Friday, November 28, 2008

उठा बापू उठा

उठा बापू उठा आणि
द्या पुन्हा अंहीसेचे धडे
तुम्ही उभारल्या पोकळ भींतीना
जाउ लागलेत तडे
रक्ताळलेला हा शुभ्र पंचा
कुठवर मिरवत फिराल
वाटल नव्हत.. त्याच्या शस्त्रास्त्रांच्या ढिगार्‍यात
तुम्ही एक रिकाम काडतुस होउन उराल
अस का केल बापू तुम्ही?
घर झाडू पण दिल नाहीत
आता घर साफ कराव म्हणल
तर भीतींच उरल्या नाहीत
एक गोचिड चिरडवी म्हटल तर
तुमच महात्म्य आडव येत
आपलच रक्त बोटाला लागव
तर हीरव्यांना वावड होत
तुमची आधराला घ्यावी काठी
तर ते उगारली म्हणतात
ती हाणुन आमच्या पाठी
ते सदैव कण्हत असतात
तुम्ही येवढी सवय केलीत
दुसर्‍यांचा मार खायची
त्यांनी एक हात छाटला
तर दुसरा पुढे करायची
तुम्हाला नोटेवरती छापलय
तुम्ही सारं जग व्यापलय
पिसाळलेल कुत्र देखिल
गोंजाराव म्हणत आपलय
तुमच्या अंहीसेच्या कुर्‍हाडीला
अर्धमाचा दांडा
पित्यानेच का घालावा
पोराच्या म्स्तकी धोंडा?
उठा बापू उठा आणि
द्या पुन्हा अंहीसेचे धडे
आम्ही अंगाखांद्यावर खेळवतोय
तुमचे रक्तपिपासु किडे...

Tuesday, November 25, 2008

बप्पा तुला पेंटींगला केवढा मोठ्ठा पेपर (बालकविता)

मायबोली.कॉमच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली ही बालकविता.
बप्पा तुला पेंटींगला केवढा मोठ्ठा पेपर
सका्ळी संध्याकाळी वेगवेगळे वेगळे कलर

बप्पा तुझ्या पेंटींग मध्ये ढग कीती छान
दडुन बसला सुर्य बघतो हळुच काढुन मान

अरे!डोंगराच्या पेंटींगवर पाखरांचे थवे
रोज कसे देतोस सांग आकार नवे नवे

शुभ्र ढगां देतोस का पावसाळ्यात टांग
विजे साठी वापरलास रंग कुठला सांग

पावसाच्या पेंटींगवर थेंब खरे खरे
सप्तरंगी धनुष्य काढलेस कसे बरे?

रात्री तुझ्या डब्यातले रंग संपतात का रे
काळ्या पांढर्‍या रंगानीच रंगवतोस का सारे

पट्टी, कंपास शिवाय कसं जमत तुला रे?
उन्हाळ्याच्या सुट्टीत माझी ट्युशन घेशील का रे?

बप्पा तुला पेंटींगला केवढा मोठ्ठा पेपर
सकाळ संध्याकाळी वेगळे वेगळे कलर...

सत्यजित.

Thursday, November 20, 2008

वनराणी

पायी पाचोळ्याचे चाळ
पानोपानी सळसळ
तिच्या अंकुरल्या ज्वानी
कांती काचोळीचे वळ

झुळझुळता ओढा
तिने घेतला स्तनावर
अंग अंगभर काटा
शिरशिरी मनभर

ती केतकी नहाली
ओढा नागिण सरसर
धुंध गंध जलावर
ओढा वाही दुर दुर

उघड्या पाठीवर केस
कुरळ्या लता लांब लांब
तिच्या डहुळल्या कटी
तळी चंदनाचे खांब

ओल्या केसातुन पाणी
थबकले पाठीवर
जसा थेंब तेजाळतो
झुळझुळ अळवावर

काळ्या कातळाच्या पाठी
ओल्या पावलांचे ठसे
उत्तान नागीण नागवी
कोवळे उन खात बसे

-सत्यम

Thursday, November 6, 2008

सिगरेटचं थोटूक

एका अशाच काविळलेल्या संध्याकाळी
धुरकटलेल्या श्वासासंगे
हातातल अर्धवट थोटूक सुद्धा प्रकाशत होत,
मला वेड्याच हसु आलं,
थोड्याच वेळात, तो शेवटच्या घटाका मोजत असताना
मी कुठलीही दया न दाखवता
चिरडणार होतो त्याला, ह्या कट्ट्यावर
आणि भिरकावणार होतो अंथांग समुद्रात
तो विझणार होता , तो सुटणार होता,
तो मोकळा होणार होता, मला न विझवता....
भुरभुरणारा वारा होता
हेलकावणारा अंथांग समुद्र
एखादी लाट येउन आदळत होती
माझ्या अर्धोन्मिलीत मनातल
मिणमिण चैतन्य जागत ठेवायला ...
ही संध्याकाळ कधी तरी सोनेरी असायची
अगदी लख्ख सोनेरी...
तिच्या सहवासात, तिच्या गंधात अखंड बुडालेली
अंथांग समुद्राच्या आणि केशरी वर्तुळाच्या साक्षीने
रंगवली जायची कीतीतरी उद्याची स्वप्ने
मग चांदण भरून यायच,
त्या अंधारात लखलखत चांदण पांघरुन सजायचा तो समुद्र..
मी तिला म्हणायचो,
'तू देखिल अशीच सजशिल ना त्या रात्री नुसत लखलखत चांदण लेउन'
ती माझ्या दंडाला चिमटा काढत.. घट्ट बिलगायची
मला कधीच कळायच नाही की तिच अंग का शहारत..?
पश्चिमेच्या गार वार्‍या मुळे.. की माझ्या उधाणलेल्या रुधिरामुळे?
आता कधीच कळणारही नाही...
आता ती उब नाही, ते केशरी वर्तुळ नाही...
आता उरलिय ती फक्त मिणमिणत्या विस्तवाची साथ..
मला दया आली त्याची
एक शेवटचा झुरका घेउन,
मी त्याला बसवल माझ्या शेजारी
माझ्या सारखच कणा कणान
मरण त्याच्याही नशिबी आल होतं ना...
म्हटल "बस! दोघे एकदम राख होउ"
तुला पेटवुन ती काढी कधीचीच विझुन गेली नाही
माझ्या देखिल अयुष्यात ती अशीच आली
एका उजळलेल्या फुरफुरत्या काडी प्रमाणे
नशिबाशी ओंझळ तिच्या प्रकाशाने उजळुन गेली, भरुन गेली
मी देखिल तेवू लागलो होतो तिच्या संगे
वाटल होत आता असेच तेवत राहू एकमेकांसाठी अयुष्याभर..
पण छे! नशिबाची ओंझळ ती...
झटक्यात विरुन गेली,
तिला विझवुन गेली...
आणि मी जगतोय अजुन कणाकणाने जळत.. कणाकणाने जळत...
आता अयुष्य एक सिगरेट थोटुक होउन राहीलय...
कुणी चिरडतय का याची वाट बघत...

-सत्यजित

पाकीजा

उमराव शोधातात की शोधताय नरगिस
इथे पाकीजा शब्दच मुळी खोटा आहे,
वेड्यांन्नो हा फक्त कोठा आहे

उदरात काय पेक्षा पदरात काय
फायद्याच्या सौद्यात तोटा आहे
हा कोठा आहे हा कोठा

चेहरा नाही ना मोहरा नाही
सारा बंद निनावि लखोटा आहे
हा कोठा आहे हा कोठा आहे

कायद्याचा देव, वायद्याचा देव
पुजलेला देव देखिल थोटा आहे
हा कोठा आहे हा कोठा आहे

न दिव्यात वात ना मदतीचा हात
इथे पैसा फक्त मोठा आहे
हा कोठा आहे हा कोठा आहे

अंगाला रंग रंगाला अंग
अंगाचा संग वांझोटा आहे
काय शोधतोस खुळ्या हा कोठा आहे