार होतो त्याला, ह्या कट्ट्यावर
आणि भिरकावणार होतो अंथांग समुद्रात
तो विझणार होता , तो सुटणार होता,
तो मोकळा होणार होता, मला न विझवता....
भुरभुरणारा वारा होता
हेलकावणारा अंथांग समुद्र
एखादी लाट येउन आदळत होती
माझ्या अर्धोन्मिलीत मनातल
मिणमिण चैतन्य जागत ठेवायला ...
ही संध्याकाळ कधी तरी सोनेरी असायची
अगदी लख्ख सोनेरी...
तिच्या सहवासात, तिच्या गंधात अखंड बुडालेली
अंथांग समुद्राच्या आणि केशरी वर्तुळाच्या साक्षीने
रंगवली जायची कीतीतरी उद्याची स्वप्ने
मग चांदण भरून यायच,
त्या अंधारात लखलखत चांदण पांघरुन सजायचा तो समुद्र..
मी तिला म्हणायचो,
'तू देखिल अशीच सजशिल ना त्या रात्री नुसत लखलखत चांदण लेउन'
ती माझ्या दंडाला चिमटा काढत.. घट्ट बिलगायची
मला कधीच कळायच नाही की तिच अंग का शहारत..?
पश्चिमेच्या गार वार्‍या मुळे.. की माझ्या उधाणलेल्या रुधिरामुळे?
आता कधीच कळणारही नाही...
आता ती उब नाही, ते केशरी वर्तुळ नाही...
आता उरलिय ती फक्त मिणमिणत्या विस्तवाची साथ..
मला दया आली त्याची
एक शेवटचा झुरका घेउन,
मी त्याला बसवल माझ्या शेजारी
माझ्या सारखच कणा कणान
मरण त्याच्याही नशिबी आल होतं ना...
म्हटल "बस! दोघे एकदम राख होउ"
तुला पेटवुन ती काढी कधीचीच विझुन गेली नाही
माझ्या देखिल अयुष्यात ती अशीच आली
एका उजळलेल्या फुरफुरत्या काडी प्रमाणे
नशिबाशी ओंझळ तिच्या प्रकाशाने उजळुन गेली, भरुन गेली
मी देखिल तेवू लागलो होतो तिच्या संगे
वाटल होत आता असेच तेवत राहू एकमेकांसाठी अयुष्याभर..
पण छे! नशिबाची ओंझळ ती...
झटक्यात विरुन गेली,
तिला विझवुन गेली...
आणि मी जगतोय अजुन कणाकणाने जळत.. कणाकणाने जळत...
आता अयुष्य एक सिगरेट थोटुक होउन राहीलय...
कुणी चिरडतय का याची वाट बघत...

-सत्यजित

पाकीजा

उमराव शोधातात की शोधताय नरगिस
इथे पाकीजा शब्दच मुळी खोटा आहे,
वेड्यांन्नो हा फक्त कोठा आहे

उदरात काय पेक्षा पदरात काय
फायद्याच्या सौद्यात तोटा आहे
हा कोठा आहे हा कोठा

चेहरा नाही ना मोहरा नाही
सारा बंद निनावि लखोटा आहे
हा कोठा आहे हा कोठा आहे

कायद्याचा देव, वायद्याचा देव
पुजलेला देव देखिल थोटा आहे
हा कोठा आहे हा कोठा आहे

न दिव्यात वात ना मदतीचा हात
इथे पैसा फक्त मोठा आहे
हा कोठा आहे हा कोठा आहे

अंगाला रंग रंगाला अंग
अंगाचा संग वांझोटा आहे
काय शोधतोस खुळ्या हा कोठा आहे

Wednesday, October 29, 2008

कंबखत दैव

त्या जादूई क्षणात सांग काय दडले होते
मन काबुत नसताना सांग काय घडले होते

तव गोर्‍या नितळ कांती लव सांजेच्या उन्हाची
फुलल्या श्वासास संध्येचे पिसे जडले होते

अधरामृतात तुझ्या आकंठ संजीवताना
माळुन केसात जुई चांदणे उघडले होते

भाळी ठेवले ओठ सैल केली मिठी जराशी
पण रुणझुणत्या पैजणांत पाउल अडले होते

ढळला हळुच हुंदका अबोला बोलून गेला
तुझ्या पावलांत आसवांचे फुल पडले होते

सोडवून गेलो हात वळवाची होती रात
होता पाऊस खरा का आभाळ रडले होते

न सरली अजुन रात्र ती उरली उरात माझ्या
का कंबखत दैवाने मलाच निवडले होते?...

-सत्यजित.

Saturday, September 27, 2008

सावंतांचा महिमा फाजिल झाली पोर (विडंबन)

गावाल्यानु तुम्ही आता पर्यंत, मराठी विडंबने ऐकत होता. मा़झ्या टाळक्यात असो इचार इलो की मालवणीत विडंबन करुचा, तर मंडळीन्नु. मालवणी म्हंटला की कोकण इला, कोकण म्हंटल की सावंतवाडी ईली..आनी मग इले सांवत , सांवत म्हनले की ईली राखी सांवत. माका वाट्लाच तुमका गुदगुदल्यो होतोल्यो..जरा दमान घ्या... राखी सावंत म्हनले की लागले कुदायला...

तर गाव वाल्यान्नू आणि त्यांच्या मंडळीन्नू.. सिन असो आसा ...
कोकणातल्या निळ्या खाडी एक शिड चल्ला हा, आणि त्या शिडात कोकणी युगुल बसलेल असा (नुतन आनी सुनिल द्त्त) ... ते राखी सावंत बद्दल गझाली करतत... गान सांगुची गरज हा काय? मुजीक चालू..

तो: सावंतांचा महिमा फाजिल झाली पोर
ती:सावंतांचा महिमा फाजिल झाली चोर
तो: फाजिल झाली पोर
ती: फाजिल झाली चोर

तो: चोर नाय गो पोर.. पोर.

ती: फाजिल झाली पोर

तो: असा..
माका काय सांगता बघ गे , कपडे चोरान गेलो चोर
सावंतांचा महिमा फाजिल झाली पोर
पण चला रे हुडकून काढू, कोन ह्यो बनलो चिंधी चोर
{
तो:
रामा अजब आहे ही राखी मय्या
ती:
अय्या बांधेल गो राखी, करेल हो भय्या..
} ||२||

तो:
हे भय्ये इथले झालेत, माजोरे शिरजोर
पण चला रे हुडकून काढू, कोन ह्यो बनलो चिंधी चोर

ती : ओ....

ती,तो :
सावंतांचा महिमा फाजिल झाली पोर
माका काय सांगता बघ गे , कपडे चोरान गेलो चोर

ती: माका काय विचरतास मरे, हीका रे विचारा
तो: फाटकी गो कापडा हिची कोन चोरेल बरा

ती: फाटक्या चिंध्या नुसत्या,नं असतले नुसते दोर
तो:चला रे हुडकून काढू, कोन ह्यो बनलो चिंधी चोर

तो: ओ....

ती,तो :
सावंतांचा महिमा फाजिल झाली पोर
माका काय सांगता बघ गे , कपडे चोरान गेलो चोर

ती:
कोणते मलम बाई चोळता थोबाडा
रोजचो तमाशो हिचो, रोज नवो राडा
काय नाय घातल्यान कपरे, तर चोरात काय तो चोर
पण चला रे हुडकू काढू, कोन ह्यो बनलो चिंधी चोर
सावंतांचा महिमा फाजिल झाली पोर
माका काय सांगता बघ गे , कपडे चोरान गेलो चोर.

-सत्यजित

Tuesday, September 16, 2008

आई... हळुहळू हळुहळू सुर्य कुठे गेला? (बालकविता)

आई... हळुहळू हळुहळू सुर्य कुठे गेला?
जाता जाता सांग त्याने प्रकाश का नेला?

ठेवुन जा प्रकाश म्हणाले मी त्याला जाताना
नाही म्हणाला उद्या आणिन सोबत पुन्हा येताना
अंधाराची भीती सांग वाटते का त्याला?
आई, अंधाराची भीती सांग वाटते का त्याला?...

थांब म्हणाले थोडा वेळ येतिल चांदण्या आकाशात
त्या म्हणाला येणार नाहीत येवढ्या माझ्या प्रकाशात
खरच सांग चांदण्या का घाबरतात त्याला? आई...

ऐकत नाहीस माझं काहीच आहेस किती हट्टी रे
चांदोबाशी सांग कशाला घेतलिस उगा कट्टी रे
चांदोबाशी बट्टी घ्यायला सांग ना तू त्याला.. आई...

थांब म्हटलं थोडा वेळ मिळुन सारे खेळू खेळ
जायला हव म्हणाला आता घालवुन चालणार नाही वेळ
संध्याकाळीची सांग त्याला असते का शाळा? आई...

-सत्यजित

Sunday, September 14, 2008

हर्षे स्विकारावी भक्तांची सेवा

जय देव जय देव जय गणपती देवा
हर्षे स्विकारावी भक्तांची सेवा ||धृ||

लंबोदर सुंदर पाषंकुशधारी
वरदहस्ते मुर्ती मुषकाची स्वारी
नागेन्द्राचा विळखा धारूनिया उदरी
रत्नजडीत मुकुट शोभतो शिरी ||१||

सर्वांग सुंदर देवा गणराया
आदिशक्तीशाली गौरीच्या तनया
भक्तांची दु:खे नेशी तु विलया
तारिशी सारी विघ्ने करूनी तू किमया ||२||

कार्यारंभी पूजन तुझे करावे
निर्विध्न तू कार्य सिद्धीस न्यावे
संकट येता देवा मज तू तारावे
अनंतरूपे दर्शन आम्हा तू द्यावे ||३||

त्रैलोक्याचा देव देवांचा त्राता
दीनांचा उद्धार, ज्ञानाचा दाता
बुद्धीचा तू देव विद्यागणनाथा
सद्भावे ठेवितो तव चरणी माथा ||४||

तू कोटी सूर्य तेज निर्गुण आकार
ज्ञानियांचा राजा सद्गुण साकार
जय जय श्री गणराज मज तू पावावे
मानून घे ही सेवा केली मनोभावे ||५||

जय देव जय देव जय गणपती देवा
हर्षे स्विकारावी भक्तांची सेवा ||धृ||

~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~
हे अजून एक कडवं .. बप्पांच्या निरोपाचं

आनंदे उत्सवे राहिलासी देवा
पुढच्यावर्षी लवकर येशील ना देवा
काही झाले अनुचित देवा क्षमा असावी
तुझी सतकृपा सदैव आम्हावरी व्हावी || ६||

Thursday, September 11, 2008

जगुन घे रे गड्या.. राहुन जाईल जगायचं...

जगुन घे रे गड्या.. राहुन जाईल जगायचं
मारुन घे रे उड्या.. राहुन जाईल उडायचं
बघता बघता कुपीतलं
अत्तर उडुन जाईल
लाउ लाउ म्हणता म्हणता
कुपी नाहीशी होइल
आज आहे.. उद्या येईल
असेलही परवा
नाही पाहिला उद्या कोणी?
मग कशा फुका पर्वा
जगुन घे रे गड्या एकदाच असत जगायचं
जगताना जगण्यावर ओझ नसत व्हायचं

जगुन घे रे गड्या.. राहुन जाईल जगायचं
मारुन घे रे उड्या.. राहुन जाईल उडायचं....

Tuesday, September 9, 2008

ओ लाल जुडी फुलं... (गणेश स्तवन)

हो लाल मेरी पत .. दमा दम मस्त कलंदरच्या चलीवर हे गणेश स्तवन लिहीण्याचा एक

प्रयत्न... गणरायाच्या चरणी..

ओ लाल जुडी फुलं
ओ लाल जुडी फुलं वाहतो तुला जगपालणा
शिवबाच्या, गौरीच्या तनया तू सुंदर
देवा माझा महोदर, देव माझा लंबोदर
पहिला हो त्याचा नंबर

चार चार हात तुझे , वरद दे देवा
हो पामरांचे पालन, करी सदा जगतारणा
शिवबाच्या, गौरीच्या तनया तू सुंदर
हेरंभा तू सुंदर, देव माझा लंबोदर
पहिला हो त्याचा नंबर

डमडम तुझे डमरु बाजे
गोजिरे रुप तुझे मनी भावे मनमोहना
शिवबाच्या, गौरीच्या तनया तू सुंदर
देव माझा मनोहर,देव माझा लंबोदर
पहिला हो त्याचा नंबर

तव चरणी लेकरु घेई रे लोळण
उचलुनी कडेवरी घेई मला जगपालणा
शिवबाच्या, गौरीच्या तनया तू सुंदर
देव माझा विश्वेश्वर,देव माझा लंबोदर
पहिला हो त्याचा नंबर

तुरुतुरु तुझा उंदीर धावे
होउन मुषकारुढ जाशी देवा जगतारण्या
शिवबाच्या, गौरीच्या तनया तू सुंदर
देव माझा विद्येश्वर,देव माझा लंबोदर
पहिला हो त्याचा नंबर

ओ लाल जुडी फुलं
ओ लाल जुडी फुलं वाहतो तुला जगपालणा
शिवबाच्या, गौरीच्या तनया तू सुंदर
देवा माझा महोदर, देव माझा लंबोदर
पहिला हो त्याचा नंबर

-सत्यजित

Monday, September 8, 2008

असावा सुंदर पापलेटचा बंगला

आता श्रावण संपला, आणि नारळी पोर्णिमा पण झाली आता रहावत नाही हो... तळलेल्या माशांचा आणि तिरफळ घातलेल्या कालवणाचा घमघमाट आता मनाचा ठाव घेत आहे... आणि मन लहान होउन गात आहे...


असावा सुंदर पापलेटचा बंगला
चंदेरी रुपेरी सुरमईचा चांगला

पापलेटच्या बंगल्याला सारंग्याचे दार
धार धार डेंग्यांच्या कुर्ल्या पाहरेदार

गोल गोल कोळंब्यांच्या खिडक्या दोन
हॅल्लो हॅल्लो करायला लॉबस्टरचा फोन

मांदेल्यांचा सोनेरी रंग छानदार
बांगड्यान्ना अंगभर खवले थोडे फार

बंगल्याच्या छतावर कालवा रहातो
शिंपीतल्या तिसर्‍यांशी लपाछपी खेळतो
लांब लांब करल्यांचा नाच रंगला
बोंबलाचा मासा मस्त चांगला...

कित्ती कित्ती चविचा पापलेटचा बंगला
सोलकढी भातासंगे मस्त हाणला...

-सत्यजित.

Thursday, September 4, 2008

बप्पा दे गोड चॉकलेट सारखं सुखं....

बप्पा तू करतोस खरच आयडीया किती मस्त
येवढ्या सगळ्यां गोंगाटात बसतोस कसा स्वस्थ?

आम्ही काही मागता टिचर आमच्यावर ओरडतात
वन बाय वन म्हणतं, सगळ्यांना रांगेत उभे करतात

हं... तरीच तुझे सुपा येवढे मोठ्ठे मोठ्ठे कान
एकदम सगळ्यांच एकुन घेतोस देवा तू महान

कशी मस्त आईडिया तुझी, तुला केवढी मोठ्ठी सोंड
कानात गंम्मत सांगायला, न्यायला नको जवळ तोंड

लाल लाल शेला छान, पिवळं धोतर आहेस नेसलस,
अरे वाजेल ना थंडी तुला, तू शर्ट का नाही घातलस?

आजींनी विणलं स्वेटर त्यावर मस्त जॅकेटचा ड्रेस
देतो नविन जिन्स पँट वाटल्यास त्यावर धोतर नेस

किती घातलेस दागिने आणि किती घातलेस हार?
सगळ्यात दुर्वा नी जास्वंद, तुला आवडत ना फार

कुठे मोदकांच ताट, कुठे शि-याचा टोप
काहीच न खाता तुझं वाढलं कसं पोट?

आई सारखंच तुझही मी खाता का पोट भरतं?
आइच म्हणते तुझ्या चरणी सर्वाच दु:ख हरत

बप्पा मला सांग जरा हे दु:ख काय असतं
कान, नाक, गुढगा, पोट नक्की काय दुखतं?

काहीच नको दुखायला, कुणा देउ नकोस दु:ख
शहाणा कर सगळ्यांना, दे चॉकलेट सारखं सुखं

बप्पा दे गोड चॉकलेट सारखं सुखं....

-सत्यजित.

Wednesday, August 27, 2008

सतावुन जाणार्‍या आठवणी

सतावुन जाणार्‍या आठवणींना
मातू देऊ नको म्हणालास खरा
पण जाता जाता त्याच आठवणी देउन गेलास
तू काय दिलस, तू काय नेलस
ह्याचा हिशोब करताना
हसर्‍या आठवणींचेही डोळे पाणावतात
त्यांचे डोळे पुसण्याचे सामर्थ्य नाही रे माझ्यात
माझ्यातला तू मात्र माझे डोळे पुसत रहातोस
आणि मग पुन्हा डोळे पाणावतात
कदाचित तू पुसत रहावस म्हणुन
तू काय, तुझ्या आठवणी काय
तितकच प्रेम करतात माझ्यावर
आणि तरीही तुझे शब्द आठवत रहातात
'सतावुन जाणार्‍या आठवणीना मातु देऊ नकोस'

-सत्यजित.

Monday, August 25, 2008

किरकिर... कुरकुर... (बाल कविता)

एकदा सगळ्या कीड्यांची रानात भरली सभा
गवतामध्ये पाना मागे धरुन बसले दबा

आला तिकडुन भुंगा त्यानी केला खुप दंगा
चाविन कडकडुन म्हणाला जर घ्याल कुणी पंगा

तिकडुन आली मुंगी हलवत तिची ढुंगी
मुंगळा म्हणाला नाच तिला मी वाजवितो पुंगी

इतक्यात उड्या मारत कोठुन आला नाकतोडा
अंधाराला घाबरलेला वाटत होता थोडा

अंधारात काजवा मात्र मिरवत होता ऐट
लुकलुक हींडत होता ठेउन चड्डीत लाईट

रातकीडा म्हणाला.. मित्रांनो! चला देउया का नारे ?
किरकिर किरकिर कुरकुर कुरकुर ओरडुया रे सारे !

किरकिर किरकिर कुरकुर कुरकुर ओरडुया रे सारे..

किरकिर किरकिर... कुरकुर कुरकुर...
किरकिर किरकिर... कुरकुर कुरकुर...

काट्यानां लाउन जेल शाईन मारतय सुरवंट
झूरळ जाउन कोपर्‍यात खात बसलय सुंठ

गोगलगाय म्हणाली, मित्रांनो मी येउन करणार काय?
तुम्हा सगळ्यांना सहा पाय पण मला एक पण नाय

तुम्ही सगळे जाल पळुन नी कोणी जाईला उडुन
मला सोडुन जात म्हणाल तू बस तुझ्या शंखात दडुन

फुलांचा लागलाय सेल फुलपाखारांना नाही मुळीच वेळ
आणि माशी, मच्छर खाता बसलेत रस्त्यावरची उघडी भेळ

बाकी सगळे किडे इकडुन तिकडुन पळतायत
किटकनाशके मारुन मारुन... ही माणस त्यांना छळतायत... वात आणला आहे ह्या माणसांनी....

निषेद नोंदवा जाहीर सभा... किरकीर.. कुरकूर....


-सत्यजित.