Saturday, June 4, 2011

संधीसाधू पाऊस

एक ओली छत्री,
बस मध्ये चढली
तशीच ओली निथळती
सीट वरती दुमडली
खिडकी बाहेर, दारावर
काचांवरल्या धारांवर
धावत्या तरुंच्या पारांवर
खाबांवरल्या तारांवर...
इथे तिथे पसरलेल्या नजरा
आल्या होत्या भानावर

सारे पारधी साव़ज झाले...
निवांत बसले सावध झाले
इतके सावध की...
कुणी सांगुन खिसा कापावा इतके बेसा­वध

पुढच्या माना अचानक
करु लागतात व्यायाम
किमान दोनशे अंशात फिरली नाही
तर मानेच काय काम?

मागचे पुढे, पुढचे मागे
एक ओझरती झलक... आणि उगाच त्रागे..

हा पाऊस काही पहीला नव्हता
तरी इतका मोहक पाहीला नव्हता
बावर्‍या सावळ्या नभांवर
ओघळताना पाहिला नव्हता

ओढणी इतकी सावधान
बिलगून बसली होती छान
हात तिला दाटवती ,
"अगं किती बिलगशील, आहे का भान?"

कुठून येतोय हा मृदगंध?
जो, तो पहात होता
तिच्या ओढणीला बिलगुन
वारा नकळत वहात होता

हळुवार पाऊसही
तिला पाहताच धावला असेल
पावसाला पाहुन असा
वाराही कावला असेल

त्यात छत्री होती तकलादू
पाऊस पाहतो संधी साधू
ढगांत ध्यानस्त बसलेला
विरघळुन जातो ढोंगीसाधू

मी तर एक साधा माणुस
पण नभांनी तरी सावरायच?
मा़झ्याकडे जर असता पाऊस
तर कठीणच होतं आवरायच...

आता मेलो तरी चालेल
पण एकदा मला वर जायचय
तेवढ्या एका छत्रीसाठी
एकदा तरी पाऊस व्हायचय....

तेवढ्या एका छत्रीसाठी
एकदा तरी पाऊस व्हायचय....

- सत्यजित

1 comment:

  1. सत्यजित नमस्कार ,
    खूपच सुंदर ....असा मोहक पाउस अनुभवायला अशीच मोहक नजर आणि लेखणी हवी .व्वा ,सुंदर !

    ReplyDelete