Thursday, November 20, 2008

वनराणी

पायी पाचोळ्याचे चाळ
पानोपानी सळसळ
तिच्या अंकुरल्या ज्वानी
कांती काचोळीचे वळ

झुळझुळता ओढा
तिने घेतला स्तनावर
अंग अंगभर काटा
शिरशिरी मनभर

ती केतकी नहाली
ओढा नागिण सरसर
धुंध गंध जलावर
ओढा वाही दुर दुर

उघड्या पाठीवर केस
कुरळ्या लता लांब लांब
तिच्या डहुळल्या कटी
तळी चंदनाचे खांब

ओल्या केसातुन पाणी
थबकले पाठीवर
जसा थेंब तेजाळतो
झुळझुळ अळवावर

काळ्या कातळाच्या पाठी
ओल्या पावलांचे ठसे
उत्तान नागीण नागवी
कोवळे उन खात बसे

-सत्यम

1 comment: